• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आयुष्यातले सांगाती १२,मा.गो.उपाख्य बाबुराव वैद्य,*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
July 3, 2025
in Uncategorized
0
आयुष्यातले सांगाती ७……महामहोपाध्याय डॉ वासुदेव विष्णू मिराशी..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

*आयुष्यातले सांगाती १२*,*मा.गो.उपाख्य बाबुराव वैद्य*,*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य हे एक सिद्धहस्त पत्रकार होते, एक वैचारिक लेखन करणारे ख्यातनाम लेखक होते, उत्तम वक्ते होते,

सामाजिक आणि राजकीय विचारवंत होते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय प्रवक्ते देखील होते, विधान परिषदेचे सहा वर्ष सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले होते. एक कुशल संघटक म्हणून देखील ते ज्ञात होते. त्याचबरोबर सर्वांसोबत संबंध जपणारे जगन्मित्र व्यक्तिमत्व म्हणूनही ते ओळखले गेले होते.विशेष म्हणजे बाबुरावंचे आणि पाठक परिवाराचे कौटुंबिक स्नेहबंध होते. ते स्नेहबंध उभय पक्षी जपले गेले हे विशेष.मा. गो. वैद्य हे नाव लहानपणापासून कानावर पडणारे नाव होते.

लहानपणी घरी येणाऱ्या तरुण भारतात अधून मधून त्यांचे नाव झळकायचे. त्याशिवाय आई आणि बाबा यांच्या तोंडात त्यांचे नाव असायचे. बाबुराव काही काळ नागपुरात बडकस चौकातील कोलते वाड्यात राहायचे. तिथे बाजूलाच माझ्या मावशीचे म्हणजे उद्धवराव जोशींचे बिऱ्हाड होते. दोन्ही घरे लागून शेजारी असल्यामुळे दोघांचेही चांगलेच गुळपीट होते. लग्नाआधी शिक्षणासाठी काही वर्ष माझी आई मावशीकडे राहिली होती. त्यामुळे तिचे आणि वैद्य कुटुंबाचे चांगलेच संबंध होते. लग्नानंतर बाबांशीही त्यांचा परिचय झाला. ते संबंध त्यांनीही जपले. आम्ही थोडे मोठे झालो तोवर मात्र वैद्य कुटुंबाने कोलत्यांचा वाडा सोडला होता. त्यामुळे आम्हा मुलांचा वैद्य परिवाराशी फारसा संबंध नव्हता. दरम्यानच्या काळात हिस्लॉप कॉलेजमधली प्राध्यापकी सोडून बाबुराव आणि दैनिक तरुण भारतचे कार्यकारी संपादक म्हणून काम सुरू केले होते. त्यामुळे शालेय शिक्षण संपवून कॉलेजमध्ये गेल्यावर कधी मध्ये कार्यक्रमात बाबुरावंचे ओझरते दर्शन व्हायचे. मात्र प्रत्यक्ष परिचय झाला नव्हता.

१९७१ मध्ये संघ शिक्षा वर्गाच्या प्रथम वर्षाला प्रशिक्षणार्थी म्हणून असताना बाबुरावंचा मुलगा मनमोहन (संघाचे विद्यमान सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य) हा देखील माझ्यासोबत होता. त्यावेळी वर्गात एकदाच बाबुराव आले असल्याचे आठवते..मात्र तेव्हाही भेट आणि परिचय होऊ शकला नव्हता. तो व्हायला खूप काळ लोटावा लागला. त्यावेळी मी २३ वर्षाचा होतो. मुंबई दूरदर्शनचा वृत्त छायाचित्रकार म्हणून कार्यरत होतो. जानेवारी १९७९ मध्ये नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार आणि ख्यातनाम हिंदी साहित्यिक अनंत गोपाळ शेवडे यांचे निधन झाले. त्या दिवशी लगेचच मुंबई दूरदर्शनचे वृत्त निर्माता डॉ. गोविंद गुंठे यांचा मला फोन आला. अनंत गोपाळ शेवडे यांच्या अंत्ययात्रेचे संपूर्ण चित्रीकरण करून मी मुंबईला पाठवावे, तसेच मुंबई दूरदर्शनने शेवड़ेंवर आयोजित विशेष श्रद्धांजली कार्यक्रमात बोलण्यासाठी नागपूरहून कोणी ज्येष्ठ पत्रकार येऊ शकतील का, तसे आयोजन करून त्यांना पाठवावे अशा सूचना गुंठेंनी मला दिल्या. जेष्ठ पत्रकार म्हटल्यावर मला बाबुरावांची आठवण झाली. तोवर आम्ही प्रत्यक्ष भेटलो नव्हतो. तरीही हिम्मत करून त्यांना तरुण भारत कार्यालयात फोन केला.

त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. ते स्वतः कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबईला जाऊ शकणार नव्हते. मात्र त्यांनी काही नावे सुचवली. मग मी पुढील हालचालींना लागलो. दुसऱ्या दिवशी शेवड्यांच्या अंत्ययात्रेत बाबुराव अगदी त्यांच्या निवासस्थानापासून तर थेट मोक्षधाम घाटापर्यंत सहभागी झाले होते. मी देखील संपूर्ण चित्रीकरण करत होतो. मला चित्रीकरण करताना बाबुराव बघत असावे. त्या दिवशी मोक्षधाम घाटावरून अंत्यसंस्कार आटोपून परत निघालो. तितक्यात बाबुराव देखील तिकडून परत निघत होते. मी दिसताच ते माझ्या जवळ आले आणि मला विचारले, “तुम्हीच का ते मुंबई दूरदर्शनचै पाठक?” मी होकार देताच ते माझ्याशी आपुलकीने बोलू लागले. मग मी त्यांना आणखी ओळख दिली.” मी आपले जुने शेजारी उद्धवराव जोशी मास्तरांची साळी शांता पोफळीचा मुलगा” ही ओळख सांगताच बाबुराव एकदम माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले “अरे मग तू तर फारच जवळचा निघालास.” मग त्यांनी माझी अधिक खोलात जाऊन चौकशी केली. दूरदर्शन साठी छायाचित्रण करत असतानाच मी प्रेस फोटोग्राफी सुद्धा करतोय हे कळल्यावर त्यांनी लगेच “मग तू तरुण भारतात ये, आम्हालाही काही फोटो लागले तर तुला सांगत जाऊ.” असे सांगत सहकार्याचा हात पुढे केला.

तेव्हापासून माझा आणि बाबुरावंचा चांगलाच परिचय झाला. अधून मधून कार्यक्रमांमध्ये भेटी झाल्या की ते सर्वांची चौकशी करत, काही माहिती देऊ लागले.सर्वांशी संबंध जपणे हे बाबुराव वैद्यांचे एक वैशिष्ट्य होते. तसा विचार करता माझ्या तुलनेत ते खूपच मोठे होते. सामाजिक दृष्ट्या देखील त्यांची प्रतिष्ठा खूप मोठी होती. तरीही मला आठवते १९८० मध्ये जेव्हा दूरदर्शनच्या वृत्तछायाचित्रकारांच्या राष्ट्रीय पातळीवरील चमूत माझी निवड झाल्याची बातमी आली, तेव्हा बाबुरावंनी स्वतःहून मला घरी फोन केला होता. १९८१ मध्ये माझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नाचे निमंत्रण त्यांना दिले. तेव्हाही ते आवर्जून विवाह सोहळ्याला उपस्थित राहिले होते.१९८५-८६ च्या दरम्यान बाबुराव तरुण भारतातून मुख्य संपादकपदावरून निवृत्त झाले. तरीही तरुण भारत संचालित करणाऱ्या नरकेसरी प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होतेच. त्या निमित्ताने कधीमधी आमच्या भेटी व्हायच्या. बरेचदा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा आम्ही भेटायचो. दरवेळी भेटले की ते आई-बाबांची आवर्जून चौकशी करायचे. तसेच मावशी कडची देखील चौकशी ते करायचे. नागपुरात दिलीप देवधरने ज्ञानयोद्धा व्याख्यानमाला सुरू केली होती. या व्याख्यानमालेत बाबुरावंची बरीच भाषणे झाली होती.

त्यावेळी मी वृत्त संकलनासाठी नेहमी जात असे. तिथे बाबुरावंची भेट व्हायची. १९९० मध्ये माझ्या लग्नाला देखील ते उपस्थित राहिले होते. १९९५ नंतर बाबुराव तरुण भारतातून पूर्णतः निवृत्त होऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य म्हणून कार्यरत झाले. पुढे ते संघाचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणूनही कार्यरत झाले होते. याच काळात मी पूर्ण वेळ मुद्रित माध्यमांमध्ये पत्रकार म्हणून कार्यरत झालो होतो. दैनिक पुढारी कोल्हापूरचा विदर्भ प्रतिनिधी म्हणून मी नागपुरात वृत्त संकलन करत असे. त्यावेळी मग पुन्हा पत्र परिषदांच्या निमित्ताने बाबुरावांची भेट होऊ लागली. २००२ पासून मी रामटेकच्या गडावरून या नावाने एक दिवाळी अंक प्रकाशित करू लागलो. त्यासाठी मग बाबुरावंकडे विविध राजकीय विषयांवर वैचारिक लेख द्यावा म्हणून विनंती करण्यासाठी मी जात असे. पूर्वी तरुण भारतात असताना त्यांना तरुण भारत कार्यालयात भेटायचो. आता मात्र त्यांना त्यांच्या धंतोलीतल्या घरी भेटावे लागायचे. मग मी घरी गेलो की आवर्जून वैद्य काकूंना बोलावून सांगायचे, “याला ओळखलं का, हा अविनाश पाठक, आपण कोलत्यांच्या वाड्यात राहायचो, तेव्हा शेजारच्या जोशी मास्तरांची साळी शांता पोफळी होती ना, तिचा हा मुलगा” मग वैद्यकाकुंशीही गप्पा व्हायच्या. पहिल्यांदा जेव्हा लेख मागायला गेलो, तेव्हा मी घाबरत घाबरतच बाबुरावंना मानधनाची अपेक्षा विचारली. तेव्हा त्यांनी मला “तू दिवाळी अंक काढायची हिंमत करतो आहेस हेच माझ्यासाठी खूप आहे. मला वेगळं मानधन नको, तू छान अंक फक्त काढ.” असे म्हणून प्रोत्साहन देखील दिले. तेव्हापासून दरवर्षी बाबुरावंचा एक लेख मी हक्काने घेत असे. त्यांनीही कधी मला नकार दिला नाही.

याच दरम्यान २००५ मध्ये वडिलांचे आणि २००६ मध्ये आईचे निधन झाले, त्यावेळी संघाचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य असल्यामुळे बाबुरावंचा देशभर प्रवास सुरू असायचा. मात्र त्या व्यस्ततेतही आईबाबा गेल्याचे कळल्यावर ते घरी भेटायला येऊन गेले होते.काळात बाबुरावंचा एक धाकटा मुलगा श्रीनिवास हा देखील पत्रकारितेत सक्रिय होता. त्याच्याशीही माझा चांगला परिचय झाला. दरम्यान वर्धा येथे असलेला त्यांचा दुसरा मुलगा भूषण याचाही माझा परिचय झाला. त्यामुळे कौटुंबिक स्नेहबंध अधिकच घट्ट होऊ लागले. बाबुराव वयाची ९७ वर्षे जगले आणि अखेर पर्यंत ते सक्रिय देखील होते. आमच्यासारख्या त्यांच्या तुलनेत तरुण असलेल्या पत्रकारांना ते सांगायचे “मी शंभर वर्ष जगणार आहे आणि माझी शंभरी तुम्हा पोरांना साजरी करायची आहे.” विशेष म्हणजे ते शेवटले काही दिवस सोडले तर हिंडते फिरते होते. जाहीर कार्यक्रमांना देखील जायचे कुठे भाषणांना बोलावले तर ते आयोजकांना सांगायचे, “मी भाषणाला येतो, भाषण देईल, मात्र मी बसून बोलेन आणि जेवढं बोलता येईल तेवढेच बोलेल. २००९ पासून मी माझ्या आई-वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी मान्यवरांची व्याख्याने आयोजित करत असे.

२०१६ मध्ये वडिलांची तारखेने पुण्यतिथी रक्षाबंधनाच्या दिवशी आली. मग त्या दिवशी मी “रक्षाबंधनाचा धार्मिक आणि सामाजिक अन्वयार्थ” या विषयावर बाबुरावंचे व्याख्यान आयोजित केले होते. सुगंध मंगल कार्यालयात झालेल्या या व्याख्यानाचे अध्यक्ष नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन प्र कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे होते व्याख्यानाच्या सुरुवातीलाच बाबुरावंनी माझे वडील आणि आई यांचे आणि बाबुरावंचे असलेले स्नेहबंध उलगडले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर लावलेल्या बॅनरवर विष्णुपंत आणि सुमतीबाई पाठक स्मृती प्रतिष्ठान असे लिहिले होते. त्यावर बाबुराव म्हणाले की “अविनाश च्या आईचे नाव सुमती बाई आहे हे मला आज कळले. आजवर मी त्यांना आमच्या शेजारच्या जोशी मास्तरांची साळी शांता पोफळी म्हणूनच ओळखत होतो.” दोन मिनिटे त्यांनी कोलतेंच्या वाड्यातील आठवणी देखील सांगितल्या. तिथे बाबुराव खाली राहायचे. आणि वरच्या मजल्यावर कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले डॉ. विनायक देशपांडे यांचे आई-वडील राहायचे. त्यावेळी तुमचा जन्मही झाला नव्हता, आम्ही खाली नळ सोडला की देशपांडे कडले पाणी बंद होत असे” असे देशपांडे यांना सांगून त्यांचेही कौटुंबिक स्नेहबंध बाबूरावांनी उलगडले.वयापरत्वे हळूहळू बाबुराव थकत होते.

त्यांना वयाची ९५ वर्षे पूर्ण झाल्यावर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता. त्यावेळी नागपुरात महर्षी व्यास सभागृहात झालेल्या त्या समारंभात बोलताना बाबुरावंनी “आता मी मृत्यूला केव्हाही सामोरे जायला तयार आहे” असे जाहीर करून निरवानिरवीर्ची भाषा बोलायला सुरुवात केली होती. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत माझा मुंबईचा पत्रकार मित्र सुकृत खांडेकर नागपुरात आला होता. त्याला बाबुरावंची भेट घ्यायची होती. म्हणून मी बाबूरावंना फोन केला. त्यांनी दिलेल्या वेळेवर मी आणि सुकृत त्यांच्या घरी पोहोचलो. जवळजवळ दीड तास आमच्या गप्पा झाल्या. तेव्हाही वैद्यकाकूंना बाबुरावंनी “याला ओळखलं का, हा जोशी मास्तरांची साळी शांता पोफळीचा मुलगा” अशी ओळख करून दिली होती. ती माझी आणि बाबुरावंची अशी निवांत झालेली शेवटचीच भेट होती. २०२० च्या मार्च महिन्यात नागपुरात बाबुरावांच्या ९७ व्या वाढदिवसानिमित्त सुरेश भट सभागृह जाहीर कार्यक्रम झाला होता.

यावेळी संघाचे सरसंघाचालक डॉ. मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे मंत्री अनिल देशमुख, असे सर्वच मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर व्यासपिठावर बाबूरावांची घाई घाईत भेट झाली. तिथे त्यांना भेटणारे देखील खूप लोक होते. गर्दीत जास्त बोलतही आलेले नाही. नंतर लगेचच कोरोना काळ सुरू झाला. त्यामुळे कुणाला जाऊन भेटणे शक्यच नव्हते. २०२० च्या दिवाळीत मनमोहनजींची भेट झाली होती. त्यावेळी बाबुरावांचे प्रकृती ठीक नसल्याचे कळले. मात्र कोरोना काळ असल्यामुळे जाऊन भेटता आले नाही. नंतर डिसेंबर २०२० मध्ये अचानक बाबुराव गेल्याचीच बातमी आली. बाबुरावंच्या अंत्ययात्रेत मी सहभागी झालो होतो. कोरोनाकाळ असून देखील तिथे संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक सुहृद त्यांना आदरांजली अर्पण करायला आले होते. त्यावरून हा माणूस किती मोठा होता हे लक्षात येत होते.

दुसऱ्याच दिवशी काही वृत्तपत्रांमध्ये माझा “नियतीने चुकाविले मा.गो. वैद्यांचे शतक” हा लेखही प्रकाशित झाला होता. बाबुरावंच्या चौदाव्या दिवशी त्यांच्या घरी गेलो असता मनमोहनजी, भूषण आणि श्रीनिवास यांना तो लेख असलेली वृत्तपत्रे देखील मी दाखवली होती.मा.गो.उपाख्य बाबुराव वैद्य हे एक सर्वार्थाने मोठे असलेलेच व्यक्तिमत्व होते. असे असूनही त्यांनी सर्व स्तरात आपले स्नेहबंध जपले होते. त्यापैकी मी देखील एक होतो. त्यामुळेच त्यांच्या आठवणी या कायम राहणारच.

Views: 60
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
कोल्हापुरात अपेडा यांच्यातर्फे गूळ निर्यात क्षमतेसाठी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

कोल्हापुरात अपेडा यांच्यातर्फे गूळ निर्यात क्षमतेसाठी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)