विश्वविजेत्या क्रिकेट संघासाठी राष्ट्रपतींचे रिसेप्शन : शाबासकी आणि मेमो
उमेश काशीकर यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
दिनांक २ एप्रिल २०११ रोजी वानखेडे स्टेडियमवर भारतीय क्रिकेट संघाने इतिहासातील एक सुवर्णाध्याय लिहिला !
आयसीसी जागतिक एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेत त्या दिवशी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंकेला हरवून विश्वचषक दुसऱ्यांदा जिंकला.
हा अंतिम सामना पाहण्यासाठी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आल्या होत्या. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे हे देखील आले होते.
दिवस-रात्र झालेला हा अंतिम सामना अंदाजे रात्री साडेअकरा वाजता संपला आणि संपूर्ण देशभर भारत जिंकल्यामुळे एकच जल्लोष झाला.
विजेत्या क्रिकेट संघाला शाबासकी देण्यासाठी राष्ट्रपतींनी मुंबई येथील लोकभवनाच्या – तेंव्हाच्या राजभवनाच्या – हिरवळीवर दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक ३ एप्रिल रोजी – भारतीय क्रिकेट संघासाठी रिसेप्शन आयोजित करण्याचे ठरवले आणि स्टेडियमवरच जाहीर देखील केले !
वास्तविक वर्ल्ड कप संपल्यामुळे सर्व खेळाडू दुसऱ्या दिवशी आपापल्या घरी जाण्यास उत्सुक होते.
राष्ट्रपतींच्या रिसेप्शनसाठी सर्व खेळाडूंना आणखी एक दिवस मुंबईत थांबणे भाग पडले.
इकडे सामना संपल्यानंतर राष्ट्रपती प्रतिभा पाटील मुक्कामासाठी राजभवन येथे परत आल्या.
त्यांनी राज्यपाल के शंकरनारायणन यांना दुसऱ्या दिवशी आपण राजभवन येथे विजेत्या क्रिकेट संघासाठी स्वागत समारोह आयोजित करीत असल्याचे सांगितले.
राज्यपाल शंकरनारायणन यांनी राष्ट्रपतींचे सचिव क्रिस्टी फर्नांडिस यांच्या उपस्थितीत रात्री एक वाजता (एव्हाना घड्याळात ३ एप्रिल तारीख सुरु झाली होती !) राजभवनातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. बैठकीत राष्ट्रपतींच्या सूचनेनुसार राजभवनाच्या हिरवळीवर आयोजित करावयाच्या रिसेप्शनसाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.
पत्रिका छापून पोहोचविण्याचे आव्हान
रिसेप्शनची वेळ संध्याकाळी पाचची ठरली होती. पहिले आव्हान होते ते पत्रिका छापून घेण्याचे आणि त्याहीपेक्षा त्या पत्रिका वेळेत वाटण्याचे !
इतक्या कमी वेळात राष्ट्रपतींच्या रिसेप्शनच्या पत्रिका छापून सर्व निमंत्रितांना पोहोचवणे एक मोठेच आव्हान होते.
राज्यपालांचे तत्कालीन अवर सचिव (प्रशासन) देवेंद्र खाडे यांनी लगेचच शासकीय मुद्रणालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि सकाळपर्यंत निमंत्रण पत्रिका छापून आणल्या देखील !! पोलीस विभागाच्या मदतीने या सर्व पत्रिका निमंत्रितांना पोहोचवल्या गेल्या.
खाद्यपेय व्यवस्था
निमंत्रितांसाठी कमी वेळात खाद्यपेय व्यवस्था करणे व त्यासाठी कॅटरर व मेन्यू ठरवणे हे दुसरे आव्हान होते !
त्यावेळी खाद्यपेय अधीक्षक असलेले प्रशांत उन्हवणे यांनी हे आव्हान एकहाती सांभाळले.
रिसेप्शनच्या काही तास आधी, सकाळी ११ वाजता कॅटरर ठरला आणि त्याने चार वाजेपर्यंत राजभवनाच्या मागच्या लॉनवर स्टॉल देखील लावले !!
माध्यमांची तौबा गर्दी
राजभवनात राष्ट्रपतींनी रिसेप्शन आयोजित केल्याची बातमी जशी बाहेर पसरली तसतसे माध्यम प्रतिनिधींचे फोन खणखणू लागले.
मुंबई व राज्यातीलच नाही तर देशभरातील आणि आंतरराष्ट्रीय मीडियाचे प्रतिनिधी देखील अंतिम सामन्यासाठी मुंबईत आले होते.
या सर्वांना रिसेप्शनचे वृत्तांकन करायचे होते.
त्यामुळे लॉनच्या क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त माध्यम प्रतिनिधींनी रिसेप्शन कव्हरेजसाठी नावे दिली.
मुंबईतील बड्या उद्योजकांना व विविध देशांच्या राजनैयिक प्रतिनिधींना देखील निमंत्रणे पाठवण्यात आली.
हा सोहळाच असा होता की कुणाकडून अस्वीकृती (regret) येणे शक्यच नव्हते.
उद्योग जगतातील मुकेश अंबानी, नीता अंबानी, अजय पिरामल, विजयपत सिंघानिया, गौतम सिंघानिया, निखिल मेसवानी, अशोक हिंदुजा, राजश्री बिर्ला, कुमारमंगलम बिर्ला तर आलेच, पण काही निमंत्रित कुटुंबातील सदस्यांना देखील घेऊन रिसेप्शनला आले ! लोकभवनातील काही अधिकारी देखील आपल्या कुटुंबियांना घेऊन आले !!
मरीन ड्राइव्ह ते लोकभवन गर्दी
हॉटेलमधून टीम सदस्य राजभवनला येण्यास निघाले त्यावेळी रस्त्याने आणि त्यातही लोकभवनाकडे येणाऱ्या वाळकेश्वर रस्त्यावर एकच गर्दी झाली आणि काही वेळ ट्राफिक जाम झाले !
रूपरेषा
कार्यक्रमाची रूपरेषा अगोदरच ठरली होती.
सर्व खेळाडू एका लाईनमध्ये उभे राहतील.
राष्ट्रपती प्रतिभा पाटील, त्यांचे पती देवीसिंह शेखावत, राज्यपाल के शंकरनारायणन, त्यांच्या पत्नी राधा शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय कृषी मंत्री व आयसीसीचे अध्यक्ष शरद पवार एकत्र पायऱ्या उतरुन हिरवळीवर येतील.
सर्व खेळाडूंचे तसेच कोच गॅरी कर्स्टन यांचे अभिनंदन करतील.
विश्वचषकाजवळ प्रमुख पाहुणे खुर्चीवर आसनस्थ होतील; खेळाडू मागे उभे राहतील.
फोटो सेशन होईल.
त्यानंतर राष्ट्रपती थोड्या अंतरावर ठेवलेल्या सोफ्यावर बसतील.
त्या ठिकाणी प्रत्येक खेळाडूचे नाव पुकारले जाईल.
राष्ट्रपती खेळाडूंना पुष्पगुच्छ देऊन शाबासकी देतील असे ठरले.
सोहळा झाला की चहापानाला सुरुवात होईल.
राष्ट्रपती व मान्यवरांना सोफ्यावरच सर्व्ह केले जाईल, असे ठरले.
राष्ट्रपती लॉनवर आल्यावर उजवीकडे खेळाडू आणि त्यांच्या विरुद्ध बाजूला छायाचित्रकार व कॅमेरामन यांना उभे करण्यात आले.
रेटारेटी होऊ नये म्हणून पोलिसांनी माध्यम प्रतिनिधींसमोर दोरी ठेवून राष्ट्रपती महोदयांना मधल्या पॅसेजमध्ये खेळाडूंशी संवाद साधताना कोणतीही अडचण होणार नाही हे पाहिले.
आणि गोंधळ सुरु झाला !!
कार्यक्रमासाठी माध्यम प्रतिनिधींची संख्याच इतकी जास्त होती की गोंधळ झाला नसता तरच नवल !
राष्ट्रपती व इतर मान्यवर खेळाडूंना भेटून थोड्या अंतरावर खुर्च्यांवर बसले, त्या ठिकाणी खेळाडूंचा सत्कार झाला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी मान्यवरांना चहा स्नॅक्स द्यायला सुरुवात केली.
इकडे खेळाडूंसाठी खाण्याचे काउंटर सुरु करण्यात आले.
राष्ट्रपतींशिवाय केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख, श्रीमती वैशाली देशमुख, विधानपरिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आदी देखील स्थानापन्न झाले.
खेळाडूंचा भांगडा
दरम्यान, रिसेप्शन साठी नेमलेल्या कॅटररने त्या दिवशीचा माहोल पाहून एक पंजाबी ढोल वादक व दोन पंजाबी वर्दी घातलेल्या युवकांना आणले !
त्यांनी ढोल वाजवायला सुरुवात केल्यावर लगेचच वीरेंद्र सेहवाग, कोहली आणि युवराज सिंहने भांगडा करायला सुरुवात केली !
राष्ट्रपती बसल्या असताना हे ठीक दिसणार नाही म्हणून कुणीतरी ढोल थांबवायला सांगितला !
दुसरीकडे माध्यम प्रतिनिधींची शिस्त तुटली.
खेळाडूंना भेटून बाईट घेण्याची, एक्स्क्लुजिव्ह फोटो घेण्याची आयतीच संधी त्यांना लाभली.
काहीवेळ इतका गोंधळ झाला की विचारता सोय नाही.
रिसेप्शनला आलेले अभ्यागत, उद्योगपती, अधिकारी व त्यांचे कुटुंबीय देखील खेळाडूंसोबत किमान एकतरी छायाचित्र, सेल्फी मिळावे म्हणून धडपडत होते.
खेळाडूंना काउंटरवर जाऊन स्नॅक्सची डिश घेणे, आणि एखादा घास घेणे देखील कठीण झाले.
एकदोन खेळाडू निवांततेसाठी झाडामागे गेले, तर तेथेही काही लोक पोहोचले व त्यांना फोटोसाठी विनंती करु लागले !
क्रिकेटचे फॅन सर्वच जण ! त्यामुळे लोकभवनातील कर्मचारी – अधिकारी यांनी देखील आपापली कर्तव्ये सांभाळत किंवा थोडावेळ कर्तव्य बाजूला ठेवून – अशी संधी पुन्हा मिळणार नाही म्हणून – खेळाडूंसोबत फोटोसाठी चढाओढ केली.
एकवेळ अशी आली की एकीकडे राष्ट्रपती विराजमान आहेत आणि दुसरीकडे जो – तो खेळाडूंच्या मागे !
वातावरण विजयाचे असल्यामुळे कुणीही त्याचे फारसे मानून घेतले नाही हे नशीब !!
मेमो आणि शाबासकी
राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, मुख्य न्यायमूर्ती बसले आहेत आणि समोर बेशिस्त परिस्थिती झाली. त्यामुळे राजभवन प्रशासनाला दखल घेणे भाग पडले.
राज्यपालांचे मावळते सचिव श्रीकांत देशपांडे, नुकतेच सचिवपदी पदोन्नती झालेले विकास चंद्र रस्तोगी यांनी कार्यक्रमातील बेशिस्तीची गंभीर दखल घेतली.
दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांनी आधल्या दिवशीच्या रिसेप्शनची एक एक छायाचित्रे मागवून तपासून पाहण्याचे आणि कोणत्या कर्मचारी – अधिकाऱ्याने आपले कर्तव्य सोडून क्रिकेटपटूंसोबत फोटो काढले याचा तपस करायचे ठरवले.
त्यात एका कर्मचाऱ्याने वर्ल्ड कप उचलून – जणू आपणच कप जिंकला आहे अश्या अविर्भावात – खेळाडूंसोबत फोटो काढून घेतल्याचे दिसले !
त्याकाळात फेसबुक फार लोक वापरत नव्हते. तरीही वापरणाऱ्यांनी आपले खेळाडूंसोबतचे फोटो फेसबुकवर टाकून दिले !
ज्यांची रिसेप्शनच्या ठिकाणी ड्युटी लागली नव्हती असेही कर्मचारी लॉनवर फोटो काढून घेण्यासाठी आले होते.
असे काही कर्मचारी शोधून त्यांना ‘मेमो’ देण्यात आले !!
परंतु प्रशासनाने देखील मानवी दृष्टिकोन ठेवून गंभीर कारवाई न करण्याचा निर्णय घेतला !
गौतम गंभीरचे राष्ट्रपतींच्या विमानाने प्रयाण
गौतम गंभीरला त्याच दिवशी दिल्ली येथे पोहोचणे आवश्यक होते.
राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या देखील रिसेप्शन आटोपून लगेचच दिल्लीला जाणार होत्या.
त्यामुळे गौतम गंभीरने दिल्लीला त्यांच्यासोबत प्रवास करण्याची इच्छा व्यक्त केली.
राष्ट्रपती सचिवालयाने देखील त्याला सोबत येण्याची अनुमती दिली.
त्यामुळे इतर खेळाडू लोकभवन येथून बसने हॉटेलकडे रवाना झाले, तर गौतम गंभीर राष्ट्रपतींच्या कॉन्व्हॉयमध्ये बसून विमानतळाकडे व तेथून दिल्लीला रवाना झाला !
आणि शाबासकी…
इतक्या कमी वेळेत रिसेप्शन आयोजित केल्याबद्दल राष्ट्रपतींनी जाताना राज्यपाल महोदयांकडे समाधान व्यक्त केले.
राज्यपालांच्या सूचनेनुसार राज्यपाल सचिवालयाकडून वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रशस्तिपत्रे प्रदान करण्यात आली.


