कालचक्र;प्रत्येक पक्षफुटीसाठी भाजपच जबाबदार कसा…?ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.चार दिवसांपूर्वीच आम आदमी पक्षात फूट पडली असून त्यांचे दहापैकी सात राज्यसभा सदस्य पक्ष त्याग करून भारतीय जनता पक्षात दाखल झालेले आहेत. सहाजिकच देशातील सर्व विरोधी पक्ष या फुटी साठी भारतीय जनता पक्षाला जबाबदार धरत असून त्यांना देशातील राज्य पातळीवरील छोटे पक्ष संपवायचे आहेत असा आरोप करीत आहेत. आम आदमी पक्ष हा माझ्या आठवणीनुसार साधारणपणे २०१०च्या दरम्यान उदयाला आला. त्याआधीच्या काळात सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंनी भ्रष्टाचार विरोधी देश घडवण्यासाठी रणशिंग फुंकले होते. त्यात देशभरातील अनेक सुशिक्षित विचारवंत अण्णांना पाठिंबा देत सहभागी झाले होते. अरविंद केजरीवाल हे देखील त्यातीलच एक होते. अरविंद केजरीवाल हे मूळचे सनदी अधिकारी होते. मात्र प्रशासनातील भ्रष्टाचाराला कंटाळून त्यांनी पदाचा राजीनामा दिला आणि ते अण्णांच्या आंदोलनात सक्रियपणे सहभागी झाले होते. अण्णांनी सातत्याने आंदोलन करत माहितीचा अधिकार कायदा तसेच भ्रष्टाचार विरोधी कायदे सरकारकडून करवून घेतले. त्यानंतर अण्णा आपल्या राळेगणसिद्धी येथील आश्रमात विसावले होते. त्याचवेळी अरविंद केजरीवालांनी आम आदमी पक्ष उभा केला. आम्हाला देशात भ्रष्टाचार मुक्त शासन द्यायचे आहे अशी घोषणा देत ते मैदानात उतरले होते. योगायोगाने त्यांना झाडू हे चिन्ह मिळाले त्यामुळे आम्हाला भ्रष्टाचाराची झाडझुड करायची आहे असे सांगूनच त्यांनी दंड थोपटले होते. त्यामुळेच देशाच्या विविध भागातील सुशिक्षित विचारवंत नागरिक त्यांच्या या आम आदमी पक्षात हिरीरीने सहभागी झाले होते. त्यांना देशात प्रतिसाद देखील चांगला मिळाला. २०१५ मध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ते पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला पराभूत करून त्यांनी दिल्लीची सत्ता मिळवली. तिथून त्यांची खरी घोडदौड सुरू झाली. दिल्लीत सत्तेत येताना त्यांनी दिल्लीच्या जनतेला खूप सारी आश्वासने दिली होती. मात्र ती पूर्ण करणे त्यांना शक्य होत नव्हते. बराच वेळ त्यांनी केंद्रात असलेले भाजप सरकार आपल्याला काम करू देत नाही असा कांगावा केला. त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री असताना राज्यपालांच्या घरात जाऊन आंदोलन करण्याचा आणि धरणे धरण्याचा उद्योगही त्यांनी केला होता. दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे तसेही तिथल्या राज्य शासनाला मर्यादित अधिकार असतात. ते अधिकार वाढवून मिळावे यासाठी देखील त्यांचा संघर्ष होता. मात्र केंद्रात आपल्या विरोधातील सरकार असले तर ज्या सामंजस्याने काम निभावून न्यावे लागते ते सामंजस्य त्यांना कधीच दाखवता आले नाही. भ्रष्टाचारमुक्त शासन देता देता अरविंद केजरीवाल आणि त्यांचे सहकारी हे सर्वच भ्रष्टाचाराच्या घोळात हळूहळू मुरत गेले. त्यात त्यांचे उपमुख्यमंत्री सिसोदियाजी यांना मद्य घोटाळ्यात अटक करण्यात आली. ते दीर्घकाळ तुरुंगात होते. इतकेच काय पण एका टप्प्यावर स्वतः मुख्यमंत्री केजरीवालांना देखील अटक करण्यात आली. त्यांच्यावर देखील मद्य घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप झाला होता. त्याचवेळी त्यांनी आधी कोणत्याही सरकारी सवलती वापरणार नाही असे सांगत सरकारी बंगला गाडी या सर्वाचा पुरेपूर उपभोग घेतला होता तुरुंगात असतानाही त्यांनी तुरुंगातून राज्यकारभार चालवण्याचा विक्रम देखील काही काळ केला. त्यांनी दिल्लीत शंभर रुपये कोटी रुपये खर्चून आलिशान बंगलाही बांधण्याचा आरोप त्यांच्यावर होतो आहे. हे बघता त्यांनी किती भ्रष्टाचार केला असेल हे लक्षात येते. दिल्लीत स्थिरावल्यावर त्यांनी देशभरात पाय पसरायला सुरुवात केली. अगदी थेट गोवा महाराष्ट्र इथपर्यंत येऊन त्यांनी निवडणुका लढवल्या. मात्र त्यांना इतरत्र कुठे फारसे यश मिळाले नाही. मात्र पंजाब मध्ये तिथल्या काँग्रेस अकाली दलाची सत्ता दूर सारून तिथे सत्ता मिळवण्यात ते यशस्वी झाले. २०२४ मध्ये दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र भारतीय जनता पक्षाने त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव केला. त्यामुळे दिल्लीतून ते सत्य बाहेर फेकले गेले. असे असले तरी पंजाबमध्ये त्यांची सत्ता होती. त्याचबरोबर राज्यसभेत आणि लोकसभेत देखील काही जागा निवडून आणण्यात ते यशस्वी झाले होते. त्यामुळे ते जरी स्वतः पदावर नसले तरी त्यांची सत्तेच्या जोरावर चालणारी मुजोरी चालूच होती. मधल्या काळात त्यांचे राज्यसभेतील गट नेते नवीन चढ्ढा यांच्यावर काही आरोप करत अरविंद केजरीवाल यांनी त्यांना पदावरून बाजूला केले. त्यामुळे चढ्ढा दुखावलेले होतेच. त्यांनी आपल्या सोबत अजून सहा खासदार जमवले आणि दोन दिवसांपूर्वी या सात खासदारांनी भाजपशी संधान बांधून भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी त्यांना पक्षात घेत त्यांचे स्वागत केले. या घटनेने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. सर्व विरोधक आरोप करत आहेत की या सातही जणांना ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून भाजपने पक्षातून फोडले आहे. भाजपला देशातील सर्वच छोटे पक्ष हळूहळू संपवायचे आहेत. त्यासाठी भाजप पक्ष फोडत चालला आहे असाही आरोप केला जातो आहे. मात्र त्याचवेळी पक्ष सोडणारे खासदार मात्र केजरीवालांच्या एकाधिकारशाहीवर आरोप करत आहेत. त्यामुळेच आम्हाला सकारात्मक भूमिका घेऊन चालणाऱ्या पक्षात प्रवेश घ्यायचा होता आणि राजकारण करायचं होते म्हणून आम्ही भाजपात आलो असा खुलासा ते करत आहेत. गेल्या पन्नास वर्षात आपल्या देशात प्रत्येक राज्यात अशा छोट्या पक्षांचे अमाप पीक आलेले दिसते आहे. अनेक ठिकाणी या छोट्या पक्षांनी त्या राज्यापूर्ती आपली ताकद निर्माण केली असून तिथे सत्ता मिळवायची तर राष्ट्रीय पक्षांना त्यांचे पाय धरावे लागतात अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे. त्यामुळे अशा त्रासदायक पक्षांना संपवण्यासाठी राष्ट्रीय पक्ष कायम प्रयत्न करणार, यात तसे वावगे काहीही नाही. दुसरा मुद्दा असा येतो की हे छोटे राज्यस्तरीय पक्ष फक्त त्या राज्यापुरता विचार करत असतात. राष्ट्रीय मुद्द्यांचे त्यांना काहीही देणे घेणे नसते. त्यामुळे राष्ट्रीय मुद्द्यांवर त्यांची ठोस भूमिका नसते. त्या उलट काँग्रेस आणि भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांना मात्र सर्व राष्ट्रीय मुद्द्यांना धरून राजकारण करायचे असते. त्यामुळे सर्वच राज्यांसाठी त्यांचे समान धोरण असते. इथेच या छोट्या पक्षांचे आणि राष्ट्रीय पक्षांचे फाटते. मग मायनॉरिटीत गेलेला छोटा राष्ट्रीय पक्ष त्या राज्यात सत्तेत शिरकाव करायला अनेकदा या छोट्या पक्षांना सोबत घेत असतो. १९८८ मध्ये महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेला सोबत घेतले होतेच ना. तसेच आंध्रात तेलगु देशमला, तर कर्नाटकात राजदला त्यांनी सोबत घेतले आहे. मात्र राज्यात जेव्हा राष्ट्रीय पक्ष तिथल्या स्थानिक पक्षांशी आघाडी करतात तेव्हा त्यांचे बस्तान बसेपर्यंत ते त्या पक्षांना वापरतात. राजकीय दृष्ट्या त्यात चूक काहीही नाही. २०१५-१६ मध्ये भाजपने काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाशी युती केली होती. त्यातून भाजपाला जे काही साध्य करायचे होते ते करताच त्यांनी या सरकारचा पाठिंबा काढला आणि तिथे राष्ट्रपती राजवट लावली होती, याचीही आठवण येते करून द्यावीशी वाटते. मग अनेकदा हे छोटे पक्ष जेव्हा डोकेदुखी ठरू लागतात, तेव्हा अशा प्रकारे त्या पक्षात फूट पाडून ते पक्ष खिळखिळे केले जातात. मात्र मुद्दा असा येतो की या स्थानिक पक्षांमध्ये फुट का पडावी? तिथल्या नेत्यांची एकाधिकारशाहीच बरेचदा अशा फुटी साठी कारणीभूत ठरते. आम आदमी पक्षातही केजरीवालांची एकाधिकारशाहीच पक्ष फोडायला कारणीभूत ठरली आहे. तोच प्रकार महाराष्ट्रात देखील झाला आहे. शिवसेनेत उद्धव ठाकरेंचे चुकीचे निर्णय एकनाथ शिंदे यांना बंड करायला कारणीभूत ठरले तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांचे कन्या प्रेम अजित पवारांना पक्ष फुटी साठी प्रवृत्त करून गेले. अशावेळी सत्ताधारी असलेल्या भाजपने संधीचा फायदा करून घेतला त्यात त्यांचे काही चुकले असे वाटत नाही. मात्र देशातील सर्वच विरोधी पक्ष आणि त्यातही छोटे पक्ष नेहमीप्रमाणे या फुटी साठी भाजपला जबाबदार धरत आहेत. त्यांनी जबाबदार धरण्यात काही चूक आहे असे वाटत नाही. मात्र प्रश्न असा येतो की भाजपला तुमच्या पक्षात येऊन आगळीक करता येईल अशी परिस्थिती तुम्ही निर्माण का करावी आणि भाजपाला तशी संधी का द्यावी? तुम्ही जर तुमचा पक्ष मजबूत ठेवला आणि कोणताही कार्यकर्ता नाराज होणार नाही याची काळजी घेतली तर तुमचा पक्ष फुटणार नाही आणि तो हळूहळू वाढतच जाईल. मात्र आम आदमी पक्ष असो, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, तेलगू देशम पार्टी, द्रमुक, राजद, सपा, बसपा असे कोणतेही स्थानिक पक्ष असोत, ते स्वतःच्या पक्षात आलबेल ठेवत नाहीत, आणि मग भाजपला जबाबदार धरतात. माझ्या मते त्यांनी आधी स्वतः आत्मपरीक्षण करायला हवे मगच भाजपाला जबाबदार धरावे. त्यातच त्याचे हित आहे.


