एस. पी. साहेब सांगा ठाण्याचा कारभार चालणार कसा?
तोडक्या संख्याबळामुळे पोलिसांवर वाढता ताण
मायणी दि. १९ :- प्रतिनिधी
मायणी सह परिसरात सध्या चोरीचे आणि वाटमारीचे प्रकार सुरू आहेत. अवैध धंद्यांवर खुलेआम व्यासपीठ म्हणून मायणी परिसराकडे आज पाहिले जात आहे. पोलिसांच्या प्रतिमेवर शिंतोडे उडवले आज आहेत. यात वास्तविक पाहता सत्यता पण असू शकते. परंतु, वडुज पोलीस ठाणे अंतर्गत कार्यरत असणाऱ्या मायणी पोलीस दुरक्षेत्र एकंदरीत परस्थिती पाहता. मुख्य वडुज ठाणे अंमल कार्यक्षेत्रात दाखल होणाऱ्या एकूण गुन्ह्यांपैकी मायणी पोलीस दुरर्क्षेत्र अंतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या कमालीची आहे.
या दाखल होणाऱ्या गुन्ह्याच्या तुलनेत पोलीस स्टाफ ची संख्या पाहता कागदावर अधिकारी सहित कर्मचारी असे आठ आणि प्रत्येक्षात इतर विविध कामे पाहता दैनंदिन कामकाज करणाऱ्यांची संख्या पाचच दिसते.
यात मायणी , म्हासुर्णे, चितळी, कलेढोण, पाचवड, विखळे, निमसोड या प्रमुख गावांसह अनेक लहान गावे, वड्यावस्त्यासह तरसवाडी ,कुकुडवाड घाट व सांगली- सातारा जिल्ह्याची हद्द असे मोठे कार्यक्षेत्र असणाऱ्या मायणी पोलीस दुरक्षेत्र आणि सद्य स्थितीतील एक पोलीस अधिकारी व तोडके कर्मचारी यांचे बलाबल होणे अवघड आहे.
वरील सर्व कार्यक्षेत्राचे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखताना अनेक सार्वजनिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, शासकीय दौरे , भांडणे, सार्वजनिक ठिकाणी होणारे वाद, निवडणुका , याचे सर्वांगीण नियोजन करताना अपुऱ्या संख्येने असलेले पोलीस कर्मचारी सर्व ठिकाणी आपले "बेस्ट" देताना कमी पडताना दिसत आहेत.
नोंदवण्यात येणाऱ्या गुन्ह्यांची नोंद करता करता जुन्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात संबंधित अधिकारी व कर्मचारी आज मितिस अपयशी ठरत आहेत. गुन्हा नोंदवायची घाई करायची का? तपासाची! हे सर्व झालच तर सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था आणि दैनंदिन उपक्रमाची जंत्री थांबता थांबत नाही. यामुळे मायणी पोलीस दूरक्षेत्र अनेक सार्वजनिक व वैयक्तिक वादांवर पडदा टाकणारे "सामोपचार केंद्र" बनलेले पहावयास मिळत आहे.
शेजारी वीस किमीवर असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील विटा पोलीस ठाण्यातील शेकडो पोलीस कर्मचारी घेऊन कामकाज करीत असताना मायणी पोलीस दूरक्षेत्र सामावून घेणारे वडूज पोलीस ठाणे अद्याप तोडक्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बळावर कार्यरत आहे. ही तफावत ठळक जाणवणारी ठरते.
या सर्व बाबींकडे नूतन पोलीस अधीक्षक साहेबांनी गांभीर्याने लक्ष देऊन जिल्हा सरहद्दीवरील चर्चित "मायणी पोलीस दूरक्षेत्र सक्षम ,कार्यक्षम व भक्कम संख्याबळ असणारे बनवणे आवश्यक आहे.
चौकट -
"दूरर्क्षेत्र नको ,थेट तालुक्याचे फौजदारच गाठतो"
मायणी पोलीस दुरक्षेत्राचा "कर्तव्यदक्ष"कारभार पाहता भागातील ग्रामस्थ थेट वडुज ठाणे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्याशी प्रत्यक्ष , अप्रत्यक्ष आपली तक्रार आणि स्थानिक कर्मचाऱ्यांच्या वर्तुवणुकीविषयी नाराजी व्यक्त करीत असतात. यामुळे सोनवणे यांना स्वतः उच्चस्तरीय गुन्ह्यांची खबरदारी घेण्यासोबतच तळातील छोट्या वादावर ही पडदा टाकावा लागत आहे.


