आयुष्यातले सांगाती २३,
भगतसिंहजी कोशियारी,
ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
भगतसिंहजी कोशियारी हे २०१९ ते २०२३ या कालखंडात महाराष्ट्राचे राज्यपाल होते. त्या काळात राजकीय वर्तुळात ते सर्वाधिक चर्चेत राहिले ते त्यांच्या घटनेच्या चौकटीत काम करण्याच्या मानसिकतेतून. त्यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार होते. तर केंद्रात भाजपप्रणित सरकार होते. त्यामुळे कोशियारीजी हे घटनेच्या चौकटीत राहूनच काम करणारे असल्याने राज्यात सत्तारूढ असलेल्या शिवसेना नेत्यांची त्यांची सतत तू तू मै मै चालायची. त्यामुळे त्यांची कारकीर्द काहीशी वादग्रस्तच ठरली होती. मला आठवते उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी घटनेची चौकट मोडून शपथ घेण्याचा प्रयत्न केला होता. कोशियारीजींनी व्यासपीठावरूनच त्यांना थांबवून पुन्हा शपथ घ्यायला लावली होती. त्याचप्रमाणे विधानसभा अध्यक्षांच्या निवडी संदर्भात देखील त्यांनी सरकारला घटनेच्या चौकटीत अडवून घेतले होते. विधान परिषदेतील राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांची नावे देखील घटनेच्या चौकटीत नसल्यानेच त्यांनी रोखून धरली होती. त्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी खूप आदळ आपट केली पण ते बधले नव्हते.
असे असले तरी माणूस म्हणून कोशियारीजी एक दिलखुलास व्यक्तिमत्व होते. भेटलेल्या प्रत्येकाशी ते जिव्हाळ्यानेच वागायचे आणि शक्यतोवर प्रत्येकाची आठवण देखील ठेवायचे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जेमतेम साडेतीन वर्षाच्या वास्तव्यात इथे अनेकांशी त्यांचे स्नेहबंध जुळले होते.
त्या अनेकांपैकी मी देखील एक होतो. साधारणपणे महाराष्ट्राचे राज्यपाल दरवर्षी हिवाळी अधिवेशनात नागपुरात येतात. त्यावेळी ते अधिवेशनातील मान्यवर आणि स्थानिक मान्यवर नागरिकांसाठी एक स्नेह भेटीचा कार्यक्रम आयोजित करत असतात. एक पत्रकार म्हणून मला देखील त्या कार्यक्रमांना जाण्याचा योग येतो. कोशियारी जी महाराष्ट्राचे राज्यपाल सप्टेंबर २०१९ मध्ये बनले. त्यावर्षी डिसेंबर मध्ये जेमतेम एक आठवड्याचे हिवाळी अधिवेशन झाले. त्याआधी नवे सरकार स्थापन करताना बरेच घोळ झाले होते. त्यामुळे कोशियारीजी नागपुरात फिरकलेच नाहीत. नंतर लगेचच कोरोना आला. त्यामुळे त्यांची कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट होण्याची शक्यताच नव्हती.
ऑक्टोबर २०२० मध्ये माझा दृष्टिक्षेप हा वैचारिक लेखांचा संग्रह आणि सत्तेच्या सावलीत हा राजकीय कथांचा संग्रह प्रकाशासाठी सिद्ध होणार होता. नोव्हेंबर मध्ये त्याचा प्रकाशन समारंभ करावा असे म्हणत होते. मात्र कोरोनामुळे तो समारंभ मोठ्या प्रमाणात न करता ऑनलाइनच घ्यावा लागणार होता. त्यासाठी कोणाशी बोलावे असा विचार डोक्यात चालू होता.
दिल्लीहून प्रकाशित होणारे पाक्षिक चाणक्य वार्ता साठी मी अधून मधून लेखन करत असतो. त्याचे संपादक डॉ. अमित जैन माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्याशी बोलताना मी सहजच विषय काढला आणि कोणीतरी मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकांचे ऑनलाईन प्रकाशन व्हावे असा प्रयत्न असल्याचे बोललो. ते लगेचच बोलले कोशियारीजींना विचारू का? मी एकदम दचकलोच. कोशियारीजी हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते. माझ्यासारख्या सामान्य पत्रकार आणि लेखकाच्या पुस्तकाचे प्रकाशन ते करतील का हाच डोळ्यासमोर प्रश्न होता. या दोन पुस्तकांआधी माझी ११ पुस्तके प्रकाशित झाली होती. मात्र राज्यपाल पदी असलेल्या कोणत्याही व्यक्तीकडून प्रकाशनाचा योग आला नव्हता. त्यामुळे मी थोडा विचारात पडलो. पण अमित जैन यांनी आग्रह धरला आणि “तुम्ही तारीख सांगा. त्या तारखेला आपण ऑनलाइन प्रकाशात समारंभ आयोजित करू आणि कोशियारीजी मान्यता देतील” असा त्यांनी शब्दच देऊन टाकला. मग माझी देखील हालचाल सुरू झाली.
१३ नोव्हेंबर २०२० रोजी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर दुपारी चार वाजता आम्ही हा ऑनलाईन पुस्तक प्रकाशन समारंभ ठरवला. माझे विनंती करणारे पत्र मी अमित जैन यांना पाठवले होते. योगायोगाने हा दिवस माझ्या दिवंगत आईचा स्मृतिदिन होता. ते देखील मी पत्रात नमूद केले होते. त्यांनी ते कोशियारीजींकडे पाठवले. लगेचच त्यांच्या
खाजगी सचिवांचा मला फोन आला, आणि मग झपाटून सूत्र हलली. त्या कार्यक्रमाला कोशियारींसह माजी राज्यसभा सदस्य अजय संचेती, ख्यातनाम राजकीय विश्लेषक डॉ. उदय निरगुडकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक लक्ष्मीनारायण भाला असे सर्व मान्यवर सहभागी होणार होते. तोपर्यंत मी कोशियारीजींना फक्त टीव्हीवर बघितले होते. प्रत्यक्ष बोलण्याचा प्रश्नाचे नव्हता.
कार्यक्रमाचे आयोजन चाणक्य वार्ताने केले होते. त्यामुळे कार्यक्रमात कोशियारीजी, मी, चाणक्यवार्ताचे डॉ. अमित जैन, अजय संचेती डॉ. उदय निरगुडकर, लक्ष्मीनारायण भाला, पुस्तकाच्या प्रकाशिका लता गुठे असे सर्व मान्यवर सहभागी झाले होते.
कार्यक्रमाची वेळ दुपारी ४ची ठरली होती. मात्र ऐनवेळी काही तांत्रिक बिघाड झाले आणि सगळे मान्यवर ऑनलाइन कनेक्ट व्हायला दुपारचे सव्वाचार वाजले. दरम्यान राज्यपालांना पाच वाजता जायचे असल्यामुळे माझे प्रास्ताविक मी थोडक्यात आटपावे असे सुचवण्यात आले होते. सर्व मान्यवर ऑनलाइन कनेक्ट झाल्यावर निवेदिका श्रुती देशपांडे ने माझे नाव पुकारले. कोशियारीजींना घाईने जायचे असल्यामुळे मी फक्त पाच वाक्यात माझे प्रास्ताविक उरकले. तितक्यात तिकडून कोशियारीजींचाच आवाज आला. “पाठकजी, आप आपका पूरा भाषण तो कीजिए. पुस्तकोंकी पार्श्वभूमी आप विस्तार से बताईये, ताकी मै भी भाषण कर पाऊंगा, और और आपकी माताजी का आज स्मृतिदिन है. उस विषय मे भी बोलिये” मग मी एक तीन ते चार मिनिटात माझी पार्श्वभूमी मांडली. त्यानंतर अमित जैन यांनी प्रास्ताविक केले आणि मग कोशियारीजननी ऑनलाईन पुस्तकांचे प्रकाशन केले. मग कोशियारीजींना भाषणासाठी निमंत्रित करण्यात आले. कोशियारीजी जवळजवळ १५ मिनिटे बोलले. मराठी भाषेला हिंदीचा तडका दिल्यावर ती भाषा जास्त चांगली वाटते. त्यामुळेच मराठी आणि हिंदी यांच्यात सौहार्द निर्माण होत आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. माझी मराठी पुस्तके त्यांना वाचणे शक्य नव्हते. मात्र त्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी त्या पुस्तकाचे जे सारांश त्यांना दिले होते, त्यानुसार त्यांनी राजकारणाचे योग्य असे चित्र कथा कादंबरी आणि नाटक चित्रपटातून व्हायला हवे असे सांगत त्या दृष्टीने पाठकजींचा हा राजकीय कथांचा प्रयत्न निश्चीत अभिनंदन असल्याचे ते म्हणाले.
त्यादिवशी त्यांना लगेचच दुसऱ्या एका बैठकीसाठी जायचे असल्यामुळे भाषणानंतर ते फार वेळ थांबले नाहीत. मात्र दुसऱ्या दिवशी आश्चर्यकारक रित्या त्यांच्या खाजगी सचिवांचा मला फोन आला आणि त्यांनी माझे कोशियारीजींचीच बोलणे करून दिले. त्यांनी पुस्तक लेखनासाठी माझे अभिनंदन केले आणि मी जानेवारीत नागपूरला येतो आहे, त्यावेळी अवश्य भेटा असे निमंत्रणही त्यांनी मला दिले.
जानेवारी २०२१ मध्ये कोशियारीजींचे विदर्भात कार्यक्रम होते. त्यासाठी ते नागपुरात येणार होते. त्यांच्या दौऱ्यापूर्वी दोन दिवस आधीच मला मुंबईच्या राजभवानातून फोन आला, आणि या दौऱ्यात राज्यपाल महोदय आपल्याला भेटू इच्छितात, त्यासाठी त्यांचे खाजगी सचिव कमालजींशी तुम्ही संपर्कात रहा, अशी सूचनाही आली.
त्यानुसार मी कमलजींच्या संपर्कात होतोच. मग त्यांच्या दौऱ्यात एक दिवस मला वेळ कळवण्यात आली. अजून तुमच्या सोबत कोणी येणार असेल तर त्यांची नावे देखील कळवा असेही सांगण्यात आले. माझ्यासोबत माझी पत्नी सौ अनुरूपा, भारतीय लष्कराला पहिली मार्शल ठेऊन देणाऱ्या संगीतकार डॉ. तनुजा नाफडे ख्यातनाम मराठी साहित्यिक शुभांगी भडभडे आणि माझे मित्र अभिनंदन पळसापुर असे आम्ही पाच जण जाणार होतो. सगळ्यांची नावे मी कळवली. त्यानुसार मला व्हाट्सअप वर सर्वांचे पासेस मिळाले.
ठरल्याप्रमाणे आम्ही सर्वजण नागपूरच्या राजभवनात गेलो. तिथे स्वागत कक्षात आम्हाला बसवण्यात आले. थोड्याच वेळात आतल्या दालनात आम्हाला बोलावले गेले. तिथे कोशियारीजी बसलेले होते. पांढरे धोतर त्यावर पांढराच कुर्ता त्यावर करड्या रंगाचे जॅकेट आणि डोक्यात संघाची काळी टोपी अशा वेशात खुर्चीत बसलेल्या कोशियारीजींनी आईए पाठकजी म्हणून माझे स्वागत केले. कोरोना काळ असल्यामुळे आम्ही सर्वजण तोंडाला मास्क लावून होतो. समोर जाऊन मी एकेकाची ओळख करून देऊ लागलो, तर कोशियारीजी लगेचच म्हणाले “पहिले आप सबलोक मुंहपर के मास्क निकालो, ताकी मे हर किसी का चेहरा ख्याल मे रख पाऊंगा. मग सगळ्यांनी मास्क काढले. मग एकेकाची ओळख करून दिली. तेव्हा नुकतीच संक्रांत आटोपली होती. त्यामुळे जाताना आम्ही तिळगुळाचे लाडू एका डब्यात घालून सोबत नेले होते. डबा उघडून त्यांच्या हातात दिला. तर त्यांनी विचारले हे काय? मग त्यांना सांगितले नुकतीच संक्रांत झाली असल्यामुळे हे तिळगुळाचे लाडू आहेत. त्यांनाही महाराष्ट्राच्या परंपरांची एव्हाना ओळख झाली होती. त्यामुळे लगेचच ते म्हणाले अब मुझे आपसे मिठाही बोलना होगा. आम्ही सर्वांनीच त्याला हसून प्रतिसाद दिला. त्यांनी त्यातला लाडूचा एक तुकडा तोडून खाल्ला आणि आम्हा सर्वांनाही त्यांनी थोडा थोडा तिळगुळ दिला. मग त्यांनी उरलेल्या तिळगुळ उपस्थितांमध्ये वाटायला सांगितला होता. त्यावेळी मी त्यांनी ऑनलाईन प्रकाशित केलेली दोन पुस्तके आणि माझी इतर काही पुस्तके अशी त्यांना सप्रेम भेट दिली
तेव्हा पाठकजी इतना मै कहा पढ पाउंगा असे विचारताना मग त्यांनीच सांगितले की आता मी मराठी शिकतो आहे. राजभवन मधल्याच एका ज्येष्ठ मराठी अधिकाऱ्याची पत्नी मराठीची शिक्षिका असल्यामुळे ती माझी रोज शिकवणी घेते असेही त्यांनी त्यावेळी सांगितले. माझ्या माहितीनुसार त्यावेळीच कोशियारीजींनी पंचाहात्तरी ओलांडली होती. तरीही त्या वयात नवी भाषा शिकण्याचा त्यांचा उत्साह बघून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.
मग थोडा वेळ ते शुभांगीताई भडभडे, डॉ. तनुजा नाफडे आणि अभिनंदन पळसापुरे यांच्याशी बोलले. मग अनुरूपाशी बोलताना ते म्हणाले “तो अभी आप ही पाठक जी की स्फूर्ती देवता हो.” त्यावर अनुरूपाला काही बोलणे सुचलेच नाही. मग “ऐसेही लिखते रहो पाठकजी” असे सांगून त्यांनी ती भेट आटोपती घेतली होती. एक पत्रकार म्हणून याआधी काही राज्यपालांना भेटण्याचा योग आला होता. मात्र कोशियारीजींची ही भेट एकदमच लक्षात राहण्याजोगी होती.
नंतरच्या काळात कोरोनाचा जोर एकदम वाढला होता. त्यामुळे दिवाळी २०२१ पर्यंत बाहेर कुठे कोणाला भेटणे शक्यच होत नव्हते. डिसेंबर २०२१ मध्ये कोशियारीजी एका कार्यक्रमासाठी नागपुरात आले होते. त्याचे वृत्तांकन करण्यासाठी गेलो असताना त्यांची माझी ओझरती भेट झाली होती. मात्र त्या भेटीतही त्यांनी पटकन मला ओळखले आणि “कैसे हो पाठकजी” म्हणून चौकशी केली होती.
जानेवारी २०२२ पासून मी रत्नागिरीचे साप्ताहिक बलवंत साठी संपादकीय सल्लागार म्हणून काम सुरू केले होते. दर आठवड्याला तिथल्या मंडळींशी ऑनलाइन चर्चा करून प्रत्येक अंकाचे स्वरूप कसे असावे हे आम्ही ठरवत होतो आणि त्यानुसार अंक प्रकाशित होत होता.माझ्या सूचनेनुसार त्या साप्ताहिकात बरेच फेरबदल करायचे ठरवण्यात आले, आणि नव्या फेरबदलानुसार पहिला अंक एप्रिल २०२२ च्या पहिल्या आठवड्यात प्रकाशित करायचे ठरले. तो अंक प्रकाशित करण्यासाठी बलवंतचे मालक संपादक बाळ माने यांनी राज्यपालांचीच वेळ मिळवली. त्या कार्यक्रमासाठी मी यावे म्हणून मानेंचा खूप आग्रह होता. त्यांनी माझे रेल्वेचे तिकीट सुद्धा पाठवले. त्यामुळे मग मी कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी मुंबईत पोहोचलो. कार्यक्रम दुपारी चार वाजता ठरला होता. तरीही माने आणि मी सकाळीच राजभवनवर राज्यपालांना भेटण्यासाठी गेलो होतो. तिथे आमची भेट झाल्यावर कोशियारीजींनी लगेचच मला ओळखले “नागपूर मे अपनी मुलाकात हुई थी और आपकी दो पुस्तकं का विमोचन मे मैने किया था” हे त्यांना आठवले. पाच मिनिटे बोलून आम्ही तिथून निघालो.
दुपारी चार वाजता मुंबईतील राजाभवनच्या प्रमुख दालनात बलवंतच्या नव्या अंकाच्या प्रकाशानाचा कार्यक्रम ठरला होता. ठरल्याप्रमाणे चार वाजता कोशियारीजी तिथे पोहोचले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. मानेंनी प्रास्ताविक केल्यावर बलवंतच्या नव्या स्वरूपाची संकल्पना काय ते सांगण्यासाठी मला बोलावण्यात आले. माझे नाव पुकारताच कोशियारीजी लगेच म्हणाले “आइये पाठक जी, आप बताईये”. मग मी माझी भूमिका मांडली. त्यानंतर माझ्यासह रत्नागिरीचेच एक ज्येष्ठ पत्रकार यांचा कोशियारीजींनी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कारही केला. एका राज्यपालाच्या हस्ते झालेला हा माझ्या आयुष्यातील पहिलाच आणि आजपर्यंत तरी शेवटचाच सत्कार होता. कार्यक्रम संपल्यावर कोशियारीजी आत जायला निघाले तेव्हा त्यांनी पाठकजी सब लोग चाय लेके जाना” म्हणून लगेचच तिथल्या सहाय्यकाला सर्वांना चहा द्यायलाही सांगितले होते.
आमच्या कौटुंबिक स्नेही डॉ. तनुजा नाफडे यांचे राग रंजन हे पुस्तक जून २०२२ मध्ये प्रकाशनसाठी सिद्ध झाले होते. याचे प्रकाशन कुणीतरी मान्यवरांच्या हस्ते व्हावे अशी त्यांची इच्छा होती. त्या माझ्याकडे आल्या आणि नितीन गडकरींची वेळ मिळेल का म्हणून त्यांनी विचारणा केली. गडकरींची वेळ काही जुळत नव्हती. त्याच दरम्यान जुलैमध्ये राज्यपाल कोशियारींचा नागपुरात दौरा असल्याची बातमी आली होती. मी तनुजा नाफडेंना विचारले की राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करता येईल का? त्या लगेच तयार झाल्या. मग मी माझे संपर्क वापरून राज्यपालांच्या खाजगी सचिव आणि जनसंपर्क अधिकाऱ्यांची चर्चा केली आणि त्या दौऱ्यात नागपुरातच कार्यक्रम ठरवला. नाफडे मंडळींची इच्छा होती की एखाद्या हॉटेलमध्ये दणक्यात कार्यक्रम आयोजित करू. मात्र कोशियारीजींचा आग्रह होता की राजभवन च्या दरबार हॉलमध्ये कार्यक्रम करावा. मग मी तनुजा नाफडेंना समजावले “तुम्ही सेंटर पॉईंट मध्ये कार्यक्रम केला तरी त्याला जो ग्रेस येणार नाही, तो राजभवन च्या दरबार हॉलमध्ये कार्यक्रम झाला म्हटल्यावर ग्रेस आलेला असेल. मग त्याही तयार झाल्या आणि राजभवनला कार्यक्रम ठरवला गेला. या कार्यक्रमाला राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का या अध्यक्षस्थानी राहणार होत्या, आणि ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित पुस्तकावर बोलणार होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्याची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली होती.
ठरल्या वेळेवर कोशियारी दरबार हॉलमध्ये पोहोचले. आल्यावर त्यांनी आधी शांताक्कांशी संवाद साधला. मग माझ्याकडे बघून कैसे हो पाठकजी? म्हणून चौकशी केली. मग मी तनुजा नाफडेंची त्यांची ओळख करून दिली आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली.
कार्यक्रमात ठरल्यानुसार सर्वांची भाषणे झाली आणि शेवटी निवेदिकेने आभार प्रदर्शनासाठी माझे नाव पुकारले. मी खाली प्रेक्षकात बसलो होतो. उठून मी व्यासपीठाकडे जाऊ लागलो, तर स्टेजवरूनच कोशियाईजींनी आवाज दिला, आईए पाठकजी, अब आपको सुनते है. अर्थात मला फारसे बोलायचे नव्हतेच. मी अवघ्या तीन मिनिटात आभार प्रदर्शन आटोपले आणि राष्ट्रगीतानंतर कार्यक्रम संपला् निघताना पुन्हा एकदा कोशियारीजींनी माझ्याशी संवाद साधला. त्यावेळी माझी पत्नी अनुरूपा देखील सोबत होती. तिच्याशीही ते दोन मिनिट बोलले होते.
त्यानंतर कोशियारीजींची भेट झाली ती सप्टेंबर २०२२ मध्ये. त्यावेळी भारत विकास परिषदेचे नागपुरात क्षेत्रीय संमेलन होते. त्याच्या उद्घाटनाला कोशियारीजी आले हो.ते तेव्हा त्यांची माझी भेट झाली. मात्र ती अगदी दोन मिनिटांची होती. कार्यक्रम आटोपताच ते लगेच निघून गेले होते.
१९७० साली नागपूरच्या हडस हायस्कूलमधून एस एस सी पास झालेल्या आम्हा सर्व मित्र-मैत्रिणींचा एक ग्रुप बनलेला आहे. आम्ही नागपूर मुंबई आणि पुणे इथली मित्रमंडळी कायम सक्रिय असतो, आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतो. त्याशिवाय वर्ष, दोन वर्षातून कधीतरी एकदा सगळे एकत्र भेटतो देखील. दिवाळी २०२२ मध्ये आम्ही नागपुरातील मंडळी एकत्र भेटलो असताना एक मित्र संजीव भुसारीने प्रस्ताव ठेवला.” अव्या आम्हाला तू एकदा राजभवनला घेऊन चालशील का?” मी लगेचच होकार दिला. त्यावर्षी डिसेंबर मध्ये नागपूर अधिवेशनासाठी कोशियारीजी आले होते. मी आधीपासूनच राज्यपाल कार्यालयाशी संपर्क साधून कार्यक्रम घेता येईल का यासाठी प्रयत्न केले होते. जर कार्यक्रम ठरलाच तर कोण कोण येणार त्या सर्व नावांची यादी राजभवन ने सांगितल्यानुसार मी ती यादी आधीच मी राजभवन च्या अधिकाऱ्यांना ईमेलवर पाठवली होती.
अचानक एक दिवस राजभवनात त नागपूरचे अधिकारी येवले यांचा मला फोन आला. उद्या सकाळी दहा वाजता राज्यपाल महोदयांनी आपल्या सर्व ग्रुपला भेटायला बोलावले आहे. एकूण ३५ जणांना परवानगी दिली आहे. मग लगेच व्हाट्सअप ग्रुप वर संदेश टाकला. रात्रीच सर्व चर्चा झाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजताच आम्ही सर्व नागपूर राजभवन च्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचलो. ठरल्याप्रमाणे पोलीस तपासणी होऊन आम्हा सर्वांना आज सोडण्यात आले. तिथे राजभवना मुख्य प्रवेशद्वारापासून आत जवळजवळ एक किलोमीटरचे अंतर आहे. ते ओलांडून आम्ही मुख्य इमारतीजवळ पोहोचलो. तिथे वाहने उभी केली आणि सर्वजण आत गेलो. आम्हाला तिथे एका कक्षात बसवण्यात आले. ठरल्याप्रमाणे दहा वाजता कोशियारीजी येऊन पोहोचले. आम्ही सर्वांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. मग मीच सर्व मित्र-मैत्रिणींचा त्यांना परिचय करून दिला. “तुम्ही सर्व केव्हा एसएससी झालात?” असे त्यांनी विचारल्यावर मी जेव्हा “आम्ही १९७० मध्ये पास झालो आहोत” असे सांगितले, तर इतकी वर्ष तुम्ही एकत्र आहात म्हणजे चांगलेच आहे, म्हणून त्यांनी आमचे कौतुकही केले. मग सर्वांशी त्यांनी परिचय करून घेतला आणि सुमारे वीस मिनिटे सर्वांशी चर्चाही केली. राज्यपालांशी भेटणे ही माझ्याकरिता काही विशेष बाब नव्हती. मात्र इतर सर्व मित्र मैत्रिणींना त्याचे खूपच अप्रूप होते. सर्वांनी मग कोशियारीजीन सोबत फोटो काढून घेतले. त्यांनी देखील सर्वांना बाजूला उभे करून फोटो काढले, आणि ५२ वर्षानंतर सुद्धा तुम्ही सर्व मित्र मैत्रिणी एकत्र येता हेच खूप वेगळेपण आहे, अशी टिपणी देखील त्यांनी केली. सर्वांनाच ती भेट संस्मरणीय ठरली होती. दुसऱ्या दिवशीच्या सर्व वृत्तपत्रांमध्ये या भेटीचे विशेष वृत्त देखील प्रकाशित झाले होते.
ही माझी आणि कोशियारीजींची शेवटची भेट ठरली. त्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि ते उत्तराखंडमध्ये आपल्या मूळ गावी रवाना झाले. मात्र जाण्यापूर्वी एकदा त्यांचे आणि माझे फोनवर बोलणे झाले होते. नंतर गेल्या दोन वर्षात त्यांचा आणि माझा संपर्क होऊ शकला नाही. अर्थात अजूनही ते समाजकारणात सक्रिय असल्याची माहिती मिळते. असेच कधीतरी ते कुठेतरी भेटतील आणि तितक्याच आपुलकीने माझी चौकशी करतील याबद्दल मला खात्री आहे.
कोशियारीजींच्या आणि माझ्या जेमतेम सात वेळा भेटी झाल्या. त्यातही एक भेट ऑनलाईनच हो.ती मात्र या भेटीतही त्यांचे आणि माझे चांगलेच मैत्र जमले. ते माझ्यापेक्षा वयाने, मानाने, आणि ज्ञानाने सर्वतोपरी ज्येष्ठच आहेत. तरीही त्यांनी माझ्याशी आपुलकीने संबंध जपले. त्यांच्यासारख्या एका वयोवृद्ध राजकीय नेतृत्वाशी माझे इतके जवळीकीचे संबंध आले हे माझ्यासाठी तरी भाग्यच म्हणावे लागेल.


