पुणेफाइल्सज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले असून, २३ जानेवारी २०२६ रोजी मुंबईत षण्मुखानंद हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमास मी स्वत: उपस्थित होतो. त्यावेळी उद्धव ठाकरे, राज ठाकरे, संजय राऊत, अमित ठाकरे आणि अन्य बरेचजण हजर होते. त्यानंतर काहीच दिवसांत पुण्यात आल्यावर आज सकाळीच सदाशिव पेठेतील बाळासाहेब यांचे जन्मस्थान मी पाहिले. माझे लहानपण ज्या भागात गेले, तोच हा भाग आहे.
त्याच्या मागच्याच्या मागच्या गल्लीत एका वाड्यात मी राहत होतो. आज त्या भागातून जाताना अचानक आठवण आली आणि बाळासाहेबांचे जन्मस्थान पाहिले. मी शाळेत असतानाच पुण्यात नंदू घाटे (त्यांच्या कन्यांच्या लग्नात बाळासाहेब आवर्जून उपस्थित राहिले होते), काका वडके यांची नावे प्रसिद्ध होती. पुण्यात त्यांनी शिवसेना वाढवली. याखेरीज सुभाष सर्वगौड, शशिकांत सुतार, दीपक पायगुडे, रामभाऊ पारिख, नाना वाडेकर हे जुने शिवसैनिक. अर्थात मी हे सर्व असली शिवसेनेबद्दलच बोलत आहे. नकली शिवसेनेचा जन्म २०२३ साली झाला आणि सुईणीचे ‘कर्तव्य’ कमळाबाईने बजावले! असो. पुण्यातील प्रसिद्ध काँग्रेस नेते भाऊसाहेब शिरोळे यांच्याशीही बाळासाहेबांचे उत्तम संबंध होते. बाळासाहेबांना पुण्यातील कॅम्प परिसरातील दोराबजी हॉटेलमधील बिर्याणी पसंत होती.
१९९० मध्ये भाजपशी युती असताना शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ बाळासाहेबांनी शशिकांत सुतार यांच्यासाठी मागून घेतला. युती सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद बाळासाहेबांनी आग्रहपूर्वक शिवसेनेकडे घेतले. युती सरकार असताना खडकवासला धरणापासून पर्वती जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतच्या बंद नळ योजनेस मान्यता द्यावी, असा आग्रह बाळासाहेबांनी धरला आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्याचे भूमिपूजनदेखील पार पडले होते. मी पुण्यात ज्या भागात नंतर स्थलांतरित झालो, त्याच भागात प्रसिद्ध उद्योगपती वसंतराव वैद्य यांचा ‘लौकिक’ नावाचा बंगला होता. पुण्यात बाळासाहेब आले की ते त्यांच्याकडे जात असत. त्या काळात पुण्याच्या समाज जीवनात वैद्य यांचे चांगलेच प्रस्थ होते. त्यांच्याच बंगल्यात अमिताभ बच्चन आणि जया भादुरी देखील आले होते, हे मी स्वतः १९७३ साली पाहिले आहे. सदाशिव पेठेतील बॅरिस्टर गाडगीळ स्ट्रीटवर नागनाथ पाराच्या अगदी जवळ, एका वाड्यात बाळासाहेब राहत होते. या वाड्यासमोर इंदिराबाई खाडे यांच्या मॅटर्निटी होममध्ये त्यांचा जन्म झाला.
सदाशिव पेठेतील वाड्यात प्रबोधनकार ठाकरे हे राहत होते आणि त्यांच्या ‘प्रबोधन’ या नियतकालिकाचे कार्यालय देखील तेथेच होते. प्रबोधनकार यांची मते जहाल होती आणि ते सनातन्यांवर तुटून पडत असत. महात्मा फुले यांच्या क्रांतिकारक विचारांचा पुरस्कार करणाऱ्या प्रबोधनकारांना देखील पुण्यात टीका आणि सामाजिक जाच सहन करावी लागली. मात्र केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर त्याचप्रमाणे लोकमान्य टिळकांचे चिरंजीव श्रीधरपंत टिळक हे प्रबोधनकारांमागे ठामपणे उभे राहिले होते. ज्या भागात प्रबोधनकार राहत होते, त्याच गल्लीत नंतरच्या काळात ग. प्र. प्रधान देखील दुसऱ्या टोकाला राहत होते. प्रधान मास्तरांना टांग म्हणून सायकलवरून जाताना देखील मी पाहिले आहे…
प्रबोधनकार जिथे राहत, त्याच्यापुढे गांधीवादी कार्यकर्ते बाळूकाका कानिटकर यांचा वाडा होता, हे मला आठवते. त्याच गल्लीत पुढे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर सामाजिक कार्यकर्ते गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका हे राहत असत. १८७० साली त्यांनी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना केली आणि विधायक व समाजोपयोगी कामे केली. वासुदेव बळवंत फडके यांच्या खटल्यांचे वकीलपत्र घेणारे सार्वजनिक काका हे न्यायमूर्ती रानडे यांचे उत्तम स्नेही होते.
विशेष म्हणजे, त्याच गल्लीत शंकर रामचंद्र राजवाडे उर्फ अहिताग्नी राजवाडे हे राहत असत. ते एक प्रसिद्ध वैदिक विद्वान आणि सनातन धर्माचे अभ्यासू पुरस्कर्ते होते. पुण्यातील वैदिक संशोधक मंडळाचे प्रमुख म्हणून त्यांनी कार्य केले. एकाच भागात प्रबोधनकार राहत होते आणि त्याच गल्लीत गांधीवादी कानिटकर, समाजसुधारक सार्वजनिक काका हे राहत होते आणि अहिताग्नी राजवाडेदेखील! सनातनी आणि सुधारक यांची अशी ही गल्ली…


