मायणी येथे तिसरी मेंढपाळ हक्क परिषद उत्साहात संपन्न
मायणी (ता. खटाव) : महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील मेंढपाळांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली तिसरी मेंढपाळ हक्क परिषद मायणी येथील चांदणी चौकातील धनगर विठोबा मंगल कार्यालयात उत्साहात संपन्न झाली.
उद्घाटन व अध्यक्षस्थान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेशाध्यक्ष प्रा. चंद्रकांत हुलगे यांनी केले. उद्घाटन आमदार दिलीप येळगावकर, जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, रासपचे जिल्हाध्यक्ष मामू विरकर व युवा नेते सचिन गुदगे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थान ओबीसी नेते प्रा. लक्ष्मणराव हाके यांनी भूषविले.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज घोरपडे व जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.पडळकर : “मेंढपाळांचे प्रश्न राज्याच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत”आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, “मेंढपाळांचे प्रश्न केवळ समाजापुरते मर्यादित नाहीत तर ते राज्याच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत आहेत. शासन दरबारी ठोस उपाययोजना व्हाव्यात यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लवकरच बैठक घेऊन मेंढपाळांना चराई हक्क मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. महाराष्ट्रातील सर्व संघटना एकत्र आणून सरकारशी संवाद साधला जाईल. कृषी उत्पन्न बाजार समितीत मेंढपाळांना मतदानाचा अधिकार मिळावा, ही मागणी कौतुकास्पद असून त्याचा गांभीर्याने विचार केला जाईल.”हाके : “सरकारदरबारी ठोस लढा देऊ”प्रा. लक्ष्मणराव हाके म्हणाले, “मेंढपाळांचे प्रश्न गंभीर असून अलीकडे या परिषदेतून त्यांना वाचा मिळत आहे. हे प्रश्न सरकारदरबारी मांडण्यासाठी आम्ही ठोस लढा उभारणार आहोत. भविष्यातील बैठकींसाठी मला निमंत्रित करा, मी नक्की उपस्थित राहीन.”
अंकुश मुढे : “दख्खनी मेंढी संवर्धन व शेफर्ड आयडीची गरज”प्रमुख मार्गदर्शक व मेंढपाळ आर्मीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अंकुश मुढे यांनी भाषणात सांगितले की, “मेंढपाळांना चराई क्षेत्र उपलब्ध नाही, पशुधनाला विमा नाही, शेळ्या-मेंढ्यांसाठी कर्जाची सुविधा नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीत हमीभाव व मतदानाचा अधिकार मिळत नाही. या गंभीर प्रश्नांना आवाज देण्यासाठीच ही परिषद आयोजित केली आहे.
महाराष्ट्राची मातृमेंढी म्हणून ओळखली जाणारी दख्खनी मेंढीचे संवर्धन काळाची गरज आहे. आदमापूर येथे दख्खनी मेंढी संवर्धन केंद्र स्थापन करणे आवश्यक आहे. काही गोरक्षक व्यापाऱ्यांना अडवून पैशाची मागणी करत असल्याने व्यापारी महाराष्ट्रात शेळ्या-मेंढ्या खरेदी करण्यास टाळाटाळ करीत आहेत. यामुळे मेंढपाळांना कवडीमोल भावाने पशुधन विकावे लागत आहे. अशा गोरक्षकांवर कठोर कारवाई व्हावी.”त्यांनी पुढे विचारले, “शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळतो, पण कृषीचा दर्जा पशुला दिल्यानंतरही पशुपालकांना ‘शेफर्ड आयडी’ कधी मिळणार? तसेच शेळी-मेंढी पशुधन विकासासाठी केंद्र पुरस्कृत आयोग स्थापन करावा.”नवनाथ गारळे : “मेंढपाळांवरील हल्ल्यांना आळा घालावा”स्वागताध्यक्ष व राष्ट्रीय महासचिव नवनाथ गारळे म्हणाले, “मेंढपाळांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. मेंढपाळ आर्मी त्यांचे संरक्षण करीत असली तरी शासनाने कठोर कायदा करणे आवश्यक आहे. माडग्याळ मेंढीला जीआय मानांकन मिळाले आहे,
त्याच धर्तीवर गजीनृत्यालाही जीआय मानांकन मिळावे. तसेच माडग्याळ मेंढीची बीजबँक आटपाडी येथे स्थापन करावी.”घोरपडे व येळगावकरांची ग्वाहीआमदार मनोज घोरपडे म्हणाले, “धनगर समाज प्रामाणिक व कष्टाळू आहे. या समाजाच्या न्यायहक्कांसाठी मी सदैव कटिबद्ध आहे.” तर आमदार दिलीप येळगावकर म्हणाले, “मेंढपाळांच्या प्रश्नांसाठी माझ्या राजकीय प्रवासात मी नेहमीच समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.”
आयोजन व प्रतिसादया परिषदेसाठी राष्ट्रीय महासचिव नवनाथ हणमंतराव गारळे, प्रदेशाध्यक्ष प्रा. चंद्रकांत हुलगे, जिल्हाध्यक्ष रमेश तांबे, तालुकाध्यक्ष गोरख यमगर, अर्जुन शेंडगे, प्रकाश जानकर, पै. गणेश कचरे व गणेश घुटुकडे यांनी परिश्रम घेतले.या परिषदेला महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून हजारोंच्या संख्येने मेंढपाळ उपस्थित राहिले व कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला.या वेळी मेंढपाळ आर्मीचे प्रवक्ते दादासाहेब वाक्षे, कायदेशीर सल्लागार सुयश कदम, तालुकाध्यक्ष विकास जानकर, दादासो कोळपे, चंद्रकांत पोकळे, हणमंत ढवाण, नवनाथ पोकळे, किसनराव सोनवलकर, महादेव शेळके, दत्तात्रय काळे, सागर हजारे, प्रमोद गावडे, सचिन शिंगाडे,नितीन कठरे,आण्णासाहेब काकडे आण्णासाहेब मेटकरी,पांडुरंग म्हारगुडे लक्ष्मण यमगर, संजू लंगू आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


