• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आयुष्यातले सांगाती २०,डॉ विकास महात्मे,..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
August 6, 2025
in Uncategorized
0
आयुष्यातले सांगाती ७……महामहोपाध्याय डॉ वासुदेव विष्णू मिराशी..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

आयुष्यातले सांगाती २०,डॉ विकास महात्मे,..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

डॉ. विकास महात्मे हे एक विख्यात नेत्रशल्यतज्ञ तर आहेतच, पण त्याचबरोबर ते सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत. धनगर समाजाला आरक्षण मिळावे आणि एकूणच मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या समाजाला मुख्य प्रवाहात आणले जावे यासाठी हा विद्वान डॉक्टर कंबर कसून मैदानात उतरलेला देखील जनसामान्यांनी बघितला आहे. ही सर्व गुणवैशिष्ट्ये असलेला हा डॉक्टर अनेकांचा चांगला मित्र देखील आहे. सर्वच क्षेत्रात डॉ. महात्मेंनी मैत्र जपले आहे. त्यांच्या अनेक मित्रांपैकी मी देखील एक आहे.

डॉ. विकास महात्मे हे नाव गेल्या अनेक वर्षांपासून मी सातत्याने ऐकत होतो. एक कुशल नेत्रशल्यचिकित्सक आणि वैद्यकीय व्यवसाय करतानाच सामाजिक बांधिलकी जपणारा डॉक्टर म्हणून त्यांचे नाव मी ऐकून होतो. विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून ते ठिकठिकाणी वैद्यकीय शिबिरे आयोजित करायचे. गोरगरिबांना डोळे तपासून त्यांना चष्मे द्यायचे आणि त्यातही मोतीबिंदू झालेल्या गोरगरिबांची विनामूल्य शस्त्रक्रिया देखील ते करायचे. त्यासाठी त्यांचे नाव माध्यमांमध्ये तर चर्चेत होतेच, पण समाजात देखील त्यांचे नाव आदराने घेतले जात होते. एक पत्रकार या नात्याने त्यांच्याबद्दलची वेळोवेळी माहिती मला मिळत होती. त्यांच्या शिबिरांच्या बातम्या देखील मी करत होतो. मात्र प्रत्यक्ष संपर्क असा आला नव्हता.

२००९ मध्ये माझी एक सहकारी पत्रकार गौरी शास्त्री देशपांडे ही महात्मेंच्या विविध हॉस्पिटल्सची प्रसिद्धी यंत्रणा सांभाळत होती. तिच्या आग्रहामुळे मी एकदा वेळ ठरवून त्यांच्या नागपूरच्या राजीव नगर परिसरातील हॉस्पिटलमध्ये गेलो. ते भव्य हॉस्पिटल पाहून मी देखील थक्क झालो. त्या ठिकाणी नेत्ररोगासंदर्भात सर्व चाचण्या आणि इलाज करण्यासाठी सुसज्ज अशी यंत्रणा होती. ज्याप्रमाणे श्रीमंतांवर किंवा मध्यमवर्गीय रुग्णांवर इलाज करण्यासाठी सोय होती. तशीच गरीब रुग्णांसाठी देखील वेगळी सोय केलेली होती. त्या दिवशी पहिल्यांदा मी त्यांच्या चेंबरमध्येच भेटलो. अर्धा तास आमची विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. सोबत चहा देखील झाला. माझ्या आठवणीनुसार त्या भेटीवर मी नियमित लेखन करीत असलेल्या वृत्तपत्रांमध्ये बातमी देखील दिली होती.

सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या रुग्णसेवेची दखल घेत २०१० मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने त्यांना गणतंत्र दिनी पद्मश्री हा नागरिक पुरस्कार जाहीर केला. त्यावेळी त्यांच्या छत्रपती नगर चौकातील निवासस्थानी मी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी गेलो होतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारे एक स्फूट मी वृत्तपत्रांना पाठवले देखील होते.

धनगर समाजाला मुख्य प्रवाहात आणायचे, आपले सर्व समाज बांधव आपल्याच सारखे पुढे यायला हवेत, यासाठी प्रयत्न करायचे, असे ठरवून २०१२ पासून डॉक्टर महात्मेंनी धनगर समाजाच्या समस्या घेऊन काम सुरू केले. हळूहळू मग मेडिकल कॉन्फरन्सेस मध्ये बोलणारे डॉ. महात्मे धनगर समाजाचे मेळावे आयोजित करू लागले, आणि त्यात समाजाचे मुद्दे घेऊन बोलू लागले. मला आठवते त्यावेळी हॉटेल हरदेव मध्ये त्यांनी एक पत्र परिषद घेतली. त्या पत्र परिषदेत मी देखील होतो. पत्र परिषद संपल्यावर मी सहज त्यांना प्रश्न विचारला “डॉक्टर तुम्ही एक प्रतिथयश वैद्यकीय व्यावसायिक आहात, आता तुम्ही ही आंदोलने मोर्चे आणि मेळावे यात कसे काय उतरलात?” तेव्हाच डॉक्टर लगेच उतरले “माझ्या सर्वच तळागाळातल्या समाज बांधवांसाठी मला काहीतरी करायचे आहे. आतापर्यंत वैद्यकीय व्यावसायिक म्हणून खूप काही मिळवले आहे. आता समाजासाठी तर थोडे काही करू द्या.” आणि खरंच त्यानंतर डॉक्टर महात्मे यांनी स्वतःला या कामात झोकून दिलेले मी बघितले आहे.

त्यांच्यासारखा सुविद्य प्रतीथयश डॉक्टर आपल्या मदतीला आला आहे हे बघून धनगर समाज देखील त्यांच्यासोबत आला. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी प्रवास केला आणि समाज बांधवांना संघटित केले. त्यांचे हे काम बघून त्यावेळी भाजपाचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी या दोघांचेही त्यांच्याकडे लक्ष गेले. भाजप देखील ओबीसी समाजाच्या मागण्या घेऊन त्यावेळी रस्त्यावर उतरत होताच. त्यामुळे फडणवीसांनी त्यांना भाजपमध्ये सहभागी करून घेतले. मग डॉ. महात्मे भाजपच्या बैठकी मेळावे मोर्चे इथे हमखास भेटू लागले. २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी झोकून देत भाजपाचा प्रचार केला होता. त्यामुळे धनगर बांधव मोठ्या प्रमाणात भाजपच्या पाठीशी उभे झालेले बघायला मिळाले.

हे सर्व करत असतानाच त्यांनी वैद्यकीय व्यवसायावरील लक्ष बिलकुल कमी केलेले नव्हते. केव्हाही फोन केला की सध्या पेशंट बघतो आहे थोड्या वेळाने फोन करतो असे उत्तर मिळायचे. एव्हाना नागपुरात त्यांनी तीन हॉस्पिटल्स सुरू केले होते. तरीही व्यवसाय सांभाळून त्यांचे समाजकार्य सुरू होतेच.

त्यांच्या या कामाची दखल घेत भारतीय जनता पक्षाने २०१६ मध्ये त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली. ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाल्याची बातमी आली, त्या दिवशी आम्ही सर्व पत्रकार त्यांच्या छत्रपती नगर चौकातील निवासस्थानी पोहोचलो होतो. आता या संधीचे देखील मी सोने करण्याचा प्रयत्न करणार असे त्यांनी त्यावेळेस स्पष्ट केले होते.

राज्यसभा सदस्य झाल्यावर डॉ. विकास महात्मे अधिकच व्यस्त झाले. मात्र त्याही स्थितीत ते आमच्यासारख्या मित्रांशी संपर्क ठेवून असायचे. मी कधीही त्यांना फोन केला तर आधी त्यांचे स्वीय सहाय्यक उचलायचे. थोड्याच वेळात त्यांचा कॉल बॅक येत असे.

२०१७,१८,१९ या काळात एका पुस्तकाच्या कामासाठी मी सारखा दिल्लीत जात असे. काही वेळा संसद भवनात देखील जावे लागायचे. तिथे हमखास डॉ. महात्मेंची भेट व्हायची. एकदा संसद भवनात नितीन गडकरींच्या ऑफिसमध्ये अचानक डॉक्टर भेटले. मला बघताच ते आश्चर्यचकित झाले. “अरे तुम्ही इथे कधी आलात आणि कसे काय?” हा प्रश्न त्यांनी विचारला. मी गमतीत त्यांना उत्तर दिले “तुम्ही नागपुरात भेटत नाही म्हणून तुमच्या शोधात इथवर आलो,” त्यावर ते हसले आणि “चला थापा मारू नका” असे म्हणत मला संसद भवानाच्या कॅन्टीनमध्ये घेऊन गेले होते. तिथे बऱ्याच गप्पा झाल्या त्यांनी घरी येण्याचेही आमंत्रण दिले मात्र घरी जाणे काही झालेच नाही. नंतरही त्या कामासाठी जेव्हा जेव्हा दिल्लीत जात असे तेव्हा त्यांची कुठेतरी भेट व्हायचीच.

२०२२ च्या डिसेंबर महिन्यात नागपूरच्या प्रेस क्लब मध्ये पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात विविध क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर मंडळी किंवा त्यांच्या हॉस्पिटल मधील तज्ञ स्टाफ सहभागी झाला होता. मी देखील स्वतःची तपासणी करून घ्यायला तिथे गेलो होतो. डोळे तपासण्यासाठी तिथे गेलो असता ही मंडळी डॉक्टर महात्मेंच्याच हॉस्पिटलमधली आहेत असे कळले. माझे दोन्ही डोळे तपासल्यावर त्या डॉक्टरांनी माझ्या दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू असल्याचे निदान केले. मात्र आपल्याला कोणताही त्रास होत नाही म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केले होते.

दोन-तीन दिवसातच डॉक्टर महात्मेंचा माझ्या मोबाईलवर फोन आला. त्यांनी तिथल्या पत्रकार क्लब मध्ये केलेल्या तपासण्यांचे अहवाल बघितले होते. त्यात माझ्या दोन्ही डोळ्यांमध्ये मोतीबिंदू आहे हे त्यांनी वाचले होते. तोच संदर्भ घेऊन त्यांनी फोन केला, आणि मला सोमवारी १२ नंतर राजीव नगरच्या हॉस्पिटलमध्ये भेटा असे फर्मावले. मी थोडी टाळाटाळ केली तर ते प्रेमानेच रागावले आणि “डोळ्याच्या बाबतीत दुर्लक्ष करू नका, परवा या, मी डोळे तपासतो” असे त्यांनी सांगितले. त्यामुळे माझाही नाईलाज झाला.

ठरल्याप्रमाणे सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास मी डॉक्टर महात्मे यांच्या राजीव नगरच्या हॉस्पिटल मध्ये गेलो. तिथे काउंटरवर माझे नाव सांगतात लगेचच तिथल्या रिसेप्शनिस्टने “महात्मे सरांनी तुम्ही येणार म्हणून सांगितले आहे” असे सांगून लगेच मला ताब्यात घेतले. मग सुमारे तीन तास माझ्या डोळ्यांच्या विविध तपासण्या केल्या गेल्या. एव्हाना डॉक्टर महात्मे देखील तिथे पोहोचले होते. त्यांनीही माझे डोळे तपासले. सर्व रिपोर्ट्स बघितले आणि तुम्हाला मोतीबिंदू तर आहेच, पण काचबिंदू देखील आहे. त्यामुळे तातडीने इलाज करावा लागेल असे सांगितले. लगेच दोन दिवसानंतरची अपॉइंटमेंट पक्की केली आणि पुढले उपचार त्यांनी सुरू केले होते. दोन दोन-तीन बैठकींमध्ये त्यांनी लेझर ट्रीटमेंटच्या मदतीने माझ्या डोळ्यातील काचबिंदू काढून टाकले. मोतीबिंदू पुरेसे परिपक्व झालेले नाहीत त्यामुळे सध्या चालू द्या, योग्य वेळ येईल तेव्हा आपण शस्त्रक्रिया करू असे त्यांनी सांगितले. मात्र दर दोन महिन्यांनी एकदा चेकअपला येत चला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यानच्या काळात परिचयातल्या एक दोन गरीब रुग्णांनाही उपचारासाठी मी त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो. त्यावेळी त्यांच्याकडून कोणतीही फी न घेता त्यांनी उपचार केले होते. त्या रुग्णांना वेळ येईल तेव्हा मोतीबिंदूचे ऑपरेशन देखील मी विनामूल्य करून देईन, असेही त्यांनी त्या रुग्णांना स्पष्ट केले होते.

याच दरम्यान नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर जिल्हा मोतीबिंदू मुक्त करण्याची योजना जाहीर केली होती त्यावेळी सर्व गोरगरिबांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया डॉक्टर महात्मेच करत होते असे गडकरींकडून मला कळले होते त्यामुळे महात्मेंबद्दलचा माझा आदर अधिकच दुणावला होता.

त्यानंतर जेव्हा जेव्हा भेट व्हायची तेव्हा ते आवर्जून चौकशी करायचे. ऑक्टोबर २०२३ मध्ये आणखी एका पत्रकार मित्राला सोबत घेऊन मी त्याचे डोळे तपासायला महात्मेंकडे गेलो होतो. तेव्हा त्यांनी पुन्हा माझं डोळे तपासून घेतले. रात्रीचा गाडी चालवताना काही त्रास होतो का असा प्रश्न त्यांनी विचारला. तेव्हा मला काहीही त्रास होत नाही असे मी उत्तर दिले होते. तरीही त्यांनी काळजीपोटी पुन्हा विचारलेच. तर मग मी गंमतही केली.” आज रात्री तुम्ही कुठे बोलावता? तुम्ही म्हणाल तिथे स्कूटर किंवा कार चालवत येतो. तुमच्या घरी येऊ की रेडिसन ब्लू हॉटेल ला भेटायचं” त्यावर ते मस्त हसले आणि ज्या दिवशी रात्रीचा वाहन चालवताना त्रास जाणवेल त्याच्या दुसऱ्याच दिवशी मला येऊन भेटा असे सांगून मला रवाना केले.

फेब्रुवारी २०२४ मध्ये खरोखरच एका रात्री स्कूटरने येत असताना आपल्याला रस्त्यावरचे अंधुक दिसते आहे हे लक्षात आले. लगेचच फोन करून मी दुसऱ्या दिवशी डॉ. महात्मेंच्या क्लिनिकमध्ये पोहोचलो. त्यांनी लगेचच दोन्ही डोळे तपासले आणि उजव्या डोळ्याचे ऑपरेशन महिनाभरात करावे लागेल आणि डाव्या डोळ्याचे पुढल्या दोन महिन्यात, असे सांगितले. त्यानुसार मार्च २०२४ मध्ये माझ्या उजव्या डोळ्याचे, तर मे २०२४ मध्ये माझ्या डाव्या डोळ्याचे ऑपरेशन त्यांच्या हॉस्पिटलमध्ये पार पडले. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमात ते स्वतः ऑपरेशन करू शकणार नव्हते. मात्र दरवेळी ते संबंधित शन्यचिकित्सक आणि इतर संबंधितांना “हे पेशंट माझे मित्र आहेत” अशी सूचना घेऊन ठेवत होते. ऑपरेशनच्या दिवशी सकाळी ते कुठेही असले तरी त्यांचा फोन यायचाच.

विशेष म्हणजे डोळे तपासण्यापासून तर दोन्ही डोळ्यांची ऑपरेशन्स पूर्ण करून चष्मा देईपर्यंत दरवेळी मी फी किती द्यायची हे तिथल्या स्टाफला विचारत होतो. मात्र दरवेळी तुम्ही महात्मे सरांचे पेशंट आहात त्यामुळे त्याबाबत सरच तुम्हाला बोलतील असे उत्तर मिळत होते.

याच दरम्यान ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) नागपूर शाखेचे अध्यक्ष म्हणून डॉ. विकास महात्मेंची नियुक्ती झाल्याची बातमी आली. त्यावेळी त्यांना भेटून मी त्यांचे अभिनंदनही केले. “तुम्ही अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारून एक दोन महिने झाले की तुमची एक सविस्तर मुलाखत घेईल” असे त्यावेळी आमचे बोलणे ही झाले.

नेमका याच दरम्यान मी चिकनगुनियाने आजारी झालो. तो आजार चांगलाच अंगावर निघाला. परिणामी पंधरा दिवस मी किंग्जवे हॉस्पिटलला आय सी यु मध्ये ऍडमिट होतो. घरी आल्यावर मायस्थेनीया ग्रेव्हीसने गाठले. त्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली. मग एम्स मध्ये दाखवा असे अनेकांनी सुचवले. मग मीच डॉक्टर महात्मेंना फोन केला. तेव्हा “तुम्ही कधी येता ते सांगा. मी एम्स मध्ये तुमच्या तपासणीची व्यवस्था करतो असे त्यांनी आश्वस्त केले. घरच्यांना भीती होती की तिथे जर ऍडमिट करून घेतले तर घरापासून खूप दूर आहे. मग जाणे येणे कसे करणार? पण तशी वेळ येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

मात्र एम्समध्ये जाण्याची वेळ आली नाही. घरीच डॉक्टरांच्या उपचाराने हळूहळू प्रकृतीत फरक पडू लागला. मात्र हे आजारपण जवळजवळ सात-आठ महिने पुरले. त्यामुळे आमच्या भेटीगाठी होऊ शकल्या नाही. अधून मधून फोनवर बोलणे होत असते. सध्या अजून वाहन चालवण्याची मला परवानगी नाही. दरवेळी फोनवर बोलताना डॉक्टर मला रिक्षाने न फिरता कॅबनेच या कारण रिक्षाने फिरणे त्रासदायक आहे, असा आपुलकीचा आणि काळजीचा सल्लाही देत असतात. अजूनही माझे स्वतंत्रपणे बाहेर फिरणे बंदच आहे. काही दिवसांपूर्वी सौभाग्यवतीला सोबत घेऊन महात्मेंच्या हॉस्पिटलमध्ये तिचे डोळे तपासायला गेलो होतो. आधी फोनवर बोलणे झाले होते. मात्र त्यादिवशी प्रकृती अस्वास्यामुळे डॉक्टर आले नव्हते. त्यामुळे भेटीचा योग आला नाही.

अर्थात ही तात्पुरती फेज आहे. त्यांच्या माझ्या नियमित भेटी होत राहणार हे नक्की आहे, आणि अशा ख्यातनाम नेत्रशल्यचिकित्सकाशी आणि समाजसेवकाशी आपली मैत्री आहे ही बाब कायम माझ्यासाठी आनंददायीच राहणार आहे.

Views: 58
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे कायदेविषयक जनजागृती मार्गदर्शन संपन्नप्रत्येक मुलाला आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार आहे…दिवाणी न्यायाधीश श्री आर आर पाटील

दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे कायदेविषयक जनजागृती मार्गदर्शन संपन्नप्रत्येक मुलाला आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार आहे…दिवाणी न्यायाधीश श्री आर आर पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)