*घ्या समजून राजेहो…*,*ठाकरेंच्या वल्गना* ,*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!*
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७महाराष्ट्र शासनाने पहिल्या वर्गापासून हिंदी शिकवण्याचा निर्णय जाहीर केला आणि त्यावरून राजकीय नाट्य सुरू झाले. परिणामी राज्य शासनाने आपले निर्णय मागे घेतले. आता या संदर्भात ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेत फडणवीसांनी नवी समिती जाहीर केली असून या समितीचा अहवाल आल्यावर त्या अहवालानुसार पहिलीपासून हिंदी शिकवायची किंवा नाही या संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी घोषणा फडणवीसांनी केली आहे.आता त्यावरून पुढे जे राजकारण सुरू झाले आहे त्यात दोन्ही ठाकरे बंधू विशेषतः ठाकरे उबाठा गटाचे नेते हे सर्व काही आमच्यामुळेच घडले आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस हा आमच्याच पाठीशी आहे, शिवसेना म्हणजेच मराठी माणूस, आणि इथे आम्हीच मराठी माणसाला एकत्र आणलेले आहे, असा दावा करीत आहेत. वस्तुतः पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याचा जो निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केला त्याला राजकीय पक्षांनी विरोध जरूर केला. मात्र सामान्य माणूस फारसा व्यक्त झालेला दिसला नाही. या प्रकरणात २९ जून रोजी शिवसेनेतर्फे महाराष्ट्रभर ठीक ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारने जारी केलेले शासन अध्यादेश जाळून निषेध करण्याचा कार्यक्रम घेतला होता. या कार्यक्रमाला त्या त्या गावातील शिवसैनिक निश्चित उपस्थित होते. मात्र सामान्य मराठी माणूस कुठेच फारसा उपस्थित असलेला दिसला नाही.
५ जुलै रोजी आम्ही मोर्चा काढणार अशी हवा ठाकरेंच्या दोन्ही सेनांतर्फे करण्यात आली. मात्र या मोर्चाची सामान्य माणसांमध्ये फरशी चर्चा होतांनाही दिसली नाही. ५ जुलै रोजी शिवसेना उबाठा गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी विजय मेळावा जाहीर केला आहे. या मेळाव्याचे आयोजक जरी ठाकरे बंधू असल्याचे दाखवले जात असले, तरी हा मेळावा मराठी माणसाचा आहे असे शिवसेना उबाठा गटाचे नेते अनिल परब यांनी नुकतेच माध्यमांशी बोलताना सांगितले. जर या आंदोलनामुळे मराठी माणूस एकत्र येऊन शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या पाठीशी उभी झाला, हे दावे खरे मानले तर या जल्लोष मेळाव्याला शिवाजी पार्क सुद्धा अपुरा पडायला हवा होता. मला आठवते एका काळात मुंबईच्या शिवाजी पार्कवर बाळासाहेबांची सभा व्हायची, तेव्हा शिवाजी पार्क अपुरा पडायचा, आणि आजूबाजूच्या रस्त्यांमध्ये खचाखच गर्दी व्हायची. त्यावेळी मेळाव्यासाठी मुंबई तर सोडा पण जवळपासच्या सर्व जिल्ह्यांमधून सुद्धा हजारोंच्या संख्येने शिवसैनिक आणि सामान्य नागरिक सुद्धा गर्दी करायचे. आज मात्र वरळीच्या डोममध्ये हा मेळावा घ्यावा लागतो आहे या वरूनच सर्व काही आले. या मेळाव्याला खरोखरी मराठी माणूस किती मोठ्या संख्येत येतो हे उत्तर ५ जुलैला मिळेलच.विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या जवळ जवळ आठ दिवस आधीपासून शिवसेना आणि मनसे यांनी ५ जुलैला मोर्चा काढणार असल्याची जोरदार हवा निर्माण केली होती. मात्र त्याआधीच पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र सरकारने पहिल्या वर्गापासून हिंदी शिकवण्याबाबतचा शासकीय आदेश मागे घेतल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी पत्रपरिषदेत केली. त्यामुळे या आदेशाविरोधात झालेले विरोधकांचे आंदोलनही थंडावले . महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गट यांनी संयुक्तरित्याह आयोजित केलेला ५ जुलैचा मोर्चा देखील स्थगित करण्यात आल्याची घोषणा लगेचच करण्यात आली.
प्रकरणात अशी अचानक माघार घेण्याचा असा निर्णय घेण्यामागे देवेंद्र फडणवीसांची काही वेगळी खेळी तर नाही ना अशी शंका त्यावेळी राजकीय विश्लेषक घेताना दिसत होते. ५ जुलैला या कथित हिंदी सक्तीच्या विरोधात भव्य मोर्चा काढणार अशी घोषणा करत त्या दृष्टीने वातावरण निर्मितीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गट दोघेही सक्रिय झाले होते. त्याशिवाय सोमवारी सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देखील विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील याची फडणवीसांना खात्री होती. त्यामुळे अधिवेशनाच्या एक दिवस आधीच कथित हिंदी सक्तीचे दोन्ही शासन आदेश रद्द केल्याची घोषणा करून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या तयारीतील हवाच काढून घेतली असेही बोलले गेले. पत्रपरिषदेत याबाबत घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण घटनाक्रम माध्यमांसमोर जाहीर केला. त्याचे सर्व वृत्तवाहिन्या थेट प्रक्षेपण करत असल्यामुळे उभ्या महाराष्ट्राने ती पत्र परिषद बघितली. त्रिभाषा सूत्रसंदर्भात प्राथमिक हालचाली या उद्धव ठाकरे यांच्याच काळात झाल्या होत्या. तसेच डॉ. रघुनाथ माशेलकर समितीने दिलेला अहवालही उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला होता. त्यावर त्यांची स्वाक्षरी देखील आहे आणि त्यात पहिलीपासून हिंदी शिकविली जावी अशी सूचना आहे,
याकडे फडणवीसांनी लक्ष वेधले. त्यानुसार हा शासन आदेश जारी करण्यात आला होता आणि आम्ही पहिल्या वर्गापासून हिंदी शिकवण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याची सक्ती केलेली नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात जर तीन भाषांचे पुरेसे ज्ञान नसले तर मराठी विद्यार्थी अकॅडमीक बँक ऑफ क्रेडिट च्या स्पर्धेत माघारतील ही भीतीही त्यांनी व्यक्त केली.या प्रकारामुळे उद्धव ठाकरे पुरते एक्सपोज झाले. सत्तेत असताना एक करायचे आणि सत्तेबाहेर गेल्यावर त्याला विरोध करायचा, ही ठाकरेंची सवय आहे असा टोला देखील फडणवीसांनी लावला. यावेळी त्यांनी नाणार रिफायनरी आंदोलनाबाबतही संदर्भ दिला. खरे तर या आंदोलनाशी जुळताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंनाच जाब विचारायला हवा असे देखील फडणवीसांनी सुचवले. मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचे जे पत्र विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांना मराठीत पाठवले त्यात व्याकरणाच्या २४ चुका असल्याचे सांगत बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिकल्यावर मराठीच्या अशा चुका होऊ शकतात असा टोला देखील फडणवीसांनी लावला. (शिवसेना आमदार आदित्य ठाकरे बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्येच शिकले आहेत) आपण माशेलकर समितीचा अहवाल वाचलाच नाही असा खुलासा नंतर उद्धव ठाकरेंनी केला.
मात्र मुख्यमंत्री असणाऱ्या माणसाने इतका महत्त्वाचा अहवाल न वाचताच त्यावर सही कशी केली हा प्रश्नही उभा महाराष्ट्र आज विचारतो आहे. त्यामुळे हा खुलासाही हास्यास्पदच ठरतो. तरीही उद्धव ठाकरे आणि त्यांचे हीज मास्टर्स व्हॉइस असलेले खासदार संजय राऊत हे वारंवार कुठला जीआर आणि कुठला रिपोर्ट असे दावे करत आम्हीच कसे बरोबर अशा वल्गना करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेत समिती नेमली आहे त्यावर प्रतिक्रिया देताना मराठी भाषेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी अर्थतज्ञ काय करणार असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. मात्र त्याचवेळी तुम्ही देखील या संदर्भात निर्णय घेण्यासाठी एका वैज्ञानिकाच्या(डॉ रघुनाथ माशेलकर) अध्यक्षतेखाली समिती कशी नेमली होती याचे उत्तर त्यांच्याजवळ नाही. अचानक हिंदी सक्तीचे दोन्ही आदेश रद्द ठरवत या संदर्भात विचार करण्यासाठी नव्या समितीची घोषणा करताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या आंदोलनातील हवा तर फडणवीस यांनी काढलीच, पण त्याचबरोबर हे दोन भाऊ एकत्र येणार ही हवा माध्यमांच्या माध्यमातून तयार केली गेली होती, तिलाही कुठेतरी ब्रेक लावला.
जरी हे यश मराठी माणसाच्या एकीचे आहे असे दोघेही भाऊ म्हणत असले तरी उद्या या विजयाचे श्रेय घेण्यासाठी दोन्हीही भाऊ पुढे येणार हे नक्की होते. निर्णय जाहीर झाल्यावर लगेचच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हा आमचाच विजय आहे असा तोंड भरून दावा करताना दिसत होते. त्यामुळे ५जुलैचा मेळावा आटोपला की ही श्रेयाची लढाई सुरू होईल आणि तिथेच हे दोन भाऊ आणि त्यांचे पक्ष एकत्र येण्याच्या प्रक्रियेत गतिरोध निर्माण होईल, हे चित्र निश्चित दिसते आहे. आम्ही म्हणजेच महाराष्ट्र हा या दोन्ही भावांचा दावा देखील याच प्रक्रियेतून पुढे हळूहळू फोल होताना दिसणार आहे. फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे दोन्ही पक्ष या आंदोलनात सक्रिय झाले होते, हे देखील हळूहळू सर्वांसमोर येईल. विशेष म्हणजे महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी शिकवण्याची मुहूर्तमेढ च्या उद्धव ठाकरेंनी रोवली, त्यांच्यासोबत जायचे का, आणि गेल्यास आपला मतदार काय म्हणेल, याचाही विचार राज ठाकरे यांना भविष्यात करावा लागणार आहेच.
दादा भुसेंसारख्या मंत्र्यांनी येऊन राज ठाकरे यांना प्रेझेंटेशन दाखवले होते अशा बातम्या आहेत मात्र प्रेझेंटेशन काय दाखवले हे बाहेर जाहीर झाले नव्हते. त्यामुळे आपल्याला हे माहीत नव्हते अशी भूमिका राज ठाकरे यांना घेणे सोयीचे होते मात्र आता फडणवीसांनीच सर्वकाही पत्र परिषदेत जाहीर केले असल्यामुळे राज ठाकरे यांचीही अडचण झाली आहे. नमूद केल्याप्रमाणे मराठी माणसाचे ऐक्य होऊ नये आणि दोन्ही ठाकरे बंधू तसेच शिवसेना उबाठा गट आणि मनसे हे दोन्ही एकत्र येऊ नये म्हणून फडणवीस यांनी २९ जूनलाच दोन्ही शासन निर्णय रद्द करत असल्याची घोषणा केल्याचा आरोप उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे तसेच हीज मास्टर्स व्हॉइस संजय राऊत करताना दिसत आहेत मात्र शिवसेनेची जी ताकद आधी होती ती आज संपलेली दिसते आहे. त्यांच्यातलाच एक मोठा गट बाहेर पडून आज भाजपसोबत आला आहे. उद्धव ठाकरेंचे मूळ शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देखील दुसऱ्या गटाला मिळाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गट स्थानिक स्वराज्य निवडणुकात काय ताकद दाखवेल हे उघड आहे. तीच परिस्थिती राज ठाकरे यांच्या मनसे बाबतही आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांना एकही आमदार निवडून आणता आलेला नाही. आज मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात त्यांची कुठेही ताकद नाही.
त्यामुळे हे दोन्ही भाऊ एकत्र आलेही तरी राज्यातील सत्ताधारी आघाडीवर महायुतीवर काहीही परिणाम होणार नाही हे चित्र आज तरी दिसते आहे. त्याच वेळी जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर शिवसेनेसोबत जायचे का याचाही निर्णय घ्यावा लागेल असे मत काँग्रेसी नेत्यांनी व्यक्त केले आहे. हे बघता ज्या काँग्रेसच्या मुस्लिम मतांच्या जोरावर ठाकरे गटाला विधानसभेत वीस जागा तरी निवडून आणता आल्या त्यांचाच पाठिंबा गेला तर काय हा प्रश्न देखील ठाकरेंसमोर उभा राहणार आहे. शिवाय उद्धव ठाकरे यांनी अपमान केल्यामुळेच राज ठाकरेंना शिवसेना सोडून बाहेर पडावे लागले ते उद्धव ठाकरे आता राज ठाकरेंना जुना सन्मान देणार आहेत का असा सवाल भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे. या मुद्द्यातील वास्तव देखील नाकारता येत नाही. त्यामुळे हे दोन भाऊ एकत्र येण्याची शक्यता आज तरी धूसर आहे.तरीही संजय राऊत रोज हाच दावा करत आहेत.
त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मी काही दोन भाऊ एकत्र येऊ नये असा कोणताही जी आर काढलेला नाही असा टोला लगावला आहे. त्यावर फडणवीसांच्या जीआर वर शिवसेना सुरू झाली नाही असे सांगत शिवसेना बंद पाडण्याचा जीआर फडणविसांनी काढला तरी शिवसेना आज कायम आहे असाही दावा केला आहे.हे सर्व मुद्दे लक्षात घेत मराठी माणसाचीच शिवसेना, मराठी माणसाचे ऐक्य म्हणजेच शिवसेना, आणि मराठी माणूस शिवसेना आणि मनसेच्या नेतृत्वात एकत्र आला म्हणूनच फडणवीस सरकारला घाबरून आपला हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला हे ठाकरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे दावे हे किती निरर्थक आहेत हे दिसून येते. तरीही तुम्हाला लोकशाहीत काहीही बोलण्याचा अधिकार आहे. त्याचा कसा वापर करायचा हा तुमचा निर्णय आहे. असे असले तरी महाराष्ट्रातील जनता आता शहाणी झाली आहे. त्यामुळे ती तुमच्या या वल्गनांना बळी पडणार नाही हे निश्चित. वाचकहो पटतेय का हे तुम्हाला….? त्यासाठी आधी समजून तर घ्या राजेहो….्


