बदलत्या जगाचा अर्थ उघड्या डोळ्यांनी पहा अन विवेकवादी बनून संघर्ष करा
उल्का महाजन यांचे आवाहन
खानापूर ;
आज जग झपाट्याने बदलत आहे हे जरी खरे असले तरी जगाचा अर्थ उघड्या डोळ्यांनी पाहावा व अपेक्षित बदलासाठी विवेकवादी बनून जन आधारावर चळवळी उभ्या करा तरच संघर्षातून जग बदलेल असे आवाहन जन आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांनी वाझर तालुका खानापूर येथे व्यक्त केले.
बळवंतराव शिरतोडे श्रमप्रतिष्ठा पुरस्कार संपतराव पवार यांना तर गिताबाई शिरतोडे कर्तुत्ववान महिला सन्मान पुरस्कार उल्का महाजन यांना वितरण प्रसंगी ‘कष्टकऱ्यांपुढील आव्हाने’ या विषयावरील आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आमदार अरुण (अण्णा) लाड होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नेत्या मुक्ता दाभोळकर, भाई व्ही.वाय. पाटील, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे नेते कॉम्रेड धनाजी गुरव,कॉ.मारुती शिरतोडे, सरपंच संजय जाधव ,उपसरपंच हनुमंतराव जाधव ,आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे राज्याध्यक्ष दगडू जाधव, कलाकार संघटनेचे सर्जेराव कदम, सामाजिक कार्यकर्ते डॉ.अमोल पवार, प्रा. दादासाहेब ढेरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
महाजन म्हणाल्या आज आपल्या पुढील सामाजिक व राजकीय प्रश्न का निर्माण झाले आहेत ते उघड्या डोळ्यांनी पहावे.विवेकवादी बनावे.केवळ समाज सेवेतून समाज बदलत नसतो तर तो संघर्षातून बदलतो. अशा विचारसरणीच्या कृतिशील माणसांना वाझरकरांनी दिलेला पुरस्कार हा उपेक्षित,वंचित समाजासाठी संघर्ष करण्यास सतत बळ देत राहील. रायगड मधील शेतकऱ्यांच्या लढ्या बाबत त्या म्हणाल्या, “सर्व पक्षांचे मुख्यमंत्री हे अंबानी आदानी पुढे गुडघे टेकतात.ते जे बोट दाखवतील ती जमीन देण्याचा डाव आखतात तो उलथून टाकण्याचे काम रायगडमधील शेतकऱ्यांनी केले. आमदार अरुण लाड म्हणाले की देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाखोंनी आपले बलिदान दिले.हे बलिदान धुळीस मिळाले का?अशी शंका कंगणाच्या विधानावरून येते. दीड वर्षापासून या देशाच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करीत आहेत. याकडे केंद्र सरकारने साफ दुर्लक्ष केले आहे.
उलट पिढ्यानपिढ्या शेती करणाऱ्यांची शेती काढून घेऊन ती भांडवलदारांना देण्याचा डाव केंद्राने मांडला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नेत्या मुक्ता दाभोळकर म्हणाल्या कि माध्यमातील नवे बदल विवेकवादी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी समजून घ्यायला पाहिजेत आणि विवेकवादी चळवळी बळकट करायला पाहिजेत.भाई संपतराव पवार म्हणाले,दुष्काळ निर्मूलनासाठी जी कामे केली ती लोकसहभागातून केली. सामाजिक कामे लोक सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्याध्यक्ष कॉम्रेड धनाजी गुरव म्हणाले चंदनाच्या विधानाचा नुसता निषेध करून उपयोगाचा नाही तर शालेय विद्यार्थ्यांना देशसेवेचे लढे समजून देण्याची चळवळ हाती घेतली पाहिजे.प्रारंभी स्वागत व्ही..वाय. पाटील यांनी केले.प्रास्ताविक विशाल शिरतोडे यांनी केले. या वेळी मारुती शिरतोडे संपादित “श्रमिकाची पाऊलवाट” या पुस्तकाचे प्रकाशन मुक्ता दाभोळकर व कॉम्रेड धनाजी गुरव यांच्या हस्ते झाले.
पुरस्काराचे मानपत्र वाचन विक्रम शिरतोडे,ऋषिकेश पवार यांनी केले. या कार्यक्रमास हिम्मतराव मलमे,रघुराज मेटकरी,फारुक गवंडी, राहुल थोरात ,कवी नितीन चंदनशिवे, वैभव शिरतोडे ,,विशाल निकम, विजय देवकर, दिग्दर्शक उमेश मालन ,जगन्नाथ आडके, संभाजी मदने ,सुनिल गुरव, राम चव्हाण, अनील नरदेकर, लक्ष्मण शिंदे, सुभाष जाधव,अरुण जाधव, विमित शिरतोडे ,बाळासाहेब खेडकर,विनोद आल्हाट ,जगन्नाथ शिंदे,संभाजी जाधव,ॲड.अभिषेक खोत,महेश मदने यांचे सह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषद शिक्षण समितीचे सदस्य बाबासाहेब लाड यांनी आभार मानले. तर रात्री झी टॉकीज फेम प्रसिद्ध कीर्तनकार अविनाश भारती यांचे सुश्राव्य किर्तन सोहळा पार पडला.
याचा लाभ वाझर व परिसरातील शेकडोंनी घेतला. कॉम्रेड बळवंतराव शिरतोडे श्रमप्रतिष्ठा पुरस्काराचे हे दहावे वर्षर तर गिताबाई शिरतोडे कर्तृत्ववान महिला सन्मान पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून आता पर्यंत महाराष्ट्रातील अनेक नामांकित सामाजिक कार्यकर्ते व कष्टकऱ्यांच्या,राबणाऱ्या, माणसांच्या चळवळी उभ्या करणार्या नेत्याना हा पुरस्कार दिला गेला आहे. या अनोख्या प्रबोधनपर कार्यक्रमाची चर्चा सर्वत्र होत आहे.







