ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७जगात ठिकठिकाणी आर्ट कॅफेज् आहेत आणि तिथे असंख्य कलारसिक जाऊन फोटो, चित्रे न्याहाळतात आणि कॉफी पिता पिता पुस्तके वाचतात, संगीताचा आस्वाद घेतात.
पणजी किंवा मुंबईत काही हॉटेलांत गिटारवर पाश्चात्य धुना ऐकवत, वादक मनोरंजन करतात. मुंबईत श्रीमंतांसाठी बीकेसीमध्ये ‘एनएमएसीसी आर्ट्स कॅफे’ आहे. विरारला ‘द आर्ट टेबल कॅफे’ आहे. कर्जतला ‘रूट्स आर्ट कॅफे’ आहे. आणि पुण्यातील ‘द डेली ब्रू आर्ट कॅफे’ रसिकांना ठाऊक आहे. हे कॅफे पेंटिंग्ज, हस्तकला आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी ओळखले जातात. कर्जतमध्ये एनडी स्टुडिओच्या अगदी जवळ ‘रूट्स’ एक छोटेखानी कॅफे आहे. रूपाली पाटोळे तो चालवतात. त्या स्वतः जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधील विद्यार्थिनी असून, त्यांनी बंगळुरूमध्ये शिल्पकलेचे शिक्षण घेतलेले आहे.
रूपाली यांच्या कॅफेतील फर्निचर, एकूण एक वस्तू आणि रचना यात गावातले गावपण जपलेले आहे. आज पुण्यात अशाच एका उत्कृष्ट कॅफेमध्ये जाणे झाले. पुण्यात नळस्टॉपजवळ लॉ कॉलेज रोडवर ‘मसई कॅफे’ आहे. गेल्यावर्षी ३० मार्चलाच त्याची स्थापना झाली. आर्टिस्ट ऍक्टिव्हिस्ट आणि टेक एक्सपर्ट्स यांनी एकत्रपणे चालवलेला हा कॅफे. सिनेमा, नाटक, साहित्य, चित्रकला अशा विविध कलाक्षेत्रांतील लोक इथे येत असतात. लॉ कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, गरवारे कॉलेज, फिल्म इन्स्टिट्यूट इथल्या तरुणाईला हा कॅफे पसंत आहे,
असे कळाले. या कॅफेमध्ये घरचे मसाले वापरून बनवलेली मिसळ, चिकन – मटण खिमा, अख्खा मसूर, आगाऊ ऑर्डरनुसार पूर्ण चिकन व मटन थाळी, विविध चहा आणि कॉफीचे प्रकार मिळतात-जे या कॅफेमध्ये निवांत बसून एन्जॉय करता येते. आज या कॅफेमध्ये या टीममधील एक, कौस्तुभ खांडेकर यांच्या आमंत्रणावरून तेथे गेलो होतो. मी तिथे मिसळपाव खाल्ला.मिसळीतील कोल्हापूर स्टाइल घरगुती मसाला अत्यंत रुचकर, चविष्ट, चमचमीत होता.
पोटाला त्रास देणारा बिलकुल नव्हता. त्यानंतर कोल्हापूरच्या जवळच्या ठिकपुर्ली गावात, घरोघरी बनणाऱ्या खव्याच्या बर्फीचा मी आस्वाद घेतला. ही बर्फी खाल्ल्यावर आपण या जगातच न राहता थेट तरंगायलाच लागतो… या कॅफेचे वैशिष्ट्य म्हणजे, खांडेकर (त्यांचे सुशिक्षित चिरंजीव भास्कर हे किचन मनोभावे सांभाळतात) कोल्हापूरचे, सॉफ्टवेअरमधले आहेत. हृषिकेश मोघे आणि साहिल कल्लोळी हे या स्टार्टअपचे चालक-मालक आहेत.
हृषिकेश हे उत्कृष्ट चित्रकार असून, त्यांची चित्रे या कॅफेमध्ये पाहायला मिळतात. ही चित्रे वैविध्यपूर्ण आणि वेधक आहेत. कल्लोळी हे रंगकर्मी असून, ते कोल्हापूरच्या ‘प्रत्यय’ या सुप्रसिद्ध नाट्यसंस्थेची जोडले गेलेले आहेत. ते कमिटेड कम्युनिस्ट कार्यकर्ते आहेत. ‘मसई’ हा कॅफे इमारतीच्या आऊट हाऊसमध्ये आहे आणि हँगआउटसाठी तो अत्यंत उत्तम आहे. रस्त्याच्या किंचित आतल्या बाजूस असल्यामुळे आवाजाचा त्रास नाही. माझ्या तरुणपणी पुण्यात ‘कॅफे डिलाइट’ हा असाच कार्यकर्त्यांचा व कलावंतांचा अड्डा होता किंवा अलका टॉकीजसमोर ‘रिगल’ मध्ये किंवा ‘गुडलक’ किंवा फर्ग्युसन रोडवरच्या ‘दिवार’ कॅफेत चार आण्याचा चहा पीत आम्ही तासन्तास बसायचो!
आज ‘मसई’ने मला माझ्या तरुणपणातल्या दिवसांची आठवण करून दिली… (सोबतच्या छायाचित्रात माझ्यासमवेत कौस्तुभ खांडेकर आणि त्यांचे चिरंजीव भास्कर)


