घ्या समजून राजे हो
शरद पवारांनी शिवसेनेचे खच्चीकरण का कैले..?
ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: “शरद पवारांचे अभिनंदन: मिशन ठाकरे कम्प्लीट” अशा शीर्षकाचा एक व्हिडिओ ऍनलायझर या यूट्यूब चैनलवर काल रात्री पाहण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सुशील कुळकर्णी यांनी या व्हिडिओमध्ये योग्य विश्लेषण केलेले आहे.
या व्हिडिओमध्ये कुलकर्णींनी शरद पवारांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या परिवाराचे आणि त्यांच्या शिवसेना पक्षाचे राजकीय वर्चस्व कसे संपवले म्हणजेच खच्चीकरण कसे केले यावर भाष्य केले आहे. हे भाष्य सविस्तर आहे. मात्र या भाष्यात शरद पवारांनी ठाकरे परिवाराचे राजकीय वर्चस्व का संपवावे याचा कोणतीही कारणमीमांसा केलेली नाही. त्यामुळे माझ्या अल्पमतीनुसार आणि अनुभवानुसार मी ही कारणमीमांसा वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.
ही कारणमीमांसा करायची झाल्यास आपल्याला महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासूनच्या इतिहासात डोकवावे लागेल. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याचे गठन झाले. त्यावेळी राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे होते. यशवंतराव चव्हाण हे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे अतिशय निकटवर्ती होते. नेहरूंना महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे आपला विश्वासू मुख्यमंत्री हवा होता. कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तिथे कोणत्याही पंतप्रधानाला आपला विश्वासू माणूस हवा असतो. त्यामुळे नेहरूंनी चव्हाण यांना मुख्यमंत्री केले.
चव्हाण यांचा राज्यकारभार सुरळीत चालू होता. अचानक १९६२ मध्ये चीनचे युद्ध उफाळले. या युद्धात भारताला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे दुखावलेल्या नेहरूंनी तत्कालीन संरक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यायला सांगितला आणि त्यांच्या जागी यशवंतराव चव्हाण यांना संरक्षण म्हणून दिल्लीत बोलावले. नोव्हेंबर १९६२ मध्ये चव्हाण दिल्लीला जाऊन संरक्षण मंत्री पदाची शपथ घेते झाले. त्यांच्या जागी विदर्भातील चंद्रपूरचे मारोतराव कन्नमवार हे मुख्यमंत्री झाले. कन्नमारांचा काळ हा जेमतेम एक वर्षाचा राहिला. १९६३ च्या अखेरीस त्यांचे निधन झाले आणि विदर्भातीलच यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद येथील वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री बनले.
यशवंतराव चव्हाण जरी दिलीत असले तरी महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचे बारीक लक्ष होते. इतकेच काय तर मुख्यमंत्र्यांना आपल्या मनाप्रमाणे निर्णय घ्यायलाही ते भाग पाडत असे अनेक तत्कालीन प्रशासकीय अधिकारी आणि पत्रकार सांगतात. त्यावेळी वसंतराव नाईक हे कन्नमवार मंत्रिमंडळात मंत्री होते. त्यांना मुख्यमंत्रीपदाचा कारभार सांभाळावा लागल्यावर त्यांनी या सर्व प्रकारची माहिती घेतलेलीच होती. कन्नमवार हे ग्रामीण भागातून आलेले रांगडे व्यक्तिमत्त्व होते, तर वसंतराव नाईक हे उच्चशिक्षित आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे त्यांनी चतुराईने पावले उचलायला सुरुवात केली.
त्यावेळी महाराष्ट्रात मुंबईमध्ये दोन राजकीय शक्ती अशा होत्या की त्या प्रसंगी संपूर्ण मुंबईला वेठीस धरू शकायच्या. त्यात एक होते कम्युनिस्ट नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, आणि दुसरे नेते समाजवादी जॉर्ज फर्नांडिस. या दोघांच्याही हातात विविध कामगार संघटना होत्या, आणि या दोघांचेही यशवंतराव चव्हाण यांचे संबंध अतिशय चांगले होते. त्यामुळे मुख्यमंत्री कोणीही असो, या दोन नेत्यांच्या मदतीने चव्हाण त्या मुख्यमंत्र्याला जेरीस आणायचे. याशिवाय विदर्भात आणखी एक राजकीय शक्ती कार्यरत होती. ती म्हणजे नाग विदर्भ आंदोलन समितीचे नेते लोकनायक बापूजी आणि हे होते आणि त्यांचे सहकारी त्रिंबक गोपाळ देशमुख हे होते. या दोघांनी ठरवले की ते पूर्ण विदर्भ बंद करायचे. हे दोघे मात्र चव्हाण यांच्या कह्यात नव्हते.
या सर्व परिस्थितीचा अभ्यास करत वसंतराव नाईक यांनी पावले टाकायला सुरुवात केली. आधी त्यांनी मुंबईकडे लक्ष केंद्रित केले. त्या काळात प्रबोधनकार ठाकरेंचे चिरंजीव बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार म्हणून गाजत होते. त्यांनी नुकतेच मार्मिक नामाचे व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले होते. त्यातून तत्कालीन राजकारणावर ते टीकाटिपणी करायचे. त्या काळात मुंबई जरी महाराष्ट्राची राजधानी होती, तरी तिथे परप्रांतीयांचे आणि विशेषतः दक्षिणत्यांचे जास्त प्रस्थ होते. सर्व नोकऱ्या याच मंडळींनी बळकावले होत्या, आणि मराठी तरुण मात्र बेकार होता. बाळासाहेब ठाकरे यांनी हा मुद्दा लक्षात घेत आपल्या साप्ताहिकातून मराठी तरुण जागा करायला सुरुवात केली. हळूहळू मराठी माणूस त्यांच्याशी जुळू लागला. त्यातून त्यांनी मराठी माणसाला एकत्र करीत जून १९६६ मध्ये शिवसेना ही आक्रमक संघटना स्थापन केली. शिवसेनेचा विस्तार झपाटून होऊ लागला.
असे म्हणतात की ही संघटना स्थापन करण्यात आणि तिचा विस्तार होण्यात तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा छुपा पाठिंबा होता. ही माहिती तत्कालीन राजकारणी आणि पत्रकारही देतात. त्या काळातील ज्येष्ठ पत्रकार आणि आमदार प्रल्हाद केशव अत्रे हे तर जाहीर रित्या शिवसेनेचा उल्लेख वसंतसेना असाच करायचे. नाईकांनी शिवसेनेला आर्थिक पाठबळ मिळवून दिले, तसेच उद्योगपतींकडून पाठिंबाही मिळवून दिला. त्याचा परिणाम शिवसेना मुंबई आणि ठाणे परिसरात महापालिकेत प्रवेश करती झाली. १९६९ मध्ये शिवसेना मुंबई महापालिकेत पोहोचली होती. इतकेच काय तर १९७० मध्ये मुंबईच्या परळमध्ये तत्कालीन कम्युनिस्ट आमदार कृष्णा देसाई यांचा हत्या झाली होती, त्या जागी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे वामनराव परब विजयी झाले होते. विधानसभेत शिवसेनेचा चंचूप्रवेश झाला होता.
शिवसेनेच्या या झंझावाती विस्तारामुळे जॉर्ज फर्नांडिस आणि कॉम्रेड डांगे या दोघांच्याही हालचालींना ब्रेक लागायला सुरुवात झाली होती. त्यांचे मुंबईतील महत्त्व कमी होऊ लागले होते. हळूहळू ते संपत गेले. आणीबाणीनंतर जॉर्ज हे बिहारमध्ये स्थलांतरित झाले तर श्रीपाद अमृत डांगे हे वृद्धापकाळमुळे निष्क्रिय झाले होते. १९७७ नंतर यशवंतराव चव्हाण यांचे राजकारणातील महत्त्व हळूहळू संपू लागले होते, आणि १९७० नंतर तर ते जवळजवळ अडगळीतच गेले होते. काँग्रेस पक्षात ते एक वृद्ध नेतृत्व म्हणून ओळखले जाऊ लागले.
विदर्भातील बापूजी आणि त्र्यंबक देशमुख या दोन नेत्यांनाही यशवंतराव चव्हाण यांनी १९६६ च्या दरम्यान आपल्या कह्यात घेतले. मी इंदिराजींशी बोलून विदर्भाचे वेगळे राज्य करून देतो. तुम्ही काँग्रेसमध्ये या असे सांगून त्यांना काँग्रेसमध्ये घेतले. ही या दोन दबंग नेत्यांची राजकीय आत्महत्या होती असे म्हटले तरी चालेल. चव्हाण यांच्या या खेळीने वसंतराव नाईक काहीसे अस्वस्थ झाले जरूर, मात्र त्यांनी. सावधगिरीने पुढील पावले उचलायला सुरुवात केली. १९६८ मध्ये महाराष्ट्रात पहिले कृषी विद्यापीठ स्थापन झाले. हे विदर्भात व्हावे अशी वैदर्भियांची इच्छा होती. मात्र चव्हाण यांच्या दबाधामुळे हे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीला स्थापन करण्याचे ठरले. वैदर्भीय नेते त्यामुळे संतापले. त्यांनी विदर्भात आंदोलन सुरू केले. ही संधी साधत नाईकांनी त्यांच्या जिल्ह्यातील जांबुवंतराव धोटे या तरुण कार्यकर्त्याला पुढे आणले. धोटे आक्रमक नेते होते. त्यांना विदर्भ आंदोलनात उतरवले. त्यांनी आपल्या आक्रमक शैलीने उभा विदर्भ पेटवला. विदर्भ तीन दिवस धगधगत होता. त्याचे परिणाम राष्ट्रीय स्तरावरही उमटले. शेवटी राज्य सरकारला राहुरी सह विदर्भात अकोला येथे दुसरे कृषी विद्यापीठ घोषित करावे लागले. इथूनच जांबुवंतराव धोटे यांचे नेतृत्व पुढे आले.
कृषी विद्यापीठ मिळाल्यावर जांबुवंतरावंनी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आंदोलन उभे केले. ही मागणी जुनीच होती.त्यांनी आपल्या महाविदर्भ राज्य संघर्ष समितीचे काम गावागावात पोहोचवले. त्यामुळे एका हाकेवर विदर्भ बंद करणारा नेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली. तोवर बापूजी अणे यांचे निधन झाले होते आणि देशमुख हे काँग्रेसवासी झाल्यामुळे दात काढलेला सिंह अशी त्यांची अवस्था झाली होती.
या पद्धतीने वसंतराव नाईकांनी यशवंतराव चव्हाण यांचे दोनही मोहरे गारद केले होते. मुंबईत जॉर्ज आणि डांगे यांची मोनोपली संपवली होती, आणि बाळ ठाकरे हे नेतृत्व प्रस्थापित केले तर विदर्भात जांबुवंतराव धोटे हे नवे नेतृत्व पुढे आणले होते. त्यामुळे चव्हाण यांचा जोर संपवण्यात ते यशस्वी झाले होते. यात नाईकांना साथ मिळाली ती बाळासाहेब ठाकरे आणि जांबुवंतराव धोटे यांची, असे तत्कालीन सर्वच राजकीय विश्लेषक सांगतात.
१९६७ च्या दरम्यान शरद पवार यांचे राजकीय नेतृत्व हळूहळू विकसित होऊ लागले होते. ते सर्वप्रथम आमदार झाले तर १९७२ मध्ये राज्यमंत्री झाले. नंतर ते कॅबिनेट मंत्री झाले. १९७८ मध्ये महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी विभाजित झालेल्या इंदिरा काँग्रेस आणि अर्स काँग्रेस या दोन काँग्रेसला पुरेशा जागा न मिळाल्यामुळे या दोन्ही काँग्रेसने एकत्र येत सरकार बनवले होते. यशवंतराव आणि शरद राव हे दोघेही अर्स काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी अर्स काँग्रेसचे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले होते. सरकार स्थापन होऊन जेमतेम सहा सात महिने झाले असतील, तेव्हा अचानक शरद पवारांनी बंड केले. त्यावेळी पक्षांतरबंदी कायदा नव्हता. त्यामुळे शरद पवारांनी दोन्ही काँग्रेस मधून थोडे थोडे करत आमदार बाहेर काढले आणि त्यावेळी विरोधात असलेल्या जनता पक्षाच्या मदतीने सरकार बनवत ते स्वतः मुख्यमंत्री बनले. यावेळी त्यांनी समाजवादी कॉग्रेस हा नवा पक्ष स्थापन केला.तिथूनच पवार महाराष्ट्राचे दबंग नेतृत्व म्हणून ओळखले जाऊ लागले.
पवारांची ही राजवट फेब्रुवारी १९८० पर्यंत चालली. दरम्यान देशात पुन्हा लोकसभा निवडणुका झाल्या होत्या आणि पुन्हा एकदा इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या होत्या. त्यांनी शरद पवारांचे सरकार बरखास्त केले. विधानसभा विसर्जित केली आणि नव्याने निवडणुका घेतल्या. त्यावेळी पवारांची सत्ता आली नाही. ते विरोधी पक्षनेते बनले.
या वाटचालीत आपले राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय वर्चस्व संपवण्यासाठी कारणीभूत ठरलेले बाळासाहेब ठाकरे आणि जांबुवंतराव धोटे हे कायम पवारांच्या हिटलिस्टवरच होते. त्यातल्या जांबुवंतराव धोटे यांना त्यांनी १९७८ मध्येच काँग्रेसमध्ये घेऊन त्यांचा जोर संपवला. मात्र बाळासाहेब ठाकरे यांचा जोर तसाच होता, नव्हे तो दिवसागणितक वाढताच होता.
१९८५ च्या दरम्यान आधी मराठी माणसाची कैवारी असलेली शिवसेना सांधा बदलून हिंदुत्ववादी बनली होती. त्यामुळे त्यांचा आणि भाजपचा संवाद सुरू झाला. १९८८ मध्ये भाजप शिवसेना युती झाली आणि तेव्हापासून ते एकत्रितपणे निवडणुका लढवू लागले. एव्हाना काँग्रेस मधून आधी बाहेर पडलेले शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये आले होते, आणि काँग्रेसमध्ये पुन्हा तोडजोडीचे राजकारण करीत १९८८ मध्ये ते परत एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. एकूण १९९० च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला लक्षणीय यश मिळवून दिले. १९९० मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री बनले, तर 1991 मध्ये स्वर्गीय राजीव गांधी यांच्या हत्यानंतर ते केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून गेले. १९९३ मध्ये ते परत महाराष्ट्रात आले. ते १९९५ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
१९७२ मध्ये राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री झाल्यापासूनच शरद पवारांनी बाळासाहेब ठाकरेंशी मैत्री करण्यास सुरुवात केली होती. ही मैत्री हळूहळू वाढत होती. त्यांनी बाळासाहेबांचा चांगलाच विश्वास संपादन केला होता. त्यायोगे शिवसेनेतील इतर पदाधिकाऱ्यांशी त्यांनी मैत्री केली होती. हळूहळू संधी साधून त्यांनी डाव खेळायला सुरुवात केली. पहिला प्रयोग १९९३ मध्ये त्यांनी केला. त्यावेळी त्यांनी छगन भुजबळांसह शिवसेनेतील जवळजवळ १८ आमदारांना शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये डेरेदाखल केले. बाळासाहेबांना हा मोठा धक्का होता. तरीही बाळासाहेबांनी शिवसेनेला सांभाळून घेत १९९५ मध्ये शिवसेना भाजप युतीची सत्ता आणली. दरम्यानच्या काळात पवार केंद्रात गेले होते. यानंतर त्यांनी १९९८ च्या दरम्यान शिवसेनेतील गणेश नाईक, सुरेश नवले, आणि गुलाबराव गावंडे या तिघांना काँग्रेसमध्ये आणले.
१९९९ मध्ये काँग्रेसची पुन्हा दोन शकले झाली. शरद पवार सोनिया गांधींच्या नेतृत्वाविरुद्ध बंड करत विदेशीच्या मुद्द्यावर पक्षत्याग करते झाले. त्यांच्यासोबत त्यांचे अनेक सहकारी बाहेर पडले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.
इतके होऊनही पवारांचे मन भरलेले नव्हते. २००५ मध्ये नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंशी न पटल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांना पक्षाबाहेर काढले. त्यांना काँग्रेसमध्ये प्रतिष्ठित करण्याचे कामही पवारांनीच केले असे त्यावेळी बोलले जात होते. पाठोपाठ वर्षभरातच बाळासाहेबांचे सख्खे पुतणे राज ठाकरे यांना शिवसेनेतून बाहेर काढून स्वतंत्र पक्ष काढण्यासाठी पुढे केल्याची कामगिरी पवारांचीच होती अशी त्यावेळी सर्वत्र चर्चा होती.
याचा परिणाम हळूहळू शिवसेना खिळखिळी होण्यात झाला. परिणामी २००९ मध्ये भाजपपेक्षा जास्त जागा लढवूनही शिवसेनेच्या कमी जागा निवडून आल्या. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद भाजपकडे गेले.
२०१२ मध्ये बाळासाहेबांचे दुःखद निधन झाले. शिवसेनेची सर्व सूत्र उद्धव ठाकरेंकडे आली. जी क्षमता बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती ती उद्धव ठाकरेंमध्ये नव्हती. पाठोपाठ २०१४ च्या लोकसभा निवडणुका आल्या. यावेळी भाजप आणि शिवसेना युतीत लढले होते. २०१४ मध्ये केंद्रातील काँग्रेस राजवट संपून भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार आले. लगेचच पाच महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका आल्या. या निवडणुकांमध्ये भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेकडे जास्त जागा मागितल्या. शिवसेनेने ते मान्य न केल्यामुळे युती तुटली आणि दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. त्याचवेळी राज्यात असलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीही युती तुटली. चार पक्षांच्या लढतीत भाजपने १२२ जागा जिंकून राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले. इथे पुन्हा शिवसेनेला बार्गेन करण्याची संधी होती. मात्र इथे शरद पवारांनी डाव साधत भाजपला राज्यात सरकार स्थिर हवे म्हणून पाठिंबा देऊन टाकला. परिणामी उद्धव ठाकरेंची गोची झाली. त्यांना नाक मुठीत धरून भाजपला शरण जावे लागले.
२०१९ मध्ये पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेची युती झाली. त्यांनी लोकसभेच्या जागा जशा एकत्र लढवल्या तशाच विधानसभेतही एकत्र निवडणुका लढवल्या. यावेळी शरद पवार वयाच्या ७९ व्या वर्षी भर पावसात प्रचार करत फिरले आणि जनतेची सहानुभूती मिळवली. परिणामी भाजपच्या जागा कमी झाल्या. भाजपला. १०५ जागांवरच समाधान मानावे लागले तर शिवसेनेला ६१ जागांवर थांबावे लागले.
वस्तूतः दोन्ही पक्षांचे मिळून सरकार बनवण्यासाठी स्पष्ट बहुमत होते. मात्र त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तोंडाला पाणी सुटले. त्यांनी बाळासाहेबांच्या खोलीत न दिलेल्या वचनाचे कारण पुढे करत भाजपशी युती तोडली. त्यामागे ही शरद पवारांचा साथ होता असे बोलले गेले. भाजपशी युती तुटताच शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना आघाडी करण्यासाठी आपल्या नाकदुऱ्या काढायला लावल्या. नंतर आघाडी करत त्यात काँग्रेसलाही सहभागी करून घेतले आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार बनवले. वस्तूतः मतदारांनी भाजप शिवसेना युतीने सरकार बनवावे असा कौल दिला होता, तर काँग्रेस राष्ट्रवादीला विरोधी पक्षात बसवण्याचा कौल दिला होता. मात्र हा कौल धुडकावून लावत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी अभद्र आघाडी बनवली. दुसऱे म्हणजे आजवरच्या शिवसेनेच्या आयुष्यात ठाकरे परिवारातील कोणीही सरकारात पद घेतले नव्हते. बाळासाहेबांनी ते घेऊ दिले नव्हते. शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद घ्यायला लावले आणि मातोश्रीवर बसून राज्यकारभार चालवणारा मुख्यमंत्री अशी बदनामी देखील केली. आपल्या “लोक माझे सांगाती” या आत्मचरित्रात शरद पवारांनी याबाबत लिहिलेही आहे.
या धोकेबाजीने दुखावलेल्या भाजपने जून २०२२ मध्ये शिवसेनेचे पुन्हा दोन तुकडे करत वचपा काढला, आणि उद्धव ठाकरेंचे सरकार पायउतार केले. एकावेळी 80 च्या आसपास आमदार निवडून येत असलेल्या शिवसेनेचे जेमतेम १७-१८ आमदार शिल्लक राहिले. या काळात उद्धव आणि आदित्य ठाकरे फक्त शिवसेना सोडून गेलेल्या ४० जणांवर गद्दार म्हणून तोंडसुख घेत राहिले. मात्र त्या पुढे त्यांना काहीच करता आले नाही या प्रकारात शिवसेनाही त्यांच्या हातून गेली आणि शिवसेनेचे पक्षाची नावही गेले. चिन्ह गेलेल्या शिवसेनेच्या नावावर त्यांना विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुका लढवाव्या लागल्या. यावेळी आपली सत्ता येईल या भ्रमात ते होते. मात्र २८८ पैकी फक्त २० जागांवर त्यांना समाधान मानावे लागले आहे. आता ते ईव्हीएम मशीनच्या नावाने खडे फोडत आहेत. एका काळात शिवसेनेची केंद्रा त आणि राज्यात सत्ता होती (अर्थात केंद्रात सत्तेत सहभाग होता) तर मुंबई महापालिकेत त्यांचीच गेली कित्येक वर्ष एकहाती सत्ता होती. आता राज्यात आणि केंद्रात तर उद्धव ठाकरेंची शिवसेना कुठेच नाही, आणि नजीकच्या भविष्यात मुंबई महापालिकेत निवडणुका झाल्या तर तिथेही त्यांची सत्ता येण्याची शक्यता कमीच दिसते आहे.
२००६ मध्ये बाळासाहेब ठाकरेंपासून वेगळे झालेले राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष काढला खरा, मात्र त्यांनी आपली चमक फक्त 20०९ च्या विधानसभा निवडणुकीतच दाखवली. नंतर त्यांच्या धरसोडीच्या राजकारणामुळे त्यांचे अस्तित्व हळूहळू संपत चालले आहे. २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांचा एकही आमदार निवडून आला नाही. त्यामुळे आता त्यांचे पक्षाची मान्यता नाही पण पक्ष चिन्ह जाणार हे निश्चित झाले आहे.
एकूणच एका काळात बाळासाहेब राज आणि उद्धव ही त्रयी म्हणजे एक शक्ती होती. मात्र या त्रयीला पवारांनी विभक्त कसे करता येईल हे बघितले, आणि नंतर आपले राजकीय डावपेच खेळून या परिवाराचे राजकीय वर्चस्व आता संपुष्टात आणले आहे. त्यांचे पूर्ण खच्चीकरण केले आहे.ते राजकीय वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी कदाचित खूप वेळ जावा लागणार आहे.
हा इतिहास लक्षात घेता शरद पवारांनी आपले राजकीय गुरु स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे मुंबईतील राजकीय वर्चस्व संपवणारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे आणि त्यांच्या परिवाराचे राजकीय वर्चस्व संपुष्टात आणले आहे असा निष्कर्ष काढता येतो. हा निष्कर्ष मी त्या त्या काळातील अधिकारी, पत्रकार आणि राजकीय विश्लेषक यांच्याशी चर्चा करून आणि माझे गेल्या पन्नास वर्षातील पत्रकारितेतील अनुभव लक्षात घेऊन त्यावरून काढलेला आहे. वाचकांनी तो योग्य की अयोग्य हे ठरवायचे आहे.
वाचकहो पटते का तुम्हाला हे….?
त्यासाठी आधी समजून तर घ्या राजेहो…