डिपॉझिट इन्शुरन्स कंपनीला हवा कर्नाळा बँक ठेवींचा हफ्ता !!
ठेवीदार, बँक अवसायकांपुढे नवे आव्हान !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईनवेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
पनवेल – रायगड जिल्हा: रिझर्व्ह बँकेकडून कर्नाळा बँकेचा व्यावसायिक परवाना रद्द करण्यात आल्यानंतर ठेवी परत मिळण्याची अपेक्षा वाटत असतानाच डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गरंटी कंपनीने मध्येच डोकं वर काढून सप्टेंबरपर्यंत इन्शुरन्सचा हफ्ता भरण्याची अट घातल्याने बँक अवसायनक आणि ठेवीदारांची नव्याने डोकेदुखी वाढली आहे.
कर्नाळा नागरी सहकारी बँकेत शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार विवेकानंद पाटील यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने 543 कोटीचे उखळ पांढरे करून भ्रष्ट्राचाराचा डोंगर उभा केला. त्यामुळे डबघाईस गेलेल्या बँकेच्या ठेवीदारांना गेल्या दोन वर्षात मानसिक त्रास सहन करून उसनवारीवर जीवन जगावे लागत आहे.
शेजारच्या तालुक्यातील पेण अर्बन बँकेत अकरा वर्षापूर्वी झालेल्या बँक घोटाळ्याप्रमाणेच कर्नाळा नागरी बँकेचा घोटाळा रेंगाळत राहण्याची चिन्ह आणि राजकारण सुरू असताना पनवेल संघर्ष समितीने ठेवीदारांसाठी छातीचा कोट करून राज्य व केंद्र शासनाला जागे करून बँकेचे चेअरमन विवेकानंद पाटील यांना ईडीला अटक करण्यास भाग पाडले. त्याशिवाय सीआयडीने काही संचालकांची वाहने जप्त करण्याची कारवाई केली. गेल्या सहा-सात महिन्यात संघर्ष समितीने ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळविण्यासाठी केलेल्या लढ्याला यश मिळते असे दिसू लागल्याने राजकारणही तापू लागले. श्रेयवादाची लढाईसुद्धा बघायला मिळत आहे.
एप्रिलमध्ये बँकेत पैसे शिल्लक नसताना पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी सहकार खात्याकडे तगादा लावला. प्रधान सचिव अरविंद कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे यांची प्रत्यक्ष भेट घेवून बँक वसुलीचे आदेश काढून अंमलबजावणी करून घेत बँकेचा 38 लाखापेक्षा जास्त रकमेचा हफ्ता भरून ठेवी सुरक्षित केल्या होत्या. त्यानंतर पुलाखालून खूप पाणी वाहून गेले आहे. आता ठेवीदारांना इन्शुरन्सचे पैसे मिळणार, अशी अपेक्षा वाटत असताना डिपॉझिट इन्शुरन्स कंपनीने पुन्हा कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या नाड्या आवळल्या आहेत. त्यांनी सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व ठेवींच्या हफ्त्याची रक्कम भरावी असे आदेश काढल्याने नवा पेच निर्माण झाला आहे.
आधीच कर्नाळा बँक ठेवीदारांना खूप जाच सहन करावा लागला आहे. त्यात हे नवे शुक्लकाष्ठ सुरू झाल्याने ठेवीदार, बँक अवसायनकांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. बँकेत तूर्तास इतकी मोठी रक्कम शिल्लक नसल्याने आता हफ्याची रक्कम द्यायची कुठून ही चिंता सतावत आहे.