बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराला महंमद युनूस जबाबदार !
शरद पवार यांच्या हस्ते महंमद युनूस यांना दिलेला ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार मागे घ्या !
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: बांगलादेशातील शेख हसिना सरकार उलथवून लावल्यानंतर डॉ. महंमद युनूस यांच्या नेतृत्वाखाली सरकार अस्तित्वात आले; मात्र युनूस यांच्या सत्ताकाळात हिंदूंवरील आक्रमणे, हत्या, लुटालुट, महिलांवरील आणि लहान मुलांवरील अत्याचार, बलपूर्वक विस्थापन, मंदिरांचा विध्वंस यांमध्ये भयावह वाढ झाली आहे. बांगलादेशामध्ये प्रतिदिन मानवतेची हत्या असतांना तेथील अल्पसंख्यांक हिंदू समाज तसेच अन्य समुहांना सुरक्षित वातावरण देण्यात डॉ. महंमद युनूस हे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यामुळे संपूर्ण भारतात हिंदू आंदोलन करून तीव्र संताप व्यक्त करत आहेत. अशा मानवतेची हत्या करणाऱ्या डॉ. महंमद युनूस यांना सकाळ समूहाच्या वतीने वर्ष २००७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख आणि तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते दिलेला ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार तात्काळ मागे घेण्यात यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.
एरव्ही महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून अल्पसंख्यांकांच्या हितरक्षणाची आग्रही भूमिका मांडली जाते. महाराष्ट्रातील अल्पसंख्यांकांप्रमाणेच बांगलादेशातील अल्पसंख्यांक असलेल्या हिंदु, बौद्ध, ख्रिस्ती आदी समाजाप्रती ती सहानुभूती का दाखवली जात नाही ? बांगलादेशी हिंदू समाजाला भारतातील अल्पसंख्यांकांप्रमाणे सन्मानाने जगण्याचा अधिकार नाही का ? बांगलादेशातील हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध आदी अल्पसंख्यांक समुदायावरील अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत असतांना डॉ. महंमद युनुस यांची मूक बघ्याची भूमिका अनाकलनीय आहे. ही शांतता आणि मानवी हक्कांच्या विरोधी आहे. तरी त्यांना दिलेला पुरस्कार मागे घेण्याविषयी आणि या अत्याचारांविषयी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने भूमिका स्पष्ट करायला हवी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.