आयुष्यातले सांगाती २७,गोपीनाथजी मुंडे,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!,
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
भारतीय जनता पक्ष हा पूर्वी महाराष्ट्रात तरी शेठजी आणि भटजींचा पक्ष म्हणून ओळखला जात होता. या पक्षाला खरा सर्वसमावेशक चेहरा देणारे जे काही मोजके नेते होते, त्यात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे देखील एक होते. आपल्या दिलखुलास स्वभावाने आणि व्यापक जनसंपर्काने त्यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर सर्व देशभर आपला संपर्क प्रस्थापित केला होता. पक्षभेद बाजूला ठेवून त्यांनी अनेकांशी मैत्री केली आणि ती जपली देखील. त्यांच्या असंख्य मित्रांपैकी मी देखील एक होतो. ते भाग्य योगायोगानेच मला लाभले होते.
गोपीनाथजींच्या नेतृत्वाचा महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर उदय झाला तो साधारणपणे १९८१-८२ च्या दरम्यान. त्यावेळी मी दूरदर्शनचा वृत्त छायाचित्रकार म्हणून कार्यरत होतो. त्या काळात दूरदर्शन हे सरकारी माध्यम म्हणून ओळखले जात होते. तर गोपीनाथजी हे विरोधी पक्षाचे नेते होते. त्यामुळे फारसा संपर्क येण्याचा प्रश्नच नव्हता. १९९३-९४ नंतर मी इलेक्ट्रॉनिक माध्यम सोडून मुद्रित माध्यमात पत्रकार म्हणून सक्रिय झालो. त्यानंतर माझा गोपीनाथजींचा संपर्क यायला सुरुवात झाली. मग कधी कधी त्यांच्या कार्यक्रमांचे वृत्त संकलन करायला मी जात असे. मात्र प्रत्यक्ष परिचय झाला नव्हता.
१९९५ मध्ये महाराष्ट्रात सत्तांतर झाले. शिवसेना भारतीय जनता पक्षाचे संयुक्त सरकार सत्तेत आले. मनोहर जोशी मुख्यमंत्री तर गोपीनाथ मुंडे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यावेळी हा शपथविधी सोहळा झाला त्यावेळी मी काही कामाने दिल्ली मुक्कामी होतो. त्यामुळे शपथविधी झाल्याचे वृत्त मी तिथल्या वृत्तपत्रातच वाचले. शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे काही कामाने नवी दिल्लीत आले होते. तिथे पंतप्रधानांना भेटणे आणि इतर काही मान्यवरांना भेटणे हा त्यांचा कार्यक्रम होता. दुपारी साडेचारच्या सुमारास मी महाराष्ट्र सरकारचे अधिकृत अतिविशिष्ट अतिथींचे विश्रामगृह असलेल्या महाराष्ट्र सदनात काही कामाने पोहोचलो. तिथे मला ज्यांच्याशी काम होते, त्यांची चौकशी करत असतानाच अचानक तिथे चहल-पहल सुरू झाली. मी सहज चौकशी केली तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येत आहेत असे कळले. तिथे काही वृत्तवाहिन्यांचे पत्रकार आणि कॅमेरामन उभेच होते. मी बाहेर जाऊन पोर्चमध्ये बघतो तो तितक्यातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना घेऊन येणारी कार तिथे थांबली. लगेच वृत्तवाहिन्यांच्या कॅमेरामन आणि पत्रकारांनी त्यांना घेरले. मग महाराष्ट्र सदनाच्याच लॉनवर मनोहर जोशींचा बाईट घेणे सुरू झाले. गोपीनाथ मुंडे एका बाजूला उभे होते. मग मीच स्वतःहून जाऊन त्यांना माझा परिचय करून दिला. पाच मिनिट त्यांच्याशी गप्पाही मारल्या. ती त्यांची माझी पहिली प्रत्यक्ष भेट होती.
नंतर मग कधीमधी कार्यक्रमांमध्ये आमच्या भेटी होऊ लागल्या. दरवेळी भेटले की ते ओळखीचे स्मित देत असत. कधी वेळ असला तर चौकशी देखील करायचे. १९९६ पासून मी दैनिक पुढारी साठी विधान परिषदेत वृत्त संकलन करू लागलो. मग त्यानिमित्ताने आमचा संपर्क अधिकच वाढला. सभागृहात आक्रमकपणे सरकारची बाजू मांडणारे गोपीनाथजी बाहेर मात्र अत्यंत दिलखुलासपणे सगळ्यांशी गप्पा मारायचे. त्यावेळी नागपुरात उपमुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर अधिवेशन काळात गोपीनाथजींचा मुक्काम राहत असे. तिथे दरवर्षी ते अधिवेशन काळात सर्व पत्रकारांना स्नेहभोजनाला निमंत्रित करायचे. १९९७ मध्ये पहिल्यांदा मी तिथे स्नेहभोजनाला गेलो होतो. तिथे माझा सहकारी उदय तानपाठकने माझी ओळख करून देताच गोपीनाथजी लगेच म्हणाले “माझा त्यांचा आधीचाच परिचय आहे, काय लक्षात आहे ना?” म्हणून त्यांनी मलाच विचारले. “आपण दिल्लीत पहिल्यांदा भेटलो होतो.” दिल्लीतली भेट त्यांनी लक्षात ठेवावी याचे मलाही आश्चर्यच वाटले होते.
१९९८ पासून मी नागपूर अधिवेशनाबरोबरच मुंबईत देखील वृत्त संकलनाला जाऊ लागलो. तिथे देखील मी विधानपरिषदेतच वृत्त संकलन करत असे. तिथेही आमच्या मग नियमित भेटी व्हायच्या. अनेकदा सभागृहात काही वाद व्हायचे मग त्यावर खुलासा करण्यासाठी लगेचच प्रेस गॅलरीत निरोप पाठवून गोपीनाथजी सर्व पत्रकारांना भेटायला बोलवायचे. विधान भवनात असलेल्या भाजप कार्यालयाच्या बाजूच्या रूममध्ये गाद्या आणि लोड टाकलेले असायचे. तिथे एका लोडावर बसून गोपीनाथजी पत्रकारांना आपली बाजू समजावून सांगत असत. बरेचदा त्यांच्या बाजूलाच बसण्याचा मला योग यायचा. बोलता बोलता एकदम बाजूच्या मांडीवर जोरात थाप मारण्याची त्यांची सवय होती. अशी थाप मारून आपले म्हणणे बरोबर आहे की नाही आणि आपल्या म्हणण्याला दुजोरा आहे की नाही असे ते विचारत असत.
१९९९ मध्ये महाराष्ट्रात सत्तांतर झाले. शिवसेना भाजप युतीची सत्ता जाऊन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेकाप यांची सत्ता आली. मग गोपीनाथजी विधानसभेत भाजपचे गटनेते म्हणून सक्रिय झाले. तेव्हा देखील ते मुंबईत पत्र परिषदा घ्यायचे. त्यावेळी भेटले की हमखास चौकशी व्हायची.
२००१ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकनाथ गायकवाड यांच्या कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजला होता. त्यावरून अर्थसंकल्प सादर करण्याच्या दिवशीच गोंधळ झाला होता. विधानसभेत काही भाजप सदस्यांना त्या दिवशी निलंबित केले होते. तो मुद्दा त्यावेळी बराच गाजत होता. नंतर एक दिवस गोपीनाथजींनी मुंबईच्या रेडिओ क्लब मध्ये रात्री सर्व पत्रकारांना स्नेहभोजनाला निमंत्रित केले. त्या दिवशी विधान परिषदेचे कामकाज बराच वेळ चालले. त्यामुळे काम आटोपून आणि बातम्या फॅक्स करून रेडिओ क्लबला पोहोचता पोहोचता आम्हाला बराच उशीर झाला होता. आम्ही पाच सातच पत्रकार तिथे होतो. बाकी बहुतेक सर्व भोजन आटोपून निघून गेले होते. मग गोपीनाथजी आणि आम्ही चार पाच जण अशी रात्री उशिरापर्यंत गप्पांची मैफल रंगली. मग बऱ्याच बिटवीन द लाईन स्टोरीज त्यांनी आम्हाला ऐकवल्या होत्या.
त्यावेळी विधानसभेत जरी सत्ताधारी पक्षाचे बहुमत असले तरी विधान परिषदेत मात्र विरोधी पक्षांचे बहुमत होते. तेव्हा जसे विधानसभेतील बहुमताद्वारे विरोधी पक्षांचे काही आमदार निलंबित केले जातात, तसे विधान परिषदेतील बहुमताद्वारे सत्ताधारी गटातील काही आमदार आणि मंत्र्यांना निलंबित का केले जाऊ नये, हा प्रश्न मी चर्चेत उपस्थित केला होता.त्यावेळी छगन भुजबळ विरुद्ध विरोधक असा सामना रंगत होता. भुजबळ हे विधान परिषदेचे सदस्य होते. त्यावेळी त्यांनाच विधान परिषदेतून निलंबित का केले जाऊ नये हा मुद्दा मी चर्चेत मांडला. तेव्हा त्याच्या सर्व तांत्रिक बाजू कशा आडव्या येऊ शकतात हे गोपीनाथजींनी मला शांतपणे समजावून दिले होते.
२००३ मध्ये नागपुरात अक्कू यादव प्रकरण खूप गाजले होते. अक्कू यादव नावाचा एक गुंड इतर नागपुरातील एका वस्तीत तिथल्या महिलांना प्रचंड त्रासदायक ठरला होता. अक्कुला एका प्रकरणात पोलिसांनी अटक केली आणि त्याला दुसऱ्या दिवशी न्यायालयात उभे केले. त्यावेळी संतप्त महिला न्यायालयात पोहोचल्या आणि तिथेच त्यांनी अक्कूवर हल्ला केला आणि न्यायालयातच त्याचा जीव घेतला. या प्रकारात जवळजवळ शंभरच्या वर महिलांना पोलिसांनी अटक केली होती. दोन दिवसांनी त्या जामीनावर सुटल्या, मात्र त्या वस्तीत प्रचंड तणाव होता.
त्या वस्तीतील महिलांना भेटण्यासाठी गोपीनाथजी खास मुंबईहून नागपूरला आले होते. तो दिवस नागपंचमीचा होता नागपंचमीला नागपुरातील बहुतेक सर्व वृत्तपत्रे बंद असतात. त्यामुळे गोपीनाथजींची ती भेट कव्हर करण्यासाठी नागपुरातील कोणीच स्थानिक पत्रकार आले नव्हते. योगायोगाने मी मात्र वृत्त संकलन करण्यासाठी गेलो होतो. गोपीनाथजी सेंटर पॉइंट हॉटेलमध्ये उतरले होते. तिथून त्या वस्तीत जायला निघाले तेव्हा त्यांनी भाजपचे स्थानिक प्रसिद्धी प्रमुख संजय फांजेकडे चौकशी केली तर आज सुट्टी असल्यामुळे फक्त एकच पत्रकार आले आहेत असे सांगितले गेले. मग “अविनाश साठी वेगळी गाडी कशाला? आम्ही सोबतच जाऊ” म्हणून मला त्यांनी आपल्याच गाडीत बसवून घेतले. गाडीत आमच्या खूप गप्पा झाल्या. त्या वस्तीत गोपीनाथजींनी सर्व पीडित महिलांची भेट घेतली. तिथे दोन दिवसांपासून सर्व काम ठप्प झाले होते. मग स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना सांगून तिथे अन्न कसे पोहोचवता येईल आणि मदत कशी उभी करून देता येईल याची व्यवस्था गोपीनाथजींनी केली. गाडीत परतताना गोपीनाथजी मला म्हणाले “अविनाश शेवटी ही छोटी माणसंच आपले मतदार असतात, यांना थोडी जरी मदत केली तरी ते आठवण ठेवतात, त्यामुळे भाजपासाठी हे छोटे मतदारच मी महत्त्वाचे ठरवले आहेत”.
त्यावेळी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा बराच चर्चेत होता. भारतीय जनता पक्षाने वेगळ्या विदर्भाच्या मागणीला पाठिंबा दिला होता. २००३च्या नागपूर अधिवेशनात एक दिवस रात्री त्यांनी सर्व पत्रकारांना स्नेहभोजनाला निमंत्रित केले होते. रात्री तिथे गप्पा मारताना वेगळ्या विदर्भाचा विषय निघाला. तोवर गोपीनाथजी हे बहुतेक वेगळ्या विदर्भाच्या बाजूने नसावेत असे वाटत होते. मात्र त्यादिवशी त्यांनी खुलून आपली मते सांगितली. “वेगळ्या विदर्भाचे आंदोलन उभे करायला मी आता नितीनकडे ती सूत्र सोपवणार आहे” असे सुतोवाचही त्यांनी केले होते. त्यावेळी गोपीनाथजी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. वेगळ्या विदर्भासंबंधी त्यांची स्पष्ट मते ऐकून आम्ही सर्वच वैदर्भीय पत्रकार सुखावलो होतो.
२००२ पासून मी रामटेक च्या गडावरून या नावाने एक नियतकालिक सुरू केले होते. त्याचा दिवाळी अंक देखील काढायचो. दरवर्षी दिवाळी अंकाची प्रत मी अधिवेशनात आलेल्या गोपीनाथजींना आवर्जून देत असे. ते अंक वाचून मला प्रतिक्रिया देखील कळवायचे. अनेकदा भेटल्यावर त्यांच्या काही सूचना देखील असायच्या.
गोपीनाथजींचे मेहुणे प्रमोद महाजन हे त्यांचे राजकारणातले खंदे साथीदार देखील होते. २००६ मध्ये प्रमोदजींची सख्या भावाने हत्या केली. त्यावेळी गोपीनाथजी चांगलेच दुखावले होते. नंतर लगेचच नागपुरात संघ कार्यालयावर दहशतवादी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी गोपीनाथजी तातडीने निघून आले होते. तेव्हा त्यांची माझी भेट झाली. ते प्रमोदजींच्या जाण्याने चांगलेच व्यतीत झालेले दिसले.
२००६ मध्ये अमरावती जिल्ह्यात एक विधानसभा पोटनिवडणूक होती. तिथे शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करायला गोपीनाथजी आले होते. सोबत उद्धव ठाकरे आणि मनोहर जोशी सुद्धा होते. मला मनोहर जोशींना भेटायचे होते. म्हणून मी नागपूरला ते उतरलेल्या हॉटेल प्राईडमध्ये गेलो होतो. तिथेच गोपीनाथजी सुद्धा उतरले होते. मनोहर जोशींना भेटल्यावर ते मला उद्धव ठाकरेंकडे घेऊन गेले. तिथे गोपीनाथजी सुद्धा होते. मग “काय अविनाश काय हालचाल?” म्हणून त्यांनी चौकशी केली. मी तिथून निघालो तेव्हा गोपीनाथजी सुद्धा नागपुरात एका ठिकाणी जाण्यासाठी म्हणून निघाले होते. आम्ही दोघेही लिफ्टपर्यंत आलो. तिथे मी सहज गोपीनाथजींना विचारले “तुम्ही सध्या फार शांत आहात” त्यावर गोपीनाथजी मला म्हणाले “आता प्रदेशाध्यक्ष तुझा नितीन आहे. त्याला तू सांग. तुमच्याजवळ गोपीनाथ मुंडे सारखे धडधडणारी तोफ आहे, त्याचा फायदा करून घे,” आणि माझ्या पाठीवर थाप देत गोपीनाथजी खळाळून हसले होते.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नागपुरात संचेती परिवाराकडे सत्यनारायण होत असे. त्याला राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित रहात. मला देखील या समारंभाचे निमंत्रण असायचे. एकदा मी आणि माझी मुलगी किती दिव्येशा असे दोघेही तिथे पोहोचलो. तेव्हा गोपीनाथजी देखील तेथे आले होते. मला बघताच त्यांनी मला आवाज दिला, “काय अविनाश काय म्हणता?” मी त्यांच्याबरोबर बोलायला गेलो. माझ्यासोबत दिव्येशा देखील होती. तिच्याकडे बघून त्यांनी “ही कोण” म्हणून मला विचारले. “ही माझी मुलगी आहे” असे मी सांगताच त्यांनी दिव्येशाला जवळ येत तिला नाव विचारले. मग तिचा लाड देखील केला. “तू सुद्धा तुझ्या बाबांसारखीच पत्रकार हो” असाही आशीर्वाद त्यांनी दिला होता.
२००८ मध्ये मी रामटेकच्या गडावरून चा दिवाळी अंकासोबत वासंतिक अंकही काढायचे ठरवले होते. दरवर्षी माझ्या अंकासाठी मी कोणीतरी एखादा मान्यवर अतिथी संपादक म्हणून घेत असे. २००७ च्या डिसेंबरच्या अधिवेशनात मी गोपीनाथजींना नागपुरात भेट झाली असताना विनंती केली. “तुम्ही या अंकाचे अतिथी संपादक व्हा.” त्यांनी लगेचच होकार दिला. तो डिसेंबरचा तिसरा आठवडा होता. गोपीनाथजी लगेच मला म्हणाले, “तू असं कर जानेवारीच्या ११ किंवा १२ तारखेला मला मुंबईत भेट. मग आपण या विषयावर सविस्तर बोलू.” मी होकार दिला.
ठरल्याप्रमाणे १२ जानेवारीला मी गोपीनाथजींना मुंबईत भेटायला गेलो. त्यांचा स्वीय सहाय्यक रवी अनासपुरे ला फोन केला. त्याने दुपारी वरळीतल्या ऑफिसमध्ये भेटायला बोलावले. तिथे भेटल्यावर गोपीनाथजींनी मला सरळ प्रश्न केला. “अविनाश तू मला अतिथी संपादक करतो आहेस, कारण मला साहित्यातले फार कळते म्हणून नाही, तर माझ्याकडून आर्थिक मदत हवी म्हणूनच. तू अतिथी संपादक करतो आहेस. तेव्हा मला सांग तुला हा अंक काढायला किती खर्च येणार आहे? मी आकडा सांगताच गोपीनाथजी म्हणाले “इतक्या रकमेच्या दोन जाहिराती मी तुला देतो, बाकी तू तुझ्या जाहिराती जमव, तुझ्या अंकाचा खर्च मी काढून देतो” आणि लगेच रवी अनासपुरेला सांगून किती रकमेच्या कोणा कोणाच्या जाहिराती अविनाशला मिळवून द्यायच्या याची सूचनाही दिली. मग त्यांना तुमचे संपादकीय आणि एखादा लेखही लागेल असे सांगितल्यावर ते तूच बघ, असे सांगून त्यांनी पुढला माणूस भेटायला बोलावला होता.
अंकाचे काम अंतिम टप्प्यात आले होते. मात्र गोपीनाथजींकडून मला त्यांचे संपादकीय आले नव्हते. मी सतत पाठपुरावा करत होतो. त्यावेळी माधव भंडारी आणि केशव उपाध्ये हे दोघे त्यांचे जनसंपर्काचे काम सांभाळत होते. माधवरावंनी मला सांगितले की “तू स्वतःच त्यांचे संपादकीय तयार कर आणि मला फॅक्स कर, मी गोपीनाथजींना दाखवतो आणि त्यात फेरफार करून तुला पाठवतो.” त्यानुसार मी त्यांना माझ्या पद्धतीने संपादकीय तयार करून पाठवले. माधव भंडारींनी ते गोपीनाथजी समोर ठेवले. त्यावेळी योगायोगाने माझे मित्र अजय संचेती तिथे बसलेलेच होते. गोपीनाथजींनी ते संपादकीय वाचले आणि लगेच माधव भंडारींना म्हणाले” अरे माधव अविनाशने लिहिलेले इतके साहित्यिक मी लिहू शकणार आहे का?” मग अजय संचेती समोर ते कागद त्यांनी टाकले आणि म्हणाले “बघ तुझा मित्र किती साहित्यिक लिहितो आहे, मी इतके साहित्यिक लिहू शकेल का?” अजय संचेतींनी ते बघितले आणि म्हणाले “गोपीनाथजी पाठकजींनी लिहिले आहे, म्हणजे तुम्ही नक्की लिहू शकाल, म्हणूनच त्यांनी लिहिले आहे.”गोपीनाथजींनी क्षणभर त्यांच्याकडे बघितले आणि म्हणाले “असं म्हणतोस” लगेच माधव भंडारी यांना कागद देत म्हणाले “अविनाशला निरोप दे की असंच असं माझ्या नावाने छापून टाक” त्यानुसार मला माधव भंडारींचा फोन आला आणि मी पुढल्या छपाईला लागलो.
७ मे २००८ रोजी बासंतीक अंकाचे प्रकाशन ठरले होते. मी महिनाभर आधी गोपीनाथजींना बोललो होतो. त्यांनी प्रकाशन समारंभाला येण्याचे मान्य केले होते. मात्र ऐनवेळी राजस्थानच्या निवडणुका आल्या, आणि त्यांचा मला फोन आला, “अविनाश मी येऊ शकत नाही, मला माफ कर.” माझाही नाईलाज झाला मग शेवटी नितीन गडकरींच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन समारंभ आटोपला होता.
नंतर महिनाभराने एका कार्यक्रमासाठी गोपीनाथजी नागपुरातल्या आले होते. त्यावेळी त्यांचा फोन आला.” मला अंक बघायचा आहे. आज रात्री विमानाने मी मुंबईला परत जाणार आहे. तेव्हाच तू एअरपोर्टवर भेट”. मी रात्री एअरपोर्टवर अंक घेऊन पोहोचलो. माझ्या पाठोपाठच गोपीनाथजी प्रज्ञावहिनी आणि पूनम महाजन तिघेही पोहोचले. मी गोपीनाथजींना वासंतीक अंकाची प्रत दिली. त्यांनी लगेचच अंक उघडून पाने पलटायला सुरुवात केली. मग श्रेय नामावलीचे पान दिसले. त्यानंतर अतिथी संपादकीयाचे पान त्यांनी बघितले. त्यातले संपादकीय दाखवत प्रज्ञावहिनींना ते म्हणाले “हे बघ हे संपादकीय माझे आहे” पूनमने देखील ते पाहिले ती लगेच म्हणाली, “गोपीनाथ मामा तुम्हीच खरच लिहिलं आहे हे?” गोपीनाथजींनी क्षणभर तिच्याकडे डोळे रोखून पाहिले आणि मग ती आणि प्रज्ञावहिनी दोघेही खळाळून हसू लागले.
२००९ मध्ये गोपीनाथ विधानसभेचा निरोप घेत लोकसभेत निवडून गेले. त्याच दरम्यान नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. मग गोपीनाथजींचे नागपुरात येणे कमीच झाले होते. अधून मधून फोनवर आमचे बोलणे व्हायचे. दिल्लीत आता गोपीनाथजींना मोबाईलवर जरी फोन केला तरी आधी त्यांचा स्वीय सहाय्यक उचलत असे. मात्र थोड्याच वेळात गोपीनाथजींचा फोन मला येत असे. नागपुरातील एका राजकीय मित्राच्या कार्यक्रमाला येण्यासाठी मी त्यांना फोन केला होता. मात्र त्यावेळी त्यांचे जमले नाही. २०१२ मध्ये माझ्या मागोवा घटितांचा आणि कालप्रवाहाच्या वळणांवरून यातून पुस्तकांचे प्रकाशन न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांचे हस्ते झाले होते. त्या समारंभासाठी गोपीनाथजींचा आवर्जून शुभेच्छा संदेश आला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते विदर्भात प्रचारासाठी आले होते. तेव्हा धावपळीतच त्यांची माझी भेट झाली होती. त्यांनी हॉटेल सेंटर पॉईंट मध्ये पत्र परिषद घेतली होती. पत्र परिषदेनंतर आमचे थोडावेळ बोलणे झाले होते. आता दिल्लीला आला की भेट असे त्यांनी आवर्जून सांगितले होते.
२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला दणदणीत यश मिळाले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यांच्या पहिल्याच मंत्रिमंडळात गोपीनाथजी ग्राम विकास मंत्री झाले. मंत्री झाल्यावर मी त्यांना अभिनंदनचा फोन केला होता. “आता नागपूरला आलो की तुला निवांत भेटतो, तुझ्या घरी येण्याचे आमंत्रण अजून पेंडिंग आहे. आता यावेळी नक्की तुझ्याकडे येतो” असे त्यांनी मला आश्वस्त केले होते.
मात्र अचानक एका सकाळी दिल्लीत विमानतळाकडे येत असताना गोपीनाथजींच्या कारला अपघात झाल्याची बातमी कळली. लगेच टीव्ही लावला. थोड्याच वेळात गोपीनाथजी या अपघातात जागीच ठार झाल्याचेच कळले. आम्हा सर्व स्नेहीजनांना हा फार मोठा धक्का होता. त्या दिवशी संध्याकाळी त्यांचे पार्थिव आधी मुंबईत आले. मग त्यांच्या मूळ गावी रेणापूरला हेलिकॉप्टरने नेण्यात आले होते. तिथेच त्यांचे अंत्यसंस्कार आटोपले होते. एका धडाकेबाज पर्वाचा अकाली अंत झाला होता.
खरे तर त्यावेळी लगेचच होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप महाराष्ट्रात विजयी होईल असे चित्र दिसत होते. त्यामुळे भाजप विजयी झाले तर गोपीनाथजीच पुढले मुख्यमंत्री असतील असे बोलले जात होते. मात्र नियतीच्या मनात ते नव्हते. त्यामुळेच नियतीने त्यांना आमच्यासारख्या अनेक मित्रांच्या सहवासातून ओढून नेले होते.
आज गोपीनाथजी नसले तरी त्यांची आठवण अनेकदा होतेच. महाराष्ट्रात भाजपला सत्तेपर्यंत पोहोचवणारा शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे गोपीनाथजी हे माझे देखील चांगलेच स्नेही होते. हे माझ्यासाठी मी भाग्य समजतो.


