घ्या समजून राजेहो…,
मालेगाव बॉम्बस्फोट खटला: संघाला बदनाम करण्याचा काँग्रेसचा आणखी एक फसलेला प्रयोग.,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!,
ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!,
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/
समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
२९ सप्टेंबर २००८ रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात दाखल झालेल्या खटल्याचा निकाल गेल्या आठवड्यात ३१ जुलै २०२५ रोजी जाहीर झाला. या प्रकरणात प्रकरणातील सर्व आरोपींना पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्त केलेले आहे.
हे बॉम्बस्फोट झाले ती सगळी मुस्लिम बहुल वस्ती होती. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांनी हे बॉम्बस्फोट घडवून आणले असा आरोप करत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात हेवीवेट हिंदुत्ववादी नेते आरोपी बनवले गेले होते. यांनीच कट करून हे बॉम्बस्फोट घडवून आणले असा तपास यंत्रणांचा दावा होता. मात्र आता न्यायालयाने त्यांना ठोस पुराव्याअभावी निर्दोष सोडले आहे. त्यातच या प्रकरणातील एक प्रमुख साक्षीदार निवृत्त पोलीस अधिकारी मेहबूब मुजावर यांनी इथे आपल्यावर तपास कामात वरिष्ठांकडून कसा दबाव आणला गेला याची माहिती माध्यमांना दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्या पाठोपाठ कालच प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांनी खटल्याच्या सुनावणी दरम्यान न्यायालयात जे लेखी स्टेटमेंट दिले होते ते एका वृत्तवाहिनीच्या हाती लागल्यामुळे आणि त्यातील दावे बाहेर आल्यामुळे तर राजकीय वातावरण चांगलेच तापायला सुरुवात झाली आहे.
२९ सप्टेंबर २००८ रोजी हे बॉम्बस्फोट मुस्लिम बहुल वस्तीत झाले होते. त्याआधी देशात १९९२ चे बाबरी मशीद पाडण्याचे प्रकरण, त्यानंतर मुंबईत झालेले साखळी बॉम्बस्फोट, नंतरही घडलेल्या बॉम्बस्फोटाच्या घटना, २००२ मध्ये गुजराथेतील दंगली, या सर्व पार्श्वभूमीवर देशात हिंदुत्ववादी वातावरण तयार होते आहे की काय अशी भीती कथित पुरोगामी मंडळींच्या मनात निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. त्यामुळेच त्या काळात काही काँग्रेसच्या नेत्यांनी भगवा दहशतवाद, हिंदू दहशतवाद असे शब्द रूढ करायला सुरुवात केली होती. मालेगाव मध्ये झालेल्या या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणाचा तपास राज्य दहशतवाद पथकाकडे सोपवण्यात आला होता. त्यांनी हे बॉम्बस्फोट हिंदुत्ववाद्यांनीच घडवून आणले असा दावा करत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. त्या काळात साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर पुरुष पोलिसांनी गुन्हा कबूल करावा यासाठी अनन्वित अत्याचार केल्याचे चर्चिले गेले होते. हे प्रकरण तब्बल सतरा वर्ष चालले आणि ३१ जुलैला न्यायालयाने सर्व आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले आहे.
या खटल्यात दहशतवाद विरोधी पथकाचे एक अधिकारी पोलीस इन्स्पेक्टर मेहमूद मुजावर हे प्रमुख साक्षीदार होते. निकालानंतर दोनच दिवसांनी मुजावर यांनी माध्यमांना मुलाखत देताना सांगितले आहे की त्या काळात या खटल्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरकार्यवाह मोहन भागवत यांना पकडून आणावे आणि त्यांनाही या प्रकरणात गोवावे यासाठी माझ्यावर वरिष्ठांचा दबाव होता आणि तसे न केल्याची किंमत मला नोकरीत चुकवावी लागली. आपण न्यायालयात साक्ष देताना हे स्पष्ट केले आहे असेही त्यांनी माध्यमांना सांगितले.
या दरम्यान या प्रकरणातील निर्दोष मुक्त झालेल्या आरोपींनी देखील माध्यमांशी बोलताना आपबिती कथन केली आहे. आपल्यावर कारण नसताना दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांकडून कशाप्रकारे दबाव आणले गेले आणि आपला कसा छळ केला गेला हे त्यांनीही माध्यमांना सांगितले आहे.
आता काल साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांनी न्यायालयात जे अंतिम लेखी निवेदन दिले त्याच्या प्रतीच एका वृत्तवाहिनीच्या हाती लागल्याचा दावा त्या वृत्तवाहिनीने केला आहे. त्यातील मुद्दे बाहेर आल्यावर एक खा.सुप्रिया सुळे वगळता कोणीही त्याबाबत प्रतिवाद केल्याचे दिसून आलेले नाही. त्याचबरोबर असे निवेदन न्यायालयात दिलेलेच नाही असेही कोणी अद्याप म्हटलेले नाही.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या निवेदनानुसार त्यांना अटक केल्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा अनन्वित छळ केला त्यांना दररोज मारहाण केली जात असे. त्याचप्रमाणे संघाचे सरसंघचालक सुदर्शनजी, मोहन भागवत, इंद्रेश कुमार, योगी आदित्यनाथ आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची नावे घ्यावी, जेणेकरून त्यांनाही आरोपी करता येईल, यासाठी त्यांना दररोज छळले जात होते, असेही त्यांनी सांगितले आहे. त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली जात होती आणि त्यांच्या स्त्रीत्वाचा अपमानही केला जात होता असेही त्या निवेदनात नमूद असल्याचे वृत्त बाहेर आले आहे.
कर्नल प्रसाद पुरोहित यांनी आपला काहीही संबंध नसताना आपल्याला कसे गोवण्यात आले हे स्पष्ट केले आहे. आपण ज्या ठिकाणी कर्तव्यावर होतो तिथे अचानक आपला मोबाईल काढून घेतला गेला आणि आपल्याला आधी भोपाळला आणले गेले. तिथून आपल्याला दिल्लीला नेणार असे सांगून मुंबईला आणले गेले. तिथे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला विमानतळावरच घेरले आणि तिथून खंडाळ्याला एका अज्ञात बंगल्यात आणले. तिथे दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांनी आपली उलट तपासणी घेतली आणि आपल्याला अटक केली गेली. त्यानंतर साध्वींनी सांगितल्याप्रमाणेच संघाचे वरिष्ठ अधिकारी तसेच योगी आदित्यनाथ नरेंद्र मोदी यांची नावे घेण्यासाठी देखील आपल्यावर दबाव आणला गेला असेही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. त्यांनी यात पुढे असेही म्हटले आहे की हिंदू दहशतवाद हा शब्द काही दिवस आधीच एका भाषणात शरद पवारांनी उच्चारला होता. तेव्हापासूनच हे प्रकार सुरू झाले. मात्र हिंदू दहशतवाद हा शब्द शरद पवारांनी वापरल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी खोडून काढला आहे.
शरद पवारांनी हिंदू दहशतवाद हा शब्द वापरला, तर पुढे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातच संसदेत बोलताना केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी याला भगवा दहशतवाद असे म्हटले. वस्तूतः भगव्या रंगाला आपल्या देशात अगदी पुराण काळापासून महत्व प्राप्त झाले आहे. रामायणात आणि महाभारतात राजध्वज हे भगव्या रंगाचे असल्याचे दाखवले गेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यात चा ध्वज देखील भगवाच होता. आजही मंदिरांवर भगवा ध्वज असतो. त्यामुळेच हिंदूंना बदनाम करण्यासाठी भगवा दहशतवाद हा शब्द रूढ करण्याचा हा शिंदेंचा म्हणजेच तत्कालीन काँग्रेसचाच प्रयत्न होता हे दिसून येते. म्हणूनच अशा हिंदुत्ववादी व्यक्तींबरोबरच त्यांना आरोपी बनवून खटले भरा आणि भगवा दहशतवाद आणि हिंदुत्ववाद हे शब्द बदनाम करा असे दबावतंत्र काँग्रेसनेच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर वापरून त्यांना असे करायला भाग पाडलेले ही असू शकते.
हा सर्व घटनाक्रम बघता जर मुजावर यांनी केलेले दावे खरे असतील आणि साध्वी प्रज्ञा सिंह आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांनी खरोखरी न्यायालयात असे स्टेटमेंट दिले असेल तर या सर्व प्रकरणात एकूणच देशातील हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटना यांना बदनाम करून गोवण्याचा काँग्रेस आणि इतर कथेत पुरोगामी राजकीय पक्ष नेते आणि विचारवंतांचा डाव होता असा निष्कर्ष काढता येतो. नेहरूंच्या कालखंडापासूनच काँग्रेसचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर राग आहे. त्यामुळे संघाला काँग्रेसने कायमच आपल्या हिटलिस्टवर ठेवलेले दिसते. १९४८, १०७५ आणि १९९२ या कालखंडात काँग्रेसने काहीही ठोस कारण नसताना संघावर बंदी घातलेली आहे आणि नंतर नामुष्की झाल्यामुळे ती उठवली देखील आहे. तसेही संघाला जिथे जिथे शक्य असेल तिथे विरोध करण्याचेच काँग्रेसचे धोरण राहिले आहे. तरीही संघ वाढला. नुसताच वाढला असे नाही, तर संघाशी संबंधित व्यक्तींच्या संघ विचाराने प्रेरित असलेल्या विविध संघटना समाजाच्या विभिन्न क्षेत्रात कार्यरत झाल्या आहेत. त्यामुळे आज समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात संघ विचार पोहोचला आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. संघ विचारांनी प्रेरित राजकीय व्यक्तींनी १९५२ साली भारतीय जनसंघ नामक राजकीय पक्ष स्थापन केला. पुढे १९८० साली याच पक्षाचे रूपांतर भारतीय जनता पक्षात झाले. त्यावेळी कुठेही अस्तित्व नसलेल्या या पक्षाने आज केंद्रात सत्ता मिळवली आहे, तर देशातील अर्ध्याहून अधिक राज्यांमध्येही भाजपची सत्ता असल्याचे दिसून येते. हीच बाब काँग्रेसजनांना पोटशुळ उठवणारी ठरली आहे. संघ आपल्याला भविष्यात अडचणीचा ठरू शकतो हे लक्षात येऊनच त्यावेळी बहुतेक नेहरूंनी संघावर बंदी आणली असावी. तेच काम पुढे १९७५ मध्ये त्यांची कन्या इंदिरा गांधींनीही केले. मात्र दोघांचेही प्रयत्न फसले. दरवेळी बंदीनंतर संघ अधिकच जोमाने वाढला. आज तो वाढतोच आहे. परिणामी आज देशातील मोठ्या प्रमाणातला हिंदुत्ववादी वर्ग संघाच्या बाजूने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या उभा झालेला दिसतो आहे.
ही प्रक्रिया १९९२ मध्ये राम मंदिर आंदोलनापासूनच सुरू झाली होती. त्यानंतर या हिंदुत्ववादी विचाराच्या विस्ताराला अधिक गती मिळाली. तीच काँग्रेसला बोचली. त्यामुळेच त्यांनी भगवा दहशतवाद, हिंदू दहशतवाद असे शब्दप्रयोग रूढ करत हिंदुत्ववाद्यांना बदनाम करणे सुरू केले. त्यांच्यावर अशा बॉम्बस्फोटाच्या आरोपात अडकवून एकूणच हिंदुत्ववादी नेतृत्वाच्या विरोधात चुकीचे विमर्श (नॅरेटिव) पसरवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यासाठी सरकारी यंत्रणेवर दबाव आणून आपले लक्ष्य साध्य करण्याचा अयशस्वी प्रयत्न देखील केला गेला.मेहमूद मुजावर यांची न्यायालयातील साक्ष आणि साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर तसेच कर्नल प्रसाद पुरोहित यांची न्यायालयातील लेखी निवेदने बघितल्यावर हे चुकीचे नॅरेटिव पसरवण्याचा प्रयत्न होता हे स्पष्ट होते. मात्र विशेष न्यायालयाच्या निकालानंतर हे असे चुकीचे नॅरेटिव पसरवण्याचा प्रयत्न फसला असेच म्हणावे लागेल. न्यायालयाने फिर्यादी पक्षाने म्हणजेच तपास पथकाने आरोपींच्या विरोधात पुरेसे ठोस पुरावेच दिले नाहीत, असे आपल्या निकाल पत्रात नमूद केले आहे. याचाच अर्थ या आरोपींना धरून बांधून आरोपी बनवले गेले असाही काढता येतो. एकूणच या खटल्यात प्रत्यक्षात आरोपी कोणी वेगळेच असतील. (त्यांना आता पुन्हा शोधण्याची जबाबदारी सरकारवर आली आहे) मात्र फिर्यादी पक्षाने त्या आरोपींना शोधलेच नाही आणि आजही ते मोकळे फिरत असावेत हे स्पष्ट होते.
आधी म्हटल्याप्रमाणे काँग्रेसने संघाला या पद्धतीने बदनाम करण्याचा आतापर्यंत खूपदा प्रयत्न केला आहे. अजूनही तसे प्रयत्न चालूच आहेत. संघाने स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला नव्हता. त्याचप्रमाणे जंगल सत्याग्रहात डॉ. हेडगेवार नव्हतेच. देशात संघ कायम-दुफळी माजवण्याचाच प्रयत्न करतो आहे, असे विविध आरोप आजही काँग्रेसची मंडळी उच्चारवाने बिनदिक्कत करत असतात. आता हिंदू दहशतवाद आणि भगवा दहशतवाद या मुद्द्यावर काँग्रेसच्या मुस्काटात हाणली गेल्यानंतर काँग्रेसचे एक नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आता हा सनातन दहशतवाद असल्याचा दावा केला आहे. वस्तूतः सनातन धर्म हा या देशातील प्राचीन धर्म आहे. हिंदू धर्मियांना प्राचीन काळात सनातनी म्हणूनच ओळखले जात होते. त्यामुळे आता हा नवा शब्दप्रयोग शोधून पुन्हा एकदा हिंदूंना आणि हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येते.
आज दुर्दैवाने हिंदू समाज हा जाती-जमातींमध्ये वाटला गेलेला आहे. काँग्रेस पक्षाने हुशारीने जाती जातींमध्ये भांडणे कशी लावता येतील हेच बघितले आहे. महाराष्ट्रात भाजपची सत्ता आली कीच मराठ्यांचे आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते. त्यामागे शरद पवारांचा हात आहे अशी राजकीय वर्तुळात कुजबूज चालते. एकूणच हिंदू समाजात जाती-जातीत भांडणे लावायची आणि अल्पसंख्याकांचे लांगुलचालन करून त्यांची एक गठ्ठा मते घ्यायची ही काँग्रेसची सुरुवातीपासून रणनीती होती. संघपरिवार इथे आडवा येऊ शकतो हे लक्षात आल्यानेच संघाला कायम हिटलिस्टवर ठेवले गेले. ते नेहरूंनी सुरू केले आणि आज त्यांचा पणतू राहुल गांधी देखील तेच करत आहेत.मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल आणि त्यानंतर मुजावर प्रज्ञासिंह आणि पुरोहित यांची समोर आलेली निवेदने यातून हाच निष्कर्ष काढता येतो.
मात्र असे असले तरी संघ परिवार आणि हिंदुत्ववादी संघटना या वाढतातच आहेत. संघ १९२५ मध्ये स्थापन झाला. यंदा संघाची शताब्दी आहे. त्या काळात देशात ज्या ज्या इतर विचारधारा सक्रिय झाल्या, मग ती काँग्रेसची असो, कम्युनिस्टांची असो, किंवा अजून कोणाची, सर्वांचीच स्थिती आज दयनीयच आहे. मात्र त्यावेळी कुठेच नसलेला संघ आणि संघ परिवारातूनच पुढे आलेला भारतीय जनता पक्ष आज देशातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे आणि अर्ध्यापेक्षा जास्त देशावर भाजपाची सत्ता आहे. ती सत्ता परत मिळवण्यासाठी काँग्रेसची आजही धडपड सुरू आहे. मात्र हे सर्व घटनाक्रम बघता काँग्रेसची ही धडपड कितपत यशस्वी होईल हे सांगता येत नाही. आज तरी संघ परिवाराला संपवण्याचा काँग्रेसचा हा प्रयोग फसला आहे असेच म्हणावे लागते.
वाचकहो…. पटतेय का तुम्हाला हे…..?
त्यासाठी आधी समजून तर घ्या राजेहो..


