चाळीस टक्के शेतकऱ्यांनीच काढला पीकविमा
३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
त-हाडी ः
,ता.१ ः खरिप हंगामातील पेरण्या आटोपल्या की लगबग सुरु होते ती, पीक विमा काढण्याची. गत काही वर्षांपासून सततच्या नैसर्गिक आपत्तीने पिकांची नासाडी होत असून, या पिकांचे संरक्षण करण्यासाठी पीकविम्याचे कवच शासनाच्या वतीने देण्यात आले आहे. यामध्ये यंदा शासनाने केवळ १ रुपयामध्ये पीक विमा काढण्याचा निर्णय घेतल्याने विमा काढणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल असे अपेक्षीत होते. मात्र, विमा काढण्यासाठी शासनाने तीन ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे तीन दिवस राहीले असतांना सुध्दा शिरपूर तालुक्यातील केवळ चाळीस टक्केच शेतकऱ्यांनी पीक विमा काढल्याचे वास्तव आहे.
शिरपूर तालुका कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एकूण ४४ हजार शेतकऱ्यांच्या नावे सातबारा आहे. त्यापैकी अद्यापपर्यंत १८ हजार ७९६ शेतकऱ्यांनीच आपल्या पिकांचा विमा काढला आहे. तर तालुक्यातील जवळपास ६० टक्के शेतकऱ्यांनी शेवटचे तीन दिवस राहिले असतांना सुध्दा पिक विमा काढला नसल्याचे वास्तविक चित्र आहे. त्यामुळे केवळ तीन दिवसांमध्ये २५ हजार २०४ शेतकऱ्यांना पीक विमा काढावा लागणार आहे.
१ ते ३० जुलै, व आता शासनाने ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे असा पीक विमा काढण्याचा कालावधी शासनाकडून ठरवण्यात आला होता. त्यामध्ये दोन चार दिवस ऑनलाईन सर्विस बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला.
तर दरवर्षीचा अनुभव पाहता यंदाही पीकविमा काढण्याला परत मुदतवाढ मिळेल का? अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असून, तशी मागणी सुध्दा शेतकरी करीत आहेत. केवळ एक रुपयामध्ये शासनाकडून पीक विमा काढून मिळत असल्याने शेतकऱ्यांनी विमा काढावा असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने सुध्दा वारंवार करण्यात येत आहे.
पीक विमा काढण्यासाठी शासनाने ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिलेले आहे शेवटच्या तीन दिवस राहिले आहेत. काही अडचण असल्यास कृषी सहायक , कृषी अधिकारी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी १ फक्त रुपया देऊन आपला पीक विमा काढावा मुदतीच्या आत सेतू सेवा केंद्रावर जाऊन काढावा.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा
या खरीप हंगामात शेतकरी बांधवांनी एक रुपयात पीक विमा भरण्यास उत्तम प्रतिसाद दिला असून आतापर्यंत १८७९६ पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले आहेत. तांत्रिक कारणांनी कोणत्याही शेतकऱ्यांचा विमा भरणे मागे राहू नये, यासाठी ऑनलाइन विमा अर्ज करण्यासाठी 3 दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. उर्वरित शेतकरी बांधवांनी आपला विमा अर्ज 3 ऑगस्टच्या आत ऑनलाइन भरून घ्यावा.
- , चंद्रशेखर साठे तालुका कृषी अधिकारी, शिरपूर पीक विमा काढतांना शेतकऱ्यांनी निर्धारीत करण्यात आलेल्या रकमेचाच भरणा करावा. त्या व्यतिरीक्त अतिरीक्त पैसे देवू नये. सामुहिक सेवा केंद्र (सीएससी) चे केंद्र धारक अतिरीक्त पैशाची मागणी करीत असल्यास त्याबाबत संबंधीत तालुक्याचे तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांचेकडे तक्रार करावी.







