पावसाची वाट न पाहता कापूस, मका लागवड; अनेक शेतकऱ्यांचे धूळपेरणी सुरुवात
त-हाडी प्रतिनिधी : यंदा आद्रा नक्षत्र सुरू झाले तरी पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
पावसाची वाट न पाहता कापूस, मका तसेच इतर कडधान्य पिकांची धुळपेरणी सुरु केली आहे.
लाखो रुपयांचे बियाणे शेतीत टाकून शेतकऱ्यांनी एकप्रकारे सट्टाचं लावला आहे.
दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पावसाचे आगमन होते. मात्र, यंदा जून महिना संपायला आला तरी दमदार पाऊस झालेला नाही.
यावर्षी ८ जूनपासून मृग नक्षत्र सुरू झालंय. मात्र, संपूर्ण नक्षत्र कोरडेच गेले. आता शुक्रवार पासून आद्रा नक्षत्र लागलंय. नक्षत्र बदलल्यानंतर तालुक्यात बहुतांश ठिकाणी पाऊसधारा कोसळल्या. मात्र पेरणीलायक पाऊस अजूनही झालेला नाही.
नक्षत्र बदलानंतर पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्यात. त्यामुळे पेरणी योग्य पाऊस झालेला नसला तरी शेतकऱ्यांनी जोखीम पत्करून कापूस, मका तसेच इतर कडधान्य पिकांची धूळपेरणी सुरू केली. यावर्षी आधीच पाऊस लांबलाय. अचानक पाऊस आला तर पेरणीची धावपळ होऊ नये, यासाठी अनेकजण धूळपेरणी करत आहेत.
यंदा पाऊस लांबल्याने शेतकर्यांसह सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शिरपूर तालुक्यातील त-हाडी सह परिसरातील वरूळ भटाणे जवखेडा त-हाडकसबे अभानपुर जळोद विखरण भामपुर टेकवाडे भरवाडे या गावात अद्याप पाऊसच पडला नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
शिरपूर तालुक्यातील त-हाडी परिसरात रोहिणी नक्षत्रासह मृग नक्षत्र काही अपवाद वगळता संपूर्ण कोरडा गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता आद्रा नक्षत्राकडे डोळे लागले असून अनेक शेतकऱ्यांनी धुळपेरणी करण्यात सुरुवात केल्याचे दिसून येत आहेत.
बोरीग सह विहिरींतील पाण्यात घट
पाऊस येईल या आशेवर काही शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनावर जेमतेम पाण्यावर कापूस ,मका, या पिकांची लागवड केली आहे,. परंतु सध्या जोरात वाहणारे वारे व रखरखता सूर्यप्रकाश यामुळे विहिरींतील पाणी झपाट्याने घटत आहे. तालुक्यातील बहुतांश लहान धरणे व पाझर तलाव कोरडे असून मोठ्या धरणाची पाणीपातळी खलावली गेली आहे.







