राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस मुंबई प्रदेश सचिव स्नेहल कांबळे यांचा राजीनामा
- प्रदेश अध्यक्ष यांच्यावर हस्तक्षेपाचा आरोप
- महाराष्ट्र प्रदेश ‘मायको’ नावाचा कार्यक्रम
- २५ लाखांची रोख बक्षिसे ठेवल्याने नाराज
मुंबई / प्रतिनिधी :- राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस मुंबई प्रदेश सचिव स्नेहल कांबळे यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहान यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा पत्रात प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्यावर मुंबई प्रदेशात हस्तक्षेप करण्याचा आरोप केला आहे.
स्नेहळ कांबळे यांनी आरोप केला आहे की, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे यांचा मुंबई प्रदेशमध्ये हस्तक्षेप वाढत असून मुंबई प्रदेशची ते वाट लावत आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश ‘मायको’ नावाचा कार्यक्रम राबवित असून त्यासाठी त्यांनी २५ लाखाची रोख बक्षिसे ठेवली आहेत. आज ग्रामीण भागात विद्यार्थिनींला बसच्या पाससाठी पैसे नाही म्हणून आत्महत्या करते,
अनेक विद्यार्थी आई थापाला आर्थिक मदत व्हावी म्हणून शिक्षण सोडतात, या व्यतिरिक्तही विद्यार्थ्यांचे अनेक विषय व समस्या सोडविणे बाकी आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण विदयार्थी प्रतिनिधी असताना विदयार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याऐवजी त्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी सुनील गव्हाणे लाखो रुपये वाटाण्याच्या स्पर्धा ठेवत आहेत.
कदाचित तेवढ्या पैशात शेकडों विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न सुटले असते अजूनही खूप काही करता आले असते. त्यांनी नमूद केले आहे की, सुनील गव्हाणे सारख्या वृत्तीची लोकं ही संघटनेला कीड असतात आणि ती फिड मुंबई प्रदेशला लागली आहे. राज्य कोरोनाच्या संकटात असताना,
विदयार्थ्यांचे शैक्षणिक हाल होत असताना, एकीकडे विदयार्थ्यांचे पेपर फुटीने नुकसान होत असताना, शेतकऱ्यांच्या मुलांचे नुकसान होत असताना आर्थिक बक्षीस ठेवणे माझ्या तत्वात बसत नाही. विद्यार्थी सेलचे काम विद्यार्थी हित साधणे आहे. नाचगाण्याच्या स्पर्धा ठेवून मला त्यातून असे काही साध्य होताना दिसत नाही. जे उपक्रम लोकहिताचे नाहीत, विद्यार्थी हिताचे नाहीत, माझ्या तत्वात बसत नाहीत त्यांना मी पाठिंबा देणार नाही म्हणून राजीनामा देत आहे, असे राजीनामा पत्रात नमूद करण्यात आले आहे.







