आयुष्यातले सांगाती ३४,अनंत तरे,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
माझ्या आठवणीनुसार २००० सालच्या डिसेंबर महिन्यातील महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातील हा प्रसंग आहे. तेव्हाही दरवर्षीप्रमाणे मी विधिमंडळात विधानपरिषद सभागृहाचेच वृत्त संकलन करायला जात होतो. साधारणपणे माझ्याकडे नियमित वृत्तपत्रांचे वृत्तसंकलन वगळता पहिल्या आठवड्यात दूरदर्शन आणि दुसऱ्या आठवड्यात आकाशवाणीचे समालोचन लिहिण्याचे काम येत असे. अधिवेशनाचा तो दुसरा किंवा तिसरा दिवसच असावा. त्या दिवशी प्रश्नोत्तराच्या तासानंतर एका मुद्द्यावरून सभागृहाचे कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते. तेव्हा प्रेस गॅलरीतून खाली कॅन्टीन मध्ये जाऊन चहा घ्यावा म्हणून मी बाहेर पडलो तर जिन्यातच समोर विधानपरिषद सदस्य अनंत तरे उभे होते. तरे त्या आधीच्या अधिवेशनापासूनच सभागृहात सदस्य म्हणून आले होते. त्यामुळे मी त्यांना चेहऱ्याने ओळखत होतो. मात्र त्यांचा माझा प्रत्यक्ष परिचय झाला नव्हता.
माझ्यासमोर उभे असलेल्या अनंत तऱेंनी मला प्रश्न विचारला, “विधान परिषदेत रिपोर्टिंग करणारे अविनाश पाठक कोण आहेत?” मी लगेच उत्तर दिले “मीच अविनाश पाठक” तर तरे लगेच माझ्याशी हस्तांदोलन करत म्हणाले “पाठक साहेब तुम्हालाच भेटायला येत होतो. काल दूरदर्शनला समालोचन तुम्हीच लिहिले आहे ना.” मी होकार देताच “तुम्ही माझा मुद्दा अगदी व्यवस्थित कव्हर केलात म्हणून धन्यवाद द्यायला आलो आहे,” असे तरे सांगते झाले. मी त्यांना धन्यवाद देतच होतो, तितक्यात त्यांनी विचारले “तुम्ही कुठे निघालात?” मी लगेच बोललो “कॅन्टीनमध्ये चहा घ्यायला चाललो आहे” “चला मग आपण सोबतच जाऊ” म्हणून आम्ही दोघेही कॅन्टीन कडे निघालो. त्यादिवशी कॅन्टीन मध्ये दहा पंधरा मिनिटेच आमच्या गप्पा झाल्या आणि आम्ही दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र बनलो. ती मैत्री दीर्घकाळ टिकली होती.
आज सकाळी दैनिक बित्तमबातमीचा अंक बघत असताना त्यात ११ ऑक्टोबरला ठाण्यात आठवणीतले अनंत तरे हे त्यांच्या स्वीय सचिवांनीच लिहिलेले पुस्तक प्रकाशित होत असल्याची बातमी वाचली. त्यामुळे अनंत तरे यांच्या माझ्या मनात असलेल्या असंख्य आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या. त्यामुळेच आज आयुष्यातले सांगाती या लेखमालिकेत मी अनंत तरेंवरच लिहायचे ठरवले.
अनंत तरे २००० मध्ये विधान परिषदेत ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आले होते. त्याआधी ते ठाण्याचे महापौर सुद्धा होते. शिवसेनेचे ते अगदी कडवे कार्यकर्ते शिवसैनिक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्याबद्दलची ही सर्व माहिती मला होतीच. मात्र मैत्री झाल्यावर ते एक चांगले मित्र सुद्धा आहेत आणि सह्रदय माणूस देखील आहेत हे लक्षात आले.
मग नागपूर अधिवेशनात आमच्या दररोज भेटी होऊ लागल्या. कधी विधानभवनाच्या लॉबीत तर कधी कॅन्टीनमध्ये आमच्या गप्पांच्या मैफिली रंगू लागल्या. तरी आणि मी साधारणतः समवयस्काच होतो. त्यामुळे आमची वेव्हलेंग्थ जुळायला फारसा वेळ लागला नाही.
अधिवेशन आटोपून मुंबईला गेल्यावर देखील तरेंचा अधून मधून फोन येत असे. बरेचदा कप्पांच्या ओघात ते एखादी बातमी सुद्धा देऊन जायचे. त्यावेळी नागपुरात रामटेक चे खासदार असलेले शिवसेनेचे सुबोध मोहिते यांची माझी मैत्री होती. त्या संदर्भात देखील काही हिंट तरी देऊन जायचे.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्चमध्ये सुरू होणार होते. त्यावेळी थोडा आधीच तऱेंचा मला फोन आला. मुंबईत अधिवेशनासाठी येणार का म्हणून त्यांनी विचारणा केली. मी होकार देताच लगेच त्यांनी त्यांना आवडणारी नागपूरची संत्रा बर्फी माझ्यासाठी आवर्जून घेऊन या असे सांगितले. मी जाताना त्यांच्यासाठी संत्रा बर्फी घेऊनच गेलो होतो. मात्र विधान भवनात ती आणता येणार नव्हती. म्हणून मी रूमवरच ठेवली होती दुपारी अधिवेशनात भेटताच त्यांनी लगेच विचारले संध्याकाळी कामकाज संपल्यावर आपण भेटूया आणि मग मी संत्रा बर्फी घेऊन जातो असे त्यांनी सांगितले.
त्या दिवशी कामकाज संपल्यावर मला बातमी फॅक्स करायची होती. तर अनंत तरे प्रेस रूम मध्ये मला शोधत आले. माझी बातमी लिहून फॅक्स होईपर्यंत ते थांबले. मग आम्ही दोघेही आमदार निवास च्या माझ्या खोलीवर गेलो. तिथून त्यांना संत्रा बर्फीचे डबे दिल्यानंतर रात्री आम्ही दोघेही सोबतच जेवलो. पुन्हा बऱ्याच गप्पा झाल्या होत्या. या अधिवेशनात देखील जवळजवळ तीनदा मी दूरदर्शनसाठी समालोचन लिहिले होते अनंत तरी सभागृहात एक जागरूक सदस्य असल्यामुळे कामकाजात ते दररोज सक्रिय असायचेच. त्यामुळे दररोजच्या समालोचनात त्यांचा उल्लेख केला जायचा. त्यामुळे तरी चांगलेच सुखावायचे.
२००१ नंतर मी कौटुंबिक अडचणीमुळे मुंबईला वृत्त संकलनासाठी जाणे बंद केले. अर्थात नागपुरात वृत्तसंकलनाला मीच असायचो, आणि अधिवेशनात त्यांची भेट व्हायचीच. हळूहळू एकमेकांना हक्काने काम सांगण्यापर्यंत आमचे संबंध प्रस्थापित झाले होते.
२००२ पासून मी रामटेक च्या गडावरून या नावाने एक नियतकालिक सुरू केले होते. अनंत तरे यांना हे कळताच त्यांचे शुभेच्छांचे पत्र देखील आले होते. त्यावर्षीच्या दिवाळी अंकासाठी काही जाहिराती पाठवा म्हणून त्यांना पत्र पाठवले. त्यांनी लगेचच स्वतःची जाहिरात आणि सोबत धनादेश पाठवून दिला. अंक प्रकाशित झाल्यावर त्यांना प्रत पाठवली. नागपूर अधिवेशनात भेटल्यावर त्यांनी अंकाचे चांगलेच कौतुक केले होते.
अनेकदा अनंत तरे मला त्यांच्या व्यक्तिगत अडचणी सुद्धा शेअर करायचे. एका अधिवेशनात त्यांनी मला नागपुरातून चांगल्या साड्या खरेदी करून घ्यायच्या आहेत, तेव्हा दुकान सजेस्ट करा असे सुचवले. मी त्यांना महिंद्रकर अँड सन्स मध्ये घेऊन गेलो. तिथल्या साड्या त्यांना खूपच आवडल्या. त्यांनी घरी वहिनींसाठी तर साड्या घेतल्याच, पण इतरही नातेवाईकांसाठी साड्यांची खरेदी केली. त्यांनी मला सुद्धा तुम्ही वहिनी साठी साडी घ्या म्हणून आग्रह केला होता. मात्र मी तो टाळला.
नंतर साधारणपणे दर वर्षी ते अधिवेशनात एक दिवस मला सोबत घेऊन महिंद्रकर अँड सन्स मध्ये जायचे आणि तिथे त्यांची साडी खरेदी चालायची. एकदा गुढीपाडव्याच्या पंधरा दिवस आधी त्यांचा मला फोन आला.” पाठक साहेब माझा एक काम आहे. तुम्ही वहिनींना सोबत घेऊन महिंद्रकर अँड सन्स मध्ये जा आणि मला एकविरा देवीसाठी साड्या घ्यायच्या आहेत, त्या घेऊन पाठवण्याची व्यवस्था करा, मी लगेच तुमच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करतो,” असे त्यांनी मला सांगितले. मग मी माझी पत्नी अनुरूपाला घेऊन महेंद्रकर मध्ये गेलो. तिथे महिंद्रकरच्या मालकांना सांगताच ते म्हणाले “साहेब तुम्ही साड्या निवडा, आम्ही तरे साहेबांकडे पोहोचवायची व्यवस्था करतो” मग मी फोनवर त्यांचे बोलणे करून दिले आणि त्यांच्या सूचनेनुसार अनुरूपाने त्यांच्यासाठी साड्या निवडल्या आणि त्या ठाण्याला पाठवण्याचे व्यवस्था केली होती.
याच दरम्यान २००५ मध्ये माझ्या वडिलांचे तर २००६ मध्ये माझ्या आईचे दुःखद निधन झाले. मी मुंबई नवशक्तीचा वार्ताहर असल्याने त्यात बातमी आली होती. बातमी वाचून तरे यांचा दोन्ही वेळा आवर्जून फोन आला होता.
दरवेळी मुंबईहून आले की अनंत तरे आवर्जून काहीतरी भेटवस्तू आणायचेच. कधी माझ्यासाठी तर कधी अनुरूपासाठी आणि कधी माझ्या मुलीसाठी सुद्धा ते काहीतरी घेऊन यायचे. मी जरी मुंबईत अधिवेशनाला जात नसलो, तरी अधून मधून दिवाळी अंक किंवा तत्सम जाहिरातींसाठी मुंबईला जात असेच. मग त्यांनी ठाण्याला घरी यावे म्हणूनही आग्रह धरला. दोनदा त्यांच्या घरी मी जाऊन आलो. एकदा सहभोजनाचा आस्वाद देखील घेतला होता. त्यावेळी माझ्या आठवणीनुसार देवीचे नवरात्र होते तरी हे जातीने कोळी कुटुंब होते. त्यामुळे त्यांच्याकडे देवीच्या नवरात्रात मांसाहाराचाच नैवेद्य असायचा. मी पडलो शुद्ध शाकाहारी, तरे यांना ती कल्पना असल्यामुळे माझ्यासाठी त्यांनी वेगळा शाकाहारी स्वयंपाक करायला लावला होता.
२००६ मध्ये अनंत तरेंची विधानपरिषद सदस्यत्वाची टर्म संपली. त्यावेळी पुन्हा निवडणुका झाल्या. मात्र ते निवडून येऊ शकले नाहीत. तरीही शिवसेनेच्या कामात ते सक्रिय होतेच. मग मुंबईला गेलो की हमखास भेट व्हायचीच. ते सुद्धा नागपूरला आले की फोन करायचे. मग कधी सेंटर पॉईंट हॉटेलमध्ये किंवा कधी रवी भवन विश्रामगृहात आमच्या भेटी होत असत. दरवेळी सोबतच्या मंडळींना मी विधानपरिषद सदस्य असताना पाठकांची मला खूप मदत व्हायची हे ते आवर्जून सांगत असत.
२००९ मध्ये मी नवे घर बांधून तिथे निवासाला आलो. वास्तुपूजन निमित्त आयोजित समारंभाची मी अनंत तऱ्यांना निमंत्रण पत्रिका पाठवली होती. त्यावेळी ते येऊ शकले नव्हते. मात्र नागपूरला आलो की तुमच्या नव्या घरी नक्की येतो असा त्यांचा निरोप आला होता. अर्थात तो योग नंतर आला नाही हा भाग वेगळा.
२०११ मध्ये मी रामटेकच्या गडावरून नियतकालिक प्रकाशित करणे बंद केले. त्यामुळे मग जाहिरातंसाठी मुंबईला जाणे कमी झाले.परिणामी तरेंच्या भेटी देखील कमी झाल्या. मात्र फोनवर संपर्क होतच होता. २०१० मध्ये माझ्या मराठी वाङमय व्यवहार चिंतन आणि चिंता या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाल्याची बातमी त्यांना वृत्तपत्रातून कळली. तेव्हा त्यांचा आवर्जून फोन आला होता.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अचानक भाजप आणि शिवसेना यांची युती तुटली. त्या दरम्यान दोन्ही पक्षांमध्ये खूप आयाराम गयाराम झाले. शिवसेनेतील अंतर्गत राजकारणामुळे तरे यांना ठाण्यातून उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता होती. तरे विधान परिषदेत सदस्य असताना भाजपचे नितीन गडकरी विरोधी पक्षनेते होते. तरे यांचे आणि गडकरींचे संबंध चांगले होते. गडकरींनी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांच्या मार्फत तरे यांना तुम्ही आमच्याकडे या तर आम्ही तुम्हाला ठाण्यातून उमेदवारी देऊ अशी ऑफर दिली. त्यादिवशी सकाळीच तरेंचा मला मोबाईलवर फोन आला, आणि आता काय करावे असा सल्ला त्यांनी विचारला. मी तुम्ही भाजपमध्ये यायला काहीच हरकत नाही असे त्यांना सुचवले. त्यानुसार त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आणि उमेदवारी अर्ज भरला. त्या रात्री आमचे फोनवर सविस्तर बोलणे देखील झाले होते. मात्र रातोरात काही गडबडी झाल्या आणि तरेंनी भाजप सोडत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.
नंतर तर यांचे नागपुरात येणे खूप कमी झाले होते. माझे सुद्धा मुंबईला जाणे खूप कमी झाले होते. गेलो तरी एखाद दुसऱ्या दिवसासाठी जायचे आणि काम आटपून लगेच परत यायचे त्यामुळे इतर भेटीसाठी बंदच झाल्या होत्या . माझ्या आठवणीनुसार २०१७ किंवा १८ मध्ये ते शिवसेनेच्या एका मेळाव्यासाठी नागपूरला आले होते. त्यावेळी त्यांचा फोन आला. मग मी त्यांना भेटायला गेलो ती संध्याकाळ आम्ही दोघांनी देखील सोबतच घालवली. त्या दिवशी त्यांना विमानतळापर्यंत सोडायला मी गेलो होतो. ती आमची शेवटचीच भेट ठरली.
जानेवारी २०२० मध्ये मी मुंबईला गेलो होतो. तेव्हा तीन दिवस मुक्काम होता. त्या मुक्कामात अनंत तरे यांना फोन केला. मात्र ते त्यावेळी मुंबईबाहेर होते. त्यामुळे भेट काही होऊ शकली नाही. नंतर दोन महिन्यातच कोरोनाचे देशभर लॉक डाऊन सुरू झाले. ते तब्बल दोन वर्ष चालले. त्यामुळे भेटीगाठी होणे शक्यच नव्हते आणि अचानक २०२१ मध्ये अनंत तरे गेल्याचीच वृत्तपत्रात बातमी आली. ती बातमी धक्कादायकच होती. एक चांगला मित्र गमावल्याचे मला दुःख झाले होते.
अनंत तरे आणि माझे बऱ्याच मुद्द्यांवर वैचारिक मतभेद सुद्धा होते. तरीही ते मतभेद त्यांनी कधीही आमच्या मैत्रीच्या आड येऊ दिले नाहीत. त्यामुळे आमची मैत्री दीर्घकाळ टिकली. त्यांच्यासारखा मित्र मिळणे हे मी भाग्य समजतो.


