अभानपुर -जळोद रस्त्यावरील गायब पुलाचा प्रश्न महाराष्ट्र विधानसभेत गाजणार
त-हाडी :- तालुक्यातील आदिवासी भागातील जळोद -अभानपूर रस्त्यावर आदिवासी उपयोजनेंतर्गत पुलाच्या बांधकामासाठी सुमारे ६५ लाखांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात पुल न बांधताच निधी हडप करण्यात आल्याने अभानपूर पूल विधानसभेत गाजणार असल्याची शकता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात याबाबत आ. शिरीष चौधरी,अमिन पटेल, अशोक चव्हाण,नाना पटोले यांनी विधासभेत तारांकीत प्रश्न उपस्थित केला आहे. याबाबत राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे सीईओ व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठविले असून तातडीने खुलासा मागीतला आहे.
शिरपूर तालुक्यातील जळोद-अभानपूर येथे राज्यशासनाच्या आदिवासी उपयोजनेंतर्गत ६ डिसेंबर २०१३ रोजी पूल बांधण्यासाठी ४५ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर २९ जानेवारी २०१५ रोजी नाशिक येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी या कामाचे ६४ लाख ९५ हजार ५३४ रुपयांच्या सुधारीत अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता दिली.मात्र ठेकेदार अजय अवतराम कटारिया, शिरपूर यांच्याशी संगनमत करून अधिकारी सी. डी. वाघ, अधीक्षक अभियंता (निवृत्त), पी. एस. पाटील, उप अभियंता (निवृत्त), एस. बी. भोसले, कार्यकारी अभियंता रोहयो (निवृत्त), सा. बां. धुळे, अ. ल. पवार, कार्यकारी अभियंता, दवगुनि, मं. नाशिक, जे. एन. बेडसे, शाखा अभियंता, सा. बां. उपविभाग क्र. १ शिरपूर यांनी प्रत्यक्षात पुल बांधताच निधी हडप केला
दरम्यान तालुक्यातील बिरसा फायटर्सचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी संपूर्ण माहिती माहीती अधिकारात काढली असता सदर प्रकार उघडकीस आला.त्यांनी सदर पूल बांधून मिळावा व संबंधितांनावर कारवाई व्हावी यासाठी तालुका जिल्हा,विभाग स्तरावर पाठपुरावा केला मात्र अपयश आल्याने आ.शिरीष चौधरी,आ.अमिन पटेल,आ.अशोक चव्हाण,आ.नाना पटोले यांच्या कडे तक्रार दाखल केली
आमदारांनी सदर तक्रारीची दखल घेत विधानसभेत जळोद अभानपूर रस्त्यावरील पुलाबाबत तारांकीत प्रश्न उपस्थित करून पुलाबाबत शासनाने चौकशी केली काय? संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई झाली ? केली नसल्याचे बिलंबाचे कारण काय ? असे अनेकविध प्रश्न उपस्थित केले आहेत.त्यावरून शासनाच्या ग्रामविकास विभागाने धुळे व नंदुरबारचे सीईओ व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तातडीने खुलासा मागीतला आहे.
त्यामुळे तालुक्यातील अभानपूर जळोद रस्त्यावरील पूल विधान सभेत गाजणार आणि पूल बांधला जाणार का ? ठेकेदार अधिकाऱ्यांवर कारवाई होईल का ? याबाबत तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.







