कुलिंग चार्जेसच्या नावाखाली शीतपेयांची जादा दराने विक्री
अव्वाच्या सव्वा दराने ग्राहकांची सर्रास लूट
त-हाडी
सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून शीतपेयांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, शिरपूर शहरासह ग्रामीण भागातही अनेक शीतपेय विक्रेते कुलिंग चार्जेसच्या नावाखाली ग्राहकांकडून जादा रक्कम वसूल करत आहेत. अव्वाच्या सव्वा जादा दराने शीतपेयं विकली जात असल्याने शासनाच्या छापील किंमतीपेक्षा जादा दराने वस्तू विकण्याच्या कायद्याला अनेक शीतपेय विक्रेत्यांकडून हरताळ फासला जात असल्याने ग्राहकांची सर्रास लूट केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता झपाट्याने वाढत असून रसवंती, शीतपेयांच्या दुकानांकडे ग्राहकांची चांगलीच गर्दी वाढत असल्याचे दिसत आहे. याचाच फायदा घेत अनेत शीतपेय विक्रेते कुलिंग चार्जेसच्या नावाखाली मूळ किंमतीपेक्षा
अधिकची रक्कम वसूल करताना दिसत आहेत. ग्राहकांनी याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तरे विक्रेत्यांकडून दिली जातात. सदर बाबीचे गांभीर्य लक्षात घेता शीतपेय विक्रेत्यांवर संबंधित विभागाने कार्यवाही करण्याची मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.
विविध कंपन्यांचे शीतपेय विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. येणाऱ्या ग्राहकांची मागणी
नेमकी अडचण पाहून अधिक पैसा कमावण्यासाठी अनेक शीतपेय विक्रेते उत्पादनावर नमूद केलेल्या किंमतीपेक्षा पाच ते सात रुपये अधिक घेत आहेत. ही जास्तीची रक्कम कुलिंग चार्जेसच्या नावाखाली आकारली जात असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे ग्राहकांची मात्र सर्रास लूट होत आहे. यावर शीतपेय कंपनीद्वारे कुठलेही निर्बंध घातले जात नसल्याने दाद मागावी तरी कुणाकडे असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे..
एखाद्या ग्राहकाने अतिरिक्त किंमतीबद्दल दुकानदाराकडे विचारणा केली असता वाद- विवादाचे प्रसंग सर्रास उद्भवत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शीतपेयांना थंड करण्यासाठी लागणारी साधने वीज बिल याचा विचार करता शीतपेय ही मूळ किंमतीत विकणे परवडत नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.







