*राज्यपालांचे एडीसी*उमेश काशीकर यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र.
राष्ट्रपतींसोबत तसेच राज्यपालांसोबत नेहमी उमदे व्यक्तित्व लाभलेले रुबाबदार लष्करी किंवा पोलीस अधिकारी दिसतात. हे अधिकारी म्हणजे राष्ट्रपती अथवा राज्यपालांचे एडीसी असतात ! बरेचदा लोकांना प्रश्न पडतो की ‘एडीसी’ म्हणजे काय व त्याचा ‘फुल फॉर्म’ काय आहे ! तर, एडीसी हा शब्द फ्रेंच आहे ! त्याचा फुल फॉर्म आहे Aide – de – Camp ! शब्दशः, ‘तळावरील सहकारी’ ! मराठी भाषेत राज्यपालांचे एडीसी याला समर्पक शब्द आहे राज्यपालांचे परिसहाय्यक ! परंतु, परिसहाय्यक शब्द लक्षात ठेवणे ‘एडीसी’ शब्दापेक्षा कठीण आहे ! त्यामुळे लोक साधारणपणे एडीसी हाच शब्द वापरतात !एडीसी हे राष्ट्रपती व राज्यपालांनाच असतात असे नाही;
तर तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांना आणि महत्वाच्या लष्करी अधिकाऱ्यांना देखील एडीसी देण्यात येतात. राष्ट्रपतींना तर एडीसींशिवाय सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारी ‘मिलटरी सेक्रेटरी’ म्हणून असतात. *एडीसी पदाचा पूर्वेतिहास*एड-डी-कॅम्प (ADC) या शब्दाचा उगम साधारण १७–१८ व्या शतकातील युरोपीय लष्करी परंपरेतून, विशेषतः फ्रान्समधून झाला, असे सांगतात.
युद्धमोहीम सुरु असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश कनिष्ठांना पोहोचवणे, पलटणीत समन्वय ठेवणे आणि गोपनीय सहाय्यक म्हणून कार्य करणे यासाठी विश्वासू तरुण अधिकाऱ्यांची गरज भासत असे. भारतासारख्या ब्रिटिशांच्या वसाहतींमध्ये ईस्ट इंडिया कंपनीने – या कंपनीचे स्वतःचे लष्कर होते – एडीसी ठेवण्याची ही पद्धत स्वीकारून आपल्या लष्करी व राजदरबारी व्यवस्थेत समाविष्ट केली. गव्हर्नर, गव्हर्नर जनरल आणि व्हाइसरॉय यांना एडीसी पदावरील व्यक्ती सहाय्य करत असत. ब्रिटिश काळात गव्हर्नर पदावर सैन्य दलातील पार्श्वभूमी असलेल्या अधिकाऱ्यांशिवाय नागरी सेवेतील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाऊ लागली.
त्यामुळे एडीसी पदावरील व्यक्तीचे कार्य देखील युद्धभूमी पर्यंत मर्यादित न राहता समारंभांचे नियोजन तसेच प्रशासकीय कार्ये असे विस्तारले. ब्रिटिश काळात प्रोटोकॉलचे पालन, अधिकृत कार्यक्रमांचे नियोजन, इन्व्हेस्टिचर सेरेमनी आणि दरबार आदींचे आयोजन व इतर सार्वजनिक कार्यक्रमांचे व्यवस्थापन ही एडीसी पदावरील व्यक्तींची प्रमुख कर्तव्ये होती. मुंबई सारख्या प्रांतांत एडीसी मान्यवरांचे स्वागत, ‘गार्ड ऑफ ऑनर’ची देखरेख आणि ‘गव्हर्नमेंट हाऊस’ येथील शिष्टाचार व औपचारिक मानसन्मान जपणे या भूमिकेत दिसून येत असत. भारदस्त गणवेशातील उपस्थितीमुळे एडीसी हे राजसत्तेचे प्रतीक मानले जाऊ लागले.
*प्रसिद्ध एडीसी* सन १९२१ – १९२२ साली राजे पंचम जॉर्ज यांचे चिरंजीव व उत्तराधिकारी एडवर्ड अल्बर्ट भारत भेटीवर – या भेटीत ते मुंबईला देखील आले होते व ‘गव्हर्मेंट हाऊस’ येथे म्हणजे आजचे लोकभवन येथे देखील आले होते. यावेळी त्यांच्यासोबत रॉयल नेव्हीचे युवा अधिकारी असलेले माऊंटबॅटन देखील आले होते. सन १९३६ साली एडवर्ड राजपदावर बसल्यावर – त्यांचे पदनाम त्यानंतर राजे एडवर्ड (आठवे) झाले होते – माऊंटबॅटन यांना राजेसाहेबांचे एडीसी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. माऊंटबॅटन यांनी राजे जॉर्ज सहावे यांचे विश्वासू सहकारी म्हणून – त्यानंतर भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून – पुढेही काम पाहिले, अशी माहिती राज्यपाल एअर चीफ मार्शल ओ. पी. मेहरा, एअर चीफ मार्शल आय एच लतीफ व कोना प्रभाकरराव यांचे एडीसी म्हणून कार्य केलेले विंग कमांडर (सेवानिवृत्त) अजित साने यांनी दिली. *स्वातंत्र्योत्त्तर काळातील एडीसी*
स्वातंत्र्यानंतर राज्यघटनाकारांनी बदललेले स्वरुप आणि अधिकारासह ‘गव्हर्नर’ हे पद कायम ठेवले. त्या पदाला संविधानिक पद करण्यात आले. गव्हर्नर पदाचे पदनाम ‘राज्यपाल’ असे करण्यात आले. राज्यपाल पदाची कार्ये बदलली. परंतु ब्रिटिश काळातील राजशिष्टाचार व त्याचे दृश्य रूप असलेले एडीसी हे पद त्या पदाच्या उपयुक्ततेमुळे कायम ठेवण्यात आले. आज महाराष्ट्रात पोलीस दलातील शक्तोवर आयपीएस अधिकारी तसेच नौदलातील लेफ्टनंट हे राज्यपालांचे एडीसी म्हणून काम पाहतात. राजशिष्टाचाराचे पालन करणे व आयोजकांना राजशिष्टाचार समजावून सांगणे, राष्ट्रगीत, राष्ट्रगान, राज्यगीत गायन – वादन यांसंदभात मार्गदर्शन करणे, राज्यपालांच्या दौऱ्यांचे नियोजन करणे, प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करणे, समारंभांचे आयोजन आणि राष्ट्रपती व राज्यपालांना वैयक्तिक सहाय्य करणे ही त्यांची प्रमुख कर्तव्ये आहेत.
एडीसी हे पद अतिशय प्रतिष्ठेचे मानले जाते, कारण त्या पदावरील व्यक्ती ही संविधानिक पदावरील व्यक्तीने पारखून निवडलेली असते.तरुण वयात या पदासाठी निवड झालेल्या अधिकाऱ्यांना निर्णय प्रक्रियेच्या सर्वोच्च पातळीवर काम करण्याची संधी मिळते व त्यातून नेतृत्व गुण विकसित होतात. एडीसी पदावरील व्यक्ती बदलल्या तरी त्या पदाच्या परंपरा लिखित रूपाने एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपवल्या जातात. परंतु, बहुतेक एडीसी हे अनुभवातूनच आपले कार्य शिकतात. त्यांच्या कार्यातून राज्यपालांच्या कार्यातील सातत्य जपले जाते व पदाची गरिमा उंचावली जाते.
*महाराष्ट्रात या अधिकाऱ्यांनी एडीसी म्हणून कार्य केले आहे !*महाराष्ट्रात माजी पोलीस महासंचालक आयपीएस अधिकारी अरविंद इनामदार (राज्यपाल डॉ पी व्ही चेरियन) , एस एस पुरी (राज्यपाल अली यावर जंग), अलीकडच्या काळातील सेवानिवृत्त महासंचालक विवेक फणसाळकर (राज्यपाल डॉ पी सी अलेक्झांडर) यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांचे एडीसी या पदावर कार्य केले आहे. स्थलसेना, नौसेना व वायुसेनेतील अधिकाऱ्यांनी देखील महाराष्ट्राच्या राज्यपालांचे एडीसी म्हणून काम केले आहे. मुंबई हे नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्यालय असल्याने महाराष्ट्राच्या राज्यपालांचे एडीसी म्हणून सैन्य दलातून निवडलेले अधिकारी अधिकांश नौदलातून येतात. महाराष्ट्रात आजवर दोन वेळा वायुसेनेतील अधिकारी – विंग कमांडर अजित साने व स्क्वाड्रन लीडर अजित ढोकणे यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांचे एडीसी म्हणून काम केले आहे. राजभवनातील आपल्या साधारण २ – ३ वर्षांच्या कार्यकाळानंतर अनेक अधिकाऱ्यांनी सैन्य दलात मोठमोठ्या पदांवर काम केले. परंतु त्यांचा संबंध पुन्हा क्वचितच राजभवनाशी येत असल्याने त्यांच्याबद्दल माहिती मिळत नाही. एडीसी म्हणून कार्य केलेले पोलीस दलातील अधिकारी मात्र त्याच राज्यात कार्य करीत असल्याने त्यांची माहिती उपलब्ध असते.
*आता एडीसी पदी महिला अधिकारी देखील !*राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या एडीसी म्हणून गेल्या वर्षी लेफ्टनंट कमांडर यशस्वी सोळंकी यांची नियुक्ती करण्यात आली. इतकी वर्षे पुरुषांची मक्तेदारी राहिलेल्या या पदावर पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. *ADC must keep his eyes and ears open*”An ADC must keep his eyes and ears open and most importantly he must have tact,” असे राज्यपाल लतीफ यांनी आपल्याला सांगितले असल्याची आठवण एडीसी साने यांनी सांगितली. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले एडीसी हे पद विश्वास, शिस्त आणि संविधानिक पदाप्रती राजनिष्ठेचे प्रतीक म्हणून मानले जाते.


