शरद पवारसाहेबांचा एकेरी उल्लेख; पाटील – फडणवीसांवर बरसले आ.रोहितदादा पवार
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
हे सत्ता जाण्याचं दुःख आहे आणि ते समजू शकतो, परंतु या पातळीपर्यंत दुःख होईल ही अपेक्षा नव्हती. किती काळ सत्तेत राहिलात यापेक्षा सत्तेत असताना लोकांसाठी काय केलं हे महत्त्वाचं असतं,’ अशा शब्दांत आ.रोहित पवार यांनी भाजपच्या नेत्यांना उत्तर दिलं आहे.
‘अपेक्षाभंग झाला की दुःख होणं साहजिकच असतं आणि ते दुःख, ती सल कायम मनाला हतबल करते आणि ही हतबलता सहन न झाल्यास काहीजण मग तोल ढळल्यासारखं बडबडतात. असंच भाजपच्या नेत्यांचं झालं आहे. ५० वर्षांहून अधिक काळ संसदीय राजकारणात काम करणाऱ्या शरद पवारसाहेब यांचा भाजपचे काही स्वयंघोषित वरिष्ठ नेते एकेरी उल्लेख करू लागले यात त्यांची चूक नाही, तर हे सत्ता जाण्याचं दुःख आहे आणि ते समजू शकतो, परंतु या पातळीपर्यंत दुःख होईल ही अपेक्षा नव्हती,’ असा टोला रोहित पवार यांनी लगावला.
‘किती काळ सत्तेत राहिलात यापेक्षा सत्तेत असताना लोकांसाठी काय केलं हे महत्त्वाचं असतं. आपला पक्ष टिकवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार पडून आपण सत्तेत येण्याची स्वप्न दाखवली जातात, पण आता भाजपमधलीच मंडळी या ‘पुन्हा येण्याला’ कंटाळली आहेत. तसंच ‘सरकार पडणार की नाही यातून बाहेर पडा’ हा काही दिवसांपूर्वी तुमच्याच पक्षाच्या नेत्यांनी दिलेला सल्ला जरुर विचारात घ्या आणि चांगल्या भावनेने लोकांसाठी, राज्याच्या हितासाठी काम करा, असं केलं तर तुम्हाला नक्कीच शांतता लाभेल’, असा सल्लाही रोहित पवार यांनी दिला आहे.







