घ्या समजून राजे हो….*महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार…?*
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाची तारीख हळूहळू जवळ येते आहे. २० नोव्हेंबरला मतदान झाल्यावर २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहेत.
निकाल लागल्यावर त्या पक्षाला बहुमत मिळेल त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट दिसते आहे. सध्या महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन आघाड्या मैदानात उतरल्या आहेत. सध्या प्रचारात तरी महायुतीचा जोर दिसतो आहे. त्यामुळे महायुतीचे सरकार बनेल असे राजकीय विश्लेषकांचे मत दिसते आहे. परिणामी महायुतीचा मुख्यमंत्री कोण असणार याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
महायुतीने जे जागा वाटप केले त्यात भारतीय जनता पक्षाला लक्षणीय जागा आल्या आहेत २८८ पैकी १४८ जागांवर भाजप लढत आहे. बाकी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे दोन आकड्यात लढत आहेत. त्यामुळे भाजपचेच जास्त आमदार निवडून येणार आणि सहाजिकच भाजपचा मुख्यमंत्री बनणार असे चित्र दिसते आहे. भाजप देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करणार अशी चर्चा सुरुवातीपासून आहे. मात्र राजकारण हा अनिश्चिततेचा खेळ असल्याचे बोलले जाते. त्यामुळे २०२२ मध्ये अचानक एकनाथ शिंदे यांचे नाव जेमतेम ५४ आमदार सोबत असतानाही मुख्यमंत्री बनले होते. नेमका तसाच प्रकार यावेळी होईल की काय असे संकेत मिळत आहेत. देवेंद्र फडणवीस हे जरी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असले तरी भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी नुकत्याच पत्रकारांशी झालेल्या चर्चेत ऐनवेळी मध्य प्रदेश किंवा राजस्थानच्या धरतीवर नवा चेहरा मुख्यमंत्री म्हणून आणला जाऊ शकतो असे संकेत दिले आहेत.
तावडेंच्या या विधानापाठोपाठ फडणवीस आणि आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही आणि आपला आग्रहही नाही असे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. त्यामुळे सहाजिकच महायुतीचा दुसरा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत राजकीय वर्तुळात अंदाज बांधणे सुरू झाले आहे. आज भारतीय जनता पक्षात महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यासह आशिष शेलार, विनोद तावडे, चंद्रकांतदादा पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार हे साधारणतः आघाडीचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्यापैकीच फडणवीसांऐवजी कोणीतरी मुख्यमंत्री बनवला जाणार हे निश्चित आहे.
त्यांच्यापैकी कोणाची शक्यता किती आहे हेच आज आपल्याला बघायचे आहे. तसा विचार करता देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री बनण्यासाठी योग्य नाव आहे असे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे मत आहे. याला कारणेही तशीच आहेत.
फडणवीस हे उच्चविद्याविभूषित आहेत. कायद्याचे अभ्यासक आहेत. त्यांनी विधानसभेत येण्याआधी नागपूरचे महापौरपदही भूषवले आहे. त्याशिवाय विधानसभेत त्यांनी एक साधा आमदार ते मुख्यमंत्री अशी वाटचाल यशस्वीरित्या केली आहे. त्यात सर्वोत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कारही त्यांनी मिळवला आहे. महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस आणि प्रदेशाध्यक्ष या पदावरही त्यांनी यशस्वीरित्या कामकाज पार पाडले आहे. त्यांच्या नेतृत्वात २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीतही भाजपला घवघवीत यश मिळवून दिले आहे.
त्यांच्याच नेतृत्वाखाली पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात शपथ घेता झाला आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द ही अतिशय यशस्वी राहिली आहे. त्यांनी आणलेले विविध प्रकल्प हे चांगलेच गाजलेले आहेत. समृद्धी महामार्ग जलशिवार योजना असे विविध प्रकल्प त्यांच्या खात्यावर आहेत. विशेष म्हणजे त्यांचे स्वच्छ चारित्र्य हे नमूद करण्याजोगे राहिले आहे.
पाच वर्ष मुख्यमंत्री राहूनही कोणताही भ्रष्टाचाराचा डाग त्यांच्या नावे नाही. मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षा काम केल्यावर फासे फिरले म्हणून अडीच वर्ष त्यांनी विरोधी पक्ष नेता म्हणूनही यशस्वी कारकीर्द पार पाडली आहे. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणण्याचा चमत्कारही घडवून आणला आहे.
त्यावेळी कमी जागा असलेल्या शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवून मनाचा मोठेपणाही दाखवून दिला आहे. त्याचबरोबर त्यांच्या हाताखाली व मुख्यमंत्री पदही त्यांनी विनातक्रार स्वीकारले आहे. हे सर्व मुद्दे लक्षात घेता मुख्यमंत्रीपदाचे पहिले दावेदार म्हणून त्यांचेच नाव घेतले जाते आहे. असे असले तरी त्यांचे काही नकारार्थी मुद्दे ही आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांची जात ही त्यांना आडवी येते आहे. विशेषतः महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसींचे राजकारण चालते. त्यात फडणवीस हे नाव चालत नाही असे बोलले जाते. महाराष्ट्राच्या राजकारणावर केली पन्नास वर्षाहून अधिक काळ शरद पवारांचा प्रभाव राहिला आहे.
या शरद पवारांचे आणि फडणवीस यांचे कधीही पटलेले नाही. शरद पवारांना धोबीपछाड देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले आहे.त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले तर पवार त्यांच्या दैनंदिन कामकाजात अडथळे आणणार हे निश्चित आहे. इतरही काही मुद्दे फडणवीस यांच्या विरोधात जात आहेत. अशावेळी भाजपने जर राजस्थान किंवा मध्यप्रदेशच्या धरतीवर नवे नाव पुढे आणले तर नवल वाटू नये. भाजपमध्ये नवीन नावे जर घ्यायची झाली तर जुने भाजपवाले असलेले विनोद तावडे, आशिष शेलार, चंद्रकांत दादा पाटील, पंकजा मुंडे, गिरिष महाजन आणि सुधीर मुनगंटीवार यांची नावे प्रामुख्याने घेतली जातात. यात आशिष शेलार हे मुंबईचे आहेत. मुंबईत त्यांचा चांगला वट आहे. त्यामुळे त्यांचे नाव पहिल्या क्रमांकावर घेतले जाते. त्यांनी संघटनात्मक व्यवस्थापनावर चांगलीच पकड जमवली आहे. आज मुंबई शहर भाजपाचे ते अध्यक्ष आहेत. विधानसभेतही त्यांनी आपले कर्तृत्व दाखवून दिलेले आहे. दुसरे म्हणजे ते मराठा समाजाचे आहेत.
त्यामुळे त्यांचे नाव प्राथम्यक्रमाने घेतले जाते. विनोद तावडे हे देखील एक नाव घेतले जाते. तावडे हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. विद्यार्थी परिषदेतून पुढे आलेले संघ स्वयंसेवक म्हणून तावडे यांची ओळख आहे. ते काही काळ विधान परिषदेत कार्यरत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते म्हणूनही त्यांनी कारकीर्द गाजवली. तावडे मूळचे कोकणातले असल्यामुळे कोकणला प्रतिनिधित्व दिल्याचेही दिसून येते. त्याशिवाय ब्राह्मणेतर उच्च विद्याविभूषित सुशिक्षित चेहरा म्हणूनही त्यांची ओळख आहे. २०१४ ते २०१९ या कालखंडात ते शालेय शिक्षण आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होते. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांना उमेदवारी मिळाली नाही. मात्र शांत राहून ते पक्ष कार्य करीत राहिले. नंतर त्यांना पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत नेले आणि पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री बनवले. आज ते देशाचा कारभार चालवत आहेत. मधल्या काळात काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये यशस्वी कामगिरी केल्याचे श्रेय त्यांच्या गाठीला जमा आहे. असे असले तरी अतिरेकी फटकळ नेता म्हणून ते ओळखले जातात त्यामुळे त्यांनी मित्रां इतकेच शत्रूही जमवून ठेवले आहेत हे इथे नमूद करणे गरजेचे वाटते.मूळचे कोल्हापूरचे असलेले चंद्रकांतदादा पाटील हे संघाचे स्वयंसेवक असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भाजपमध्ये पुढे आलेले आहेत. आधी पुणे पदवीधर मतदार संघातून आमदार म्हणून विधान परिषदेत निवडून आलेले चंद्रकांतदादा नंतर पुण्यातून विधानसभेत निवडून आलेले आहेत
२०१४ ते २०१९ या काळात ते महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत राहिलेले आहेत. त्याशिवाय याच काळात ते भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षही राहिलेले आहेत. अभ्यासू कर्मठ नेता म्हणून ते ओळखले गेलेले असले तरी मवाळ नेते म्हणून ते ओळखले जातात. गिरीश महाजन हे जामनेर मधून गेली जवळजवळ पंचवीस वर्ष आमदार म्हणून निवडून येत आहेत. एक अभ्यासू आणि आक्रमक आमदार म्हणून ते ओळखले जात आहेत. जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे या भाजप नेत्याचे आणि महाजन यांचे असलेले कट्टर वैर हे उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी मंत्रिपद भूषवले आहे. सध्या देखील ते मंत्रिमंडळ म्हणून शिंदे मंत्रिमंडळात कार्यरत आहेतच. सुधीर मुनगंटीवार हे देखील एक वैदर्भीय नाव मुख्यमंत्री म्हणून पुढे येऊ शकते. मुनगंटीवार हे १९९५ पासून विधानसभेत सदस्य आहेत. एक आक्रमक अभ्यासू सदस्य म्हणून ते ओळखले जातात.
पक्ष स्तरावर प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी यशस्वीरित्या काम पार पाडले आहे. १९९८-९९ या काळात ते मंत्री होते. त्यानंतर २०१४ ते २०१९ या काळात राज्याचे अर्थमंत्री म्हणूनही त्यांनी चांगली कामगिरी पार पाडली. २०२२ पासून ते पुन्हा वनमंत्री म्हणून कार्यरत आहेतच. फडणवीसां ऐवजी वैदर्भिय चेहरा म्हणून त्यांचे नाव घेतले जाऊ शकते. तसे झाले तर पुन्हा एकदा विदर्भाला संधी मिळाली असे म्हणता येईल.पंकजा मुंडे या भाजपाला ऊर्जितावस्था आणणारे आक्रमक नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. २००९ पासून त्या विधानसभेत सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तर २०१४ ते २०१९ या कालखंडात त्या मंत्री देखील होत्या. २०१९मध्ये त्या त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या .२०२४ मध्ये त्या बीड मतदार संघातून लोकसभेसाठी उभे होत्या. मात्र तिथेही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
नंतर त्या विधान परिषदेत सदस्य म्हणून निवडल्या गेल्या आहेत. त्यांना संधी दिली तर महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री दिल्याची संधी भाजपाला मिळेल त्याचबरोबर स्वर्गीय प्रमोद महाजन आणि गोपीनाथजी मुंडे यांना खरीखुरी श्रद्धांजली वाहिल्याचे श्रेय मिळेल.भारतीय जनता पक्षातील ही प्रमुख नावे या ठिकाणी नमूद केली आहेत आणि त्यांचा लेखाजोखा ही मांडला आहे. याशिवाय भाजपमधून अजून एखादे नवीन नाव अचानक समोर आले तर आश्चर्य वाटायला नको. सध्या काँग्रेस मधून भाजपमध्ये डेप्युटेशनवर आलेले अशोक चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ही नावे देखील पुढे येऊ शकतात. मात्र त्यांना संधी कमी आहे. महायुतीत भारतीय जनता पक्ष हा काही एकटाच पक्ष नाही,
तर विद्यमान मुख्यमंत्री नेते असलेला शिवसेना हा देखील एक पक्ष त्यांच्यासोबत आहे. एकनाथ शिंदे हे सध्या मुख्यमंत्री आहेतच. मात्र त्यांनी लढवलेल्या जागा आणि त्यातील निवडून येण्याची शक्यता असलेल्या जागा बघता त्यांना संधी कमी आहे. मात्र असे असले तरी सध्या राज्यात सुरू असलेले मराठ्यांचे आंदोलन लक्षात घेता मराठा चेहरा म्हणून त्यांना पुढे केले जाऊ शकेल ही शक्यता नाकारता येत नाही. मात्र अमित शहा यांना फडणवीस मुख्यमंत्री हवेत असे बोलले जाते. त्यामुळे २०२२ मध्ये वेगळ्या परिस्थितीत शिंदेंना मुख्यमंत्री केले. मात्र यावेळी करतीलच असे नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे देखील महायुतीतील तिसऱ्या घटक पक्षाचे नेते आहेत. ते देखील एक दावेदार आहेत. मात्र नुकतीच त्यांनी बटेंगे तो कटेंगे याबाबतीत घेतलेली भूमिका लक्षात घेता ते मोदी शहांच्या हिटलिस्टवरच राहतील ही शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या कोणी नवे दावेदार असण्याची शक्यता सध्या तरी नाही. वरील सर्व लेखाजोखा बघता विनोद तावडे यांचे भाकीत खरे ठरवायचे झाले तर भाजपमधील फडणवीस वगळता उर्वरित नावांपैकीच कोणीतरी एक मुख्यमंत्री होणार हे चित्र आज तरी दिसते आहे. फडणवीस यांनी मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नाही. पक्ष देईल ते काम करायचे हेच माझे धोरण आहे असे जाहीर करून टाकले आहे. असे असले तरी मुख्यमंत्री होण्याची त्यांची इच्छा लपलेली नाही. जर संधी मिळाली तर ते मुख्यमंत्री होतीलच .
अमितभाई शहा यांनी तसे संकेतही दिले आहेत. मात्र ते झाले नाहीच तर उर्वरित नावांपैकी कोणीतरी एक मुख्यमंत्री होईल हे नक्की. अर्थात राजकारण हा अनिश्चिततेचा खेळच आहे. त्यामुळे काय होईल हे आज सांगणे कठीण आहे. ते बघता आपण सर्वांनीच या महिनाअखेरपर्यंत वाट बघणे इतकेच आपल्या हातात आहे. वाचक हो पटतेय का हे तुम्हाला…..? त्यासाठी आधी समजून तर घ्या राजे हो..आणि हो……. येत्या २० नोव्हेंबरला आपण सर्वजण अवश्य मतदान करा. ते आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. ते न चुकता पार पाडा…