नेलकरंजीप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
आटपाडी
आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची फिर्याद नाथा दामू घाडगे यांनी आटपाडी पोलिस ठाण्यांमध्ये दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नेलकरंजी येथे दिनांक २१ मे रोजी डॉ. शशिकांत भोसले चौकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा निळ्या रंगाचा जय भीम व अशोक चक्र असलेल्या ध्वजाचा लोखंडी पाइप कापून तो ध्वज रात्रीच्या वेळी कोणीतरी गायब केला.
या कारणावरून चौकामध्ये बऱ्याच लोकांचा जमाव जमा झालेला होता.त्या जमावामध्ये नाथा दामू घाडगे (वय ३२ वर्षे, रा.नेलकरंजी ता.आटपाडी जि.सांगली) हजर असताना प्रमोद बबन भोसले (रा.नेलकरंजी ता.आटपाडी) व चार ते अनोळखी इसम यांनी फिर्यादी नाथा घाडगे यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेले. संशयित आरोपी प्रमोद बबन भोसले याने फिर्यादीस शिवी देऊन तुला जिवंत ठेवत नाही अशी धमकी दिली. तसेच सदरचा ध्वजदेखील त्यांनीच गायब केलेला असावा असा फिर्यादी यांनी संशयित आरोपी यांच्यावर संशय व्यक्त केलेला आहे.
या घटनेची नोंद आटपाडी पोलिस ठाण्यांमध्ये करण्यात आली असून अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास खानापूर उपविभाग विटाचे उपविभागीय पोलिस अधिकारी करीत आहेत.