भरून येणाऱ्या ढगांकडून हुलकावणी——!
त-हाडी परिसरातील शेतकरी चिंतेनेच धास्तावले
त-हाडी ,ता. १७ (प्रतिनिधी) सकाळी अवकाळी का होत नाही आता पाऊस पडेल, अन् शेवटची घटका मोजणाऱ्या फळबागांसह थोड्याफार पाण्याच्या भरवशावर पेरलेल्या ‘खरिपा’ला जिवदान मिळेल म्हणून आसुसलेला शेतकरी….. रात्री आठ वाजेनंतर वातावरणात अचानक बदल होऊन सुटणारे जोमदार वारे…. गोळा झालेले काळे ढग निघून जाऊन आकाश निरभ्र होऊन उष्णतेचा उकाडा वाढत असल्याचे चित्र त-हाडीसह शिरपूर तालुक्यात अनुभवयास मिळत आहे .
अलिकडील अतिवृष्टीचा दोन – तीन वर्षाचा काळ सोडला तर वीस वर्षापासून हुलकावणी देणाऱ्या पावसामुळे शिरपूर तालुक्यावील शेतकरी चिंतातुर बनला.अनेकांनी रोहीण्या,मृग नक्षत्रावर भरवसा ठेवत रखरखत्या उन्हात पेरणीपूर्व मशागतीचे कामे उरकली; मात्र ही नक्षत्रे कोरडी गेली. आर्द्रा नक्षत्राने लावलेल्या एका हजेरीनंतर तालुक्यात जोमदार पाऊस न झाल्याने खरिपासह फळबागांचे तोंडचे पाणी पळाले. एकंदरीत पावसाळा कोरडा जात असल्याने शेतकर्यांनी भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईचा धसका घेतला आहे. परिसरातील ज्या शेतकऱ्यांनी बोरवेल विहीरीच्या भरवशावर ‘ठिबक’वर लागवड केली ते कापसाचे पिक हळूहळु खाली माना टाकून करपून जात आहे. पाण्यासारखा पैसा खर्च करूनही पाणी न मिळालेल्या विहीरी, कूपनलि का केवळ धोक्याचे ठिकाणं बनली आहेत.
अर्धानिम्मा पावसाळा आटोपता झाला तरी अद्याप ‘वाहते’ पाऊस न झाल्याने सर्व विहीरी, नदीनाले,तलाव कोरडेठाक आहेत. माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. चारावैरणीचा ‘प्रश्न’ही पशुपालकां ना भेडसावत आहे. खरिपां सह रब्बीच्या चिंतेने शेतकर्याच्या मनात घर निर्माण केले आहे. पाण्याअभावी खरिपापाठो पाठ पपई ,केळी व उसाचे संकटात सापडले आहे. गतवर्षी अतिवृष्टीच्या संकटाने नागवलेल्या शेतकऱ्याकडून दुकानदारांची खते – बियाणांची देणी न फिटल्याने ‘तो’ आपली ‘पत’ हरवून बसला आहे.पावसाअभावी दुकानदारांच्या धंदयावरही परिणाम होऊन उधार – उसनवारी ला चाप बसला आहे. संभाव्य पाणीटंचाईची धास्ती घेऊन अनेक पशुपालक ‘दावणी’च्या गुरांना बाजाराची वाट दाखवित आहे. उर्वरित नक्षत्रात ‘वरुणराजा’ने समाधानकारक हजेरी लावल्यास ‘बळीराजा’स दिलासा मिळेल; अन्यथा जमिनी वर उतरून आलेल्या ‘नभा’ ने हूलकावणी दिल्यास त्यांना नशिबाला दोष देण्यापलीकडे पर्याय नाही. शेतावर जातांना फवारणीसाठी घरूनच बैलगाडीमध्ये पाणी न्यावे लागते.
दररोजच्या एकंदर वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला असून परिसरातील शेताव्यवसाय संकटात सापडला. विविध संकटातून जगविलेल्या पपईच्या बागाचे भविष्य अंध:कारमय वाटत आहे. पावसाने डोळे वटारल्याने शेतकरी पूर्णतः धास्तावला असून त्यांच्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत ..
प्रतिक्रिया :
रावसाहेब पारधी (शेतकरी, ममाणे) : “पावसा अभावी शेतीचे पूर्णतः गणित बिघडले, आमचा पाण्याअभावी खरिपाचा हंगाम हातातून गेल्यास शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल.”
सुनिल भामरे (शेतकरी , त-हाडी)
,”दरवर्षीच पावसाला उशीर होऊन पेर उशीरा साधली जात असल्याने शेतीतून खर्चही निघत नाही व त्यामूळे आमचेवर कंगाल होण्याचे दुर्देवी संकट उभे राहते. माणसांपाठोपाठ दावणीच्या जनावरांचे काय करावे ही चिंता भेडसावत आहे.”
ज्ञानेश्वर पाटील
(शेतकरी, भटाणे), ‘
शेतकरी जगला तर देश जगेल ही संकल्पना लक्षात घेऊन शासनाने शिरपूर तालुक्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी पावले उचलावीत. कृत्रिम पाऊस पाडल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.”







