आयुष्यातले सांगाती १९,
शक्तीकुमार संचेती,
ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
आज ३१ जुलै २०२५, मध्य भारतातील आघाडीचे बांधकाम व्यावसायिक आणि उद्योगपती स्व. शक्तीकुमारजी उपाख्य भाऊ संचेती यांचा आज पंधरावा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने शून्यातून विश्व निर्माण करत आयुष्यभर माणुसकी उधळत जाणाऱ्या या माणूसवेड्या व्यक्तीचे आज मी पुण्यस्मरण करायचे ठरवले आहे.
शक्तीभाऊ संचेती ३१ जुलै २०१० ला गेले. त्या दिवशी त्यांच्या अंत्ययात्रेत नागपुरातील लक्ष्मीभुवन चौक ते अंबाझरी घाट या मार्गावर त्यांचे सुमारे १५००० सुहृद सहभागी झाले होते. यावरून त्याचे माणूसवेडे व्यक्तिमत्व लक्षात यावे. त्यावेळी त्यांच्या अकराव्या दिवशी मी “माणुसकीची उधळण करणारा भांडवलदार” असा एक लेख लिहिला. तो तरुण भारत, नागपूर ने प्रकाशित केला होता. त्यानंतर त्यांच्या पहिल्या स्मृतीदिनाला “मारवाडी कंजूष कसा?” या शीर्षकाचाही एक लेख त्यांच्यावर लिहिला होता. हे दोन्ही लेख माझ्या खिडकीतल्या आकाश आणि गाभाऱ्यातला कवडसा या दोन पुस्तकांमध्ये प्रकाशित झालेले आहेत. भाऊंचा माझा संबंध जवळजवळ सोळा वर्षांचा. मात्र या काळातल्या असंख्य आठवणी सांगण्याजोग्या आहेत. त्यामुळेच आज पुन्हा एकदा त्यांच्या आठवणी मी वाचकांशी शेअर करणार आहे.
छायाचित्रण आणि पत्रकारिता या क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे शक्तीकुमार संचेती हे नाव मी ऐकून होतो. मात्र प्रत्यक्ष परिचय असा कधी झाला नव्हता. नाही म्हणायला एकदा १५ ऑगस्ट १९८२ ला नागपूर विमानतळावर त्यांची भेट बांधकाम व्यावसायिक नंदा खरे यांच्यासोबत झाली होती. त्यादिवशी नागपूर दूरदर्शनची सुरुवात झाली होती आणि सकाळी दूरदर्शनचे प्रसारण होत असताना जनसामान्यांच्या प्रतिक्रियांचे चित्रीकरण मुंबई दूरदर्शन ला घाईने पाठवायचे होते. त्यावेळी मुंबई दूरदर्शनला पाठवायची एक फिल्म त्यांच्याकडे दिली होती. ती त्यांनी त्याच दिवशी पोहोचवली. कारण त्या दिवशी सकाळी मी नागपुरात केलेले चित्रीकरण रात्री दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणात दाखवण्यात आले होते. त्यालाही कुठेतरी अप्रत्यक्षरीत्या का होईना पण भाऊ संचेतीच कारणीभूत ठरले होते. कोणालाही मदत करणारे हे व्यक्तिमत्व त्या दिवशी माझ्या लक्षात राहिले होते.
त्यानंतर कधीतरी एक दोनदा माझे एक स्नेही दिनकरराव देशपांडे सोबत एक दोनदा मी त्यांच्या घरीही गेलो होतो. मात्र ती ओझरतीच भेट होती.
भाऊंचा माझा खरा संपर्क आला तो मार्च १९९४ पासून. त्यावेळी त्यांना एका प्रकल्पाचे प्रेझेंटेशन करण्यासाठी एक फिल्म बनवायची होती. तिचे चित्रीकरण झाले होते. मात्र एडिटिंग करून प्रॉपर फॉर्म मध्ये प्रेझेंटेशन बनवायचे होते. नागपुरात कोण करणार या शोधात ते होते. त्यावेळी दिनकरराव देशपांडे यांनी माझे नाव सुचवले आणि मला दिनकरराव संचेतींच्या घरी घेऊन गेले.
त्यावेळी धंद्यातली काही गणिते चुकल्यामुळे मी अत्यंत वाईट परिस्थितीत होतो. प्रचंड आर्थिक समस्येचा सामना मी करत होतो. अशा काळात जवळचे देखील परके होतात हा अनुभव मी घेतला होता. अडचणीच्या काळात कोणी एक रुपयाही उसना देत नव्हते. त्या काळी दिनकरराव मला त्यांच्याकडे घेऊन गेले. तिथे भाऊंनी त्यांचे बंधू अभय संचेती यांच्यासोबत बसवून मला कामाचे स्वरूप सांगितले. मी इतर तंत्रज्ञांची मदत घेऊन तीन दिवसात हे काम पूर्ण करता येईल असा त्यांना विश्वास दिला. त्यावेळी लगेच त्यांनी कामाला सुरुवात करायला सांगितले. आणि मी काहीही न मागता त्यांनी खटकन १००० रुपये मला ऍडव्हान्स म्हणून देऊ केले. त्या काळात एका रुपयासाठीही कपाळाला हात लावून बसणारा मी, कोणीतरी माझ्यावर हजार रुपयांसाठी विश्वास टाकते आहे हे बघून भारावलो, आणि तेव्हापासून मी त्यांचे पडेल ते काम करायचे ठरवून टाकले.
मी जरी ठरवले असले तरी तितकाच सकारात्मक प्रतिसाद मला भाऊ संचेती आणि त्यांच्या परिवाराकडूनही मिळाला. मार्च १९९४ मध्ये दिलेले ते काम ठरल्याप्रमाणे तीन दिवसात पूर्ण केले. त्यानंतर लगेचच त्याच संदर्भात अजून काही काम करायलाही त्यांनी फोन करून बोलावले. त्याच दरम्यान माझ्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्या काळातही भाऊंनी फोन करून काही मदत हवी आहे का हे मला विचारले होते. अगदी नव्या ओळखीत सुद्धा त्यांनी मदतीचा हात पुढे गेला होता.
त्यानंतर वर्षभरातच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आल्या. त्यावेळी भाऊंचे बंधू चैनसुख संचेती मलकापूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवणार होते. ते भाजपाकडून लढणार असे चालू होते. मात्र ऐनवेळी त्यांना भाजपकडून उमेदवारीला करण्यात आली. परिणामी त्यांनी अपक्ष म्हणून लढवायचं ठरवले. त्यावेळी निवडणुकीच्या काळात मी मलकापूरात राहून काही टीव्ही फिल्म च्या माध्यमातून प्रचार करता येईल का याची योजना करायला मला सांगण्यात आले होते. त्यानुसार ती योजना ठरवून मी मलकापूरला गेलो. भाऊ तिथेच होते. त्या निवडणुकीत टी. एन. सेशनचे कडक कायदे लागू होते. त्यामुळे माझी योजना कार्यान्वित करणे जड जाईल असे सगळ्यांचेच मत पडले. त्यामुळे मी परतायचं ठरवले. रात्रीची गाडी होती. त्यामुळे दुपारी मोकळा वेळ होता. भाऊंसोबत काही मंडळींची चैनसुख संचेतींचा वृत्तपत्रतून प्रचार कसा करायचा याबाबत चर्चा सुरू होती. मी शांतपणे बाजूला बसून ऐकत होतो. त्यावेळी त्या चर्चेत मी सहभाग घेऊन एक दोन उपाय सुचवले. ते भाऊंना एकदम पटले. त्यांनी लगेच मला सांगितले “मी आज दुपारीच नागपूरला जातो आहे. तुम्ही आज दुपारभरात या विषयावर इथल्या मंडळींची चर्चा करा. रात्रीच्या गाडीने निघून नागपूरला आलात की उद्या सकाळी मला भेटा. आपण निश्चित करू आणि तुम्ही ते जबाबदारी सांभाळा”. मग मी देखील स्थानिक मंडळींसोबत बसून चर्चा केली आणि योजना बनवली. दुसऱ्या दिवशी नागपुरात ती योजना भाऊंना सांगितली आणि त्यांनी लगेच माझ्या हातात काही रक्कम देऊन कामाला सुरुवात करायला सांगितले. सुमारे पंधरा दिवस मी त्या कामात त स्वतःला झोकून दिले होते. दर चौथ्या दिवशी मी नागपूरला यायचो आणि भाऊंना अहवाल देऊन कुठली योजना कार्यान्वित करायला परत मलकापूरला जायचो. त्या दिवसात मलकापुरात चैनसुख संचेतींच्या वृत्तपत्रीय प्रचाराचा जबरदस्त माहोल तयार झाला होता. त्याच दरम्यान भाऊंचा धाकटा मुलगा आनंदचा नागपुरात विवाह सोहळा होता. त्याच दरम्यान मी नागपुरात आलो होतो. संध्याकाळी स्वागत समारंभाला मी पोहोचलो. तेव्हा दारावर उभा असलेल्या भाऊंनी मला पहिला प्रश्न केला. “पाठकजी मलकापूरची काय हालचाल?” मी लगेच उत्तरलो “भाऊ दहा हजारांनी आपली सिट निघते.” ते लगेचच सुखावले. दुसऱ्या दिवशी ते देखील मलकापुरात पोहोचले होते. सर्वांचेच प्रयत्न कारणीभूत झाले. परिणामी अपक्ष म्हणून निवडणूक लढणारे चैनसुख संचेती तब्बल १२ हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले.
चैनसुख संचेती आमदार म्हणून विजयी झाले. त्यानंतर एक दिवस भाऊंनी मला फोन करून बोलावले आणि तुम्ही चैनसुखला काही काळ प्रसिद्धी आणि इतर कामात मदत करा असे सुचवले. तेव्हा माझ्या हातातही काही काम नव्हते. त्यामुळे मी लगेच तयार झालो. तिथून मग भाऊंचा नियमित संपर्क सुरू झाला. मलकापूर मुंबई अशा माझ्या फेऱ्या सुरू झाल्या.
तेव्हापासूनच माझा आणि शक्ती भाऊंचा नियमित संपर्क सुरू झाला. दरवेळी मलकापूर किंवा मुंबईहून परत आलो की भाऊ मला बोलावून घेत आणि सर्व अहवाल विचारत. वस्तूतः त्यांच्या तुलनेत मी फारच लहान माणूस होतो मात्र तरीही ते मला कायम सन्मानाने वागवत आले. कायम मला पाठकजी म्हणूनच ते हाक मारायचे. दरवेळी त्यांच्याकडे गेल्यावर कधी चहा तर कधी ताक घेतल्याशिवाय जाऊ देत नसत. जेवणाची वेळ असली तर ते आग्रहाला जेवायलाच बसवायचे. वृत्तपत्रीय क्षेत्रात माझा संपर्क चांगला होता. त्याचा त्यांनाही उपयोग व्हायचा आणि माझ्या हाताला काही कामही मिळत होते.
कामाचे बोलणे झाले की भाऊ इतरही गप्पा मारायचे. त्यावेळी आयुष्यात त्यांनी कसा संघर्ष केला याचेही काही अनुभव सांगायचे. मलकापूरला त्यांचे वडील आणि काका हे राजकारणात होते. शेती हाच त्याचा मुख्य व्यवसाय होता. त्यावेळी भाऊंनी नागपुरात येऊन बांधकाम व्यवसायात उडी घेतली. छोटी छोटी कामे करत ते पुढे आले आणि नंतर करोडोंची कामे करणारी बांधकाम व्यावसायिक बनले.
भाऊंना माणसांचे फार वेड होते. कोणाशीही संपर्क आला की त्याच्या परिवाराची पूर्ण चौकशी भाऊ करायचे. अनेकदा त्यातले अनेकजण भाऊंचे परिचितही निघायचे, आणि मग संपर्कात आलेल्या त्या व्यक्तीशी आपसूकच त्यांची जवळीक साधली जायची. प्रत्येकाच्या सुखदुःखाची जाणीव ते ठेवायचे. आयुष्यात पैसा दुय्यम माणुसकी प्रथम हे त्यांचे ध्येय होते. त्याचा अनुभव अनेकांनी घेतला त्यातला मी देखील एक होतो.
या काळात माझे छोटे-मोठे वृत्तपत्रीय लेखन सुरू होते. १९७७ मध्ये दैनिक पुढारी कोल्हापूरने नागपुरातील प्रतिनिधी म्हणून मला कंत्राटी पद्धतीवर नियुक्त केले. हे भाऊंना कळल्यावर त्यांनी इतर काही वृत्तपत्रांसाठी तुका प्रयत्न करत नाहीस म्हणून सुचवले. त्यानुसार मग दैनिक गावकरी नाशिक, दैनिक नवशक्ती मुंबई, दैनिक लोकपत्र औरंगाबाद यांच्यासाठी देखील मी काम करू लागलो. सोबत चैनुभाऊंचे काम सुरू होतेच.
१९९५ ते २००१ या काळात मी चैनुभाऊं सोबत काम केले. तेव्हा भाऊंचा नियमित संपर्क येत होता. याच काळात मलकापूर अर्बन बँकेची निवडणूक आणि मलकापूर सूतगिरणीची निवडणूक देखील आली. त्यानंतर १९९९ ची चैनुभाऊंची दुसरी विधानसभा निवडणूक देखील आली. या काळात भाऊंच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू मला अनुभवता आले.
आपल्या सोबत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बाहेरच्या लोकांसमोर सांभाळून घ्यायचे, मग भलेही तो चूक असो, त्याला उघडे पडू द्यायचं नाही, हे भाऊंचे धोरण होते. मला आठवते १९९९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस मलकापूरचे भाऊंचे अकाउंटंट पाटील आणि माझी मलकापूरच्या एका व्यावसायिकाशी वादावादी झाली. तो व्यावसायिक आम्हाला उलट सुलट बोलू लागला. तेव्हा बाजूलाच असलेले शक्तीभाऊ मध्ये पडले आणि त्या व्यावसायिकालाच त्यांनी चांगलेच दाटले. माझ्यासमोर माझ्या माणसांचा अपमान मला सहन होणार नाही असे सुनावत त्या व्यावसायिकाला तिथून जायला लावले. मग मात्र त्यांनी नेमके प्रकरण काय आहे ते विचारून आम्हा दोघांनाही कानपिचक्या दिल्या होत्या.
२००१ मध्ये मी चैनुभाऊंचे काम बंद केले. त्यावेळी थोडे उभयपक्षी गैरसमज झाले होते. भाऊंना जेव्हा हे कळले, तेव्हा त्यांनी दिनकरराव देशपांडे यांना सांगून मला बोलावून घेतले, आणि माझी बाजू ऐकून त्यातून मार्ग काढता येतो का हे देखील बघितले. त्या काळात माझ्या आई-वडिलांची प्रकृती चांगले राहत नव्हती. त्यामुळे मग मी देखील आता फारसा प्रवास करायचा नाही, नागपुरातच राहायचे असे ठरवल्याचे त्यांना सांगितले. तर “मग तुम्ही इथेच राहून आम्हाला काय लागेल ती मदत करत चला पण संबंध कायम राहू द्या “असे त्यांनी सुचवले. त्यानुसार आमचे कौटुंबिक स्नेहबंध कायम राहिले. ते आजही कायम आहेत. आज अजयभाऊंना किंवा चैनुभाऊंना लागेल तेव्हा ते मला बोलावतात आणि मला देखील काही जरूर पडली तर मी हक्काने त्यांच्याकडे जातो.
शक्तीभाऊ हे करोडोचा व्यवहार करणारे व्यावसायिक तर मी एक सामान्य पत्रकार, मात्र आमच्या प्रत्येक पारिवारिक कार्यक्रमात ते आवर्जून उपस्थित राहायचे. त्यांच्याकडल्या सर्व समारंभांना देखील ते आम्हाला सन्मानाने बोलवायचे. कोणाच्याही सुखदुःखाच्या प्रसंगात धावून यायचे. तीच परंपरा भाऊ नंतर त्यांचे दोघेही चिरंजीव अजय भाऊ आणि आनंद यांनी कायम ठेवली आहे.
एकदा संचेतींबद्दल फारसे चांगले मत नसलेल्या एका राजकीय मित्राने मला विचारले “तुम्ही सारखे त्या संचेतींसोबत असता. त्यांनी तुम्हाला आतापर्यंत काही एखाद करोड रुपये तरी दिले का? मी त्यांना उत्तर दिले.” मला इतक्या पैशांची गरजही नाही” त्यावेळी टीव्हीवर आयसीआयसीआय बँकेची एक जाहिरात यायची. त्या जाहिरातीत एक लहान मुलगा शाळेत जायला रडतो आहे, आणि त्याचे आई-वडील अस्वस्थ आहेत, किंवा मग एक नववधू सासरी जायला निघाली आहे, आणि तिच्या माहेरचे अस्वस्थ आहेत. त्यावेळी कोणीतरी मागून आवाज देतो “आम्ही आहोत ना” (हिंदीत हम है ना) अशी ती जाहिरात होती. आणि माझे मागेच आयसीआयसीआय बँक तुमच्या सर्व सुखदुःखात तुमच्या मागे आहे असे सांगितले जात होते. या जाहिरातीचे उदाहरण देऊन मी माझ्या या मित्राला सांगितले की “संचेती परिवाराने मला काय दिले हे महत्त्वाचे नाही. तर माझ्या प्रत्येक सुखदुःखाच्या अडचणीच्या प्रसंगी जेव्हा मी अस्वस्थ झाल्याचे कळते तेव्हा लगेच निरोप येतो, पाठकजी आम्ही आहोत तुमच्यासोबत. काळजी करू नका आणि त्यावेळी मला त्यांच्याकडून योग्य तो आधार दिला जातो. मला तेवढाच पुरेसा आहे.” खरोखरच माझ्या प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी भाऊ आणि त्यांचे कुटुंबीय खंबीरपणे माझ्यासोबत उभे राहिले आणि मला मदत केली. माझ्यासाठी तेच खूप आहे.
२००२ पासून मी एक साप्ताहिक सुरू केले होते. ते वर्ष दोन वर्ष चालवले. नंतर फक्त एक दिवाळी अंक काढायचं त्यावेळी दरवर्षी भाऊंच्या कंपनीची मला जाहिरात मिळायची. त्यासाठी आग्रह धरावा लागत नव्हता. भाऊ आपले व्यावसायिक मित्र एकत्र करून वर्धमान अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक सुरू केली. त्यावेळी मी न मागताच मला आणि माझ्या कुटुंबीयांना त्या बँकेचे काही शेअर्स भाऊंनी अलॉट केले होते. कुठेही कोणत्याही कार्यक्रमात ते भेटले की सोबतच्या परिचितांना माझा सन्मानाने ते परिचय करून घ्यायचे. माझे पहिले पुस्तक प्रकाशित होणार असे कळले तेव्हा त्यांनी त्याचे कौतुकच केले होते, आणि प्रकाशन समारंभाच्या वेळी मी न मागताही त्यांनी आर्थिक मदत स्वतःहून पाठवली होती.
२००९ मध्ये माझ्या नव्या घराचा वास्तु समारंभ झाला. त्यावेळी भाऊ आवर्जून समारंभाला आले होते. नंतर देखील ते घराच्या बाबत काही अडचणी आल्या का? बिल्डरने सर्व काही व्यवस्थित केलेला ना, याची चौकशी करायचै. २०१० मध्ये माझ्या एका पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला होता. त्यानिमित्ताने आम्ही घरी एक धार्मिक कार्यक्रम केला आणि संध्याकाळी सर्व आप्तेष्टांना स्नेहभोजनासाठी बोलावले होते. त्या दिवशी काही कारणाने भाऊ आणि वहिनी येऊ शकले नाहीत. मात्र दुसऱ्या दिवशी ते फोन करून आले आणि जवळजवळ तासभर त्यांनी गप्पा केल्या. सगळ्यांची चौकशी केली होती.
काहीही काम आठवले की भाऊ मला फोन करून घरी बोलवायचे. २००८ मध्येच नागपुरातलेच दुसरे एक बांधकाम व्यवसाय प्रभाकरराव मुंडले यांचे “आम्ही बिघडलो” हे आत्मचरित्र प्रकाशित झाले होते. त्यावेळी त्यानंतर मी देखील भाऊंच्या मागे लागलो की, तुम्हीही आत्मचरित्र लिहा. तुम्ही सांगा मी शब्दांकन करतो. मात्र भाऊ ते टाळत होते. मला आठवते २०१० च्या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक दिवस भाऊंनी काही काम होते म्हणून मला घरी बोलावले. त्या दिवशी कामाबद्दल चर्चा झाली. नंतर त्यांच्या अघळपघळ स्वभावानुसार इतर गप्पा सुरू झाल्या. त्यावेळेस मी पुन्हा आत्मचरित्राचा विषय काढला. तेव्हा ते म्हणाले “पाठकजी मी इतका मोठा माणूस नाही.” त्यावर मी म्हणालो “भाऊ तुम्ही वेळोवेळी हे शून्यातून विश्व उभारण्यासाठी जो काही संघर्ष केला आहे तो नव्या पिढीसमोर यायला हवा. त्यासाठी हे आत्मचरित्र गरजेचे आहे. तुम्ही सांगत चला मी लिहित जातो.” त्यावेळी थोड्या दिवसांनी बघूया असे उत्तर भाऊंनी दिले होते.
मात्र आठवडाभरातच भाऊ गेल्याची बातमी आली. सकाळीच मला फोन आला. मी लगेच त्यांच्या घरी पोहोचलो. हळूहळू त्यांच्या इथे गर्दी जमू लागली होती. दुपारी बाराच्या शुभरास ज्यावेळी त्यांची अंत्ययात्रा निघाली. त्यावेळी तिथे विशाल जनसागर लोटलेला होता. हा माणूस खऱ्या अर्थाने भांडवलदार होता. मात्र त्याचे भांडवल हे माणुसकी इतकेच होते. आणि आयुष्यभर याच भांडवलाची उधळण करत हा माणूस जगला होता. माझ्यासारख्या सामान्य माणसाचा या व्यक्तीशी इतका जवळचा संबंध यावा हे माझे भाग्यच म्हणावे लागेल.


