आयुष्यातले सांगाती १
भावी पंतप्रधानांसोबतचा हेलिकॉप्टर प्रवास….
ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
माझ्या आठवणीनुसार १९८५ च्या एप्रिल
महिन्यातली ही घटना आहे. त्या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास माझ्या स्टुडिओ कम कार्यालयातील फोन खणखणला. फोन उचलून मी प्रतिसाद देताच समोरून आवाज आला “अविनाश मी दिल्लीहून राम खांडेकर बोलतो आहे. परवा सकाळी दहा वाजता अमरावती जिल्ह्यात वरूडला नरसिंहराव साहेबांचा कार्यक्रम आहे. तो तुला दूरदर्शनसाठी कव्हर करायचा आहे. मी मुंबई दूरदर्शनच्या संचालकांशी याबाबत बोललेलो आहे. तेव्हा तू तयारीत रहा.”
“सकाळी दहाचा कार्यक्रम म्हणजे वरुड ला जायला सकाळी सातलाच निघावे लागेल. गाडीची व्यवस्था केली आहे ना?” असा प्रश्न मी रामभाऊ खांडेकरांना विचारताच ते लगेच उत्तरले, “नाही, तुला गाडीने नाही तर आमच्याबरोबर हेलिकॉप्टरनेच यायचे आहे. सकाळी सव्वा नऊला नागपूर एअरपोर्ट वरून हेलिकॉप्टर टेक ऑफ घेईल. तू साडेआठला घरी तयार रहा. तुला पिकप करायची व्यवस्था करतो” रामभाऊंचे हे उत्तर ऐकून मी अक्षरशः उडालोच. कारण आयुष्यातला पहिला हवाई प्रवास, आणि तोही पी व्ही नरसिंहराव यांच्यासारख्या केंद्रीय मंत्र्यांसोबत, ही माझ्यासाठी धक्कादायकच बाबत होती.
पी व्ही नरसिंहराव हे १९८० पासून राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झालेले काँग्रेस नेते होते. त्यापूर्वी ते आंध्र प्रदेशातील तेलंगणा परिसरातील नेते म्हणून ओळखले जात होते. १९८० पूर्वी ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री देखील होते. १९८० मध्ये इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात ते केंद्रात मंत्री म्हणून आले. दरम्यानच्या काळात ते इंदिराजींचे विश्वासू मंत्री म्हणून ओळखले जाऊ लागले.
ऑक्टोबर १९८४ मध्ये इंदिराजींची हत्या झाली. त्यांचे सुपुत्र राजीव गांधी हे देशाचे पंतप्रधान झाले. नरसिंहराव त्यांच्याही मंत्रिमंडळात होतेच. लगेच डिसेंबर १९८४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी आंध्रात तेलगू देसम पार्टीचा जोर होता. त्यामुळे राजीव गांधींनी धोका नको म्हणून नरसिंहराव यांना त्यांच्या परंपरागत मतदारसंघासह नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक लोकसभा क्षेत्रातूनही निवडणूक लढवायला लावले. रामटेक हा त्यावेळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. साहजिकच नरसिंहराव आंध्रातील आपल्या परंपरागत मतदार संघात पराभूत झाले. मात्र रामटेकमधून दणदणीत मताधिक्क्याने विजयी झाले. इंदिराजींचे विश्वासू असल्याने राजीवजी देखील त्यांच्यावर विसंबून होते. म्हणूनच राजीव गांधींच्या नव्या मंत्रिमंडळात त्यांना संरक्षण मंत्री म्हणून पद मिळाले होते. राम खांडेकर हे त्याआधी केंद्रीय मंत्री वसंतराव साठे यांचे अतिरिक्त खाजगी सचिव होते. मात्र नरसिंहराव यांना त्यांचा मतदार संघ नागपूर जिल्ह्यातला असल्यामुळे नागपूर जिल्ह्याची माहिती असणारा मराठी माणूस खाजगी सचिव म्हणून हवा होता. मग राम खांडेकर हे नरसिंहराव यांचे अतिरिक्त खाजगी सचिव म्हणून नियुक्त झाले होते. वसंतराव साठेंकडे आधी माहिती आणि प्रसारण खातेच होते. दूरदर्शनचा छायाचित्रकार या नात्याने खांडेकरांचा माझा चांगला संबंध आला होता. त्यांचे माझ्यावर विशेष प्रेम देखील होते. त्यामुळेच मंत्री कोणीही असो ते मला हक्काने कव्हरेज करायला बोलवायचे.
तसेच त्यांनी वरुडला असलेल्या सूतगिरणीच्या भूमिपूजन समारंभासाठी मला हक्काने कव्हरेजसाठी यायला सांगितले होते. ते मुंबई दूरदर्शनच्या संचालकांशी आधीच बोलले होते. त्यामुळे मला दूरदर्शन कडून आहे तसा फोन आला, आणि नरसिंहरावांसोबत वरुडला जायचे माझे निश्चित झाले.
नरसिंहराव रामटेकून विजयी झाल्यावर लगेचच केंद्रात संरक्षण मंत्री झाले. त्यानंतर त्यांची दोन-तीनदा नागपुरात चक्कर झाली होती. दरवेळी त्यांच्या कार्यक्रमांचे चित्रीकरण करायला मी जात असे. मात्र तिथे सुरक्षित अंतरावरूनच चित्रीकरण करावे लागत असे. समोरासमोर भेटून प्रत्यक्ष बोलण्याचा कधीच प्रसंग आला नव्हता.
ठरल्याप्रमाणे कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी साडेआठच्या सुमारास माझ्याकडे गाडी आली. मी माझ्या कॅमेऱ्याची बॅग खांद्यावर लटकवून तयारच होतो. त्या गाडीने मी नागपूरच्या रवी भवन शासकीय विश्रामगृहात पोहोचलो. तिथे रामभाऊ खांडेकर तयारच होते. मी आणि रामभाऊ विमानतळाकडे निघालो.
विमानतळावर आम्ही पोहोचलो तेव्हा तिथे नागपूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष रणजीत देशमुख, विदर्भ विकास मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष किशोर काशीकर, आणि विधान परिषद सदस्य राजे तेजसिंगराव भोसले हे हेलिकॉप्टरजवळच उभे होते. आम्ही पोहोचताच त्यांनी खांडेकरांचे स्वागत केले. तितक्यात विमानतळावरील संबंधित अधिकारी काही कागदपत्रे घेऊन खांडेकरांकडे आले आणि त्यांनी त्या कागदपत्रांवर आम्हा सर्वांची नावे लिहून कागदपत्रे भरून दिली.
एव्हाना सकाळचे सव्वा नऊ वाजत होते. अचानक सायरन वाजवत पोलिसांची पायलट कार आली. पाठोपाठ आलेल्या डी व्ही कारमधून नरसिंहराव साहेब उतरले. मध्यम उंची, मध्यम बांधा, पांढरे शुभ्र धोतर, पांढरा शुभ्र कुर्ता आणि खांद्यावर पांघरलेले जर तरी उपरणे, अशा वेशात उतरलेल्या नरसिंहरावांच्या चेहऱ्यावरचे कर्तृत्वाचे तेज लगेचच लक्षात येत होते.उतरताच त्यांनी चौकशी केली “काय खांडेकर सर्व मंडळी आलीत ना.” “होय साहेब.” खांडेकरांनी उत्तर देताच लगेच, “चला मग” असे म्हणत नरसिंहराव झपाट्याने चालत हेलिकॉप्टरकडे गेले. पाठोपाठ आम्हीही सर्व हेलिकॉप्टरमध्ये शिरलो.
ते भारतीय वायुदलाचे हेलिकॉप्टर होते. त्यात माझ्या आठवणीनुसार सात किंवा आठ प्रवासी बसण्याची सोय होती. पहिल्याच सीटवर नरसिंहराव बसले. त्यांच्या बाजूच्याच खुर्चीवर रामभाऊ खांडेकर बसले. मागच्या एका खुर्चीवर मी बसलो होतो. आजूबाजूलाच किशोर काशीक,र रणजित देशमुख आणि तेजसिंगराव देखील बसले होते.
हेलिकॉप्टरने टेक ऑफ घेत हवेत भरारी घेतली त्यावेळी रामभाऊ नरसिंहराव साहेबांशी काही बोलत होते. अवघ्या पाच मिनिटातच रामभाऊ तिथून उठले आणि मागेच बसलेल्या मला समोर बोलावले. लगेच त्यांनी ओळख करून दिली. “साहेब हा अविनाश पाठक दूरदर्शनचा नागपूरचा छायाचित्रकार आहे” इतक्या मोठ्या माणसाशी बोलायचे बघूनच मला घाम फुटला होता. मी घाबरतच त्यांना नमस्कार केला. मात्र नरसिंहराव साहेब आश्वासक नजरेने बघत मला म्हणाले,” नमस्कार पाठक, या बसा”. त्यांच्या बाजूला बसायचे या कल्पनेनेच मी घाबरलो. मात्र रामभाऊंनी मला बळजबरीने त्यांच्या बाजूला बसवले. मी गुपचूप त्यांच्या बाजूला बसलो होतो. मग नरसिंहराव साहेबांनीच माझ्याशी बोलायला सुरुवात केली. “काय पाठक तुम्ही नागपूरचेच का? मग घरी कोण कोण असते? असे कौटुंबिक प्रश्न विचारत त्यांनी माझी भीती कमी केली, आणि हळूहळू गप्पा मारायला सुरुवात केली. साहेबांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपुरातच झालेले होते. त्यामुळे मराठीवर त्यांचे चांगलेच प्रभुत्व होते. मग हळूहळू माझी भीड चेपत गप्पांना रंग भरू लागला.
अवघ्या ३० मिनिटात हेलिकॉप्टर वरुडला पोहोचले होते. वरुडला हेलिकॉप्टर लँड होताच दरवाजा उघडला, आणि आम्ही सर्वच खाली आलो. गाड्या तयारच होत्या. गाड्यांमध्ये बसून आम्ही कार्यक्रमस्थळी गेलो. तिथे अंदाजे दोन तासांचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम होता. ग्रामीण भागातल्या पद्धतीनुसार तिथे पंगती होत्या. पहिल्याच पंक्तीत सर्व मान्यवर बसले. मी एका बाजूला उभा होतो. नरसिंहराव साहेबांनी अचानक चौकशी केली “खांडेकर बसले का?” एव्हाना रामभाऊ तिथे पोहोचलेच होते.” हो बसतो साहेब.” असे त्यांनी सांगताच लगेच “आणि आपले ते दूरदर्शन वाले पाठक बसलेत की नाही?” असा प्रश्न विचारत नरसिंहराव साहेबांनी माझी चौकशी केली. त्यावेळी नरसिंहराव राजीव गांधी मंत्रिमंडळातील क्रमांक २ चे मंत्री म्हणून ओळखले जात होते. इतक्या मोठ्या माणसाने माझी आठवण ठेवावी ही बाब मला भारावून टाकणारीच होती.
भोजन आटोपून आम्ही सर्व पुन्हा हेलिपॅडकडे गेलो आणि हेलिकॉप्टर मध्ये बसून नागपूरकडे निघालो. परतीच्या प्रवासातही नरसिंहराव साहेबांनी मला शेजारीच बसवून घेतले होते. “तरुण मंडळी सोबत असली की बरे वाटते” असे सांगून त्यांनी मला बसण्याचा आग्रह केला होता. ( तेव्हा मी जेमतेम तिशीतला तरुणच होतो ना) परतीच्या अर्ध्या तासातहीआमच्या चांगल्या गप्पा झाल्या.
नंतरच्या पाच वर्षात नरसिंहराव साहेब नागपुरात अनेकदा येत होते. या काळात त्यांच्या कार्यक्रमांचे चित्रीकरण करायला जाण्याचाही बरेचदा योग आला. दरवेळी कितीही गडबडीत असले तरी मी समोर दिसल्यावर ते किमान ओळखीचे स्मितहास्य तरी द्यायचे. शक्य झाले तर चार शब्द बोलून चौकशी देखील करायचे.
१९८९ मध्ये देशात झालेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये केंद्रात काँग्रेसची सत्ता गेली. त्यामुळे नरसिंहराव साहेब विरोधी पक्षातील एक खासदार म्हणूनच राहिले होते. अवघ्या दीड वर्षातच देशात पुन्हा निवडणुकांची वेळ आली. १९९१ साली झालेल्या या निवडणुकीत नरसिंहराव रामटेकमधून निवडणुकीला उभे राहिले नव्हते. ते फक्त देशात प्रचारासाठी फिरत होते. आता नरसिंहराव साहेब राजकारणात सक्रिय राहणार नाहीत, असे बोलले जात होते. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
निवडणूक प्रचार जोरात आला असतानाच २१ मे १९९१ रोजी रात्री दक्षिणेत निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस नेते राजीव गांधींची हत्या झाली. या घटनेने देशाचे पूर्ण राजकारणास बदलून गेले. निवडणुकीतील अर्ध्या मतदारसंघातील मतदान आटोपले होते. उर्वरित मतदान १५ दिवस पुढे ढकलले गेले.
मतदान आटोपले. मतमोजणी झाली आणि निकाल जाहीर झाले. काँग्रेस पक्ष हा संसदेतील सर्वात मोठा पक्ष असला तरी त्यांना स्पष्ट बहुमत नव्हते. त्याचवेळी एका बाजूने भारतीय जनता पक्ष आणि एका बाजूने जनता दल हे दोन्ही पक्ष लक्षणीय संख्येत खासदार घेऊन उभे होते. अशावेळी विरोधकांचे सरकार येणे तर शक्य नव्हते. पण काँग्रेसमध्ये सुद्धा सरकार व्यवस्थित सांभाळू शकेल असा नेता कोण यावर खल सुरू झाला होता. त्यावेळी अचानक नरसिंहरावंचे नाव समोर आले. त्याच दरम्यान अर्जुन सिंह, शरद पवार ही नावे देखील पुढे आली होती. नंतर अर्जुन सिंहांचे नाव बाजूला पडले. मात्र शरद पवार आणि नरसिंहराव यांच्यात कोणी पंतप्रधान व्हायचे यावर वाद सुरू झाला. शेवटी काँग्रेस खासदारांमध्ये मतदान झाले आणि नरसिंहराव यांच्या बाजूने काँग्रेस खासदारांनी कौल दिला. सहाजिकच नरसिंहराव देशाचे नववे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार हे निश्चित झाले.
पंतप्रधान म्हणून नरसिंहरावने शपथ तर घेतली. मात्र अल्पमतातील सरकार सांभाळायचे आणि चालवायचे हे एक दिव्य होते. त्यात राममंदिरासारखा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा होताच. मात्र त्यांनी पाच वर्ष हे सरकार शांतपणे आणि समर्थपणे सांभाळले. सर्व समस्यांना तोंड दिले आणि या काळात आर्थिक उदारीकरणासारखे सारखे कार्यक्रम देखील त्यांनी राबवले.
देशाचा पंतप्रधान म्हणजे एक काटेरी मुकुट असतो. त्यावेळी सर्व काही सांभाळायचे हे एक दिव्य असते. मात्र त्या परिस्थितीतही नरसिंहराव साहेब माझ्यासारख्या अनेकांची ओळख ठेवून होते. एकदा रामभाऊंना भेटायला त्यांच्या साऊथ ब्लॉक मधील पंतप्रधान कार्यालयात मी गेलो असताना अचानक मी आणि रामभाऊ बोलत असतानाच बाहेरच्या लॉबीत नरसिंहराव साहेब आले. मला बघताच त्यांनी “काय पाठक कधी आलात दिल्लीत?” अशी चौकशी केली.
१९९६ मध्ये त्यांचे पंतप्रधान पद गेले. त्यानंतर त्यांच्या मागे झारखंड मुक्ती मोर्चा सोबत झालेल्या कथित गैरप्रकाराचे शुक्लकाष्टेही लागले. तिथून ते काहीसे खाचले होते. दरम्यान सोनिया गांधींच्या हातात राजकारणाची सूत्रे गेली. तेव्हापासून ते राजकारणापासून दूरच होते. दिल्लीत मिळालेल्या बंगल्यात ते एकटेच राहायचे. सोबत त्यांना माजी पंतप्रधान म्हणून काही कार्यालयीन स्टाफ मिळत असे. अखेरपर्यंत रामभाऊ खांडेकर त्यांचे खाजगी सचिव म्हणून कार्यरत होते. मला आठवते २००३ मध्ये मी काही कामाने दिल्लीत गेलो असताना रामभाऊंना भेटायला नरसिंहरावांच्या मोतीलाल नेहरू मार्गावरील बंगल्यात गेलो होतो. तिथे रामभाऊंनी पाच मिनिटे माझी नरसिंहराव साहेबांची भेट करून दिली होती. त्यावेळी ते खूप थकलेले दिसले. मात्र मी भेटल्यावर त्यांनी आपुलकीने चौकशी केली. यानंतर काही त्यांच्या भेटीचा योग आला नाही. नंतर २००५ मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मग रामभाऊ खांडेकरांनी देखील दिल्लीतला गाशा गुंडाळला आणि ते सपने सपत्नीक नागपुरात स्थायिक झाले.
१९८५ मध्ये नरसिंहराव हे देशाचे संरक्षण मंत्री होते तरीही ते पंतप्रधानानंतर दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री म्हणूनच ओळखले जात होते. त्यावेळी नेहरू गांधी घराण्यातील व्यक्ती वगळता इतर कोणी पंतप्रधान होईल अशी शक्यता नव्हती. मात्र त्यांच्याशिवाय कोणी झालेच तर नरसिंहराव साहेब होतील असे खाजगीत बोलले जात होते. त्यावेळी ती शक्यता धूसर होती. मात्र योगायोगाने ती शक्यता १९९१ मध्ये वास्तवात आली. १९८५ मध्ये त्यांच्यासोबत केलेला माझा पहिला हवाई प्रवास होता, तसाच पहिला हेलिकॉप्टर प्रवास देखील होता. नंतरच्या काळात विमानाने प्रवास करण्याची संधी अनेकदा मिळाली. मात्र गेल्यास पाच दशकांच्या सक्रिय आयुष्यात हेलिकॉप्टर प्रवासाची संधी पुन्हा कधीच मिळाली नाही. देशाच्या भावी पंतप्रधानांबरोबर केलेला हा माझा पहिला आणि आज तरी शेवटचाच हेलिकॉप्टर प्रवास कायम स्मरणात राहिला आहे.


