वाचन संस्कृती वाढवली पाहिजे— प्रा.डाॅ.अरविंद हंगरगेकर
उस्मानाबाद दि.५(प्रतिनिधी)
अखिल भारतीय साहित्य
महामंडळाने अत्यंत महत्त्वाच्या आणि आवश्यक अशा विषयावर हा परिसंवाद आयोजित केला आहे. वर्तमान काळाचा विचार करता वर्तमानात तरुणांची वाचन पर्यायांच्या पसारामध्ये गोंधळलेली अवस्था झाली आहे. हा गोंधळ थांबवायचा असेल तर हा पर्यायांचा पसारा आवरावा लागेल. तरच हा गोंधळ थांबू शकतो. आज वाचन संस्कृती अधिकाधिक वाढविण्यासाठी पुस्तकांची देवघे होणे आणि बालवयापासूनच मुलांना डिजिटल दुनियाशी जोडताना पुस्तकांशी मैत्री करायला लावणे काळाची गरज आहे.असे प्रतिपादन प्रा.डाॅ.अरविंद हंगरगेकर (मराठी विभाग,रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,उस्मानाबाद)यांनी नेकतेच वर्धा येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात ५फेब्रुवारी रोजी, आयोजित केलेल्या परिसंवादात प्रमुख वक्ते म्हूणून केले आहे.या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी मुंबई येथील मीनाक्षी पाटील होत्या.
पुढे बोलताना प्रा.डाॅ.हंगरगेकर म्हणाले की, पुस्तकापासून मुलं दूर गेली तर संस्कृती संपेल आणि संस्कृती संपली तर समाज टिकणार नाही. समाज टिकला नाही तर राष्ट्राचा विकास होणार नाही. म्हणून स्वतःला, समाजाला व पर्यायाने राष्ट्रालाही विकसित करण्यासाठी सातत्याने वाचन करणे गरजेचे आहे. आज वाचनासाठी समाजमाध्यमं मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध झाली आहेत. परंतु वाचक मात्र हे वाचू का ते वाचू, आज वाचू का उद्या वाचू या गोंधळात हरवून गेलेला आहे. आणि वाचनापासून दिवसेंदिवस दूर जाऊ लागलेला आहे. हे संस्कृतीसाठी ठीक नाही, आणि समाजासाठी हिताचे नाही. त्यामुळे वाचन संस्कृती गतिमान केली पाहिजे असे शेवटी आवाहान केले आहे. या परिसंवादामध्ये डॉ. अभय आणे, डॉ. योगेश कुलकर्णी ( हैद्राबाद), मा. चांगदेव काळे हे उपस्थित होते. आभार रामचंद्र वानखेडे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. मनिषा रिठे यांनी केले.







