योगी आदित्यनाथ यांच्या राजभवन भेटीनिमित्ताने…
उमेश काशिकर यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
आज दिनांक ५ जून – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा वाढदिवस !
त्यांचा जन्म पौडी गढवाल उत्तराखंड येथे झाला. त्यामुळे उत्तराखंडच्या लोकांना त्यांचा विशेष अभिमान वाटतो.
मूळ उत्तराखंडचे असलेले भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल असताना दिनांक ४ जानेवारी २०२३ रोजी आदित्यनाथ मुंबई येथे एक दीड दिवसांसाठी आले होते. त्यांचा मुक्काम राजभवन येथे होता. पहिल्या दिवशी राज्यपाल कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतली.
दुसऱ्या दिवशी सकाळी निघण्यापुरती त्यांनी राजभवन पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार त्यांच्यासोबत काही वेळ घालवण्याची संधी मिळाली.
राजभवन बंकर मधील एका दालनात स्वातंत्र्योत्तर काळातील राज्यपालांची छायाचित्रे ठेवली आहेत.
यावेळी आदित्यनाथ यांना महाराष्ट्राच्या पहिल्या राज्यपालांबाबत माहिती दिली.
उत्तर प्रदेश येथून आलेले महाराष्ट्राचे राज्यपाल
महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्रीप्रकाश हे उत्तर प्रदेश येथील वाराणसीचे होते व त्यांचे वडील भारतरत्न डॉ भगवानदास उत्तर प्रदेशच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. महाराष्ट्राचे राज्यपाल होण्यापूर्वी श्रीप्रकाश मुंबई राज्याचे राज्यपाल होते व त्यापूर्वी ते तामिळनाडू व त्याहीपूर्वी ते आसामचे राज्यपाल होते. स्वातंत्र्यानंतर श्रीप्रकाश हे भारताची पाकिस्तानातील पहिले उच्चायुक्त होते.
महाराष्ट्राच्या (आजवर झालेल्या २२) राज्यपालांपैकी तीन – श्रीप्रकाश (१९६० -१९६२), विजयालक्ष्मी पंडित (१९६२- १९६४) व मोहम्मद फजल (२००२-२००४) हे उत्तर प्रदेशचे होते.
बंकरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहून ते नतमस्तक झाले. त्यांनी बंकर संबंधात अनेक प्रश्न विचारले. देवी मंदिराला देखील त्यांनी भेट दिली.
काकोरी आम !
कालांतराने आदित्यनाथ यांनी राज्यपालांना काकोरी येथील प्रसिद्ध मलिहाबादी दशहरी आंबे पाठवले. काकोरी हे तेच ठिकाणी ज्या ठिकाणी सन १९२५ साली रामप्रसाद बिस्मिल यांनी अशफाकुल्ला खान यांच्या मदतीने ट्रेन लुटली होती व ब्रिटिश साम्राज्याला मोठा धक्का दिला होता.
पुढे आदित्यनाथ यांच्या निमंत्रणावरून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्याला भेट दिली होती.




