आयुष्यातले सांगाती २४,उल्हासदादा पवार,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
राजकारणी माणूस म्हटला की सर्वसामान्य माणूस नाकच मुरडतो. इतके राजकारण आणि राजकारणी माणूस हा बदनाम झालेला आहे. मात्र त्यातही काही सज्जन माणसं सापडतात. त्याचा उल्लेख मी नेहमी राजकारणातली सज्जनशक्ती असा करत असतो. अशीच मला भेटलेली काँग्रेस पक्षातील एक सज्जनशक्ती म्हणजे उल्हासदादा पवार. उल्हासदादांचा माझा संबंध जवळजवळ २५ वर्षापासून अधिक काळाचा आहे. तसे ते माझ्यापेक्षा वयाने जवळजवळ अकरा वर्षांनी ज्येष्ठ आहेत. आम्हा दोघांमध्ये वैचारिक मतभेदही बरेच आहेत. मी कट्टर विदर्भवादी तर दादा अखंड महाराष्ट्राचे समर्थक, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेला तर दादा सुरुवातीपासून काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत.
तरीही त्यांचा आणि माझा चांगलाच स्नेह जुळला आहे. दादांचा माझा परिचय झाला तो १९९९ मध्ये. त्यावेळी नुकतेच विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. नागपुरात दरवर्षीप्रमाणे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होते. त्या अधिवेशनात उल्हास दादा आले होते. त्यावेळी ते आमदार किंवा कोणत्या अन्य शासकीय पदावर नव्हते. मात्र काँग्रेस पक्षाचे एक पदाधिकारी म्हणून ते अधिवेशनात आले होते. त्यावेळी माझा पत्रकार मित्र अनिकेत जोशी यांच्यासोबत माझी दादांची भेट झाली होती. त्यादिवशी विधिमंडळाचे कामकाज काही कारणाने लवकर आटोपले होते. मग मी अनिकेत आणि दादा अशा तिघांच्याही कॅन्टीनमध्ये चहा सोबत गप्पा झाल्या होत्या.
थोडासा स्थूलत्वाकडे झुकणारा बांधा, गोरा पान वर्ण, अंगात पांढरा पैजामा आणि त्यावर थोडा क्रीम कलरचा झब्बा, डोक्यावरचे तुरळक सोनेरी केस, आणि सोनेरी दाढी, डोळ्यात कायम प्रेमळ भाव आणि चेहऱ्यावर कायम स्मितहास्य असणारी ही व्यक्ती पहिल्याच भेटीत मला आवडून गेली. त्याचबरोबर त्यांचे शांत आणि संयमी पण समोरच्याच्या मनाचा ठाव घेणारे बोलणे हे मनाला भावून जाणारे ठरले.त्यामुळे पहिल्याच भेटीत त्यांची माझी मैत्री जमली. त्यानंतर महिनाभरातच दादा उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणून नेमले गेले. हे कॅबिनेट दर्जाचे पद होते. पाठोपाठ थोड्याच दिवसात विधान परिषदेच्या निवडणुका आल्या. त्यात विलासराव देशमुखांनी काँग्रेस पक्षातर्फे दादांना उमेदवारी दिली आणि दादा त्यात विजयी झाले होते.
त्यावेळी दादांचे अभिनंदन करणारा फोन मी केला होता. त्या काळात दै. गावकरीसाठी विधान परिषदेत वृत्तसंकलन करण्यासाठी मी प्रत्येक अधिवेशनात नियमितपणे मुंबईत जात असे. मग प्रत्येक अधिवेशनात दादांची भेट होऊ लागली. वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष असल्याने विधान भवनाच्या जवळच असलेल्या सुरुची या इमारतीत दादांना शासकीय निवासस्थान मिळाले होते. तर मंत्रालयासमोर असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीत दादांचे वैधानिक मंडळाचे कार्यालय होते. त्यामुळे दोन्हीही ठिकाणी मी हक्काने जात असे. कित्येकदा त्यांच्या निवासस्थानी रात्री जेवायला गेल्याचेही मला आठवते. दादा १९७० पासून काँग्रेसमध्ये सक्रिय होते.
आधी युवक काँग्रेसचे पदाधिकारी देखील होते. त्यांनी वसंतराव नाईकांपासूनचा कालखंड जवळून बघितला होता. मग कधी दादा निवांत भेटले की जुन्या आठवणी आम्हा नवीन पत्रकारांशी शेअर करायचे. विधान भवन च्या कॅन्टीन मध्ये तर दादांच्या भोवती माझ्यासारखे चार दोन पत्रकार तरी असायचेच. दादा राजकारणी फक्त २० टक्के तर ८० टक्के अध्यात्मिक व्यक्ती आहेत. त्यांचा संत साहित्याचा आणि वारकरी संप्रदायाचा चांगलाच अभ्यास आहे. राजकारणात राहून सुद्धा ते आपले स्वच्छ चारित्र्य जपण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांच्यासोबत वावरताना वेळोवेळी त्यांच्या या स्वभावाचा अनुभव येत असतो. राजकारणातल्या दुष्पवृत्ती बघून ते अनेकदा अस्वस्थ होतात. मग कधीतरी माझ्यासारख्या पत्रकारांशी बोलताना तेआपल्या मनातली खंत प्रकट करत असतातत्याचबरोबर मराठी साहित्याचा देखील त्यांचा अतिशय दांडगा अभ्यास आहे. बोलताना ते साहित्यातले अनेक संदर्भ अगदी सहजगत्या देतात. तसे त्यांनी वसंतराव नाईकांपासून सर्व राजकारणी जवळून बघितले आहेत. तसेच बाळासाहेब भारदेंसारखे अध्यात्मिक अधिष्ठान असणारेही जवळून अनुभवले आहेत. अनेक मान्यवर साहित्यिकांची त्यांचे जवळीकीचे संबंध आहेत. विशेष म्हणजे कोणालाही सहजगत्या मदत करायची हे त्यांच्या स्वभावाचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे.
२००२ पासून मी रामटेकच्या गडावरून या नावाने एक नियतकालिक सुरू केले होते. २००२ चा या नियतकालिकाचा पहिलाच दिवाळी अंक चांगलाच गाजला. दिवाळीनंतर लगेचच विधीमंडळाचे नागपुरात हिवाळी अधिवेशन होते. त्यात मग मी अनेक पत्रकार आणि राजकीय मित्रांना आवर्जून दिवाळी अंकाची प्रत भेट दिली होती. त्यात दादा देखील होते इतर राजकारण्यांनी त्या अंकाची फारशी जवळून दखल घेतली नसेलही. मात्र दादांनी लगेचच दखल घेतली. त्यांना अंक दिल्यावर चार-पाच दिवसातच मला ते विधान भवनच्या लॉबीत भेटले. मी दिसल्याबरोबर लगेचच त्यांनी मला थांबवून “तुझा दिवाळी अंक वाचला आणि त्यात सर्वच लेख आणि एकूणच अंकाचे स्वरूप खूप छान जमलं आहे” असे सांगत मला शाबासकी सुद्धा दिली. अर्थात ही शाबासकी तोंडदेखली नव्हती, तर त्यातील कोणत्या लेखात काय आहे आणि काय आवडले आहे याचे विस्तृत विवेचन देखील दादांनी त्यावेळी केले. त्यावरून त्यांच्या अभ्यासू स्वभावाची मला लगेचच कल्पना आली. त्यानंतर दरवर्षी दिवाळीनंतर हिवाळी अधिवेशनात दादा मला भेटले की आवर्जून “अविनाश यंदाचा दिवाळी अंक कुठे आहे?” म्हणून विचारायचे आणि अंक वाचल्यावर आवर्जून अभिप्राय सुद्धा द्यायचे. नियतकालिक जेमतेम वर्षभर चालले. मात्र दिवाळी अंक नंतर दरवर्षी काढत होतो. दिवाळी अंक काढायचा म्हणजे आर्थिक जुळवाजवळ बरीच करावी लागते. त्यासाठी एखाद्या राजकीय व्यक्तीचा आधार असला तर चांगले,
असा विचार करत २००५ मध्ये मी दरवर्षी दिवाळी अंकासाठी एक राजकीय व्यक्ती अतिथी संपादक म्हणून घ्यायची असे ठरवले. त्यानुसार २००५ मध्ये पहिल्या दिवाळी अंकासाठी कुणाला विचारावे असा विचार करत असतानाच दादांचे नाव आठवले. लगेचच त्यांना फोन केला. त्यांनी लगेच होकार दिला. मग मी देखील उत्साहात कामाला लागलो. मात्र त्यावर्षी अडचणी बऱ्याच येणार हे नियतीनेच ठरवले असावे. दिवाळी अंकाच्या कामाने जरा गती घेतली होती. तेव्हाच ऑगस्ट महिन्याच्या शेवटी माझ्या वडिलांचे दुःखद निधन झाले. त्यातून सावरून मी कामाला लागलो होतो तोच सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात धाकट्या बहिणीचे अचानक निधन झाले. या दोन धक्क्यांनी मी पुरता कोलमडलो होतो. योगायोगाने त्याच दरम्यान एका कार्यक्रमासाठी दादा नागपुरात आले होते. आधी माझे वडील गेले आणि मग बहीण गेली हे कळल्यावर त्या धावपळीत देखील दादा मला घरी भेटायला आले. सोबत त्यांचे मित्र गिरीश गांधी देखील होते.
मग दादांनीच मला धीर दिला आणि बहिणीचे सर्व दिवस वगैरे आटोपले आणि स्थिरस्थावर झाले की तू मुंबईला ये आपण तिथे जाहिरातींसाठी प्रयत्न करू. अंग थोडा उशिरा काढ पण अंक ठरल्याप्रमाणे काढायचा असे मला सांगूनच दादा गेले होते. त्यानुसार मग मी मुंबईला गेलो. चार दिवस मुंबईत मुक्काम करून जाहिरातींसाठी जुळवाजवळ केली. रोज सकाळी हॉटेलमधून निघून दादांच्या सुरुची येथील निवासस्थानी जात असे. तिथे दादा वेगवेगळ्या लोकांशी संपर्क करायचे आणि या चांगल्या कामाला आपल्याला मदत करायची आहे असे सांगायचे. मग तिथे मी संपर्क करत असे आणि दादांनी त्यादरम्यान मला बऱ्यापैकी जाहिराती जमवून दिल्या. शिवाय दादांच्या शब्दामुळे विश्वास पाटलांसारख्या मान्यवराची कथा देखील दिवाळी अंकात प्रकाशित करण्यासाठी मिळाली होती. त्यावर्षी गीत रामायणाला पन्नास वर्षे पूर्ण झाली होती. दादांकडेच एक दिवस गीत रामायणकार ग. दि. माडगूळकरांचे चिरंजीव श्रीधर माडगूळकर भेटले. दादांनी लगेचच माडगूळकरांना सांगितले. “श्रीधर अविनाशच्या दिवाळी अंकासाठी गीत रामायणाची पन्नास वर्षे या विषयावर तू एक लेख दे”. दादांची सूचना मान्य करत श्रीधरजींनी मला एक छान लेख पाठवला होता.त्यावर्षी दिवाळी अंक जवळजवळ दिवाळीनंतर वीस दिवसांनी प्रकाशित झाला. मात्र अंक दर्जेदार झाला होता. त्या अंकाने त्यावर्षी पाच प्रतिष्ठित पुरस्कार मिळवले होते.उल्हासदादा आणि विलासराव देशमुख यांची अगदी घट्ट मैत्री होती. ज्यावेळी हा अंक निघाला तेव्हा विलासराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात दरवर्षी मुख्यमंत्री नागपूर आणि मुंबईच्या पत्रकारांना एकत्र स्नेहभोजनाला निमंत्रित करत असतात. त्यावर्षी देखील विलासरावांनी आम्हाला स्नेहभोजनाला निमंत्रित केले होते. भोजनानंतरच्या गप्पांमध्ये मी विलासराव देशमुख यांना त्यावर्षीचा दिवाळी अंक दिला. दादा बाजूला उभेच होते. दादांनी लगेच विलासरावांना सांगितले, “विलासराव या दिवाळी अंकाचा मी अतिथी संपादक आहे बरं का.” हे ऐकताच विलासरावांनी अंक उघडून पाहिला, तर पहिल्याच पानावर अतिथी संपादक उल्हास पवार असा नामोल्लेख दिसला. नंतरच्या दोन-तीन पानांनंतर दादांचे संपादकीय सुद्धा दिसले.
विलासरावांनी लगेचच दादांची फिरकी घ्यायला सुरुवात केली “अरे वा दादा तुम्हीही आता संपादक झालात” मग लगेच मला देखील विलासराव म्हणाले, “पाठक तुम्ही अतिथी संपादक फार चांगला शोधला, आता आमच्या दादांना साहित्यातच गुंतवा. त्यांचा तोच पिंड आहे.” आणि सर्व उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता. मुंबईत जसे दादा सुरुची या शासकीय निवासस्थानी राहत होते. तसेच नागपूर अधिवेशनात त्यांना नागभवन या शासकीय विश्रामगृहात एक सदनिका मिळत असे. अधिवेशन काळात फावल्या वेळात दादांकडे बरेचदा आमच्या गप्पांची मैफिल जमत असे.एका अधिवेशनातील स्नेहभोजनानंतरच्या गप्पांमध्ये विलासराव पत्रकारांना म्हणाले की माझ्या कुंडलित नक्कीच राजयोग असावे. मी बाभूळगाव चा सरपंच झालो तेव्हा पुढे मुख्यमंत्री होईल असे कधीच वाटले नव्हते. मात्र दोनदा मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली आहे. मी बाजूलाच उभा होतो. मी लगेचच आपले जुजबी ज्योतिषी ज्ञान पाजळले. “विलासराव तुमच्या कुंडलीत रवी राशीचा शनी असावा.” विलासरावांनी माझ्याकडे बघितले आणि मला विचारले “तुम्हाला ज्योतिष कळते वाटते.” मी काही बोलायच्या आतच बाजूला उभे असलेले दादा म्हणाले “विलासराव अविनाश चा चांगला अभ्यास आहे.” मग विलासराव लगेच म्हणाले, “यांना एकदा माझी कुंडली सुद्धा दाखवू या”. तेव्हापासून कधीही भेटले की विलासराव विचारायचे, “माझी कुंडली बघायची आहे ना” मात्र ती बघण्याचा योग कधीच आला नाही.दादा २०१२ पर्यंत विधान परिषद सदस्य होते. त्यावेळी आमच्या नियमित भेटी व्हायच्या. दरम्यान माझी तीन पुस्तके देखील प्रकाशित झाली. त्यातील मराठी वाङ्मय व्यवहार चिंतन आणि चिंता या पुस्तकाला २०१० चा राज्य शासनाचा रा.ना. चव्हाण उत्कृष्ट संपादित ग्रंथ पुरस्कार मिळाला. ही बातमी कळताच दादांचा लगेचच मला फोन आला. २०१२ नंतर दादांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कालखंड संपला. तरीही आमच्या भेटी होतच होत्या. दादा अधून मधून नागपूरला यायचेच. त्यांचा विविध विषयावरचा दांडगा अभ्यास लक्षात येता अनेकदा विविध विषयांवर त्यांची व्याख्याने देखील व्हायची. मग त्यावेळी त्यांचा हमखास फोन येत असे, आणि रवी भवन विश्रामगृहात आमची भेट होत असे. २०१३-१४ मध्ये नांदेडच्या दैनिक श्रमिक एकजूट मध्ये माझा नेत्यांमधील माणूस हा स्तंभ सुरू होता. त्यात साधारणपणे दरवेळी मी एका नेत्याबद्दल लिहीत असे. जवळजवळ वर्षभर मी हा स्तंभ चालवला. मग त्यातल्या निवडक लेखांचे पुस्तक करावे असा काहींनी आग्रह धरला. त्यामुळे त्याचे पुस्तक रूपात रूपांतर “आठवणीतले नेते” या नावाने करायचे ठरले. त्याला प्रस्तावना कोणाची हवी असा विचार करता करता उल्हासदादांचे नाव आठवले. मग दादांना पत्र पाठवले आणि पुस्तकाची डमी प्रत देखील त्यांना पाठवली. त्यांच्या व्यस्ततेत त्यांना प्रस्तावना पाठवणे जमले नव्हते. त्याच दरम्यान विलास मुत्तेमवारांकडल्या एका लग्नासाठी दादा नागपूरला येणार होते. मग त्यांचा मला फोन आला. अविनाश तू मला रविभवनात भेट. तिथेच मी तुला प्रस्तावना डिक्टेट करतो. त्यानुसार मी त्यांना भेटायला गेलो. त्यांनी मला लगेचच प्रस्तावना डिक्टेट केली. मी ती लिहून घेतली आणि मग थोड्याच दिवसात माझ्या आठवणीनुसार २०१८ मध्ये ते पुस्तक प्रकाशित झाले होते. पुस्तक प्रकाशित झाल्यावर त्याची प्रत घेऊन दादांकडे मुंबईतच त्यांना भेटलो होतो. “तुझे हे पुस्तक देखील नक्की काही पुरस्कार मिळवणार अशा शुभेच्छा देखील दादांनी दिल्या होत्या. या पुस्तकाचे प्रकाशन तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे हस्ते झाले होते. ही बातमी वृत्तपत्रात वाचून दादांनी लगेच फोन करून माझे अभिनंदन देखील केले होते.२०१९ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच उलथापालथी झाल्या. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेस यांचे संयुक्त सरकार सत्तेत आले होते. जानेवारी २०२० मध्ये विधिमंडळाचे दोन दिवसांचे एक विशेष अधिवेशन मुंबईत झाले होते. त्यावेळी मी काही कामाने मुंबईत होतो. त्यावेळी विधानभवनातच अचानक दादांची भेट झाली. त्या मंत्रिमंडळात बरेच मंत्री नवीन होते. दादांनी विलासराव देशमुख यांचे मंत्री झालेले चिरंजीव अमित देशमुख यांच्या दालनात मला नेऊन आवर्जून त्यांची माझी ओळख करून दिली. विलासरावंचे आणि अविनाशचे खूप चांगले संबंध होते हे आवर्जून सांगत अविनाश सारख्या चांगल्या पत्रकार आणि साहित्यिकाकडे तू लक्ष असू दे, असेही दादांनी अमित देशमुख यांना वडीलकीच्या नात्याने बजावले होते. जानेवारी २०२० मध्ये दादांची माझी प्रत्यक्ष झालेली ही शेवटची भेट ठरली. त्यानंतर गेल्या पाच वर्षात आम्हा दोघांची भेट प्रत्यक्ष भेट झालेली नाही. त्यानंतर लगेचच कोरोना आला होता. त्यामुळे भेटी तर शक्यच नव्हत्या. नंतर वयापरत्वे दादांनी देखील मुंबईत येणे कमी केले. त्यांचा जास्त मुक्काम मुंबईतच राहू लागला. माझे देखील पुण्यात जाणे कमी झाले होते आणि मुंबईत तर गेलो तरी अगदी एक दिवसासाठी जात असे. त्यातही २०२३ डिसेंबर नंतर मी नागपूर बाहेर कुठे गेलेलोच नाही. असे असले तरी दादांशी फोनवर संपर्क मात्र नियमित असतो. कधी ते फोन करतात तर कधी मी फोन केला की दादा आपुलकीने “बोला अविनाश” म्हणून बोलायला सुरुवात करतात. मग अनेक जुन्या आठवणी सांगतात. जुन्या राजकारणाबद्दल बरीच माहिती ते देतात. ते खूपदा राजकारणातल्या सध्याच्या दुष्प्रवृत्तींबद्दल दुःख देखील व्यक्त करत असतात. दरवेळी मी दादांची “तुम्ही राजकारणातली सज्जनशक्ती आहात अशी थट्टा देखील करतो” त्यावर दादा अगदी मनमोकळे हसतात आणि “काय अविनाश तू गंमत करतोस” असे म्हणून विषय टाळतात. कधी आमचे वाद देखील होतात. वादाचा विषय म्हणजे वेगळा विदर्भ आणि संयुक्त महाराष्ट्र. एकदा दादांनी शरद पवारांची प्रकट मुलाखत घेतली होती. ती टीव्हीवर दाखवली गेली. त्यावेळी विदर्भाबाबत दादा जे काही बोलले त्यावरून मी फोन करून दादांवर टीका देखील केली. त्यावर आमचा बराच प्रेमळ वादही झाला. मात्र तो तितक्या पुरताच होता. माझ्या वाढदिवसाला दादांचा आवर्जून फोन येतो. तसेच त्यांच्या वाढदिवसाला मी देखील त्यांना फोन करत असतो. यंदा १ ऑगस्टला त्यांचा ८१ वा वाढदिवस झाला. त्यावेळी आम्ही बोललो होतो. सध्या मी समाज माध्यमांवर “आयुष्यातले सांगाती” या शीर्षकाखाली मला भेटलेल्या विविध व्यक्ती विशेषांबाबत लिहीत असतो. दादांनी माझा फोन घेतल्यावर आवर्जून त्याचा उल्लेख केला.” काय अविनाश तू काय एकेक आठवणी लिहितोस आणि माझ्याही त्या व्यक्तींबद्दलच्या आठवणी जाग्या होतात” असे म्हणत दादांनी माझ्या त्या लेखमालिकेचे कौतुक केले होते. मात्र याच लेख मालिकेत मी तुमच्यावर देखील लिहिणार हे मी त्यांना त्यावेळी सांगितले नव्हते. नंतर गेल्याच आठवड्यात त्यांच्या सहस्रचंद्रदर्शनानिमित्त पुण्यात एक जाहीर कार्यक्रम झाला. त्यात शरद पवार प्रमुख अतिथी होते. त्यांचे भाषण सर्वत्र प्रसारित झाले होते. काल सकाळीच त्या संदर्भात मी दादांना फोन केला. मग पुन्हा दादा राजकारणातल्या जुन्या आठवणीत रमले. बरीच माहिती त्यांनी यावेळी मला दिली, आणि आता लवकरच मला नागपूरला चक्कर मारायची आहे आणि सर्व जुन्या मित्रांना भेटायचे आहे. तेव्हा तुझ्याकडेही येणार असे आश्वासन देखील त्यांनी दिले. नागपूरला आले तर दादा नक्की भेटतील हा मला विश्वास आहे.मला भेटलेल्या अनेक राजकीय मित्रांमध्ये दादा हे खरोखरीच एक सजन शक्ती आहेत. ते अध्यात्माकडे जास्त झुकलेले आहेत. विधिमंडळात बोलताना देखील ते अध्यात्मातले आणि संत वाङ्मयातले दाखले देत असत. आजही त्यांची तीच प्रवृत्ती आहे. अशा सज्जन राजकारणी व्यक्तीशी माझी गत २५ वर्षापासूनची मैत्री आहे, ही माझ्याकरता एक आनंददायीच बाब आहे.


