वीर मोटे यांची निवड…
सैनिक शाळा, बिजापुर येथे अखिल भारतीय फेरीत निवड
विभूतवाडी ता. आटपाडी येथील सीमेवर देशसेवा बजावणारे जवान विश्वास मोटे यांचा मुलगा वीर मोटे याने अत्यंत उल्लेखनीय यश मिळवत सरकारी सैनिक शाळा, बिजापुर येथील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत अखिल भारतीय फेरीत यशस्वी निवड झाली आहे.वीरने आपल्या जिद्द, मेहनत व अभ्यासाच्या जोरावर हे यश मिळवले असून तो लहानपणापासूनच सेना अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगत आहे. या त्याच्या स्वप्नाला छोटेसे यश आले असे म्हणावे लागेल.
वीर हा जन्मल्यापासून चौथी इयत्तेपर्यंत वडिलांसोबत सीमेवरील भागात राहत होता. वडिलांचे सैनिकी जीवन, अनुशासन आणि देशसेवा याचा त्याच्या मनावर लहान वयातच प्रभाव पडला होता.पाचवीमध्ये तो Progress English Medium School, पंढरपूर येथे शिकत होता.त्याच बरोबर I Can Institute येथे मार्गदर्शन घेत त्याने सैनिक शाळेच्या प्रवेश परीक्षेसाठी तयारी केली.या परीक्षेत यश मिळवून त्याची अखिल भारतीय स्तरावर निवड झाली आहे.
त्याच्या या यशाचे श्रेय त्याचे वडील विश्वास मोटे, आई मायाक्का मोटे, शिक्षक आणि मार्गदर्शक संस्थेचे आहे. तसेच गावामध्ये व परिसरात आनंदाचे वातावरण असून वीर मोटे याने अधिकारी होण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


