त-हाडी : – शिरपूर तालुक्यात सुमारे १४७ गावे असून ११८ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावागावात विकास गाडा सुरू आहे. शासनाने ग्रामस्थांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला इंटरनेट जोडून विविध प्रकारचे दाखले व ग्रामपंचायत स्तरावरील नमुने ऑनलाईन केले आहे. मात्र हे काम करणाऱ्या संगणक परिचालकाला तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत असल्याने संगणक परिचालकाने विविध मागण्यासाठी बेमुदत संपाचा हत्यार उपसले आहे. त्यामुळे तालुक्यातील ११८ ग्रामपंचायती ऑफलाईन झाल्या आहे.
शिरपूर तालुक्यातील ११८ ग्रामपंचायतीत १०० संगणक परिचालक कार्यरत आहे. ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून सुरु असलेल्या पुर्वीच्या संग्राम व सध्याच्या आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात मागील १२ वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर ग्रामविकास विभागाने नेमून दिलेले काम हे संगणक परिचालक करीत आहेत. वर्षानुवर्षे शासन यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असून यांना मजुरा पेक्षाही कमी मानधन मिळते.
ग्रामीण भागातील जनतेला विविध प्रकारच्या सेवा देण्याचे काम संगणक परिचालक अविरतपणे करीत आहेत. ग्रामपंचायतचे ऑनलाईन ऑफलाईन काम व इतर अनेक प्रकारची कामे प्रामाणिकपणे करुन सुद्धा महागाईच्या काळात केवळ सहा हजार नऊशे रुपये देण्यात येतात. यात कुटुंब कसे चालवायचे असा प्रश्न या कर्मचाऱ्यांनी उपस्थित करून मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत संप पुकारला आहे.
…..
- या मागण्यासाठी बेमुदत संप •
सध्या ग्रामविकास विभागास जिल्हा परिषदेकडून प्राप्त झालेल्या अभिप्राया नुसार ग्रामपंचायतच्या सुधारीत फाईल वित्त विभागास त्वरित पाठवून संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्यात यावे. कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळेपर्यंत वीस हजार रुपये मासिक वेतन देण्यात यावे. नव्याने सुरु करण्यात आलेली चुकीची टारगेट सिस्टम रद्द करण्यात यावी. पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या जुन्या संगणक परिचालकांना नियुक्ती देण्यात यावी. नियुक्ती झालेल्यांना न मिळालेले मानधन त्वरित देण्यात यावे.
…. - नागरिकांची कामे खोळंबली •
तालुक्यातील ग्रामपंचायतीतून ग्रामस्थांना विविध प्रकारचे ऑनलाइन दाखले संगणक परिचालकाच्या माध्यमातून दिले जाते. मात्र संगणक परिचालक त्यांच्या विविध मागणीसाठी बेमुदत संपावर असल्यामुळे नागरिकांना जन्म – मृत्यु प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र ,उत्पन्न प्रमाणपत्र आदी दाखले मिळत नसल्याने नागरिकांची अडचण निर्माण झाली आहे. या प्रमाणपत्र अभावी नागरिकांचे शासकीय व निमशासकीय कामे खोळंबली आहे.
….
संगणक परिचालकावर ग्रामीण भागात एका पाठोपाठ एक कामाची जबाबदारी वाढतच चालली आहे. त्या तुलनेत तूटपंजे मानधन मिळत आहे. त्यातपुन्हा चुकीची टारगेट पद्धत व अनेक ठिकाणी १ ते ३३ नमुने उपलब्ध नाहीत. अशा विविध मागण्यासाठी आम्ही बेमुदत संप पुकारला आहे. शासनाने आमच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात.
तुषार पाटील- , तालुकाध्यक्ष, संगणक परिचालक संघटना शिरपूर
….






