• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आयुष्यातले सांगाती ३…विद्याधर (अण्णा) गोखले….ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
May 30, 2025
in Uncategorized
0
आयुष्यातले सांगाती …..भावी पंतप्रधानांसोबतचा हेलिकॉप्टर प्रवास..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

आयुष्यातले सांगाती ३

विद्याधर (अण्णा) गोखले

ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

विद्याधर गोखले हे नाव शालेय जीवनापासूनच कानावर पडत होते. शाळेत असताना संगीत नाटकांचा किंवा राजकीय पत्रकारितेचा विषय निघाला की मराठी शिकवणाऱ्या परांडे मॅडम किंवा पाठक सर यांच्या बोलण्यात हमखास विद्याधर गोखलेंचा उल्लेख यायचा. पुढे महाविद्यालयीन जीवनात देखील कधीमधी हा उल्लेख कानावर पडत असे. नंतर व्यवसायात आल्यावर तर वृत्तपत्रांच्या माध्यमातून अनेकदा हे नाव वाचण्यात येत होते. मात्र त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग १९८१ साली आला.

झाले असे की नागपूरच्या विद्यापीठ दीक्षांत सभागृहात संत गुलाबराव महाराजांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचा सांगता समारंभ होता. त्या कार्यक्रमाचे मुंबई दूरदर्शन साठी वृत्तचित्रण करण्यासाठी मी गेलो होतो. तिथे प्रमुख अतिथी म्हणून विद्याधर गोखले आले होते तिथे त्यांचे थोडे विनोदी शैलीतलै अभ्यासपूर्ण भाषण मी पहिल्यांदा ऐकले. कार्यक्रम संपल्यावर आयोजकांनी त्यांची माझी ओळख देखील करून दिली. त्यांचा तो आश्वासक स्मितहास्य असलेला चेहरा माझ्या चांगलाच लक्षात राहिला.

त्यानंतर दोन-तीनदा मुंबईत दूरदर्शन केंद्रात त्यांची माझी भेट झाली होती. अर्थात ती भेट देखील ओझरतीच होती.

१९८३ मध्ये माझे एक स्नेही डॉ. विनय वाईकर यांनी आईना ए गझल हा आगळावेगळा उर्दू इंग्रजी हिंदी मराठी गझल शब्दकोश तयार केला होता. त्या निमित्ताने विद्याधर गोखले यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात एक खास कार्यक्रम आयोजित केला होता. वाईकरांच्या आग्रहांमुळे मी त्या कार्यक्रमासाठी मुंबईत त्यांच्यासोबत गेलो होतो. कार्यक्रमात विद्याधर गोखले यांचे दणदणीत भाषण झाले इतरही मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रम संपल्यावर त्या रात्री वाईकरांचेच एक नातेवाईक असलेल्या कुटुंबाच्या मलबार हिल येथील निवासस्थानी काही मान्यवरांचे स्नेहभोजन आयोजितय केले होते. तिथे विद्याधर गोखलेदेखील आले होते. त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत गप्पांची मैफिल रंगली. अर्थात मैफिलीचे बादशहा विद्याधर गोखलेच होते. त्यांचे टोपण नाव अण्णा आहे हे मला त्यादिवशी प्रथमच कळले. त्या दिवशीच त्यांचा माझा चांगला परिचय झाला.

तेव्हापासून त्यांचा माझा अधून मधून संपर्क येतच होता. १९८४ च्या जानेवारीअखेर अण्णा दैनिक लोकसत्ताचे मुख्य संपादक म्हणून निवृत्त झाले. वयाची साठी पूर्ण झाली म्हणून मुंबईत साहित्य वर्तुळात त्यांचा भव्य सत्कार सोहळा झाला होता. नंतर लगेचच मार्च महिन्यात नागपुरात वाईकरांच्याच पुढाकाराने विदर्भ साहित्य संघ आणि इतर साहित्यिक संघटनांनी मिळून त्यांचा सत्कार समारोह आयोजित केला होता. त्यासाठी अण्णा एक दिवस आधीच नागपुरात येऊन पोहोचले होते. त्यांचा मुक्काम डॉ. वाईकरांकडेच होता. आदल्या रात्री काही निवडक मंडळींचे स्नेहभोजन आयोजित केले होते. त्या दिवशीही रात्री एक वाजेपर्यंत गप्पांची मैफिल रंगली. तिथेही सूत्रधार अण्णाच होते. त्यांनी राजकारण आणि नाट्य तसेच साहित्य वर्तुळातील इतके विविध किस्से ऐकवले की, त्या दिवशीच त्यांचे बोलणे आपण रेकॉर्ड का करून ठेवले नाही असे आम्हा प्रत्येकाला वाटत होते.

दुसऱ्या दिवशी झालेल्या सत्कार समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य राम शेवाळकर होते. त्यांच्या साहित्यप्रचुर भाषणानंतर अण्णांचे अविस्मरणीय असे भाषण झाले होते. नागपूरच्या धनवटे रंगमंदिरात झालेल्या या सत्कार समारंभात आलेल्या प्रत्येकाला अण्णांचे भाषण संपूच नये असे वाटत होते इतके ते मर्मविनोदी आणि साहित्यप्रचुर भाषण होते.

दुपारच्या स्नेहभोजनानंतर पुन्हा काही काळ आमच्या गप्पा रंगल्या. त्यावेळी अण्णांचा अस्सल वऱ्हाडी खाक्या त्यांच्या शब्दाशब्दातून जाणवत होता. त्यांना नागपूर रेल्वे स्टेशनवर सोडायला गेलो, तेव्हा आता मुंबईला आला की फोन करत जा, आणि जमल्यास भेटतही जा असे त्यांनी सुचवले. त्यावेळी ते दादरजवळ तुळशी पाईप लाईन पाशी राहत होते. एकदा त्यांच्या त्या घरी गेल्याचेही मला आठवते. नंतर दरवेळी अण्णा नागपूरला आले की त्यांची एक बैठक वाईकरांकडे हमखास असायचीच. त्यावेळी मला देखील निमंत्रण असायचे.

१९८९ मध्ये अण्णा शिवसेनेतर्फे लोकसभेत खासदार म्हणून गेले. दादर मतदारसंघातून ते निवडून गेले होते. त्यावेळी मी हातात एक प्रकल्प घेतला होता. त्याचे काही काम केंद्र सरकारकडे अडकले होते. अण्णांची आपली ओळख आहे त्यामुळे त्यांची मदत होईल या आशेने दिल्लीत लोकसभेचे अधिवेशन सुरू असतानाच मी गेलो. नुकत्याच निवडणुका झाल्या असल्यामुळे अण्णांना दिल्लीत बंगला किंवा फ्लॅट मंजूर झालेला नव्हता. त्यावेळी ते महाराष्ट्र सदनातच राहत होते. मी त्यांना महाराष्ट्र सदनातच जाऊन भेटलो. त्यांनी दुपारीच संसद भवानापाशी ये तिथे बाहेरच मी तुला भेटतो आणि आत घेऊन चालतो. मग आपण संबंधित मंत्र्याला भेटू आणि तुझे काम मार्गी लावता येते का ते बघू, असे सांगितले.

त्यानुसार दुपारी एकच्या सुमारास संसद भवनाच्या प्रवेशद्वारावर मी पोहोचलो. पाचच मिनिटात अण्णा तिथे आले. येताच त्यांनी सुरक्षारक्षकाला सांगून माझा पास बनवला आणि मला संसद भवानात घेऊन ते गेले. संबंधित मंत्राकडे आम्ही गेलो असता त्यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले आणि अण्णांचे पत्र द्यायला सांगितले. अण्णांनी लगेच त्यांचे लेटरहेड दिले आणि मलाच पत्र तयार करायला सांगितले. पत्र तयार होतात अण्णा पुन्हा संबंधित मंत्र्याकडे आले आणि त्याच्याकडून नोटींग लिहूनच घेतले. मग मला सोबत घेऊन ते संसद भवनाच्या कॅन्टीनमध्ये आले आणि तिथे गप्पा मारत बसले. माझ्या आठवणीनुसार एका राष्ट्रीय वृत्तपत्राची पत्रकार प्रतिनिधी तिथे अण्णांची मुलाखत घ्यायला देखील आली होती.

त्या कामासाठी मी पुन्हा एकदा १९९० च्या जुलै महिन्यात दिल्लीला अण्णांकडे गेलो होतो. तेव्हा तिथल्या मराठी मंडळींना जमवून अण्णांनी तिथे नाट्यगीतांचा कार्यक्रम घडवण्याची तयारी देखील केली होती. त्यांच्याकडेच मला नागपूरचे जयराम पोद्दार आणि दूरदर्शनचे माझे जुने वरिष्ठ डॉ. गोविंद गुंठे हे देखील भेटले. दुसऱ्या दिवशी अण्णा पुन्हा मला संबंधित मंत्र्याकडे घेऊन गेले होते.

दुर्दैवाने १९८९ मध्ये निवडून गेलेली लोकसभा अल्पायुषी ठरली मार्च १९९१ मध्ये ही लोकसभा भंग केली गेली आणि पुन्हा निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीत मात्र अण्णा पराभूत झाले. साधारणपणे लोकसभा भंग झाली तरी खासदार मंडळी आपण पुढल्या लोकसभेत निवडून येऊ या आशेने काही काळ तरी आपले दिल्लीतले निवासस्थान सोडत नाहीत. अण्णांनी मात्र लोकसभा भंग होताच त्यांना मंजूर झालेला व्ही.पी. हाऊसमधला फ्लॅट तत्काळ सोडला आणि सर्व सामान घेऊन मुंबईत परत आले होते.

१९९२ साली मी ज्या हडस हायस्कूल मध्ये शिकलो त्या शाळेचा सुवर्ण महोत्सव होता. सुवर्ण महोत्सवी समारंभाला मुख्यमंत्री येणार होते. मात्र त्यांचा दौरा पक्का होत नव्हता. शेवटी शाळेतल्या काही शिक्षकांनी मला गळ घातली आणि मग मी माझे संबंध वापरून तत्कालीन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांना निमंत्रण दिले. त्यांनी येण्याचे मान्य केले. तरीही अजून एखादा स्टॅन्ड बाय पाहुणा हवाच म्हणून मी अण्णांना फोन केला. त्यावेळी ते मुंबईत नव्हते. तिथून मग ते संभाजीनगर मध्ये जिथे होते तिथे त्यांना संपर्क केला. त्यांनी लगेच कार्यक्रमाला यायचे मान्य केले. त्यानुसार ते कार्यक्रमाला आले देखील.

कार्यक्रमाच्या आदल्या दिवशीच ते नागपुरात येऊन पोहोचले होते. त्यांना घ्यायला शाळेतील काही शिक्षक आणि मी रेल्वे स्टेशनवर गेलो होतो. तिथून त्यांना हॉटेल निडोज मध्ये घेऊन आम्ही पोहोचलो. मग बाकी शिक्षकांना अण्णा म्हणाले तुम्ही आता निघा मी अविनाशला थोडा वेळ माझ्यासोबत गप्पा मारायला थांबवून घेतो. मग शिक्षक मंडळी तिथून निघाली आणि अण्णांच्या माझ्या गप्पा रंगल्या. दुपारी जेवणाच्या वेळेपर्यंत त्यांनी मला बसवून घेतले आणि बरेच काही किस्से सांगितले.

दुसऱ्या दिवशी कार्यक्रम बऱ्यापैकी लांबला. शांताराम पोटदुखे आणि नागपूरचे पालकमंत्री बाबासाहेब केदार यांची भाषणे शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी कंटाळवाणीच होती. अण्णा बोलायला उभे राहिले आणि त्यांनी सर्व विद्यार्थ्यांची मने जिंकली. त्या सभामंडपात असलेल्या माजी विद्यार्थी आणि इतर मान्यवरांकडे बोट दाखवून अण्णा म्हणाले की मी यांच्यासाठी आलेलोच नाही. मी आलोय तो तुम्हा मुलांसाठी, असे म्हणत त्यांनी मुलांची संवाद साधला आणि कंटाळलेल्या मुलांनी अण्णांच्या प्रत्येक वाक्यावर टाळ्या द्यायला सुरुवात केली. अण्णांचे ते भाषण विद्यार्थी आणि अण्णा दोघांनीही सारखेच एन्जॉय केले. कार्यक्रम संपल्यावर देखील विद्यार्थी अण्णा गोखलेंभोवती गराडा घालून स्वाक्षऱ्या घेत होते अण्णा देखील त्यांच्याशी गप्पा मारत होते. इतका चांगला वक्ता तुझ्यामुळे शाळेला मिळाला म्हणून शिक्षकांनी देखील माझे कौतुक केले.

त्याच वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून अण्णांची निवड झाली होती. त्या दिवशी‌ विदर्भ साहित्य संघात मी देखील उपस्थित होतो. नंतर तिथून माझ्याच स्कूटरवर अण्णांना वि.भि. कोलत्यांकडे भेटीला घेऊन गेलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मधुकर आष्टीकरांकडे मी आणि माझी पत्नी अनुरुपा अण्णांना भेटलो, तेव्हा त्यांनी दोघेही भांडत जा, मात्र भारत पाकिस्तान सारखे नको असा हितोपदेश देखील केला होता.

१९९५ मध्ये महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार सत्तेत झाले. दोन्ही पक्षांमध्ये अण्णांना चांगला मान होता. त्यामुळे लगेचच अण्णांना महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष कॅबिनेट दर्जाच्या पदावर नियुक्त करण्यात आले. त्यावेळी मुंबईला गेल्यावर मी अण्णांना भेटलोही होतो.

१९९६ च्या मे महिन्यात मी आणि माझी पत्नी मुंबईत होतो. एक दिवस दुपारीच आम्ही दादरला अण्णांच्या कबूतरखाना परिसरातील निवासस्थानी गेलो. बऱ्याच गप्पा झाल्या. त्या दिवशीच अटल बिहारी वाजपेयी सरकारचा शपथविधी होता. तो सोहळा अण्णांच्याच घरी बसून आम्ही टीव्हीवर लाईव्ह बघितला. अण्णा आपल्या नेहमीच्या मीश्किल शैलीने आम्हा दोघांच्याही फिरक्या घेत होते. शेवटी गोखले काकूंनीच त्यांना टोकले. ती अण्णांची आणि आमची शेवटची भेट ठरली.

सप्टेंबर १९९६ च्या एका संध्याकाळी दूरदर्शनच्या बातम्या लावल्या आणि ती दुःखद बातमी कानावर आली. साहित्य संस्कृती मंडळाच्या कामाने कानपूरला गेलेले अण्णा परत आलेच नाहीत. तिथेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. परत आले ते त्यांचे पार्थिवच. नंतर महिनाभराने मी मुंबईला गेलो असता त्यांच्या घरी गेलो होतो. गोखले काकूंची भेट झाली. पूर्वी अण्णा असताना जसा तू यायचास, तसाच आताही अधून मधून येत जा, असे त्यांनी सांगितले खरे. पण नंतर पुन्हा कधीच त्यांच्या घरी जाणे झाले नाही.

अण्णा एक पत्रकार होते, एक असलेले साहित्यिक होते, एक संगीत नाटककार होते, एक फर्डे वक्तेते होते, हिंदुत्ववादी अभ्यासक होते, आणि एक माणूसवेडे व्यक्तिमत्व होते. त्यांनी आयुष्यात इतके मोठेपण मिळूनही फारशी संपत्ती जमवली नाही. मात्र माणसं खूप जमवली. आजही विद्याधर गोखलेंशी आमचा जवळून संबंध आला असे सांगणारे अनेक भाग्यवान भेटतात. मी देखील त्यातलाच एक आहे हे नक्की.

Views: 413
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
नांदेड रेल्वे विभागाच्या अधिकारयांचा गलथान कारभारामुळे जनतेला नाहक त्रास !!

नांदेड रेल्वे विभागाच्या अधिकारयांचा गलथान कारभारामुळे जनतेला नाहक त्रास !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)