‘शिरपुर तालुका बनतोय वांगे पिकाचा हब.”‘वरुळ परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात वांग्याची लागवड.”
धुळे, जळगाव , नाशिक मोठी मागणी,वांगे भरीताची चवच न्यारी.’ त-हाडी: तालुक्यातील वरुळ परिसरातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक जरी कपाशी असले तरी कपाशी या पिकावर वाढता रोगाचा प्रादुर्भाव सोबतच उत्पादन खर्चाच्या मानाने मिळत नसलेले भाव यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी इतर पिकाकडे आपला मोर्चा वळवला असून कमी क्षेत्रात झटपट नका मिळवून देणाऱ्या हिरवे वांगे या पिकाला जवळ केल्याचे सद्या दिसून येत आहे.
या परिसरातील वरुळ, भटाणे, जवखेडा व नवी व जुनी अंतुली,या गावातील अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळ्याच्या उत्तरार्धात या पिकाची लागवड करून लाखो रुपयांचे उत्पादन घेत आपल्या आर्थिक प्रगतीचा मार्ग सुकर केला आहे.आजरोजी या भागातून जवळपास २ हजार ते ५ हजार क्विंटलचे हिरवे वांगे (भरिताचे) वेगवेगळ्या मार्केटमध्ये रोज ते पण जागेवरून खरेदी करून रवाना होत आहेत.यासाठी या परिसरातील शेतकऱ्यांनी व्हाट्सअप्प ग्रुपच्या माध्यमातून बाजारभाव व इतर वेगवेगळ्या माहितीसाठी संवादाचे दालन उभे केले आहे.एकप्रकारे वांगे पिकाचा हब येथे तयार होत असून त्यातून शेतकरी प्रगती साधत असतांनाच धुळे व जळगाव , नाशिक सारख्या महानगरात हे वांगे विकल्या जात असल्यामुळे तेथील ग्राहकांना न्यारीच चव त्यातून मिळत आहे. खान्देश आणि गुजरात व मध्ये प्रदेशच्या सीमेवर मोडणाऱ्या शिरपूर तालुक्याच्या वरुळ परिसरातील या गावांना कॉटनबेल्टची किनार लाभली आहे.
परंतु ते पीक सद्या परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी इतर पिकांकडे आपला कल ओढविला आहे.गेल्या २/३ वर्षांपासून येथील काही शेतकऱ्यांनी वांगे पिकाला प्राधान्य दिले आहे.अंकुर सिड्सचे विनायक या वाणाची यासाठी निवड केली जात असून एका एकरात लाखो रुपयांचे उत्पादन यातून घेतले जात आहे. वांगे(हिरवे)या पिकाची लागवड १५ मे नंतर हे शेतकरी करत असून ठिबकसिंचनवर ४ बाय २ च्या ओळीवर याची लागवड करून योग्य वेळी फवारणी व खताची मात्रा देऊन एका एकरात लाखोंचे उत्पादन यातून घेतले जात आहे.अंतुली येथील जवळपास शेतकऱ्यांच्या शेतात भरिताचे हिरवे वांगे पेरलेले असून हे वांगे इतर राज्यातील भिलाई, हैद्राबाद,कलकत्ता, सुरत अहमदाबाद तसेच जवळपासच्या धुळे व जळगाव नंदुरबार नाशिक जिल्ह्यात विक्रीला जात आहेत.
हा माल जास्त राहत असल्यामुळे दुरदूरचे व्यापारी जागेवरूनच वांग्याची खरेदी करतात.सद्या या पिकाला नगण्य भाव मिळत असून काही वेळेस ४० रु प्रति किलोने हे वांगे विकल्या गेल्याचे शेतकरी सांगत आहेत.चौकट ;’भावाला किनार नसल्याने शेतकऱ्यांचे वांदे.आर्थिक प्रगतीला ब्रेक.’दरवर्षी वांगे पिकाला सुरुवातीला भाव मिळतो, मागणी जास्त व पुरवठा कमी यामुळे हे भाव मिळत असतांना गेल्या एक दोन वर्षात या पिकाकडे अनेक शेतकऱ्यांनी मोर्चा वळविळ्याने भावाचे यावर्षी चांगलेच वांदे झाले आहे.सद्या या पिकाला अतिशय नगण्य भाव मिळत असून उत्पादन खर्च मात्र खूप वाढला आहे. रासायनिक खते व औषधांच्या किमती यात बेसुमार वाढ झाल्याने आगामी काळात भावात सुधारणा झाली नाही तर अनेक शेतकरी या पिकाला पुढील वर्षी अखेरचा बाय बाय करण्याच्या तयारीत आहे.
प्रतिक्रिया ;’मी गेल्या तीन चार वर्षांपासून या पिकाची लागवड करत असून यावर्षी नेहमीप्रमाणे दोन एकर क्षेत्रात हे पीक घेतले आहे.सुरुवातीला या पिकाला बऱ्यापैकी भाव होते.मात्र आता केवळ ७ ते ८ रुपये प्रती किलो ठोकचे भाव मिळत असल्यामुळे हे पीक आताच्या काळात परवडणारे नाही. आमच्यासारख्या जुन्या शेतकऱ्यांचा कमीत कमी या पिकातून खर्च तरी निघाला. यावर्षी नवीन एन्ट्री करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र या पिकाने चांगलेच आसमान दाखविले.’- योगेश मोतीलाल ईशी,शेतकरी,अंतुली


