ऑनलाइन औषध विक्रीविरोधातील बंदला चाळीसगावात शंभर टक्के प्रतिसादशहरातील बहुतांश मेडिकल दुकाने दिवसभर राहिली बंद
चाळीसगाव : अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने (AIOCD) पुकारलेल्या देशव्यापी बंदला चाळीसगाव शहरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचे चित्र बुधवारी दिसून आले. ऑनलाइन औषध विक्री, इंटरनेट फार्मसी तसेच ई-पोर्टल धोरणांच्या विरोधात शहरातील बहुतांश मेडिकल दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली.
शहरातील मुख्य बाजारपेठ, बसस्थानक परिसर तसेच विविध भागांतील मेडिकल दुकाने बंद असल्याने बंदचा प्रभाव स्पष्टपणे जाणवत होता. औषध विक्रेत्यांनी शासनाच्या धोरणांविरोधात नाराजी व्यक्त करत इंटरनेटद्वारे होत असलेल्या औषध विक्रीमुळे पारंपरिक औषध व्यवसाय धोक्यात आल्याचे सांगितले.
औषध विक्रेता संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाने याबाबत तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अन्यथा भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला. दरम्यान, अत्यावश्यक सेवा लक्षात घेऊन काही ठिकाणी आपत्कालीन औषध सेवा उपलब्ध ठेवण्यात आल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली.


