आयुष्यातले सांगातीl
पत्रकार नीलाताई उपाध्ये
ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
लवकरच माझे शह-काटशह हे पंधरावे पुस्तक प्रकाशित होत आहे. हा पाच राजकीय कथांचा संग्रह आहे. या कथासंग्रहाला ज्येष्ठ महिला पत्रकार स्वर्गीय नीला उपाध्ये यांची प्रस्तावना आहे. ही प्रस्तावना मी नीलाताईंकडून २०२२ मध्येच घेतली होती. मधल्या काळात ऑक्टोबर २०२४ मध्ये नीलाताईंचे निधन झाले. पुस्तक अंतिम टप्प्यावर आले असताना त्या संदर्भात नीलाताईंची मुलगी मधुरा हिच्याशी कालच बोलणे झाले. त्यामुळे सहाजिकच नीलाताईंच्या आठवणी जाग्या झाल्या. म्हणून आजचे ,”आयुष्यातले सांगाती” यात नीलाताईंबाबतच लिहायचे मी ठरवले आहे.
नीलाताई या महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ महिला पत्रकार म्हणून ओळखल्या जात होत्या. दीर्घकाळ त्यांनी राजकीय पत्रकारिताच केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या बाबत एक भीतीयुक्त आदर असलेला जाणवायचा. आपल्या वागण्याने त्यांनी हा आदर कायम जपला जाईल याची काळजी घेतली होती. आपल्या पत्रकारितेच्या आयुष्यात त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आणि अनेक पुरस्कारांच्याही त्या मानकरी ठरल्या. एकूणच सर्वच क्षेत्रात त्या खूप अग्रेसर राहिल्या होत्या. तरीही त्यांचे आणि माझे सख्य जमले होते.माझ्या आठवणीनुसार १९७० च्या दरम्यानच त्या व्यवसायात आल्या असाव्या. माझा त्यांचा परिचय मात्र १९७७ साली झाला. पहिल्याच भेटीत आमचे मैत्र जमले आणि तेव्हापासून आतापर्यंत आमचा संपर्क कायम होता.
१९७७ सालचा जानेवारी महिना होता तो. तेव्हा मी जेमतेम २२ वर्षांचा होतो. नुकताच मुंबई दूरदर्शनसाठी वृत्त छायाचित्रकार म्हणून विदर्भात कार्यरत झालो होतो. अचानक एक दिवस दूरदर्शनकडून संदेश आला. मुंबईहून नागपुरात पत्रकारांची एक चमू येणार होती. आणि ही चमू नागपूरहून वरो-याला जाऊन आनंदवन आणि दुसऱ्या दिवशी अमरावती जिल्ह्यात कृषी महाविद्यालयातील एका प्रकल्पाला भेट देणार होती. या भेटीचे चित्रीकरण करून मला मुंबई दूरदर्शनला पाठवायचे निर्देश आले होते. दुसऱ्याच दिवशी सकाळी नऊ वाजता नागपुरातून निघायचे होते. संदेशात संपर्कासाठी काही स्थानिक अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक देखील कळवले होते.
मी लगेचच संबंधित अधिकाऱ्यांना फोन केले आणि माहिती घेत दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे नऊ वाजताच आमदार निवासात पोहोचलो. तिथे सर्व मंडळी पोहोचली होतीच. पीपल्स ॲक्शन फोर डेव्हलपमेंट या केंद्र सरकारच्या योजनेचे एक अधिकारी नेने यांच्यासह माहिती आणि जनसंपर्क संचालनालयातील पद्माकर कायदे आणि इतर पत्रकार मंडळी सोबत होती. त्यांच्या समवेत माहिती आणि जनसंपर्क संचालनालयाच्या नागपूर कार्यालयातील न्यूज कॅमेरामन अजाबराव खारोडे हे देखील होते. या सर्वांमध्ये अजाबराव हेच काय ते माझ्या ओळखीचे होते. नाही म्हणायला कृषी विद्यापीठातील एक अधिकारी अडावदकर हे देखील थोडेफार परिचित होते. बाकी सर्वच अपरिचित होते.
साडेनऊच्या सुमारास पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या एका मिनीबसने आम्ही सर्वच मंडळींनी वरोऱ्याकडे कूच केले. सुरुवातीला सर्वच अपरिचित असल्यामुळे मी आणि अजाबराव खारोडे हे दोघेच एकमेकांशी बोलत होतो. दरम्यान मुंबईची सर्व पत्रकार मंडळी आपापसात गप्पा मारत एकमेकांच्या फिरक्या घेत होती. त्या सर्वांमध्ये एक महिला देखील होती.
आमच्या मिनीबसने जाम ओलांडले, आणि थोडे अंतर गेल्यावर एका वळणावर अचानक बस बंद पडली. सर्वजण खाली उतरले आणि घोळक्या घोळक्याने गप्पा करू लागले. मुंबईच्या पत्रकारांचा एकत्रितपणे एक खेळ सुरू झाला. मी दुरूनच गंमत पाहत होतो. सर्वच अनोळखी असल्यामुळे पुढे कसे जायचे हा प्रश्नच होता. अचानक त्या घोळक्यातल्या त्या एकमेव महिलेने मला जोरदार आवाज दिला. “ए मुला इकडे ये,” मी लगेच गेलो.” तू इथे कोणत्या एजन्सीकडून आला आहेस?” त्या महिलेने मला प्रश्न विचारला.”मी मुंबई दूरदर्शनकडून आलो आहे.” ” नाव काय तुझं?” ” माझं नाव अविनाश पाठक”.” मग आमच्या सोबत खेळायला ये तू” असे म्हणत त्या महिलेने मला घोळक्यात ओढले. “आधी मी तुला ओळख करून देते मी नीला उपाध्ये, मी महाराष्ट्र टाइम्सची प्रतिनिधी आहे.” मग बाकीच्यांनी आपापली ओळख करून दिली. त्यात नवशक्तीचे चंद्रकांत भोगटे, समाचार वृत्त संस्थेचे जगन फडणीस, टाइम्स ऑफ इंडियाचे विद्याधर दाते, सकाळचे विजय बांदेल, लोकसत्ताचे राजा केळकर, मंत्रालयातील फोटोग्राफर दांडेकर, पद्माकर कायदे असे सर्वच होते. मग त्या सर्वांनी मला खेळ समजावून सांगितला आणि मी देखील त्यांच्यात रमू लागलो.
अंदाजे तासाभराने गाडी दुरुस्त झाली आणि आम्ही वरोऱ्याकडे निघालो. मग मिनी बस मध्ये बसल्यावर नीला उपाध्ये माझ्या बाजूलाच येऊन बसल्या, आणि माझी चौकशी सुरू केली. आनंदवनला पोहोचता पोहोचता तासाभरात त्यांच्याशी गप्पा मारताना वेळ कसा निघून गेला ते कळलेच नाही. त्या तासाभरात आमचे सूर जुळायला सुरुवात झाली होती.
आनंदवनला पोहोचल्यावर तिथे संपूर्ण दिवस तिथले सर्व कामकाज बघण्यात आणि त्याचे चित्रीकरण करण्यातच गेला. तिथेही एक एक गोष्टी बघताना नीलाताईंच्या एक्सपर्ट कॉमेंट्स ऐकताना मजा येत होती. आनंदवनच्या बागेत पपईच्या झाडाला लागलेली एक अवाढव्य पपई विकास आमटे आम्हा सर्वांसमोर घेऊन आला ती बघताच नीलाताई पटकन उदगारल्या “अरे विकास ही पपई आहे की पपयेश्वर?” त्यांचा हा विनोद ऐकून खुद्द बाबा आमटे यांना देखील हसू आवरले नाही. जेवायच्या वेळी पानात एक भाजी मला न आवडणारी होती. त्यामुळे ती मी बाजूलाच ठेवली होती. नीलाताई माझ्या बाजूलाच बसल्या होत्या. माझ्या ताटाकडे लक्ष जाताच त्या मला रागवल्या. “पानात काही टाकायचं नाही बरं, मी मोठी आहे तुझ्यापेक्षा, रागवेन चांगली”. आणि ती न आवडणारी भाजी सुद्धा मी गुपचूप संपवून टाकली. आम्ही आनंदवनला गेलो. त्याच्या दोन-तीन दिवस आधीच संक्रांत आटोपली होती. त्यामुळे आम्हा सर्वांच्या पानात तिळगुळाची पोळी देखील वाढली होती. ती बघून नीलाताई साधनाताई आमटे यांना म्हणाल्या, “आता तुम्ही तिळगुळ देताय तर गोड बोलावच लागणार.” असे विनोद करतच आमचा दिवस पार पडला.
रात्री परतीच्या प्रवासात देखील पुन्हा एका ठिकाणी गाडी बंद पडली. तेव्हा पुन्हा सर्वजण खाली उतरलो. तिथे एका झाडाखाली मी आणि नीलाताईच गप्पा मारत बसलो. त्यावेळी त्यांनी मुंबईच्या पत्रकारितेतील खूप सारे किस्से सांगितले. आमच्या नागपुरातील तरुण भारतचे मुंबई प्रतिनिधी वसंतराव उपाध्ये हे त्यांचे यजमान, वसंतरावंची वार्तापत्रे मी दर आठवड्याला तरुण भारतात वाचायचो. त्यामुळे वसंतराव नावाने परिचित होते. वसंतराव हे ब्राह्मण समाजाचे, तर नीलाताई या माहेरच्या आगरी समाजाच्या, त्यामुळे राजा केळकर त्यांना चिडवतात. हा किस्सा त्यांनी मला तेव्हाच सांगितले. उपाध्ये हे उच्चवर्णीय म्हणजेच इंग्रजीत कल्चर्ड आणि नीलाताई या आगरी त्यामुळे राजाभाऊ आगरी आणि कल्चर एकत्र येऊन एग्रीकल्चर तयार झाले अशी मल्लीनाथी करायचे. त्या दोन दिवसात राजाभाऊंनी देखील दोन-तीनदा ही मल्लीनाथी केली होती.
आनंदवनचा दौरा आटोपल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व अमरावतीत कृषी विद्यापीठाच्या एका प्रकल्पाला भेट द्यायला गेलो होतो. तिथूनच मग या मुंबईच्या सर्व मंडळींनी हावडा मुंबई एक्सप्रेसमध्ये आपला परतीचा प्रवास सुरू केला. तिथे निघताना नीलाताई माझ्याजवळ आल्या आणि मला आपले कार्ड देत म्हणाल्या, “आता मुंबईला आला की निश्चित भेट. मी संध्याकाळी महाराष्ट्र टाइम्स मध्ये हमखास भेटतेच. तर नक्की भेटू” असे सांगूनच आम्ही निरोप घेतला होता.
महिनाभरातच मला मुंबईला जावे लागले. यावेळी मी मुंबईत जवळजवळ आठ दिवस मुक्कामी होतो. एका संध्याकाळी मी सातच्या सुमारास महाराष्ट्र टाइम्स मध्ये गेलो. तिथे नीलाताई बसल्या होत्या, त्या टेबलसमोर गेलो. त्या काहीतरी बातमी लिहिण्यात व्यस्त होत्या. मी जाऊन थोडा वेळ उभा राहिलो आणि अचानक त्यांचे लक्ष गेले. मला पाहून त्या चांगल्याच आनंदल्या.” तू कधी आलास? कधीपर्यंत मुक्काम? अशी सर्व चौकशी केली, आणि मग थोडा वेळ हवा पाण्याच्या गप्पा मारल्या. अचानक त्या म्हणाल्या, “मी इथे या क्षणी तुला चहा सुद्धा देऊ शकत नाही. मात्र तू एक काम कर. इथून जवळच केळकर हॉटेल आहे. त्याच्यावरच तरुण भारतचे मुंबई ऑफिस आहे. तिथे माझा नवरा बसलेला आहे. मी त्याला फोन करते. तू त्याच्याशी गप्पा मार आणि तिथेच चहा घे. लगेचच त्यांनी वसंतरावंना फोन केला आणि मी मुंबई तरुण भारतच्या मुंबई ऑफिस मध्ये पोहोचलो. वसंतरावांची माहिती देखील माझी देखील ती पहिलीच भेट होती.
त्यावेळी साधारणपणे दर चार महिन्याला माझी एक मुंबई भेट नक्की असायची. वेळ असला की मी नीलाताईंना आणि शक्य असेल तर वसंतरावंना देखील भेटायचो. दोन-तीनदा व्हीटी (आजचे सीएसटी) ते मुलुंड असं त्यांच्यासोबत लोकलने देखील प्रवास केला होता. नीलाताई जितक्या फटकळ तितक्याच मोकळ्या आणि प्रेमळ स्वभावाच्या होत्या. एकदा बोलता बोलता मी त्यांना दादर स्टेशनवर रुळावरून लोकलमध्ये चढलो होतो असा प्रकार कथन केला. तेव्हा त्या मला चांगल्याच रागवायल्या लागल्या की “गधड्या तुला कळत नाही का? आई-बाबांचा एकटा मुलगा आणि तीन बहिणींचा एकटा एक भाऊ आहेस. कशाला असे प्रयोग करतोस?” असे त्या बिनधास्त सुनावायच्या. नागपूरचा पत्रकार सुधीर पाठक आमचा कॉमन मित्र. त्यावेळी सुधीरचे नुकतेच लग्न झाले होते. तेव्हा दरवेळी सुधीरकडे आता काही गुड न्यूज आहे का असे प्रत्येक भेटीत त्या विचारायच्या. काही कल्पना नाही, असे सांगितले की त्या माझ्यावर चिडायच्या. दोन वर्षांनी सुधीरला पहिली मुलगी झाली. नंतर प्रत्येक भेटीत आता पुढे काय हा त्यांचा प्रश्न तयारच असायचा. त्या काळात मी अविवाहितच होतो. दर वेळी नीलाताई “आता तू लग्न कधी करणार? तू हो म्हण, मग मी मुली सुचवते.” म्हणून माझ्या मागे लागायच्या. एकूणच संबंधातल्या प्रत्येक व्यक्तीची नव्हे कुटुंबाची काळजी त्या घेत असायच्या.
महाराष्ट्र टाइम्समध्ये मी त्यांना भेटायला जात असे. तिथेच त्यांनी माझी त्यांचा सहकारी भरतकुमार राऊत यांच्याशी ओळख करून दिली. भरत आणि नीलाताई एकमेकांच्या फिरक्या घ्यायच्या त्या ऐकण्याजोग्या असायच्या. पुढे जाऊन भरत हा देखील माझा चांगला मित्र झाला. योगायोगाने भरतची बायको नीना राऊत ही दूरदर्शनमध्येच होती.
एकदा मी आणि नीना बोलत असताना मला ती भरतची बायको आहे हे कळले. त्यामुळे मग ते दोघेही माझे चांगले मित्र झाले. भरत नंतर राज्यसभा सदस्य देखील झाला होता. अजूनही त्याची माझी मैत्री आहे.
याच दरम्यान नीलाताईंना मुलगी झाली. मग मुंबईत भेटलो की त्या मुलीचे कौतुकही सांगायच्या. एकदा त्या मुलुंडच्या नवघर व्हिलेज मध्ये राहायच्या. तिथेही मी गेल्याचे आठवते. तिथे त्यांचे सासरे म्हणजे वसंतरावंचे वृद्ध वडीलही होते. त्यांचा माझाही नीलाताईंनी परिचय करून दिला होता. नंतर ही मंडळी मुलुंड वेस्ट मध्ये राहायला आली. याच दरम्यान माझी मोठी बहीण डोंबिवलीत राहत होती. तिच्याकडे उतरलो आणि दूरदर्शनला जायला निघालो,की कधीकधी सकाळी मुलुंडच्या यांच्या घरी
धडकायचो. तिथे “नीलाताई, मी तुमच्या हातचं आमलेट खायला आलोय” असं सांगितल्यावर कितीही घाईत असल्या तरी नीलाताई आमलेट आणि पराठा खाऊ घालायच्याच. यावेळी त्या “गधड्या इतक्या धावपळीत तू आला आणि आमलेट खायचं म्हणतोयस” असं म्हणून प्रेमाने त्या दाटायच्याही.
पुढे जाऊन ही मी १९९० मध्ये विवाहबद्ध झालो. त्यानंतर एकदा माझी पत्नी अनुरूपा हिच्या समवेत मी मुंबईत महाराष्ट्र टाइम्समध्ये नीलाताईंना भेटलो होतो . एव्हाना उपाध्ये मंडळी मुलुंडमधून चेंबूरला स्थानांतरित झाली होती. त्यांनी नीलाताईंनी मला “अनुरूपाला घेऊन घरी ये” म्हणून आग्रह धरला. मात्र आम्हा उभयतांना त्यांच्या घरी जाणे कधी जमलेच नाही.
मधल्या काळात माझे मुंबईला जाणे कमी झाले होते. गेलो तरी एक दिवसासाठी जायचो. याच काळात मी दूरदर्शनचे काम सोडले आणि एका राजकीय मित्राचे प्रसिद्धीचे आणि येथे मंडळाचे कामकाज सांभाळून देऊ लागलो. तेव्हा मंत्रालयाच्या प्रेसरूममध्ये कधी कधी नीलाताईंची धावती भेट होत असे. इतर पत्रकार मित्रांकडून त्यांची ख्यालीखुशाली कळत असे. त्यांची माझी शेवटची भेट बहुत २००६ मध्ये मंत्रालयातच झाली होती. त्यावेळी त्या नुकत्याच निवृत्त झालेल्या होत्या. त्यावेळी बऱ्याच गप्पा झाल्या. पुन्हा भेटायचे ठरवून निरोप घेतला. मात्र नंतर प्रत्यक्ष भेट कधीच झाली नाही.
याच दरम्यान २०१५ मध्ये वसंतरावमध्ये उपाध्ये गेल्याची बातमी वृत्तपत्रात वाचली. मात्र त्यावेळी नीलाताईंचा फोन नंबर माझ्याकडे नव्हता. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधणे आणि माझ्या संवेदना कळवणे शक्य झाले नाही.
२०२१ पासून चिंतन आदेश या पाक्षिकात मी “मेमरीतला डेटा” या शीर्षकाचा स्तंभ लिहिणे सुरू केले होते. त्यातील एका लेखात मी मुंबईच्या पत्रकारांच्या प्रेस टूर संदर्भात आठवण लिहिली होती. नीलाताईंकडे चिंतन आदेशचा अंक जात होता. त्यातील लेख वाचून नीलाताईंना सर्व जुने संदर्भ लागले आणि लगेच त्या लेखाखालचा माझा मोबाईल नंबर पाहून त्यांनी मला फोन केला. त्या दिवशी मोबाईलवर अक्षरशः बॅटरी डाउन होईपर्यंत आम्ही दोघे बोललो. तिथून फोनवर पुन्हा नियमित संपर्क सुरू झाला. मग त्यावेळी नीलाताई निवृत्त होऊन मुंबई विद्यापीठात पत्रकारितेच्या मानद प्राध्यापिका म्हणून काम करत होत्या. त्यांची काही पुस्तके ही मधल्या काळात प्रकाशित झाली होती. मग माझ्या पत्त्यावर त्यांनी त्यांची पुस्तके मला पाठवली. मी देखील माझी काही प्रकाशित पुस्तके त्यांना पाठवली होती.
२०२२ मध्ये माझे “शह काटशह” हे नवे पुस्तक प्रकाशित व्हायचे ठरले होते. त्याला कुणाची तरी प्रस्तावना असावी म्हणून विचार करता करता मला नीलाताईंचे नाव आठवले. त्यांना लगेच फोन केला. त्यांनी प्रस्तावना देण्याचे मान्य केले. मी लगेच पुस्तकाचे स्क्रिप्ट त्यांना पाठवले. मात्र गडबडीत शुद्धलेखनाच्या चुका तशाच असलेले ते आधीचेच बाड मी त्यांना पाठवून दिले. नंतर लक्षात येताच त्यांना मोबाईलवर तसा चुकीने ते जुने बाड पाठवले असल्याचा मेसेज दिला आणि कॉम्प्युटरवर सर्व शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त झाल्या आहेत हे देखील त्यांना कळवले. मात्र गडबडीत हा मेसेज बघायचे त्यांचे राहून गेले असेल असावे.
२०२२ च्या मे महिन्यातील एका दुपारी साधारणतः दोन च्या सुमारास मी एक काम आटोपून घरी निघालो होतो. माझी स्कूटर रामदासपेठ ओलांडून दीक्षाभूमीकडे सरकत होती. अचानक मोबाईल वाजला म्हणून रस्त्याच्या काठाला स्कूटर थांबवून मी मोबाईल बघितला, तर स्क्रीनवर नीलाताई उपाध्ये हे नाव दिसले. लगेच मी फोन उचलला आणि बोलायला सुरुवात केली. तिकडून नीलाताईंची तोफ धडधडायला सुरुवात झाली. “अविनाश गधड्या मी तुला आता तू खूप नालायक माणूस आहेस असे म्हटले तर आवडेल का?” असा प्रश्न त्यांनी केला. ” त्यात नवीन काय? तुम्ही नेहमीच मला नालायक म्हणता.” असे मी उत्तर देताच त्या खळाळून हसल्या, आणि म्हणाल्या “तू खरंच खूप बेशरम आहेस”. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली.” तुझ्या पुस्तकाच्या स्क्रिप्ट मध्ये किती शुद्धलेखनाच्या चुका आहेत? त्या दुरुस्त कोण करणार?” मग मी खुलासा केला आणि चुकीने जुनेच स्क्रिप्ट पाठवल्याचे सांगितले. मग त्याच सांगू लागल्या “मला कोणत्याही कॉपीतल्या चुका फार पटकन दिसतात. उपाध्ये मला नेहमी म्हणायचे, तुझ्या दोन्ही डोळ्यात दोन लाल पेन्सिली बसवल्या आहेत, त्यातून तू चुका शोधतेस. काय करू मला चुका पटकन दिसतात. पण बाकी मी तुझं पुस्तक पूर्ण वाचलं. तू तथा खरंच छान लिहिले आहेस.” असे म्हणत त्यांनी माझे तोंड भरून कौतुक केले.
यथावकाश नीलाताईंनी पुस्तकाला प्रस्तावना लिहून पाठवली त्यातील कथा त्यांना आवडल्या होत्या. त्याच वेळी त्यांनी माझ्या आधीच्या पुस्तकांबाबतही चौकशी केली.” तुझे साहित्य मुंबई पुण्यात वाचले जायला हवे. यासाठी या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ तू मुंबईत कर” असा त्यांनी आग्रह धरला. “मुंबई मराठी पत्रकार संघाची मी विश्वस्त आहे. तिथेच आपण कार्यक्रम आयोजित करू,” याबाबत त्यांनी मला आश्वस्त केले.
मात्र तो योग आलाच नाही. जो प्रकाशक माझे हे नवे पुस्तक प्रकाशित करणार होता त्याचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे ते प्रकाशन रखडले. मग दुसऱ्या प्रकाशाकडे मागणी केल्यावर त्या प्रकाशकाला ते पुस्तक दिले. आणि आता तीन वर्षांनी त्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा योग येतो आहे.
मात्र याच दरम्यान नीलाताईंनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. एक ऑगस्ट २०२४ पासून मी स्वतः खूप आजारी होतो. सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये तर मला कुणाच्यातरी मदतीशिवाय कड पलटणे ही अशक्य झाले होते. त्याच दरम्यान एक दिवस वृत्तपत्रात ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये यांचे निधन झाल्याची बातमी वाचली. त्यावेळी मी त्यांच्या कुटुंबीयांना फोन करून बोलण्याच्या देखील अवस्थेत नव्हतो. त्यामुळे कोणाशीच संपर्क करता आला नाही.
यथावकाश माझी प्रकृती सुधारली आणि दरम्यान पुस्तक प्रकाशनचा मुहूर्त सापडला. आता काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे आता नीलाताईंच्या मुलांचे संपर्क क्रमांक मिळाले तर त्यांच्याशी बोलून त्यांना पुस्तकाची प्रत तरी पाठवू या, असा मी विचार केला.मग सुधीर पाठककडून नीलाताईंची मुलगी मधुराचा नंबर मिळवला आणि तिच्याशी बोललो. त्यामुळे परवाच नीलाताईंच्या सर्व आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला.
आज नीलाताई आपल्यात नाहीत. मात्र त्यांच्या आठवणी कायम राहणार आहेत. माझ्या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत व्हावे अशी त्यांची इच्छा होती. यावेळी माझी प्रकृती मी मुंबईला येऊन प्रकाशन करावे इतकी चांगली नाही. मात्र लवकरच पुढले एखाद्या पुस्तक नक्की मुंबईत प्रकाशित करू. मला वाटते तीच नीलाताईंना खरी श्रद्धांजली ठरेल.


