मलंग मुक्तीची पहाट कधी होईल ?ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, उल्हासनगर यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.नवनाथांचे पवित्र तीर्थक्षेत्र मानले गेलेल्या कल्याण तालुक्यातील श्री मलंगगड येथील मच्छिंद्रनाथांच्या समाधीचे दर्शन घेण्याचा योग आज जुळून आला. पूर्वी शेकडो पायऱ्या चढून मलंग गडावर चढून जाण्यात वेगळीच मजा असायची l.धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रेरणेने 1986 साली सुरू झालेली श्रीमलंग मुक्तीची पहाट त्यांच्या निधनानंतर काहीशी थंडावली होती.
दिघे साहेब हयात असताना हिंदू मंच सारख्या संघटना या मलंग यात्रेत हीरिरीनने भाग घेत असत. स्वतः दिघे साहेबांची उपस्थिती ही तमाम हिंदू बांधवांना व शिवसैनिकांना प्रेरणादायी असायची. त्यामुळे मोठ्या संख्येने हिंदू बांधव माघी पौर्णिमेच्या दिवशी मलंगड यात्रेत सहभागी होत असत. त्यांनी दिलेला नारा- “हिंदूंची वहिवाट हीच मलंग मुक्तीची पहाट”! हा प्रभावी ठरला होता. मात्र गेल्या तीन वर्षापासून शिवसेनेचे विभाजन झाल्यामुळे या यात्रेत दोन वेगवेगळ्या चुली मांडल्या जाऊ लागल्या. एकनाथ शिंदे गटाकडे सत्ता व संपत्ती असल्यामुळे त्यांनी मलंग गडाच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी व होर्डिंगबाजी करून आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला व करित आहेत.
मूळ मुद्दा हा मलंग मुक्तीचा असूनही व एकनाथ शिंदे हे प्रथम मुख्यमंत्री व नंतर उपमुख्यमंत्री होऊनही मलंग मुक्ती किंवा हिंदूंची वहिवाट निर्माण करण्यात अपयशी ठरले आहेत.आज रोपवेमुळे मलंग गड गाठणे सहज साध्य आणि सोपे झाले आहे. पूर्वी आम्ही दोन दोन तास पायपीट करून अवघड पायऱ्या चढून मलंग गडावर जाऊन मच्छिंद्रनाथांच्या समाधीचे दर्शन घेत असू व हिंदू पद्धतीने आरती होत असे. सध्या ही वहिवाट दोन्ही सेनांनी सुरू ठेवलेली असली तरी त्याचा दृश्य परिणाम आढळून येत नाही, ही खेदाची बाब आहे.आज बऱ्याच वर्षांनी रोप वे ट्रेन मुळे मला गलंग गड गाठता आला व समाधीचे डोळे भरून दर्शन घेता आले. परंतु त्या समाधी स्थळाच्या आसपास हिंदू धर्माचे व मच्छिंद्रनाथांचे अस्तित्व असल्याच्या खुणा शोधूनी सापडल्या नाहीत. आज नव्याने सुरू झालेल्या पेनॅक्युलर ट्रेनमुळे मला समाधी पर्यंत पोहोचता आले या निमित्ताने आमचे जुने मित्र व सहकारी माजी खासदार राजन विचारे, माजी उपमहापौर नरेश मनेरा तसेच दिघे साहेबांचे पुतणे केदार दिघे यांचा सहवास लाभला.
तसेच माझे जुने सहकारी विनोद सावे व ज्येष्ठ पत्रकार दिवाकर गोळवकर सारख्यांची दुर्मिळ असलेली भेट झाली. शिंदे सेनेचे पदाधिकारी, काही नगररसेवक, उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे शिवसेनेचे नवे जुने पदाधिकारी, शिवसैनिक,महिला आघाडीच्या असंख्य महिला पदाधिकारी यांची भेट झाली. शिवसेनेच्या व्यासपीठावर व भोजन कक्षात ज्याला आपण निष्ठेचा प्रसाद असे नाव दिले आहे, तिथेही प्रचंड गर्दी होती. एकंदरीत ही यात्रा एका दिवसापूर्ती मर्यादित राहता कामा नये. न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणाचा निकाल लागून येथे हाजी मलंग ऐवजी श्रीमलंगड असे नामकरण होणे आवश्यक आहे. तसे झाले तरच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना मरणोत्तर समाधान लाभेल.
आता मलंगड गाठणे हे सहजसाध्य झाल्यामुळे हिंदू बांधवांनी येथे वारंवार जाऊन आपली वहिवाट निर्माण केली पाहिजे. नव्या पिढीला श्रीमलंगडाचे महत्व पटवून दिले पाहिजे व हाजी मलंग ऐवजी श्रीमलंगड तसेच नवनाथांच्या संप्रदायाचे एक तीर्थक्षेत्र मानून तेथे आपली वहिवाट निर्माण केली पाहिजे. अन्यथा कालांतराने श्रीमलंगड हे नाव व हिंदू धर्मियांच्या प्रामुख्याने नाथपंथीयांच्या अस्तित्वाच्या खुणा नष्ट होतील, अशी साधार भीती वाटते.या यात्रेच्या नियोजनासाठी व निष्ठेच्या प्रसादासाठी मलंगगडवासी शिवसैनिक, पदाधिकारी कल्याण शहर शाखा, व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी कल्याण जिल्हा शाखेने मेहनत घेतली व आर्थिक जुळवाजूळव केली. व्यासपीठ व भोजन कक्षासाठी श्री सुरेश पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.


