अंबरनाथचा लेखाजोखा भाग – 3तुतारी फुंकणारे आहेत परंतू तुतारीच नाही….ज्येष्ठ पत्रकार .दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.मी गेले दोन दिवस अंबरनाथ नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर वस्तूनिष्ठ लेख लिहिले. अंबरनाथ परिसरातील अनेकांनी या लेखाबाबत अनुकूल मत व्यक्त करून सडेतोड माहिती बाबत अभिनंदनही केले. विशेषतः अंबरनाथ नगरपालिकेच्या स्थापनेपासूनची माहिती जी अनेकांना ठाऊक नव्हती किंवा विस्मरणात गेली होती ती दिल्याने लोकांनी आनंद व्यक्त केला.
पत्रकारांचे काम हे पाट्या टाकण्याचे नसते, लांगुलचालनाचे तरमुळीच नसते, प्रसंगी कटुता घेऊन कटू सत्य मांडणे हीच खरी पत्रकारिता आहे.मी काल परवा आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या विषयी जे लिहिले ती वस्तुस्थिती आहे. त्यांचे माझे गेली वीस वर्षे चांगले संबंध असूनही त्यांची चुकीची वागणूक निदर्शनास आणताना माझी लेखणी थबकली नाही. माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांचा माझा जुना स्नेह आहे, कारण ते कला व साहित्य प्रेमी आहेत. ते नेहमीच माझा आदर करतात, समोरा समोर भेटल्यावर बडेजाव बाजूला सारून ते नतमस्तक होतात व माझ्याबद्दल गौरोवोदगार काढतात.
काल अंबरनाथला गेलो असता रस्त्यात भेट झाली, तेव्हा त्यांनी माझा योग्य तो मान राखला. अशी माणसं दुर्मिळ असतात. डॉ. बालाजी किणीकरही कधी मनात राग ठेवत नाहीत. हे सर्व संबंध विसरून परखडपणे लिहीत असतो. वैयक्तिक राग लोभ नसतोच, एकदा लिहून मोकळा झालो की सर्व विसरून जातो. कारण लेखनाचा हेतू शुध्द असतो.काल शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवार सौ. अंजली राऊत यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पक्षाची सद्यास्थिती व प्रचारातील अडचणी व प्रगती जाणून घेण्याचा उद्धेश होता. परंतू त्या प्रचारात व्यस्त असल्याने भेट होऊ शकली नाही. तरी त्यांचे यजमान ज्येष्ठ व निष्ठावंत शिवसैनिक बाळा राऊत यांची त्यांच्या बंगल्यावर भेट घेतली.
ते माझे जूने सहकारी असल्याने मनमोकळी चर्चा झाली. त्यांचा दृष्टीकोण सकारात्मक दिसला. मी म्हटल्याप्रमाणे समोर बलाढ्य व धनाढ्याचे आव्हान असताना ते ठामपणे उभे आहेत, इतर काही लोक मॅनेज झालेले असताना ते निर्धाराने लढण्यास सज्ज आहेत, ते ही आपल्या कर्तृत्वावर व निष्ठेवर अतूट विश्वास असल्याने, हे माझ्या दृष्टीने महत्वाचे. बाबासाहेब बोलून गेले की लढला नाहीस तरी चालेल पण विकला जाऊ नको, राऊत दांपत्य विकले तर गेले नाहीच आणि लढत ही आहे, हे महत्वाचे. सद्याच्या निवडणुकीत पैश्याला महत्व प्राप्त झाले आहे, माणसांच्या गुणांची मतदार कदर करीत नाहीत याचा मला स्वानुभव आहे.हार जीत होत राहील परंतू अंजली राऊत ह्या बलाढ्य शक्ती समोर हिंमतीने लढल्या, नांगी टाकली नाही हे महत्वाचे.
अंबरनाथ मध्ये शिवसेना कमकुवत झाली आहे, मनुष्यबळ कमी आहे, आर्थिक दिवाळखोरी आहे, पक्षात घरभेदी, दुहेरी निष्ठा असलेले दबा धरून बसले आहेत. अश्या वेळी पक्षाने राऊत यांना मुबलक निवडणूक निधी तो ही कोणत्याही मध्यस्था शिवाय त्यांना थेट दिला तर त्या निवडणुकीत तग धरू शकतील. “एक तुतारी द्या माज आणुनी, ती मी फुंकन स्वप्राणाने” असे केशवसूत म्हणून गेले, आजच्या काळात तुतारी म्हणजे मुबलक निधी असे गृहीत धरावे लागेल, तो जर मिळाला तर त्यांचा निवडणुकीत निभाव लागेल.या भेटीत बाळा राऊत यांनी स्पष्ट केले की, अजित काळे हा नाराज असला तरी ते स्वाभाविक आहे. परंतू संदीप पगारे यांचे नाव उगाच बातमीत टाकले आहे. संदीप पगारे हे नाराज नसून ते पक्षाचा व अंजली राऊत यांचा प्रचार निष्ठेने करीत आहेत. संदीप पगारे यांनीही मला फोन करून सत्य परिस्थिती सांगितली. स्वतःसोबत एका निष्ठावंताचे नाव जोडणे “छोट्या” लोकांना शोभत नाही.
त्यामुळे संदीप पगारे यांच्यावर कोणीही संशय घेता कामा नये.कल्याण जिल्हाप्रमुख मला नेहमीच डावलतात हे सत्य आहे. परवा उपजिल्हा प्रमुख राजेंद्र शाहू यांनी मला आग्रह केला की, आपण टिळक नगर शाखेत यावे. त्यानुसार मी काल गेलो. परंतु मला पाहताच काहींचे तोंड काळे झाले त्यांनी अँटी चंबेरमध्ये तोंड काळे केले. हा अपमान सहन न झाल्याने मी तसेच माझे सहकारी अनिल भोईर व इतरांनी शाखेतून काढता पाय घेतला. या निवडणुकीत शिवसेना उबाठा अतिशय कमकुवत स्थितीत आहे, प्रचार यंत्रणा दिसली नाही, फक्त अँप वर निवडणूक लढता येत नाही, जिंकता तर मुळीच येत नाही, हे नेतृत्वास कळायला हवे. टिळकनगर शाखे शेजारी राष्ट्रवादीच्या सदामामा पाटील यांचे कार्यालय दिसले, अंबरनाथाहुन येताना भाजपच्या करंजुले यांचे कार्यालय दिसले, शिंदे सेनेचे कार्यालय जे पूर्वी शिव सेनेची शहर शाखा होती ती दिसली, आणि डोळे दिपून गेले.
निवडणूक युद्ध सज्जता यालाच म्हणतात, या उलट आमची छावणी ओसाड वाटली.अजूनही वेळ गेलेली नाही, आर्थिक बळ देऊन, घरभेद्याना घरचा रस्ता दाखवून व मनुष्यबळ कमी असल्यास उल्हासनगर – कल्याण परिसरातून ते आयात करून निदान तुल्यबल लढत देण्याएवढी शक्ती तरी निर्माण करायला हवी. विजयाचे हजारो बाप असतात परंतू पराभवाचे खापर इतरांवर फोडण्याची स्पर्धा लागते.या निवडणुकीत उबाठा शिवसेना स्पर्धेत आहे, हे ठासवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, हे एक पत्रकार म्हणून नव्हे तर एक निष्ठावंत परंतु नेत्यांचा नावडता शिवसैनिक म्हणून माझे हे गाऱ्हाने पक्ष श्रेष्टीना आहे.


