हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ आयोजित धर्मप्रेमी लोकप्रतिनिधी सन्मान सोहळा
देव, देश, धर्म आणि मंदिरे रक्षणासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याची मंत्री आणि आमदार यांची ग्वाही !
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
नागपूर – नागपूर – लोकसभेतील ‘व्होट जिहाद’च्या षड्यंत्राला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत हिंदूंनी ‘एक है, तो सेफ है’द्वारे चोख प्रत्युत्तर दिले. हिंदूंनी बहुमत देऊन आम्हाला निवडून दिले, याची जाणीव ठेवून आम्हीही हिंदुत्वासाठी समर्पित होऊन कार्य करू. देव, देश, धर्म आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही महायुती सरकारच्या वतीने उपस्थित ४ मंत्री आणि ५ आमदार यांनी समस्त हिंदूंना दिली आहे. नवनिर्वाचित महायुती सरकारचे अभिनंदन करण्यासाठी सीताबर्डी येथील विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘धर्मप्रेमी लोकप्रतिनिधी सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. संत-महंत आणि मंदिर विश्वस्त यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणात पार पडला.
या वेळी उपस्थित लोकप्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री श्री. अतुल सावे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री श्री. भरतशेठ गोगावले, भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री श्री. जयकुमार रावल, शिवसेना नेते आणि राज्यमंत्री श्री. आशिष जयस्वाल, भाजपचे आमदार श्री. नारायणराव कुचे, आमदार श्री. प्रतापराव अडसड, आमदार श्री. राम भदाणे आणि शिवसेनेच्या विधान परिषदेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे, आमदार श्री. आनंद बोंडारकर हे उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचे सन्मान या वेळी करण्यात आले आणि त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. नागपूर येथील गुरुकृपा सेवा संस्थानचे पू. भगीरथी महाराज, सनातनचे संत पू. अशोक पात्रीकर, ह.भ.प. मनोज महाराज मिरकुटे यांची वंदनीय उपस्थिती या वेळी लाभली. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट, सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक, अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महासंघाचे सभापती श्री. श्यामसुंदर सोनी, भाजपचे शहर अध्यक्ष श्री. अनिल शर्मा, लोक जागृती मोर्चाचे अध्यक्ष अधिवक्ता रमण सेनाड, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. रामनारायण मिश्र, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे जिल्हा संयोजक श्री. दिलीप कुकडे आणि हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर आदी मान्यवरही या वेळी उपस्थित होते.
या वेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या सदस्यता नोंदणी अभियानाचे उद्घाटन उपस्थित मंत्री आणि आमदार यांच्या हस्ते करण्यात आले. आतापर्यंत मंदिर महासंघाशी १५ हजार मंदिरे देशभर जोडली गेलेली आहेत.
हिंदुत्व हीच माझ्या राजकारणाची ऊर्जा ! – मा. मंत्री अतुल सावे
बांगलादेशाची निर्मिती झाली तेव्हा तेथे १५ टक्के हिंदू होते, आता ८ टक्के झाले आहेत. ही स्थिती भारताची व्हायला नको. छत्रपती संभाजीनगर येथून मला हिंदू जनतेने निवडून दिले, याची मला जाणीव आहे. त्यामुळे हिंदुत्वासाठीच मी राजकारणात कार्यरत आहे. हिंदुत्व ही माझ्या राजकारणाची ऊर्जा आहे, असे मा. मंत्री श्री. अतुल सावे यांनी या वेळी म्हटले.
संघटित झाल्यास हिंदूंना टक्कर देण्याचे धारिष्ट कुणामध्ये नाही ! – मा. मंत्री भरतशेठ गोगावले
काँग्रेसचे नेते अद्यापही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करत आहेत. हिंदू युवती लव्ह जिहादला बळी पडत आहेत. ही सर्व हिंदु धर्मावरील संकटे आहेत. देव, देश आणि धर्म सुरक्षित राहिला, तर आपण सुरक्षित राहू शकतो. हिंदूंनी एकत्र आल्यास त्यांना टक्कर देण्याचे कुणाचे धारिष्ट्य होणार नाही, असे परखड प्रतिपादन मा. मंत्री श्री. भरतशेठ गोगावले यांनी केले.
महाराष्ट्रातील सरकार हिंदुत्वासाठी कार्य करेल ! – मंत्री जयकुमार रावल
हिंदूंनी शक्ती पणाला लावल्यामुळे आम्ही निवडून आलो. हिंदूंच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आले आहे. त्यामुळे सरकार हिंदूंच्या हितासाठी कार्य करेल. हिंदूंनीही सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे, असे आवाहन मा. मंत्री श्री. जयकुमार रावल यांनी केले.
समान नागरी कायद्यासारखे महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील ! – राज्यमंत्री आशिष जयस्वाल
बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंवर अत्याचार करण्यात आले. तसे जर भारतात हिंदू अल्पसंख्यांक झाले, तर काय होईल, याचा विचार करा. यावर केवळ निवेदन देणे आणि मेणबत्ती मोर्चा काढणे, हे उत्तर नाही. हिंदू अल्पसंख्यांक होणार नाहीत, याची दक्षता हिंदूंनी घ्यायला हवी. हिंदू अल्पसंख्यांक होणे, ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे.
हे संकट रोखण्यासाठी राष्ट्रहितासाठी समान नागरी कायद्यासारखे महत्त्वाचे निर्णय सरकारला घ्यावे लागतील, असे मा. राज्यमंत्री श्री. आशिष जयस्वाल म्हणाले.
या वेळी शिवसेनेच्या विधान परिषदेतील आमदार डॉ. मनीषा कायंदे म्हणाल्या की, हिंदूंच्या सणांच्या वेळी पर्यावरणाचा र्हास असा अपप्रचार केला जातो. अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचा अवमान झाला, तर हिंसाचार केला जातो; परंतु चित्रपटसृष्टीमध्ये हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा सातत्याने अवमान होतो, तेव्हा धर्मनिरपेक्ष मंडळी गप्प रहतात. हिंदु धर्माचा अवमान धर्मनिरपेक्ष देशात कसा चालतो? तर भाजपचे आमदार श्री. प्रताप अडसड म्हणाले की, केंद्रात हिंदुत्वनिष्ठ शासन आले नसते, तर श्रीराम मंदिर उभारणे, काश्मीरमधून ३७० कलम हटवणे हे झाले नसते. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ शासन येण्यासाठी हिंदूंनी जागरूक असायला हवे. यासाठी हिंदूंनी राजकीयदृष्ट्या सजग रहाणे आवश्यक आहे. शिवसेनेचे नांदेड येथील आमदार श्री. आनंद बोंडालकर म्हणाले की, धर्म टिकला, तर आपण सुरक्षित राहू. त्यामुळे हिंदूंनी समर्पित होऊन धर्मकार्य करण्याची आवश्यकता आहे. हिंदु धर्माचे रक्षण आणि गोहत्या रोखण्यासाठी हिंदूंनी प्राणपणाने कार्य करणे आवश्यक आहे.
सरकारने हिंदु हितासाठी कार्य करावे !
यावेळी हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले की, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात म्हटले होते की, हिंदूंची मंदिरे का कह्यात घेतली जातात अन्य धर्मियांची मंदिरे ताब्यात का घेतली जात नाहीत ? आज एकतरी मशीद किंवा चर्च सरकारच्या ताब्यात आहे का ? यावर आमची मागणी आहे की ‘सनातन धर्मियांच्या मंदिरासाठी राज्य सरकारने तात्काळ ‘सनातन मंडळा’ची स्थापना करावी. सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक म्हणाले की, आपण कोणत्याही संप्रदाय किंवा संघटनेचे असलो, तरी आपल्याला राजकीयदृष्ट्या जागृत रहाणे आवश्यक आहे. देशात परिवर्तन झाल्याने अयोध्या येथे प्रभू श्रीरामांचे मंदिर उभे राहिले.
तसेच महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा पारित होईल, अशी अपेक्षा लोकप्रतिनिधींकडून बाळगून आहोत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव आणि चित्रलेखा साप्ताहिकाचे माजी संपादक ज्ञानेश महारावसारखे लोक हे देवीदेवतांवर अतिशय खालच्या पातळीवर टीका करूनही ही मंडळी मोकाट आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असेही श्री. वर्तक म्हणाले.