जेजुरी–बेलसर फाटा–वाघोली बसमार्गाची मागणी जोरात; हजारो पीएमपी प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा
पुणे ( प्रतिनिधी ) जेजुरी व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी, शेतकरी आणि व्यावसायिकांनी जेजुरी–बेलसर फाटा–उरुळी कांचन–वाघोली– मार्गावर नियमित पीएमपीएमएल बससेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. सध्या जेजुरी–सासवड–हडपसर–मगरपट्टा–मुंढवा–खराडी बायपास–चंदननगर–वाघोली–केसनंद फाटा हा मार्ग अत्यंत वर्दळीचा ठरत असून वाढत्या प्रवासी संख्येमुळे बससेवेवर मोठा ताण निर्माण होत आहे.
दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक शिक्षण, नोकरी, व्यवसाय तसेच विविध कामांसाठी जेजूरी वरुन सासवड हडपसर वरुन , मगरपट्टा, खराडी बायपास चंदननगर भागातुन वाघोलीकडे परिसरात पीएमपी बसने प्रवास करतात. मात्र, सार्वजनिक वाहतुकीच्या मर्यादित सुविधांमुळे अनेकांना खासगी वाहनांचा किंवा महागड्या प्रवासी सेवांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे वेळ आणि पैशांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली आहे.वाढती पीएमपी प्रवासी संख्या लक्षात घेता जेजुरी–बेलसर फाटा–शिंदवणे घाट–उरुळी कांचन–थेऊर फाटा–केसनंद फाटा–वाघोली हा पर्यायी पीएमपी मार्ग सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. या मार्गामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना वाघोली, केसनंद कडे तसेच आणि परिसरातील आयटी तसेच औद्योगिक क्षेत्रांपर्यंत थेट व सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होऊ शकते.
या भागातुन जेजूरी ला भेट देणार्या भाविकांची संख्या मोठी आहे.विशेषतः वाघोली परिसरातून उरुळी कांचन, शिंदवणे घाट, बेलसर फाटा मार्गे जेजुरीकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. भविष्यात या मार्गावरील प्रवाशांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वाघोली–केसनंद फाटा–थेऊर फाटा–उरुळी कांचन–शिंदवणे घाट–बेलसर फाटा–जेजुरी अशी स्वतंत्र व नियमित बससेवा सुरू झाल्यास हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.प्रवाशांच्या मते, या मार्गावर बससेवा सुरू झाल्यास जेजुरी, बेलसर फाटा, शिंदवणे, उरुळी कांचन आणि थेऊर फाटा परिसरातील नागरिकांना पुणे शहराच्या पूर्व भागाशी थेट संपर्क मिळेल. पुरंदर व हवेली तालुक्यातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्था आणखी मजबुत होवून विकासास हातभार लागणार आहे तसेच खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होऊन सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळेल.सकाळ व सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत अधिक फेऱ्यांचे नियोजन करून ही बससेवा दर एक तासाच्या अंतराने सुरू करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी पीएमपीएमएल प्रशासनाकडे केली आहे.
ही बससेवा आणि पर्यायी मार्ग सुरू झाल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, इंधनाची बचत होईल तसेच सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, सोयीस्कर आणि परवडणारी प्रवास सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे पीएमपीएमएल प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.


