आठवण सज्जनशक्तींची..! – ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
ठाणे: आजच्या वृत्तपत्रात एक वृत्त वाचकांचे लक्ष वेधून घेणारे ठरले आहे. नेदरलँड या देशात सलग चौदा वर्ष पंतप्रधान म्हणून कार्यरत असलेले मार्क रुट यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यांनी लगेचच नवे पंतप्रधान डिक शुक यांच्याकडे आपली सत्तासूत्रे सोपवली. सत्तासूत्रे सोपवून मार्क रुट हे चक्क सायकलने आपल्या घरी गेले असे हे वृत्त म्हणते.
१४ वर्ष पंतप्रधान म्हणून कार्यरत राहिलेली एखादा व्यक्ती आपले पद सोडल्यावर सायकलने घर गाठते ही समस्त भारतीयांना अत्यंत आश्चर्य वाटणारी अशीच बाब आहे. याला कारण असे की आपल्या देशात एक तर सहजासहजी कोणी सत्ता सोडायला तयार नसते. मात्र अनेकांवर तशी वेळ येते. अर्थात सत्तेच्या काळात या राजकीय नेत्यांनी बऱ्यापैकी कमावलेले असते. त्यामुळे त्यांच्यावर सायकलने फिरण्याची वेळ येत नाही. अर्थात आपल्या देशात उच्च पदावर बसलेले लोकप्रतिनिधी फक्त वाहनाचेच सुख उपभोगतात असे नाही. तर इतरही अनेक सवलती त्यांना मिळतात. ते ज्या राज्याचे किंवा केंद्राचे उच्चपदस्थ असतात, तिथल्या राजधानीत या नेत्यांना सुसज्ज असे निवासस्थान उपलब्ध होत असते. त्या निवासस्थानात शासनाकडूनच अनेक कर्मचारी देखील उपलब्ध होत असतात.आपल्या देशात अशी सत्ता गेल्यावर अनेक नेते काही दिवस नाही तर चक्क काही वर्ष सुद्धा आपल्याला मिळालेले शासकीय निवासस्थान सोडत नाहीत. नियमानुसार ठराविक दिवसात असे निवासस्थान खाली केले नाही तर त्या उपभोक्त्याला बाजारभावानुसार भाडे आकारले जाते. अनेकदा ते भाडे देखील हे महाभाग भरत नाहीत. ज्यावेळी सरकारचे सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी या नेत्यांकडे बंगला रिकामा करण्यासाठी सांगायला म्हणून जातात, त्यावेळी बंगल्यावरचे कर्मचारी आमच्या साहेबांची लवकरच दुसऱ्या एका पदावर नियुक्ती होते आहे असे सांगून परत पाठवतात. २०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून सूत्रे स्वीकारली त्यावेळी त्यांनी दिल्लीत अशा वर्षानुवर्ष बंगले अडकवून बसणाऱ्यांना अगदी जिद्दीने बाहेर काढले. म्हणून अनेक बंगले रिकामे तरी झाले. अजूनही अनेक बंगल्यांमध्ये असे माजी मंत्री किंवा माजी खासदार जागा अडवून बसलेले असल्याची माहिती मिळते.
अनेकदा तर सरकार मधल्या वरिष्ठांची मर्जी झाली म्हणून कोणत्याही पदावर नसलेल्यांना सुद्धा बंगले दिले जातात. दिल्लीत असे अनेक कथित विचारवंत आढळतील. यात काही पत्रकार आहेत, काही साहित्यिक आणि कथित विचारवंतही आहेत. यांना असे बंगले दिले जातात आणि त्या बदल्यात त्यांनी सत्ताधाऱ्यांची तळी उचलून त्यांच्या सोयीचे नॅरेटिव्ह तयार करायचे इतकेच त्यांचे काम असते. पूर्वी यातल्या अनेकांना सत्ताधाऱ्यांबरोबर विमानाने परदेश प्रवासही घडवला जायचा. आता असे परदेश प्रवास बंद केले गेले असल्याची माहिती आहे.
आपल्या देशात असे अनेक प्रकार जनसामान्यांना बघायला मिळतात. मात्र या प्रकारांना काही मार्क रुप यांच्यासारखे अपवादही असतात. या देशातही अनेक असे नि:स्पृह आणि नि:स्वार्थ भावनेने काम करणारे राजकीय नेते आणि अधिकारी आहेत, की जे पदावर असेपर्यंतच सरकारी लाभ घेतात. पदावरून खाली उतरताच ते लगेचच सर्व लाभ सोडून सामान्य माणसासारखे आयुष्य जगायला तयार होतात. त्यातलीच काही उदाहरणे आपण आज इथे बघणार आहोत.
महाराष्ट्रात ज्या व्यक्ती आमदार म्हणून निवडून येतात किंवा नियुक्त केल्या जातात, त्यांना मुंबईत आमदार निवासात एक कक्षबंध दिला जातो. आधी एकच होता नंतर प्रत्येक आमदाराला दोन कक्षबंध दिले जायला सुरुवात झाली. या कक्षबंधात आमदार तर मुक्कामी असायचेच, पण त्यांच्याबरोबर त्यांचे कार्यकर्ते देखील तिथे मुक्कामी राहायचे. अमरावती विभाग पदवीधर मतदार संघातून १९८० च्या दरम्यान प्राध्यापक बी. टी. देशमुख हे आमदार म्हणून विजयी झाले होते. देशमुखांना देखील मुंबईच्या आमदार निवासात दोन कक्षबंध उपलब्ध झाले होते. २००८ पर्यंत देशमुख विधान परिषदेत आमदार म्हणून निवडून येत होते. २००८ मध्ये झालेल्या निवडणुकीत देशमुख यांचा पराभव झाला. हा निकाल साधारणपणे दुपारी तीनच्या सुमाराला जाहीर झाला. त्याच दिवशी संध्याकाळी विदर्भ एक्सप्रेसने बी.टी. देशमुख मुंबईला रवाना झाले. त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचताच आपल्या कक्षबंधातील आपले सामान गोळा केले आणि कक्षबंधाचा ताबा आमदार निवास व्यवस्थापकाकडे सोपवून त्याच दिवशी संध्याकाळच्या विदर्भ एक्सप्रेस ने बी.टी. देशमुख अमरावतीकडे रवाना झाले होते.
बी.टी. देशमुख यांसारखेच नि:स्पृह आणि नि:स्वार्थ भावनेने काम करणारे ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक विद्याधर गोखले हे देखील होते. १९८९ मध्ये मध्य मुंबईतून विद्याधर गोखले हे शिवसेनेतर्फे लोकसभेची निवडणूक लढले आणि विजयी झाले. त्यांना खासदार म्हणून दिल्लीत विठ्ठलभाई पटेल हाऊस मध्ये एक फ्लॅट मिळाला होता. तिथेच त्यांचा निवास होता. १९८९ मध्ये गठीत झालेली लोकसभा १९९१ मध्येच विसर्जित करण्यात आली. ज्यावेळी लोकसभा विसर्जित होते त्यावेळी आज असलेले खासदार हे तत्काळ प्रभावाने माजी झालेले असतात. तसेच विद्याधर अण्णा गोखलेही माजी खासदार झाले होते. त्यांनी त्याच दिवशी तो फ्लॅट सोडला आणि सामानासुमानासह मुंबईत आपल्या दादरमधील निवासस्थानी येऊन पोहोचल त्यावेळी त्यांना सर्वच सहकारी खासदारांनी समजावले की फ्लॅट सोडण्याची इतकी घाई का? लगेच होणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला उमेदवारी मिळणार आहे आणि तुम्ही निवडूनही याल. मग तोवर तुम्ही फ्लॅटमध्ये राहू शकता. मात्र अण्णांनी उत्तर दिले की ते माझ्या तत्त्वात बसत नाही. जर पुन्हा निवडून आलो तर नव्याने जो मिळेल तो फ्लॅट मी नक्की घेईन. मात्र माजी खासदार म्हणून मी या फ्लॅटमध्ये राहणार नाही.
असाच प्रकार माजी मुख्यमंत्री आणि माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांचाही सांगता येईल. फेब्रुवारी १९९९ मध्ये शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी फोनवर मनोहर जोशींना सूचना दिली की तुम्ही राज्यपालांकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सादर करा आणि मग मला भेटायला या. मनोहर जोशींनी सूचनेचे तत्काळ पालन केले आणि राजीनामा सादर केला. तसेच ते बाळासाहेबांना मातोश्रीवर जाऊन भेटले. बाळासाहेबांशी चर्चा करून मनोहर जोशी वर्षा बंगल्यावर परत पोहोचले. तोवर त्यांनी आधीच मोबाईल वरून कुटुंबीयांना सुचित केले होते. सर्व कुटुंबीय सामान बांधून तयार होते. त्याच रात्री नऊ वाजता वर्षा बंगला सोडून मनोहर जोशी दादर मधील आपल्या जुन्या फ्लॅटवर दाखल झाले, आणि तिथेच त्यांचा पुढे निवास राहिला होता.
इतके नि:स्वार्थ भावनेने काम करणारे फक्त राजकीय नेतेच नाहीत, तर अनेक उच्चपदस्थ अधिकारी देखील आहेत. स्व. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांच्याकडे राम खांडेकर नावाचे स्टेनोग्राफर कार्यरत होते. पुढे चव्हाण संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला गेले. तिथेच विविध पदांवर काम केल्यावर चव्हाण राजकारणातून निवृत्त झाले. तोवर खांडेकर चव्हाणांसोबतच खाजगी सचिव म्हणून होते. नंतर मोहन धारिया, वसंत साठे, आणि पी. व्ही. नरसिंहराव या मंत्र्यांकडे ते खाजगी सचिव म्हणून कार्यरत होते. नरसिंहराव पंतप्रधान झाले तेव्हा खांडेकर त्यांच्यासोबतच होते.
चव्हाण, धारिया, साठे नरसिंहराव, अशा दिग्गजांचे खाजगी सचिव म्हणून काम केलेले राम खांडेकर नरसिंहराव पंतप्रधान होईपर्यंत दररोज आपल्या दिल्लीतल्या लोधी कॉलनीतील निवासस्थानाहून शास्त्री भवन किंवा रक्षा भवन मध्ये कार्यालयीन कामासाठी सायकलनेच जाणे येणे करायचे. कार्यालयीन कामासाठी त्यांनी शासकीय वाहन वापरले असेलही, मात्र दिल्लीत खाजगी कामासाठी ते सायकलनेच फिरायचे. जर कुटुंबासोबत जायचे असेल तर ते रिक्षाने जायचे. ज्या दिवशी नरसिंहराव पंतप्रधान म्हणून निवडले गेले, त्या दिवशी सकाळी देखील खांडेकर आपल्या जुन्या सायकलने नरसिंहरांच्या बंगल्यावर पोहोचले होते. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या आणि खांडेकर, जे सकाळी माजी खासदाराचे स्वीय सहाय्यक होते ते संध्याकाळी एकदमच पंतप्रधानांचे विशेष कार्य अधिकारी बनले. दिवसभरात नरसिंहराव पंतप्रधान होणार हे निश्चित झाले आणि त्यांच्या बंगल्यावर एस. पी. जी. ची सुरक्षा लागू झाली. त्या रात्री काम आटोपून खांडेकर आपली सायकल घेऊन घरी जायला निघाले तेव्हा एस.पी.जी. च्या सुरक्षारक्षकांना हा सायकलस्वार आत केव्हा आणि कसा शिरला हा प्रश्न पडला. तितक्यात दस्तुरखुद्द नरसिंहरावच बाहेर आलेत आणि त्यांनी खुलासा केला, आणि लगेचच त्यांनी खांडेकरांना सायकल ठेवायला सांगितली. आजपासून तुम्ही सायकल चालवायची नाही तर तुमच्या दिमतीला २४ तास एक कार असेल असे त्यांनी ठणकावले. त्या दिवशीपासून खांडेकरांची सायकल बंद झाली. असे म्हणतात की नरसिंहरांच्या बंगल्यावरच्या एका खानसामाने ती सायकल मागून नेली आणि बरीच वर्षे चालवली. नरसिंह रावंचे पंतप्रधानपद गेले तरी खांडेकर त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्याच सेवेत होते. नंतर खांडेकर नागपूरला राहायला आले. त्यावेळी खांडेकर पती-पत्नी पाई फिरायचे, आणि जर कुठे दूर जायचे असेल तर रिक्षाने जायचे. एका काळी पंतप्रधानांचा विशेष कार्य अधिकारी म्हणून हा माणूस देश चालवत होता असे कोणाला सांगितले तर विश्वास ठेवत नसत.
खांडेकरांसारखेच असे अखेरपर्यंत सायकलने फिरणारे आकाशवाणीचे निवृत्त उपमहानिदेशक मधुकर गायकवाड हे देखील होते. सुरुवातीला गायकवाड आकाशवाणीच्या वृत्त विभागात वृत्त संपादक म्हणून कार्यरत होते. तेव्हा ते सायकलनेच फिरायचे. नंतर ते आकाशवाणीचे केंद्र संचालक झाले. त्यावेळी त्यांच्या दिमतीला एक कार होती. मात्र ते ती कार फक्त शासकीय कामासाठीच वापरायचे. एरवी गायकवाड सायकलनेच फिरायचे. केंद्र संचालक या पदावरून पदोन्नती झाल्यावर ते दिल्लीत उपमहानिदेशक झाले. तिथेही ते अखेरपर्यंत सायकलच चालवत होते.
असेच आणखी एक उदाहरण सांगायचे तर माहिती आणि जनसंपर्क विभागाचे निवृत्त संचालक श्रीपाद सहस्रभोजने यांचे देता येईल. विशेष म्हणजे श्रीपाद सहस्रभोजने हे वसंतराव नाईक, शंकराव चव्हाण, बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले आणि बॅरिस्टर बाबासाहेब भोसले, या चार मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत होते. नंतर ते राज्याचे माहिती संचालक म्हणून पदोन्नत झाले आणि त्याच पदावरून ते निवृत्त झाले. नोकरीत असताना आणि निवृत्तीनंतर देखील ते मुंबईत असेपर्यंत बसने फिरायचे. वर्षभरात ते नागपूरला स्थानांतरित झाले आणि नागपुरात ते सायकलने फिरू लागले. त्यापूर्वी देखील नोकरीत असताना ते सरकारी कामाने नागपूरला आले तर सरकारी कामापुरतीच सरकारी गाडी वापरायचे. खाजगी कामासाठी आपल्या सायकलने कुठेही जायचे असेल तिथे जायचे. निवृत्तीनंतर देखील अनेक वर्ष ते सायकलनेच फिरत होते.
भारतात वर्षानुवर्ष पदावर नसतानाही सरकारी मालमत्ता दाबून बसणारे अनेक माजी उच्चपदस्थ जसे आहेत तसेच वर दिलेल्या उदाहरणांमधील नि:स्वार्थ व्यक्तींसारखे असे सज्जनही अनेक आहेत. ही काही उदाहरणे आम्ही दिली आहेत. अजूनही अनेक सापडतील. नागपूरचे माजी महापौर सरदार अटलबहादुर सिंह हे देखील महापौर असतानाही खाजगी कामासाठी स्वतःच्या स्कूटरने फिरायचे. मुंबईचे महापौर देवळे हे देखील अनेकदा बेस्टच्या बसने तिकीट काढून फिरायचे असे सांगणारे आजही भेटतात. एकूणच जसे पदाचा दुरुपयोग करणाऱ्या आहेत तसेच पद सोडताच सर्व सवलती सोडणारे नि:स्वार्थ भावनेने काम करणारे अनेक लोक भारतात आहेत.
असे नि:स्वार्थ भावनेने काम करणारे अनेक सज्जन आज भारतात आहेत म्हणूनच भारत जागतिक महासत्ता बनवण्याचे स्वप्न बघतो आहे. या सज्जनशक्तीच भारताला जागतिक महाशक्ती बनवतील यात शंका नाही. त्यामुळेच अशा सज्जनशक्तींची आठवण तर ठेवायलाच हवी ना…