ढगाळ वातावरण रब्बी पिके धोक्यात; काढणीस आलेले पिके हातातून जाण्याची भिती : शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण
त-हाडी प्रतिनिधी :मागील तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे काढणीसाठी आलेल्या पिकांचे काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर आंबा पिकाचा मोहर गळाल्यामुळे फळधरणेवर परिणाम होणार आहे.
रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा पिकांची काढणी करण्यात आली आहे, तर अनेक ठिकाणी काढणी सुरू आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून ढगाळ वातारवण झाले असून, काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. या वातावरणामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
खरिपात अतिपावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने रब्बी हंगामातील पिकांबाबत शेतकरी आशावादी होते. मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे रब्बीतील पिके धोक्यात आली आहेत.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण झाल्याने या पिकांवर किड-रोगांचा प्रादुर्भाव वाढणार असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गहू पिकास थंडी फायदेशीर असते, मात्र थंडी गायब झाल्याने गहू पिक संकटात सापडणार आहे. पहाटे धुके व सकाळपासून ढगाळ वातावरण होत आहे. यामुळे हरभऱ्यावर घाटेअळी व गहू पिकावर तांबेऱ्याचा प्रादुर्भाव वाढणार आहे. यामुळे उत्पादनात घट होणार आहे
दरम्यान ढगाळ वातावरणामुळे आंब्याचा मोहर गळून पडणे, वाऱ्यामुळे कैऱ्या गळणे, तसेच भुरीसारखा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे झाडावरही परिणाम होण्याची शक्यता आहे, तर अनेक ठिकाणी हरभरा व गव्हाची काढणी सुरू आहे, तर हरभरा काढून गंज लावून ठेवली आहे. मात्र, पाऊस आल्यानंतर या पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढून ठेवलेल्या पिके झाकून ठेवण्यासाठी शेतकर्यांची धावपळ करीत आहे.