मायणी गटात आलीय रंगत कमळ आणि घड्याळ्याच्या लढाईत तुतारी वाजतीय !मायणी : –
प्रतिनिधी, दत्ता कोळी
मायणी जिल्हा परिषद निवडणुकीतील भाजपाच्या कमळ विरुद्ध राष्ट्रवादीच्या घड्याळ या टोकाच्या लढाईत शरद पवार राष्ट्रवादीची तुतारी सर्वत्र वाजू लागल्याने गटातील तिरंगी लढतीने रंगत वाढत चालली आहे.
मायणी गटातील मायणी, चितळी, कलेढोण या गावांच्या खालोखाल विखळे, पाचवड, हिवरवाडी, गारुडी, तरसवाडी, कानकात्रे, यासह इतर वाड्यावस्त्यात निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरात घुमू लागली आहे. निवडणूक दोन दिवसावर येऊन ठेपल्याने आता या टोकाच्या लढाईत साम, दाम, दंड , भेद याचा सर्वार्थाने वापर होणार आहे.
निवडणुक लढाईच्या निमित्ताने प्रचार पाणी, नागरी सुविधा, स्वच्छता,आरोग्य आणि स्वाभिमान या बाबतच्या विकासच्या मुद्द्यांवर होताना दिसत आहे. आमदारकीच्या पश्चात गेली अनेक वर्ष जि .प.गटात राज्य करणाऱ्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्हांचे गटाचे उमेदवार व अनुभवी राजकारणी असलेले सुरेंद्र गुदगे हे आपल्या मायणी गणाचे उमेदवार सौ . अनुसया गायकवाड व कलेढोण गण उमेदवार चंद्रकांत पवार यांच्या सोबत आपण केलेल्या विकास कामांच्या तसेच शैक्षणिक, बँकेच्या माध्यमातून केलेले लोकांना सहकार्य, आणि विरोधकांच्या सहकारी संस्थांच्या मुद्द्यांच्यावर प्रचार करताना दिसत आहेत. तर भाजप पक्षातर्फे सर्वसामान्य , उच्चशिक्षित अँड. सूरज पाटील मायणी गटासाठी तर मायणी गणासाठी चितळी गावच्या सौ. अनिता संभाजी कोळी तर कलेढोण गणासाठी प्रसाद जुगदर हे कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.
त्यांच्या पाठीशी थेट राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांची ताकद उभा आहे. त्यांच्या प्रचाराच्या मुद्द्यात ज्याभागात अद्याप कोणत्याची सिंचन योजनेचे पोहचले नाही अशा कलेढोण व परिसरात भाजपाच्या माध्यमातून चालू असणारे टेंभू जलसिंचन प्रकल्पाचे काम, याद्वारे होणारे दुष्काळ हटाव मोहीम, चितळी गावातील सर्वात मोठा येरळा नदीवरील कोट्यवधींचा पूल , यासह इतर विकास कामे, सिंचनामुळे बागायत झालेली येथील शेती , आणि निर्णायक ठरणाऱ्या मायणी गावातील भाजपाच्या माध्यमातून आणलेल्या चोवीस बाय सात योजना, घनकचरा प्रकल्प , बायपास, यासाठींचा कोट्यवधींचा निधी, याचबरोबर सुरेंद्र गुदगे यांच्या ताब्यातील ग्रामपंचायतीने केलेला या योजनांतील भ्रष्टाचार?,तसेच मायणी ब्रिटिशकालीन तलावात आणलेले भागातील गावांसाठी टेंभू योजनेचे पाणी या सर्व बाबीं प्रचाराचे मुद्दे आहेत.
याठिकाणी दुरंगी लढत बघायला मिळेल असे वाटत असतानाच काँग्रेस नेतृत्वाकडून दुखावले गेलेले हिवरवाडी गावचे अँड. प्रल्हाद सावंत यांनी थेट शरद पवार राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर आपली उमेदवारी निश्चित केल्याने गटातील स्व.अजित पवार राष्ट्रवादीशी समेट करण्याच्या मानसिकतेत असणार शरदपवार पक्षाचा गट ऐन वेळी सक्रिय होऊन अँड . सावंत यांच्या पाठीशी उभा राहिला.
*सोशल मीडियाची खोडी कोणाच्या पथ्यावर*
जिल्ह्यात ठिकठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी मतविभाजन टाळण्यासाठी आघाडी करताना दिसत असतानाच सोमवारी मायणी भागातील सोशल मीडियावर अँड प्रल्हाद सावंत यांची उमेदवारी पक्षाने रोखली आहे.त्यांच्याकडील पक्षाच्या तुतारी चिन्हावर मतदान न करता राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर मतदान करण्यात यावे असे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नावाचे आदेश पत्र सुरेंद्र गुदगे यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर प्रसारित केले. यामुळे तुतारी चिन्हावर शरद पवार राष्ट्रवादीकडून निवडणूक लढणारे आणि पेशाने वकील असणाऱ्या सावंत यांनी या बाबीची गंभीर दखल घेत. संबंधित पत्र विना जावक क्रमांकचे असल्याने हे कदाचित अधिकृत नसावे आणि असले तरी अद्याप माझ्यापर्यंत ते न पोहचता विरोधकांकडे कसे प्राप्त झाले? हा प्रश्न उपस्थित केला.याबाबत माझे म्हणणे मी वरिष्ठांकडे मांडेन. अशा आशयाचे स्पष्टीकरण सर्वत्र दिल्याने सुरेंद्र गुदगे गटाकडून हा खोडसाळपणा करण्यात आला का? असा संभ्रम सर्वत्र निर्माण झाला. या बाबतची स्पष्टता आणि सत्यता अद्याप समोर आली नाही. गटात ऐनवेळी उभी राहिलेली तिसरी उमेदवारी, दोन्ही राष्ट्रवादीच्या मतात होणारे संभाव्य विभाजन, वरील प्रकरणापासून लांब राहून कोणतेही भाष्य न करता भाजप पक्षाने भागातील झालेला विकास याच मुद्द्यांना धरून प्रचार चालू ठेवला आहे.
मतपत्रिका मशीन वरील भाजपा आणि अजित पवार राष्ट्रवादी यांच्या गटाच्या आणि गणाच्या उमेदवारांचा आलेला उलटसुलट अनुक्रमांक कदाचित मतदारांच्या लक्षात न आल्यास मायणी गटासह गणात “क्रॉस मतदान” होण्याची शक्यता असल्याने गट व गणाच्या सर्व तिन्ही पक्षाच्या उमेदवारांना आपल्या पुढील मताच्या बटनाची खातरजमा मतदारांना करून देणे, आवश्यक बनले आहे. ( २००८ साली जिल्हा परिषदेत काँग्रेस पक्षाकडून सदस्य असणारे आणि तत्कालीन मातब्बर राष्ट्रवादी पक्षाविरुद्ध एकत्र लढणारे माजी आमदारपुत्र सुरेंद्र गुदगे आणि राजकीय कोणताही वारसा नसणारे जयकुमार गोरे. या दोन्ही व्यक्तिमत्वाचे कारकिर्दीचा आलेख पाहता. आज एकीकडे देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आलेल्या महाराष्ट्राची सत्ता प्राप्त केलेल्या भाजप पक्षाकडून थेट महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकासमंत्री पदी झेप घेतलेले नामदार जयकुमार गोरे आणि खटाव तालुक्यात बेरजेचे राजकारण करताना जिल्हा परिषद निवडणुकीत पुन्हा स्वतः उमेदवार म्हणूनच उभा राहिलेले सुरेंद्र गुदगे या दोन्ही व्यक्तिमत्वाच्या कारकिर्दीच्या आलेखाची शिखर आणि दरी पाहता मायणी गटात जनता आता कोणाच्या पाठीशी उभा राहणार हे पाहावे लागेल. तसेच उद्या गुरुवारी होणाऱ्या मायणी येथील सभेत जयकुमार गोरे हे आपले जुने सहकारी आणि आजचे विरोधक उमेदवार असणाऱ्या सुरेंद्र गुदगे यांच्यावर काय भाष्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.)


