कलाकारांनी कलाकारांसाठी दिलेला माणुसकीचा एक हात….!
प्रतिनिधी
महेश्वर तेटांबे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि सोशल डिस्टन्सिन्गचे भान राखून तसेच राज्यशासनाच्या नियमांचे पालन करून सिद्धी कामथ – पल्लविका पाटील – महेश्वर तेटांबे या तिघा कलावंतांनी पुढाकार घेऊन सिनेसृष्टी मधील ७५ ते ८० गरजू कलावंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून सिनेसृष्टीवर आणि समाजावर एक आदर्श ठेवला आहे. कठोर परिश्रम करून आपली कला प्रामाणिकपणे सादर करणाऱ्या कलावंतावर कोरोना सारख्या महाभंयकर विषाणूंमुळे आज उपासमारीची वेळ आली आहे.
जवळजवळ सर्वच क्षेत्रांतील कलावंतांवर गेले अठरा महिने हाताला काहीच काम नसल्यामुळे नैराश्याचे वातावरण पसरले आहे. अशा द्विधा परिस्थिती मध्ये जगायचे तरी कसे हा यक्ष प्रश्न उद्भवणाऱ्या उपेक्षित आणि गरजू कलावंतांसाठी त्यांना मदत म्हणून काही सेवाभावी संस्थांच्या मदतीने सिद्धी – पल्लवी – महेश्वर या त्रिकूटने जवळजवळ ७५ ते ८० गरजू कलावंतांना सेवाभावी संस्थेच्या हस्ते प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली येथे (धान्य किट) जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यात प्रामुख्याने चारकोप कल्चरल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशन, राजेश विनायक कदम (क्लब संस्थापक – रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंडस), अजीत शाह (फेअर अग्रो), मोहम्मद सालेह हसन सनगे, नैना राणे, डिक्सन केनी , गुरुनाथ तिरपणकर (अध्यक्ष – जनजागृती सेवा समिती, बदलापूर) अशा प्रतिष्ठित व्यक्तिसंस्थानी माणुसकीचा एक हात पुढे करून आपले दातृत्व सिद्ध केले आहे. याप्रसंगी लोकप्रिय ज्येष्ठ कलावंत डॉ. विलास उजवणे यांनी या उपक्रमाला सदिच्छा भेट देऊन भरभरून शुभेच्छा दिल्या व त्यांनी दानशूर व्यक्तींचे कौतुक केले. तसेच ज्येष्ठ अभिनेते प्रदीप कबरे, दिग्दर्शक रामदास तांबे आणि राऊत मँडम (प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह) यांचे देखील या उपक्रमास विशेष योगदान लाभले. प्रसिद्ध सिने अभिनेत्री सिद्धी कामथ यांनी या उपक्रमाचे साचेबद्ध नियोजन केले तर अभिनेत्री पल्लवी पाटील आणि पत्रकार महेश्वर तेटांबे यांनी सर्वतोपरी सहकार्य करून जीवनावश्यक वस्तू वाटपाचा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.