आयुष्यातले सांगाती २६,…डॉ. विष्णू भिकाजी उपाख्य भाऊसाहेब कोलते,…ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वि. भि. उपाख्य भाऊसाहेब कोलते हे केवळ एक शिक्षणतज्ञ आणि उत्तम प्रशासकच होते असे नाही, तर ते एक विद्वान संशोधक आणि नामवंत साहित्यिक देखील होते. त्याचप्रमाणे व्यापक जनसंपर्काचे धनी असलेले भाऊसाहेब ही सर्वांशीच स्नेहबंध जपणारे सदगृहस्थ देखील होते. त्यांचा स्नेहबंध असणाऱ्यांपैकी मी देखील एक होतो.
भाऊसाहेब नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू झाले तेव्हा मी अगदी शाळकरी विद्यार्थी होतो. त्यामुळे माझा त्यांचा संबंध येण्याचे काही कारणच नव्हते. नाही म्हणायला एकदा शालेय स्पर्धेत गेलो असताना ते प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. तेव्हा त्यांचे भाषण ऐकले होते. शाळा सोडून मी महाविद्यालयात गेलो तेव्हा देखील ते नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू होतेच. नंतर दोन वर्षांनी विद्यापीठात जे सामूहिक कॉपी प्रकरण गाजले. त्यात त्यांनी जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नंतर सार्वजनिक जीवनात ते सक्रिय होतेच.
माझा भाऊसाहेबांचा सर्वप्रथम परिचय झाला तो १९८२ मध्ये. त्यावेळी मी मुंबई दूरदर्शनचा विदर्भातील कंत्राटी छायाचित्रकार म्हणून कार्यरत होतो. १९८२ च्या ऑगस्ट महिन्यात नागपूर दूरदर्शनचा शुभारंभ व्हायचा होता. सुरुवातीचे कार्यक्रम तयार करण्याची जबाबदारी मुंबई दूरदर्शनवरच होती. त्यासाठी जुलै महिन्यात मुंबई दूरदर्शनची एक टिम निर्माते आकाशानंद यांच्या नेतृत्वात नागपुरात मुक्काम ठोकून होती. ही टीम येण्याआधीच मला निरोप मिळाला होता, आणि चित्रीकरण करायच्या कार्यक्रमाबाबत माहिती देऊन नियोजन करण्याचे कळविण्यात आले होते. त्यात पहिल्याच दिवशी प्रसारित करण्यासाठी सारस्वती जन्मभू नामक माहितीपट चित्रित करायचा होता. या माहितीपटात भाऊसाहेब कोलते, वामनराव चोरघडे, दीनदयाल गुप्ता, डॉ. के.जी. जोशी. डॉ. श्रीनिवास लोकरे प्रभृतींची भाषणे देखील ध्वनिचित्रित करायची होती. या सर्वांशी बोलून कार्यक्रमाचे नियोजन मला करायचे होते.
याच संदर्भात बोलण्यासाठी भाऊसाहेब कोलते यांच्याकडे त्यावेळी सर्वप्रथम मी त्यांच्या रामदासपेठेतील कॅनल रोडवरील घरी भेटायला गेलो होतो. कुर्ता पायजामा अशा घरगुती वेशात आपल्या अभ्यासिकेत बसलेल्या भाऊसाहेबांची ती माझी पहिली भेट होती. त्यांना भेटून मी कामाचे स्वरूप त्यांना समजावून सांगितले. आकाशानंदांचाही आपल्याला फोन येईल हे देखील त्यांना सांगितले. भाऊसाहेबांनी देखील सविस्तर चौकशी केली. नंतर माझी देखील त्यांनी चौकशी केली. मग त्यांच्याकडे चहा घेऊन मी निघालो होतो. चित्रीकरणाची तारीख ठरल्यावर तसा फोन करीन हे देखील मी त्यांना सांगितले होते.
चित्रीकरणाची तारीख वेळ आणि स्थळ ठरले. सिव्हिल लाईन्समधील घटाटे बंगल्याच्या सभागृहात हे चित्रीकरण करायचे ठरले होते. तसे भाऊसाहेबांना मी कळवले. त्यांनी देखील मी वेळेवर पोहोचतो असे स्पष्ट केले होते.
मात्र चित्रीकरणाच्या अर्धा तास आधी भाऊसाहेबांचा घटाटे यांच्याकडे फोन आला. त्या दिवशी त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर नसल्यामुळे त्यांची येण्याची अडचण होती. त्यामुळे कोणी स्कूटर स्वार जरी पाठवला तरी त्याच्याबरोबर डबल सीट मी येऊन जाईल, असे त्यांनी सांगितले. मग आकाशानंदांनी स्कूटर घेऊन मलाच रवाना केले होते.
मी भाऊसाहेबांकडे पोहोचलो आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. आम्ही स्कूटरवर निघालो असतो तर दोघेही भिजलो असतो. मग मी त्यांच्या बंगल्याच्या पोर्चमध्ये उभा राहून एखादा रिक्षा दिसतो का ते बघायला लागलो. अचानक एक ऑटोरिक्षा दिसला. त्याला मी थांबवले आणि तो रिक्षा आत पोर्चमध्ये घेतला. मग रिक्षात मी आणि भाऊसाहेब दोघेही बसलो आणि रिक्षा घटाटे बंगल्याकडे निघाला.
ऑटो रिक्षात बसल्यावर पावसाचे शिंतोडे येत होते. भाऊसाहेब भिजू नयेत म्हणून मी त्यांना थोडे अलीकडे सरकायची विनंती केली. तर ते मला म्हणाले “थोडं भिजू द्या हो, चालते,” मग क्षणभराने ते मला म्हणाले “अशा पावसात भिजायची एक वेगळीच मजा असते पाठक. फक्त त्यासाठी तुमच्याजवळ मनमुराद तारुण्य हवे, आणि सोबत एखादी सखी सुद्धा हवी. आता माझं काय मी सत्तरी ओलांडलेला म्हातारा आहे, आणि माझी सखी सुद्धा आता नाही, त्यामुळे माझा काही प्रश्नच नाही, पण तुमच्याकडे तारुण्य आहे, आता तुमच्या सोबत एखादी सखी असती, तर मी रीक्षाने आलो असतो आणि तुम्हाला सखीसोबत तुमच्या स्कूटरवर पाठवले असते.” असे मिश्किलपणे म्हणत भाऊसाहेब माझ्याकडे बघून हसले. मी त्यांची नजर टाळून रस्त्याकडे बघू लागलो.
थोडा वेळ गेल्यावर भाऊसाहेबांनी मला विचारले, “पाठक तुमचं लग्न झालं आहे का?” मी “नाही” सांगितले. तेव्हा भाऊसाहेब लगेच म्हणाले “मग लवकर करा, . तुमचं आता वय काय?” मी उत्तर दिले “आता 27 चा पूर्ण झालो आहे” तर लगेच म्हणाले, “आता तुमचं लग्नाचं वय आहे, लगेच करा आणि तोवर एखादी सखी तरी पकडा, आणि अशा पावसात भिजत चला.” मी काहीही न बोलता शांत बसून होतो. भाऊसाहेब मिश्किल पणे माझ्याकडे बघत होते. एव्हाना रिक्षा घटाटे बंगल्यात पोहोचली होती.
त्यादिवशी चित्रीकरण आटोपले. मग घटाट्यांच्याच कारने मी चोरघडे आणि भाऊ साहेबांना सोडायला गेलो होतो. भाऊसाहेबांच्या घरी उतरल्यावर त्यांना आतपर्यंत नेऊन सोडले. तेव्हा पुन्हा भाऊसाहेब मला म्हणाले “पाठक माझी सूचना लक्षात ठेवा बरं.” मी काहीही न बोलता बाहेर निघून आलो.
सारस्वती जन्मभूचे चित्रीकरण पूर्ण झाले. तो माहितीपट १५ ऑगस्ट १९८२ ला नागपूर दूरदर्शनवर प्रसारित झाला. दुसऱ्याच दिवशी भाऊसाहेबांचा मला घरी फोन आला होता. “पाठक कार्यक्रम छान झाला, तुमचेही अभिनंदन आणि आकाशानंदांचे देखील. त्यांनाही माझा निरोप कळवा.” असे सांगून त्यांनी कौतुक केले होते.
नंतर जवळजवळ वर्षभर त्यांची माझी भेट नव्हती. १९८३ मध्ये नागपूर दूरदर्शनसाठी कार्यक्रम निर्मितीची जबाबदारी मुंबई दूरदर्शनचे दुसरे एक निर्माते मनोहर पिंगळे यांच्याकडे आली. त्यांनी मुलुखावेगळी माणसं आणि वऱ्हाडी माणसं हे दोन कार्यक्रम तयार करायचे ठरवले होते. व-हाडी माणसं या मालिकेत भाऊ साहेबांचा कार्यक्रम घेण्याचा त्यांचा विचार होता. योगायोगाने त्याच वर्षी भाऊसाहेब ७५ व्या वर्षात पदार्पण करणार होते. मग त्या संदर्भात मी भाऊसाहेबांना भेटायला गेलो. या कार्यक्रमांचे चित्रीकरण मुंबईत व्हायचे होते. मी भाऊसाहेबांना प्रस्ताबाबत सांगितले असता “पाठक वयापरत्वे मुंबईचा प्रवास कशाला करायला लावता? त्यापेक्षा पिंगळेनाच इथे यायला आणि माझा कार्यक्रम करायला सांगा “असे भाऊ साहेबांनी सुचवले. तरीही “भाऊ साहेबांना तू तयार कर आणि मुंबईला पाठव” असा पिंगळे सरांचा आग्रह होता. त्यामुळे दोन तीनदा मी भेटलो. मात्र त्यावेळी भाऊसाहेब प्रवासाला तयार नव्हते.
त्याच दरम्यान त्यांच्या ७५ व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त नागपूरच्या धनवटे रंगमंदिरात झालेल्या त्यांच्या सत्कार समारंभाला मी उपस्थित राहिलो होतो. दूरदर्शनसाठी मी त्याचे चित्रीकरण देखील केले होते. कार्यक्रमानंतर भाऊसाहेबांना भेटलो. तेव्हा एकदा घरी येऊन भेटा थोड्या गप्पा मारायच्या आहेत, असे त्यांनी सांगितले. मग दोन-तीन दिवसांनी फोन करून त्यांच्याकडे गेलो होतो. तासभर गप्पा मारल्या होत्या.
वर्षभराने मनोहर पिंगळे नागपुरात आले होते. भाऊसाहेबांवर कार्यक्रम मुंबईच्या स्टुडिओतच चित्रित करायची त्यांची इच्छा होती. मग भाऊसाहेबांची वेळ घेतली आणि पिंगळे सरांना घेऊन मी त्यांच्या घरी गेलो. मुंबई दूरदर्शन ला जाण्यापूर्वी पिंगळे सर नागपुरातच एका महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्याचबरोबर ते विद्यापीठाच्या राजकारणातही सक्रिय होते. त्यामुळे त्यांचा भाऊसाहेबांचा चांगला परिचय होता. मग पिंगळे सरांनी भाऊसाहेबांना मुंबईत कार्यक्रमासाठी यायला तयार केले. कार्यक्रमाच्या चित्रीकरणाची तारीख ठरली. मात्र त्यात दाखवण्यासाठी भाऊसाहेबांचे काही घरातले तर काही अभ्यासिकेतले असे शॉट्स पिंगळे सरांना हवे होते. ते चित्रीकरण करण्याची जबाबदारी माझ्यावरच झाली. मी वेळ ठरवून भाऊ साहेबांकडे गेलो आणि जवळजवळ तीन तास थांबून त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे चित्रीकरण केले होते. तो कार्यक्रम यथावकाश मुंबई आणि नागपूर मध्ये प्रसारित झाला. कार्यक्रम पाहिल्यावर भाऊसाहेबांचा मला आवर्जून फोन आला होता.
यानंतर अधून मधून कुठे कार्यक्रमांमध्ये तर कुठे कोणाच्या समारंभात भाऊसाहेबांची ओझरती भेट व्हायची. मात्र भेटल्यावर ते आवर्जून चौकशी करायचे. माझ्या व्यस्ततेत त्यांच्याकडे जाणे मला शक्य होत नव्हते. अधून मधून भेटल्यावर ते मी लग्न केले की नाही याची चौकशी मात्र आवर्जून करायचे. १९८५ मध्ये नागपुरात विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना विधान भवन परिसरात अचानक भाऊसाहेबांची भेट झाली. त्यांच्याबरोबर त्यांचे चिरंजीव प्रदीप हे देखील होते. मी दिसताच त्यांनी मला आवाज दिला.” पाठक मला मुख्यमंत्री वसंत दादा पाटलांना भेटायचे आहे. जरा ते कुठे बसतात ते सांगता का?” माझ्यासोबत काँग्रेस कार्यकर्ते नानासाहेब घु
ओले पाटील हे होतेच. ते देखील भाऊसाहेबांना ओळखत होते. मग आम्ही दोघे भाऊसाहेबांना घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेलो. दादांनी देखील भाऊसाहेबांचे स्वागत केले. भाऊसाहेबांचे काम त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगताच मुख्यमंत्र्यांची संबंधितांशी बोलून ते काम मार्गी देखील लागले होते.
१९९० मध्ये माझे लग्न झाले. लग्नाची निमंत्रण पत्रिका भाऊसाहेबांना आवर्जून पाठवली होती. मात्र वयापरत्वे प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते येऊ शकले नव्हते. त्यांचे आशीर्वादपर पत्र मात्र मला आले होते.
लग्नानंतर साधारणतः दोन महिन्यांनी एका संध्याकाळी मी रामदास पेठेतून कॅनॉल रोडनेच स्कूटर वर चाललो होतो. सोबत माझी पत्नी देखील होती. भाऊ साहेबांच्या घरासमोरूनच जाताना बाहेर पायी फिरायला निघालेले भाऊसाहेब दिसले. म्हणून मी स्कूटर थांबवली आणि त्यांच्याकडे गेलो. आम्हा उभयतांना पाहून त्यांनाही चांगलाच आनंद झाला होता. मग त्यांनी लग्नाला येऊ न शकल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली, आणि माझे आशीर्वाद आहेच असेही सांगितले. थोड्या इतर गप्पा मारून निघताना भाऊ साहेबांना जुनी आठवण झाली असावी. त्यांनी मग मिश्किलपणे विचारले,” पाठक आता तुमच्या सोबत सखी आहेच, आणि तारुण्य सुद्धा, तेव्हा आता पावसात भिजायला काही हरकत नाही” त्यांचे हे बोलणे ऐकून मी स्कूटरला किक मारली आणि “येतो भाऊसाहेब” म्हणून लगेच निघालो त्यांची ही आठवण मी माझ्या “माझ्या खिडकीतले आकाश” या पुस्तकात “पिकले पान हिरवे देठ” या शीर्षकाखालील लेखात दिलेली आहे.
यानंतर भाऊसाहेब प्रकृतीच्या कारणास्तव बाहेर सार्वजनिक कार्यक्रमात फारसे जातच नव्हते. त्यामुळे आमच्या भेटीगाठी खूप कमी झाल्या होत्या. १९९२ मध्ये नामवंत मराठी साहित्यिक आणि पत्रकार विद्याधर गोखले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. ते निकाल जाहीर झाल्यावर त्यांचे महाविद्यालयीन गुरु असलेले भाऊसाहेब कोलते यांना भेटायला जाणार होते.अण्णा गोखलेंसोबत मी देखील भाऊसाहेबांना भेटायला गेलो होतो. तिथे तब्बल दोन वर्षांनी भेटल्यावर सुद्धा भाऊसाहेबांनी आवर्जून माझी चौकशी केली. कधीतरी जमेल तसे भेटत चला असेही त्यांनी सुचवले होते.
याच काळात मी दूरदर्शन सोडून मुद्रित माध्यमात पत्रकारिता सुरू केली होती. त्यामुळे नव्या क्षेत्रात कामाचा व्याप वाढला होता. परिणामी प्रत्यक्ष भेटायला जाणे शक्य होत नव्हते. तरीही भाऊसाहेबांना जेव्हा पद्मश्री जाहीर झाली तेव्हा मी जाऊन भेटलो होतो, आणि त्यांचे अभिनंदन देखील केले होते. त्यांची प्रतिक्रिया देखील मी प्रतिनिधी असलेल्या वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित केली होती.
नंतर मात्र आमची भेट होऊ शकली नाही. दोन-तीनदा काही निमित्ताने काही वांङमयीन घटनांच्या संदर्भात माहिती किंवा प्रतिक्रिया घेण्यासाठी फोनवर बोलणे झाले होते तेवढेच.
माझ्या आठवणीनुसार १९९८ चा एप्रिल महिना असावा. त्या दिवशी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी नागपुरात होते. सकाळपासून मी त्या धावपळीतच होतो. दुपारी तीन वाजता जोशी सरांची रामगिरी या शासकीय निवासस्थानी पत्र परिषद होती. तिथे पोहोचलो असता सहजच पत्र परिषदेनंतर मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम काय, अशी चौकशी जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडे केली, असता पाच वाजता ते भाऊसाहेब कोलतेंच्या निवासस्थानी जाणार असल्याचे कळले. आज तिथे जाण्याचे कारण काय असे मी विचारले असता, “तुम्हाला कळले नाही का? कोलते सर आज सकाळीच गेलेत. त्यांचे अंत्यदर्शन घ्यायला सी एम जात आहेत” हे कळल्यावर मलाही धक्काच बसला. भाऊसाहेबांचे वय झाले होते. प्रकृती देखील ठीक राहत नव्हती. तरीही ते इतक्या लवकर जातील असे वाटले नव्हते. मग मुख्यमंत्री अंत्यदर्शनाला गेले असताना तिथे देखील मी गेलो त्याचेही वृत्त संकलन पाठवले.
त्या दिवशी रात्री नऊ वाजता भाऊसाहेबांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी देखील मी उपस्थित होतो. भाऊसाहेबांचे चिरंजीव सनदी अधिकारी दिलीप कोलते यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. त्यावेळी नागपूर विदर्भातील अनेक मान्यवर तिथे उपस्थित होते. त्यावरूनच त्यांचे मोठेपण अधोरेखित होत होते.
भाऊसाहेबांचा माझा संबंध पंधरा-सोळा वर्षांतला. त्यातही भेटी अशा खूप झाल्या नाहीत. मात्र फोनवर बोलणे खूपदा झाले. असे असले तरी त्या काळातल्या सुखद आठवणी आजही ताज्या आहेत. त्याच वेळी या मोठ्या माणसाने माझी आठवण ठेवावी आणि माझ्याशी संपर्क ठेवावा यात त्यांचे मोठेपण तर दिसतेच, त्याचबरोबर त्यांनी माझ्याशी ठेवलेला संबंध हे ईश्वरी वरदानच आहे असे मी समजतो.


