‘आठवणीतील राजभवन’ : वसंत पिटके…उमेश काशीकर यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
जनसंपर्क क्षेत्रात ज्यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते असे दिवंगत वसंत पिटके यांनी १५ वर्षांपुर्वी ‘आठवणीतील राजभवन’ हा लेख लिहून पाठवला होता. त्यावर्षी काढलेल्या ‘आपले राजभवन’ या गृहपत्रिकेत तो प्रकाशित करण्यात आला. पिटके यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले होते.
सेवानिवृत्तीनंतर देखील ते काही काळ कार्यरत होते. साधी राहणी व मनमिळावू स्वभाव असलेल्या पिटके यांचे कोरोना काळात निधन झाले.
१९८० सालच्या सुमारास मी प्रथमच मुंबईतल्या सर्वांत शांत आणि निसर्ग समृद्ध परिसर असलेल्या राजभवनात आलो. मी आलो ते माझ्या कामाच्या, जबाबदारीचा एक भाग म्हणून. तत्कालीन राज्यपाल यांच्या उपस्थितीत राजभवनात एका महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन केलं होतं, त्या बैठकीच्या दूरदर्शन व वृत्तपत्रीय वृत्तांकनासाठी माझी नियुक्ती करण्यात आली होती, त्यावेळी आतासारख्या पोलिसांच्या चौक्या वा पहारेकरी नव्हते. राजभवनात पाऊल ठेवताच माझ्या मनाला भावली ती तिथली नीरव शांतता आणि सागराचा घनगंभीर आवाज ! असं वातावरण मी मुंबईत यापूर्वी कधीच अनुभवलं नव्हतं. राज्यपाल महोदयांच्या बैठकीचं वृत्तांकन करण्याचा माझा तो पहिलाच प्रसंग होता.
बैठक अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात व पूर्वनिश्चित वेळेत पार पडली. त्या बैठकीचा वृत्तांत वर्तमानपत्रांना द्यायचा की नाही, या बाबत माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. परंतु त्यावेळच्या राजभवनचे जनसंपर्क अधिकारी के. सी. नैनन यांनी ‘डोण्ट वरी, आय विल इश्यु द प्रेस रिलीज’, असं आश्वस्त करून माझ्या मनावरचा ताण हलका केला.
एअर चीफ मार्शल लतिफ व बेगम बिल्किस लतिफ
त्यानंतर मला राज भवनात अनेक वेळा जावं लागलं. तत्कालीन राज्यपाल एअर चीफ मार्शल आय्. एच. लतिफ यांनी राजभवनच्या उद्यान व हिरवळीवर जातीनं लक्ष घातलं होतं.
ते स्वतः अर्ध्या चड्डीवर हातात पाण्याची झारी घेऊन राजभवनातील फुलझाडांची काळजी घेताना मी अनेकदा पाहिलंय.
त्यावेळी वर्तमानपत्रात धारावीच्या झोपडपट्टीबाबत विशेषतः तिथल्या बेकार तरुणांनी मांडलेल्या उच्छादाबद्दल बऱ्याच बातम्या आल्या होत्या.
राज्यपालांच्या पत्नी बिल्कीस लतिफ यांनी याप्रश्नी लक्ष घालून सगळी माहिती घेतली, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, धारावीतल्या त्या तरुण मुलांनी शिक्षण अर्ध्यावरच सोडलं होतं. त्यांमुळे त्यांना तांत्रिक वा इतर शिक्षणाची कवाडं बंद झाली होती. तेव्हा त्यांनी धारावीतच स्टोव्ह-दुरुस्ती, डब्यांची झाकणं बनविणे, प्लंबिंग, वायरींग, घरगुती उपकरणांची दुरुस्ती, हस्तकला वस्तूंची निर्मिती असे अनेक कोर्सेस विनामूल्य व विना-शैक्षणिक अट पद्धतीने सुरू केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. परिणामी त्या बेकार तरुणांचा उच्छाद बऱ्याच प्रमाणात कमी झाला.
कोना प्रभाकर राव
कला रसिक व अभिजात भारतीय संगीताची आवड असलेल्या मुंबईकरांच्या कायम लक्षात राहिले ते राज्यपाल कोना प्रभाकर राव; त्यांनी षण्मुखानंद सभागृहात मेहनत घेऊन आयोजिलेल्या ‘ताल वाद्य कचेरी’ या अनोख्या संगीत कार्यक्रमामुळे.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी त्यांनी जवळपास महिनाभर कष्ट घेतले होते. या कचेरीत दक्षिण भारतातील प्रख्यात पखवाजवादक, सुंद्रीवादक, घटम्, सनई, तार सनई, रुद्रवीणा, तर हिंदुस्थानी संगीतातील तबला, सतार, पखवाज, व्हायोलीन यांची कान तृप्त करणारी जुगलबंदी त्या त्या वाद्यातील माहीर दिग्गजांनी सादर केली. विशेष म्हणजे जवळपास तीन तास चाललेल्या या कार्यक्रमाचं मुंबई दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करण्यात आलं. असा मन आणि कान तृप्त करणारा संगीत वाद्य वादकांच्या महर्षींचा कार्यक्रम क्वचितच मुंबईत पुन्हा झाला असेल.
राज्यपालांच्या ‘ऍट होम’ ला सापाची उपस्थिती !
राजभवनातील माझ्या कायमची आठवणीत राहिलेली घटना मी कधीच विसरू शकत नाही. प्रथेप्रमाणे प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारीस मा. राज्यपाल मुंबई शहरातील निवडक बहुप्रतिष्ठीत व्यक्तींना राजभवनात चहापानासाठी निमंत्रित करतात. सन १९८९ सालची ही घटना आहे.
राजभवनातील राज्यपाल महोदयांच्या बंगल्याच्या मागील हिरवळीवर या राष्ट्रीय दिनी स्नेहोपहाराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याच्या वृत्तांकनासाठी मंत्रालयातर्फे मी उपस्थित होतो. खरं म्हणजे ही फोटो न्यूज असते.
मी एका कोपऱ्यात उभं राहून मान्यवरांचे आगमन, राज्यपालांकडून त्यांचे स्वागत, विचारपूस पाहत होतो. खाद्यपदार्थाच्या एका टेबलाजवळ मी उभा होतो, बरोबर सूर्यास्ताला राष्ट्रध्वज उतरवण्यात येतो. त्यापूर्वी राष्ट्रगीत होते व कार्यक्रमाचे समापन होते.
मी जिथं उभा होतो, त्या टेबलाखाली मला काही हालचाल जाणवली, मी निरखून पाहिलं, तर तिथं मांडूळ हा बिनविषारी साप वेटोळे घालून हिरवळीवरच थंडावा घेत होता. मी हा प्रकार तिथं उपस्थित असलेल्या साध्या वेषातील पोलिसाला सांगितला. गाजावाजा करून या सापाला पकडले असते तर मोठाच गहजब झाला असता; परंतु त्या पोलिसाने प्रसंगावधान दाखवले व तो प्रसंग अत्यंत कौशल्याने व कुणालाही थांगपत्ता लागू न देता हाताळला.
त्या पोलिसाने जवळच खाद्यपदार्थांचे एक रिकामे भांडे पाहिले. भांडे खाली ठेवण्याच्या निमित्ताने तो खाली वाकला, क्षणात तो तीनेक फूट लांबीचा साप त्या भांड्यात ठेवला, त्यावर झाकण ठेवलं आणि अत्यंत शांतपणे ते भांडे घेऊन तो निघून गेला. मात्र मी वार्ताहर असल्याने या प्रकाराची कुठेही वाच्यता न करण्याचा मला दम भरावयास तो विसरला नाही.
राजभवनाच्या लोअरगेटमधून राजभवनाकडे पायवाटेवरून जाण्याचा अनुभव काही औरच असतो. अनेक रंगीबेरंगी पक्षी, त्यांचे आवाज, गर्द हिरवळ, त्यात फुललेल्या फुलांचा मिश्र सुगंध…। मुंबईत हा अनुभव फक्त राजभवनाचा परिसरच देऊ शकतो.
राजभवनातला विशेषतः तिथल्या बीचवर शुभ्र वाळूवर बसून घेतलेला आणखी एक अनुभव मी कधीच विसरू शकणार नाही. तो म्हणजे सुमारे सात-आठ वर्षांपूर्वी गिरगाव चौपाटी आणि संपूर्ण मरीन लाइन्सवरील विशाल आकाशात झालेल्या हवाई दलाच्या वेगवान आणि विविध विमानांचा ‘हवाई शो.’
मी हा शो तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व त्यांच्या परिवारजनांसोबत अनुभवला. राजभवनाच्या त्या चौपाटीवर जाण्याची फक्त निवडक लोकांनाच त्या दिवशी परवानगी देण्यात आली होती.
उंच आकाशातील विमाने, त्यांच्या वेगवान हालचाली पाहण्यासाठी त्यावेळी बायनॉक्यूलर तसेच खाद्यपेयांची चांगली सोय करण्यात आली होती.
विमानाच्या कसरती पाहताना मानेला ताण पडू नये म्हणून तसंच आकाशाकडे विनासायास पाहता यावं याकरिता आराम खुच्र्यांची सोय करण्यात आली होती. विनागर्दीच्या वातावरणात विविध सोयी-सुविधांच्या उपलब्धतेमुळे मी या हवाई शो चा व्दिगुणीत आनंद अनुभवू शकलो, तो राजभवनामुळेच.
राजभवनामध्ये मंत्री-मंडळाचे अनेक शपथविधी समारंभ, राष्ट्रपती पदक प्राप्त पोलिसांचे ‘इनवेस्टीचर सेरमनी’, शेतीनिष्ठ पुरस्कारांचे वितरण, माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या उपस्थितीत झालेले विविध कार्यक्रम, १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटानंतर राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर मंत्रालयात जाण्यापूर्वी लगेच राजभवनातच मा. श्री शरद पवारसाहेब यांनी घेतलेली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक, अशा एक ना दोन अनेक महत्त्वाच्या प्रसंगी मला तिथे उपस्थित राहण्याची संधी मिळाली, ती फक्त मुंबई राजभवनामुळेच !


