तऱ्हाडी ग्रामपंचायतच्या कार्यशैलीविरोधात ग्रामस्थांचा संताप; निषेधार्थ गावात जागोजागी लावले पोस्टर
तऱ्हाडी (ता. शिरपूर) :
ग्रामपंचायतीकडून मूलभूत सेवा-सुविधा न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या तऱ्हाडी ग्रामस्थांनी थेट निषेधाचा मार्ग स्वीकारला आहे. ग्रामपंचायत कार्यालय ‘विकायला किंवा भाड्याने देण्याचा’ निर्णय घेण्यात यावा, अशा तीव्र आशयाची पोस्टर्स गावात विविध ठिकाणी लावण्यात आली आहेत.
ग्रामस्थांनी लावलेल्या या पोस्टरमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, गावाच्या गटारी साफ करण्यापासून ते इतर कोणत्याही कामांसाठी निधी उपलब्ध नाही. चार-चार दिवस ग्रामसेवक अनुपस्थित राहतो, महिनोंमहिने प्रशासक येत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाचे काहीही काम होत नाही.
पुढे म्हटले आहे की, गावातील स्वच्छतेच्या व आरोग्याच्या दृष्टीने निधी उपलब्ध नसेल, तर असे कार्यालय विकून किंवा भाड्याने देण्यात यावे. किमान यातून निधी उपलब्ध होवून तरी काही सेच्छतेची कामे करण्यात येतील
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या निष्क्रियतेमुळे गटारी सफाईपासून आरोग्य व्यवस्थेपर्यंत अनेक समस्या निर्माण झाल्या असून, गावात दररोज वाढणाऱ्या अस्वच्छतेमुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. ग्रामसेवक, प्रशासक तसेच गट विकास अधिकारी यांच्याकडे एक-दीड वर्षापासून वारंवार तक्रारी करून देखील काहीही उपयोग होत नाही.
अत्यंत त्रस्त ग्रामस्थ या नावाने पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले असून, या मागील खऱ्या नागरिकांचा उद्रेक लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. एवढ्या टोकाच्या भावनिक निषेधानंतर ही आता तरी प्रशासन जागेल का ? हा प्रश्न शेवटी उरतोच…


