ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!
प्रभाग 14 मध्ये माजी नगरसेवकांचे भवितव्य ठरणार : नव्यांना संधी
ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
प्रभाग क्र. 14 हा शिवसेनेचा पारंपारिक बाले किल्ला मानला जातो. मराठी बहुल मतदार असलेला हा प्रभाग आहे. यात मराठा विभाग, स्टेशन परिसर, महाराष्ट्र बँक परिसर, महात्मा फुले कॉलनी, भीम कॉलनी, चारंग बाबा नगर, गजानन नगर आदी परिसर येतो. या प्रभागाचे नेतृत्व मनोहर गावडे, बाळकृष्ण चोडणकर, सुरेंद्र सावंत, यशस्वीनी नाईक तसेच सुभाष मन्सूलकर, शेखर यादव,सुनील सुर्वे, जयश्री सुर्वे, मिताली राजेंद्र चांपूर व लीलाबाई आशान यांनी आजवर केले आहे.
2017 च्या निवडणुकीत लीलाबाई आशान, सुनील सुर्वे, शेखर यादव व मिताली चांपूर हे मूळ शिव सेनेच्या वतीने होते. सुरेंद्र सावंत हे याच प्रभागातील माजी नगरसेवक स्विकृत नगरसेवक होते.
शिवसेनच्या फाळणी नंतर हे पाच ही नगरसेवक शिंदे सेनेत गेल्याने उबाठा शिवसेनेस खिंडार पडले. मूळ शिवसेनेस उमेदवारच नाही, अशी स्थिती निर्माण झाली. तरी देखील शो मस्ट गॊ ऑन प्रमाणे शिवसेना व मनसेने या प्रभागात चार उमेदवार उभे केले आहेत.
प्रभाग अ हा अनुसूचित जाती माहिला राखीव असल्याने माजी महापौर व माजी नगरसेविका लीलाबाई आशान या शिंदे सेनेतून पुन्हा निवडणूक लढवीत आहेत. त्यांना शह देण्यासाठी भाजपने डॉ. संजीवनी कांबळे या नवख्या तरुणीस उमेदवारी दिली आहे. अल्प शिक्षित व वयोवृद्ध विरुद्ध सुविद्य व तरुण असा हा सामना रंगणार आहे. उद्धव सेनेच्या राधा विजय घावारे यांचाही पर्याय मतदारांसमोर आहे.लीलाबाई आशान या आपला किल्ला पुन्हा काबिज करतात कि मतदार नव्या चेहऱ्यास संधी देतात हे 16 तारखेला दिसून येईल.
प्रभाग क्र. 14 ब मधून राजेश चांपूर हे त्याच्या माजी नगरसेविका पत्नी मिताली यांच्या ऐवजी स्वतः शिंदे सेनेतून निवडणूक लढवीत आहेत. त्यांना या वेळी शिला सुभाष मन्सूलकर या भाजपाच्या उमेदवाराशी सामना करावा लागेल. शिला मन्सूलकर व कै. सुभाष मन्सूलकर हे दोघेही याच प्रभागातून पूर्वी नगरसेवक म्हणून निवडून आले होते. चांपूर व मन्सूलकर हे दोघेही एकाच परीट समाजाचे आहेत. मन्सूलकर यांना गजानन नगर, दासूमल नगर, चारंगबाबा नगर या परिसरात समर्थन असल्याने चांपूर ऐवजी मन्सूलकर यांचे प्राबल्य अधिक असल्याचे दिसून येते. शिवाय कै. सुभाष मन्सूलकर व कालच अकस्मात निधन झालेले दामोदर मन्सूलकर यांच्याबद्धल असलेल्या सहानुभूतीचा लाभ शिला मन्सूलकर यांना मिळू शकतो. याच प्रभागातून रघुनाथ उर्फ मयूर कांबळी हे ही उबाठा शिव सेनेतून नशीब अजमावत आहेत. असे असले तरी खरी लढत शिंदे सेना व भाजपातच होईल.
प्रभाग क्र. 14 क मध्ये मजेशीर लढत आहे. जयश्री सुनील सुर्वे व साक्षी संदीप सुर्वे या दोन सख्या जावा आपसात लढत आहेत. सुनील सुर्वे या माजी नगरसेवकाची पुण्याई कॅश करण्याचा या दोघी जावा प्रयत्न करीत आहेत. जयश्री सुनील सुर्वे या माजी नगरसेविकाही आहेत. तर संदीप सुर्वे हे आपले बंधू सुनील सुर्वे यांच्या निधना नंतर आपली पत्नी साक्षी यांच्यासह सक्रिय असल्याने ते वरचढ वाटतात. मात्र या दोघी जावांच्या भांडणात भाजपच्या नम्रता विष्णू तरे यांचीही लॉटरी लागू शकते. मतदाना आधी या दोघी जावात समेट घडला नाही तर “तुला ना मला घाल भाजपाला” अशी परिस्थिती निर्माण होऊन पाच वर्षे हात चोळत बसावे लागेल.
प्रभाग क्र. 14 ड मधील लढत खूपच चूरशीची ठरेल. माजी नगरसेवक चंद्रशेखर यादव यांनी उबाठा शिव सेनेची साथ सोडल्याने येथील स्वाभिमानी मतदार दुखावला आहे. तर सचिन कदम हे मनसेचे स्थानिक नेते कित्येक वर्षे सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवित असल्याने प्रकाश झोतात आहेत. अनेक महिला बचत गटांना त्यांनी सतत मदत केली, स्वयं रोजगार मिळवून दिले आहेत.त्यामुळे त्यांचे पारडे निश्चितच जड आहे. भाजपने प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्यां कै.सरिता खानचंदाणी यांच्या आत्महत्या प्रकरणातील एक संशयित आरोपी उल्हास फाळके यांना उमेदवारी दिली आहे. फाळके हे या परिसरास पूर्णतः नवखे असल्याने त्यांचे कमळ कोमेजून जाईल. खरी लढत सचिन कदम मनसे व शेखर यादव यांच्यातच होईल.


